चिंता नको, चिंतन हवे.....

मनन-चिंतन हे मनाचे कार्य. एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल, एखाद्या परिस्थितीत नेमका निर्णय घ्यायचा असेल, श्रेयस काय, प्रेयस काय हे माहिती करून घ्यायचे असेल, तर त्यासाठी चिंतन लागतेच.
thinking
thinkingsakal

प्रार्थनेला श्रद्धा आणि भक्ती यांची जोड लागतेच. जीवनात कशावर तरी श्रद्धा असावी, कारण श्रद्धेत मनाला आश्र्वस्त करण्याची शक्ती असते. श्रद्धा हा फक्त अध्यात्मातील विषय नसतो. श्रद्धा फक्त परमेश्र्वरावरच ठेवायला हवी असे नसते. निसर्ग हेसुद्धा परमेश्र्वराचेच एक रूप आहे.

मनन-चिंतन हे मनाचे कार्य. एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल, एखाद्या परिस्थितीत नेमका निर्णय घ्यायचा असेल, श्रेयस काय, प्रेयस काय हे माहिती करून घ्यायचे असेल, तर त्यासाठी चिंतन लागतेच. मात्र, चिंतनाचे रूपांतर चिंतेत होता कामा नये. चिंतनाचा मार्ग ज्ञानाकडे तर चिंतेचा मार्ग रोगाकडे, नाशाकडे नेणारा असतो. एका सुभाषितात म्हटले आहे, ‘चिता चिन्तासमा प्रोक्ता बिन्दुमात्रं विशेषतः। सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता॥’ चिता व चिंता यात केवळ एका बिंदूचा फरक आहे. परंतु कार्याच्या दृष्टीने विचार केल्यास त्यांच्यात फार मोठा फरक आहे. चिता केवळ मृत शरीराला, तर चिंता सजीवालासुद्धा जाळते. मानसिक ताण हा २१व्या शतकातील सर्वांत मोठा असुर आहे, असे म्हणायला हरकत नसावी. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, धातुनाश, चिडचिडेपणा, मारामाऱ्या, नैराश्‍य असे अनेक विकार मुख्यतः मानसिक ताणातून तयार होतात. जन्माबरोबर चिकटलेली चिंता चितेवर जाईपर्यंत साथ सोडत नाही. सध्या संपूर्ण जग कधीही कल्पना न केलेल्या परिस्थितीतून जाते आहे. डोळ्यांनी पाहता न येणाऱ्या या विषाणूने सामान्य व्यक्तीपासून ते वैज्ञानिकांपर्यंत, डॉक्टरांपासून ते राज्यकर्त्यांपर्यंत सर्वांनाच चिंतेने झाकाळून टाकले आहे.

सामान्य जनजीवन कधी सुरू होईल याची चिंता, आपल्याला वा आपल्या प्रियजनांना संसर्ग होणार नाही ना अशी चिंता, व्हॅक्सिन घ्यावी की नाही ही द्विधा, व्हॅक्सिन घेतले खरे पण काही दुष्परिणाम झाले तर काय याची विवंचना, या सर्व प्रकरणात आपली कोणीतरी फसवणूक तर करत नाही ना अशी शंका, शाळा सुरू झाली पण मुलांना शाळेत पाठवणे खरोखरच सुरक्षित आहे का, असा प्रत्येक पालकाला पडणार प्रश्र्न... या प्रश्र्नांना, या शंकांना, या चिंतेला अंत नाही, कशाकशाची म्हणून चिंता करायची? चिंतेचे चिंतन केल्याने चिंता वाढतेच, प्रश्र्न सुटत नाहीत.

योगवासिष्ठात म्हटले आहे, ‘‘चिन्तनेनैधते चिन्ता त्विन्धनेनेव पावकः । नश्‍यत्यचिन्तनेनैव विनेन्धनमिवानलः॥’’ आगीत सरपण टाकल्याने जसा अग्नि प्रज्वलित होतो त्याप्रमाणे विचार करण्याने चिंता (किंवा दुःख) वाढते. इंधनाच्या अभावी जसा अग्नी आपोआप शांत होतो, तसेच विचारांचे वादळ थांबवले की चिंतेला थारा मिळत नाही. चिंता करू नये आणि निदान जी वस्तुस्थिती आहे त्याची काळजी व चिंतन करत बसू नये असा सोपा उपदेश या सुभाषिताद्वारे आपल्याला समजतो पण तसे वागणे शक्य आहे का? काळजी वाटणे-काळजी घेणे हे साहजिकच असते. कार्य व्यवस्थित पार पाडण्याची शक्ती व जागरूकता काळजी वाटण्यामुळे वाढते. पण काळजी घेण्याऐवजी काळजी करण्याची सवय लागली की पर्यवसान चिंतेत होते आणि त्यातून त्रास सुरू होतात. मनाला व्यस्त ठेवले, चांगल्या सर्जनात्मक कामांमध्ये गुंतवले तर मनाचा काळजी करण्याचा स्वभाव आटोक्यात येऊ शकतो. चिंतेपासून मुक्ती खरंच अवघड असणार, म्हणूनच मोरया गोसावींनी प्रार्थना केली, ‘‘चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी। हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी॥’’ पण प्रार्थनेला श्रद्धा व भक्ती यांची जोड लागतेच. जीवनात कशावर तरी श्रद्धा असावी, कारण श्रद्धेत मनाला आश्र्वस्त करण्याची शक्ती असते. श्रद्धा हा फक्त अध्यात्मातील विषय नसतो. श्रद्धा फक्त परमेश्र्वरावरच ठेवायला हवी असे नसते. निसर्ग हेसुद्धा परमेश्र्वराचेच एक रूप आहे.

सर्वांच्या हितासाठी केलेले नवनवीन संशोधन हासुद्धा परमेश्र्वराचाच आविष्कार होय. अंधारात लोकांना व्यवहार करणे अवघड जाते आणि रात्रीच्या अंधारात चोर सोकावतात याच्या चिंतनरूपी चिंतनातूनच एडिसनला विजेचा शोध लागला असावा. जनताजनार्दनाची सेवा हीच खरी भक्ती हे लक्षात आले तर चिंतेचे चिंतन करण्याची पाळी येणारच नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ‘चिंता करितो विश्र्वाची.’ खरी चिंता ‘माझे कसे होईल’ ही असते. मनाची स्वार्थी वृत्ती चिंतेला कारणीभूत असते. स्वतःच्या ‘कंफर्ट झोन’मधून बाहेर पडून निसर्गाच्या संतुलनासाठी काम केले, प्राणिमात्रांच्या आरोग्याचा विचार केला, अडचणीत असलेल्याला यथाशक्ती साहाय्य केले, ‘लाइफ इन् बॅलन्स’सारख्या प्रकल्पात सहभागी होऊन शरीर, मन, समाज, पर्यावरण, अध्यात्म अशा सर्व स्तरांवर संतुलन साधण्यासाठी प्रयत्न केला तर चिंतेची जागा विश्र्वास घेईल, ताणाऐवजी प्रसन्नता, शांतीचा अनुभव घेता येईल. चिंता स्वतःच्या स्वार्थाची करू नये तर सर्वांची, सर्व मानवजातीची करावी म्हणजे ती चिंता न राहता किंवा चितेकडे न नेता समृद्धी व मोक्षाकडे नेईल.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com