esakal | बंधन प्रेमाचं, बंधन आरोग्याचं !
sakal

बोलून बातमी शोधा

Rakshabandhan

बंधन प्रेमाचं, बंधन आरोग्याचं !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

‘संपूर्ण कुटुंब एकत्र राहावे, सर्वांचा विकास व्हावा, आपले कुटुंब प्रथम सामाजिक व नंतर वैश्र्विक कुटुंबामध्ये समाविष्ट होण्यासाठी लागणारे भावनिक व मानसिक आरोग्य नीट राहावे हे सर्व अभिप्रेत असते आणि राखीबंधनाचा हाच खरा उद्देश असतो.’

उद्या आहे राखीपौर्णिमा. फार पुरातन काळापासून भारतीय परंपरेतील महत्त्वाचा संस्कार करणारा सण आणि घटना म्हणजे राखीपौर्णिमा. बहीण जरी भावाच्या हातावर राखीचा धागा बांधत असली तरी हा सर्व कुटुंबसंस्थेला एकत्र बांधणारा धागा असतो. गुणसूत्रांनी सर्व कुटुंबीय एकमेकांशी बांधलेले असतात. पर्यायाने या गुणसूत्रांवर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य, एकमेकांसोबतचे भावनिक व्यापार अवलंबून असतात. या सूत्रावर संस्कार व्हावा, कुठल्याही प्रकारचे वंशपरंपरागत दोष येऊ न देता आरोग्याचे संरक्षण व्हावे, वंशवृद्धी व्हावी, समृद्धी मिळावी यासाठी राखीच्या रूपाने आरोग्यधागा तयार करून बांधणे ही आहे खरी राखीपौर्णिमा.

सुंदर केशरी - सोनेरी रंगाच्या रेशमी धाग्याला, गोंडे लावून, सुशोभित करून राखी बांधण्याची परंपरा फार पुरातन आहे. त्या परंपरेची ताकद एवढी की नवीन नातेसंबंध जोडत असताना धागा हातावर बांधला तर जणू त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाला कल्याण व आरोग्य संज्ञेत समाविष्ट करून घेतले आहे असे समजले जात असे.

खरे तर पूर्वीच्या काळी हा धागा कुटुंबातल्या सर्वांच्याच हातावर बांधला जात असे. पण त्यातल्या त्यात बहीण लग्न होऊन दुसऱ्याच्या घरात जाणार असते, तिचा संपूर्ण जीवनव्यापार दुसऱ्या कुटुंबाशी जोडला जाणार असतो, अशा वेळी भविष्यकाळात तिचा मूळ कुटुंबाशी असलेला धागा तुटू नये या दृष्टीने बहिणीने भावाला राखीचा धागा बांधण्याचे महत्त्व विशेष असते. पिढ्यांमधील अंतर वाढत गेले व चुलत, मावस वगैरे इतर नाती जरी लक्षात ठेवली नाहीत तरी बहीण भावाचे नाते लक्षात ठेवावेच लागते. कारण अज्ञानामुळे, कळत- नकळत जरी रक्ताच्या नात्यांबरोबरचा संबंध बिघडला तर पुढील पिढीमध्ये शारीरिक, मानसिक दोष उत्पन्न होऊ शकतात. खरे म्हणजे राखी बांधण्याचा संस्कार म्हणजे हे निसर्गचक्र सुरळीत चालत राहण्याचे दिलेले आश्र्वासनच आहे.

बहीण दुसऱ्या घरी गेली तरी ती मूळची आपल्याच घरातील आहे हे समजून तिला आपल्या कुटुंबाचे सर्व हक्क देणे आवश्यक आहे. एकदा का मुलगी लग्न होऊन दुसऱ्या घरी गेली की तिचा आईवडिलांचे प्रेम व संपत्तीवर हक्क नसल्यासारखे होते, हे आपण अनेक ठिकाणी पाहतो. किंबहुना माहेरी खूप संपत्ती असली तर अनेक ठिकाणी बहिणीला कायदेशीर कारवाई करण्याची वेळ येते, कारण भाऊ तिला परकी मानायला लागतो. राखीमुळे त्याच्या हे लक्षात राहील की आपण दोघे एकाच धाग्याने बांधले गेलेले आहोत. कुटुंबातले नातेसंबंध हे रक्तात आलेली जनुके, त्यांची नैसर्गिक समानता व प्रेमाच्या अनुभवातून आलेले असतात. सर्वांचे जीवनधागे एका केंद्रबिंदूशी बांधलेले असल्यामुळे ही एकमेकातली ओढ तयार झालेली असते. वडील, भाऊ, बहीण, काका, मामा, मावशी या नात्यांची एकमेकांशी विशिष्ट अंतरे असतात व त्यामुळे दोन नात्यातील माणसांचे एकमेकांशी होणारे आचार-विचार ठरलेले असतात. त्यामुळे राखीबंधनाच्या निमित्ताने एकत्र येण्याने सुद्धा मानसिक ताण तयार होत नाहीत व सर्वांचेच आरोग्य चांगले राहते.

शेवटी शारीरिक आरोग्यावर मनाचाच प्रभाव असतो. म्हणून दोन व्यक्तीत जनुकीय संबंध जरी नसला तरी ते मनापासून खरोखरीच एकमेकांशी जोडले गेले असतील तरी त्यांच्यात एक मायेचे नाते व कौटुंबिक आपुलकी तयार होते आणि म्हणूनच हे नाते केवळ रक्ताच्या भावा - बहिणींपर्यंत मर्यादित नसते. संपूर्ण कुटुंब एकत्र राहावे, सर्वांचा विकास व्हावा, आपले कुटुंब प्रथम सामाजिक व नंतर वैश्र्विक कुटुंबामध्ये समाविष्ट होण्यासाठी लागणारे भावनिक व मानसिक आरोग्य नीट राहावे हे सर्व अभिप्रेत असते आणि राखीबंधनाचा हाच खरा उद्देश असतो. म्हणूनच देव आपले संरक्षण करतात असे समजून आपण देवालासुद्धा राखी बांधतो. याच भावनेतून आपले गुरु किंवा इष्टचिंतक आपली सर्वतोपरी काळजी घेणारे असल्याने हा धागा त्यांच्याही हातावर बांधून रक्षाबंधन साजरे केले जाऊ शकते. राखीच्या रेशमी धाग्यात मांगल्य आणावे लागते, त्याला अभिमंत्रित करावे लागते. अभिमंत्रित म्हणजे एखादा क्लिष्ट मंत्र म्हणायचा असे नव्हे, तर आपल्या इच्छेने, सद्भावनेने, चांगल्या कल्पनेने त्याला अभिमंत्रित करता आले तर ती भावना, ते तत्त्व मनापर्यंत व आत्म्यापर्यंत पोहोचविण्याचे काम तो धागा करू शकतो. सर्वांसाठी लाभदायक असलेला हा मंगल सण व मंगल बंधन आपण सर्वांनी जर कौटुंबिक आरोग्यासाठी व पर्यायाने व्यक्तिगत आरोग्यासाठी साजरा केला तर सर्व मानवजातीचे कल्याण होईल.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

loading image
go to top