साथी हाथ बढाना...

आयुर्वेदाने हात हे महत्त्वाचे शस्त्र आहे असे सांगितले आहे. विशेषतः शस्त्रकर्मात निपुण असणाऱ्या सुश्रुताचार्यांनी हाताला खूप महत्त्व दिले आहे.
Hand
Handsakal
Summary

आयुर्वेदाने हात हे महत्त्वाचे शस्त्र आहे असे सांगितले आहे. विशेषतः शस्त्रकर्मात निपुण असणाऱ्या सुश्रुताचार्यांनी हाताला खूप महत्त्व दिले आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये सकाळी उठल्यवर सर्वप्रथम काय करायला सांगतले, तर करदर्शन करायला सांगतिले. कर्म करणारे ते कर! दिवसाची सुरुवात हातांची ओंजळ करून एकमेकाला जोडलेल्या तळहातांकडे पाहून करण्यामागे खूप मोठा विचार दडलेला आहे.‘कराग्रे वसते लक्ष्मीः करमूले सरस्वती, करमध्ये तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम्‌’असे म्हणून मी या हातांचा दुरुपयोग करणार नाही, मी दुसऱ्याला हात दाखविणार नाही व उगारणारही नाही, मदतीसाठी मात्र माझा हात सदैव पुढे राहील असा संकल्प करून नंतर दोन हातांनी कामाला लागण्याची ही सूचना खूप मोलाची होय.

आपण म्हणतो की मनगटात ताकद असली की शत्रूही बिचकून असतो तेव्हा ज्याचे हात ताकदवान व कार्यरत आहेत त्याला रोगसुद्धा घाबरतो. हातांचा संबंध संपूर्ण शरीरात घडणाऱ्या क्रियांशी व आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी दिसून येतो. म्हणून हातावर त्या प्रसंगांचे ठसे उमटतात किंवा हातावरील चिह्ने पाहून पाहून भूतकाळ सांगता येतो किंवा भविष्याचा अंदाजही घेता येतो

आयुर्वेदाने हात हे महत्त्वाचे शस्त्र आहे असे सांगितले आहे. विशेषतः शस्त्रकर्मात निपुण असणाऱ्या सुश्रुताचार्यांनी हाताला खूप महत्त्व दिले आहे. ते म्हणतात ‘हस्तमेव प्रधान शस्त्रम्‌ ।’ अर्थात शस्त्रकर्म करण्यासाठी जरी अनेक शस्त्रे, यंत्रे, उपकरणे हाताशी असली तरी त्यांना कुशलतेने हाताळणे फक्त हातामुळे शक्य होते. म्हणून एखादे शस्त्र कितीही प्रगत आणि उत्कृष्ट असले तरी शस्त्रकर्म करणारे हात त्याहून महत्त्वाचे असतात. अभ्यंग, संवाहन हे आयुर्वेदिक उपचारांचे वैशिष्ट्य होय. त्यासाठी हात महत्त्वाचे असतात.

क्वचित काही ठिकाणी पायाने संवाहन करण्याची पद्धत असली तरी मुख्यत्वे हातांनीच अभ्यंग केला जातो. कुशल आणि शास्त्राभ्यास केलेल्या परिचारकाचे हात इतके संवेदनशील व जाणिवेने परिपूर्ण असतात की त्याला अभ्यंग किंवा संवाहन करताना कुठल्या स्नायूंमध्ये किती कडकपणा आहे, कुठे आमदोष साठलेला आहे, कुठे प्राणशक्ती कमी पडते आहे हे हात लावल्या क्षणी कळू शकते व त्यानुसार कुठे किती दाब द्यायचा किंवा कुठे किती हळुवारपणे प्राणशक्तीला चालना द्यायची हे सर्व आपसूक कळते.

वैद्यांचे नाडीपरीक्षण हेही त्यांच्या बोटांच्या संवेदनशीलतेवर आणि मन-बुद्धी केंद्रित करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. वस्तू देण्या-घेण्यासाठी तर आपण हातांचा वापर करत असतोच पण शक्ती देण्यातही हात सर्वश्रेष्ठ असतात. संत-महात्मे, देव आशीर्वचन हाताने देतात हे आपण जाणतोच पण आपणही आपले हात शक्ती देण्यासाठी वापरत असतो. एखाद्या ठिकाणी दुखत असले तर चटकन आपला हात त्या ठिकाणी जातो कारण तिथले असंतुलन दूर करण्यासाठी हवी असलेली प्राणशक्ती देण्याचे सामर्थ्य हातात असते, असू शकते.

आयुर्वेदाने हातांच्या योगे डोळ्यांची शक्ती वाढवण्याची एक सोपी पद्धत दिलेली आहे, 'आचम्य जलयुक्ताभ्यां पाणिभ्यां चक्षुषी स्पृशेत्‌ । भुक्त्वा पाणितले घृष्ट्‌वा चक्षुषोर्यदि दीयते ॥ जातरोगा विनश्‍यन्ति तिमिराणि तथैव च ।...योगरत्नाक.' जेवणानंतर पाण्याचे आचमन करावे, ओले हात एकमेकांवर चोळून डोळ्यांना लावावे. असे केल्याने नेत्ररोग नष्ट होतात व दर्शनशक्ती वाढते. आचमन म्हणजे तळव्यावर पाणी घेऊन ते आवाज न करता ओठांनी सावकाश पिणे हेही आयुर्वेदाने रोजच्या दिनक्रमात सांगितलेले आहे. प्रत्यक्षातही आचमन करून घेतलेल्या पाण्याने तहान चांगल्या प्रकारे शमते असा अनुभव येतो. हाताचा अजून एक उपयोग सांगितलेला आहे तो ‘पाणिस्वेद’ उपचारात.

लहान मुलांना जेव्हा शेकायचे असते तेव्हा तळहात वापरावेत. उदा. बाळाचे पोट दुखत असेल तर तळहात गरम करून पोटावर लावावेत. यामुळे दोन गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे बाळाला चटका बसण्याची शक्यता संपुष्टात येते आणि दुसरे म्हणजे शेकाबरोबर बाळाला हातांकरवी प्राणशक्तीही मिळते. असे म्हणतात की व्यक्तीचे वय हे तिच्या हातांवर दिसते. म्हणजेच काय तर वय वाढण्याची जी काही लक्षणे आहेत ती सर्वप्रथम हातांवर दिसू लागतात.

म्हणूनच आरोग्य टिकविण्याची इच्छा असणाऱ्यांनी आपल्या हातांची नीट देखभाल करावी. कडक, कोरडे हात वात वाढल्याचे सुचवितात, भेगा पडलेले हात शरीरातला स्नेह लक्षणीय प्रमाणात कमी झाल्याचे दर्शवत असतात. लालसर, स्पर्श सहन न होणारे किंवा साले निघणारे हात पित्त वाढल्याची नांदी देत असतात, अतिशय निस्तेज, पांढरट हात शरीरातील रक्तधातू कमी झाल्याचे सांगत असतात. सातत्याने थंड असणारे हात रक्ताभिसरण कमी होत असल्याचे, अग्नी अशक्त असल्याचे सुचवत असतात. मात्र गुलाबीसर, गुबगुबीत, मऊ हात आरोग्याचा निदर्शक असतो.

स्पर्श अतिशय बोलका असतो. नुसत्या स्पर्शाने समोरच्याला बरेच काही सांगता येते. आश्र्वस्त करण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे हात. याचा आपण सर्वांनी कधी ना कधी अनुभव घेतलेला असतो. जोपर्यंत मनुष्य दोन हातांनी काम करतो तोपर्यंत एका तोंडाला सांभाळणे व त्याचबरोबर संपूर्ण आरोग्य प्राप्त करून घेणेही शक्य आहे. अशा प्रकारे ‘अपना हाथ जगन्नाथ’ ही म्हण सिद्ध केल्याचा अनुभव प्रत्येकाला घेता येतो. यातूनच पुढे एकमेकाला ‘हात देणे’, ‘साथी हाथ बढाना’ अशी आवाहने केली जातात. कुणी आजारी असल्यास हाताने धीर देण्याचे महत्त्व सर्वाधिक असते. कोणीतरी खांद्यावर हात ठेवल्यानंतर आश्र्वासन मिळते, धीर मिळतो, आत्मविश्र्वास वाढतो व रोगपरिहार सोपा होतो.

तसेच ज्यावेळी एकमेकाला हात देत म्हणजेच आपल्याला मिळालेल्या मदतीने पुढच्याला मदत करून एक सत्कृत्यचक्र किंवा मदतशक्तीचे वर्तुळ तयार केले जाते तेव्हा कुठल्याही दुष्ट शक्तीला आत प्रवेश करणे अशक्य असते आणि निसर्गचक्राला मदत केल्यामुळे कर्मबंधने तयार होत नाहीत. रुग्णांनी एकत्र येऊन एकमेकांशी हातमिळवणी केली असता रोगाचा सामना करणे खूप सोपे होते. विशिष्ट रोगासाठी रुग्णांनी एकत्र येऊन एकमेकाला मदतीचा हात दिला तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. बऱ्याच वेळी नुसता ‘नशिबाने हात दिला’ असे म्हटले जात नाही तर अडीअडचणीच्या वेळी मिळणाऱ्या मदतीलाही ‘हात देणे’ असा वाक्प्रचार वापरला जातो.

असे म्हणतात की प्रत्येकाच्या हातावरच्या व बोटावरच्या रेषा वेगळ्या असतात म्हणून माणसाची खरी ओळख व्यक्तीच्या बोटांच्या ठशांवरून नक्की करता येते. पण खरोखरच हात मनुष्याचे संपूर्ण अस्तित्वाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे एकमेकाला मदत करण्याची वेळ आली असता ‘हातमिळवणी केली’ की काम सोपे होते. स्त्री-पुरुषाचे लग्न होते तेव्हाही ‘हस्तमिलाप’ असेच म्हटले जाते. ‘शेक हँड’ हा सुद्धा एकमेकाच्या मैत्रीचा वा संबंधांना आश्वस्त करण्याचा प्रकार असतो. भारतीयांनी सगळ्यावर कळस करून दोन हात एकत्र करून संपूर्ण शक्ती समर्पित करण्याच्या हेतूने नमस्काराद्वारे योजना केली. ज्यांना आपले जीवन यशस्वी व्हावे असे वाटत असेल, आपले आरोग्य चांगले राहावे असे वाटत असेल त्यांना इतर कशावर विश्र्वास ठेवला न ठेवला तरी आपल्या हातावर नक्की विश्र्वास ठेवावा.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com