संस्कार जलाचा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

International Water Day

संस्कार जलाचा!

पाण्याला समानार्थी शब्द जीवन असावा हा केवळ योगायोग नाही तर यातून खूप काही समजून घेण्यासारखे आहे. भारतीय संस्कृतीनुसार जीवाची उत्पत्ती आणि जीवाच्या उत्क्रांतीची सुरूवात मत्स्यावतारात म्हणजे पाण्यात झाली आणि नंतर हलके हलके कूर्म, वराह, नरसिंह असे जीवनाचे टप्पे सुरू झाले. थोडक्यात पाण्याशिवाय जीवनाची सुरूवात होणार नाही आणि जीवन चालणारही नाही. पृथ्वीव्यतिरिक्त आज कोठल्याही ग्रहावर जीवन आहे का हे शोधताना सर्वप्रथम त्याठिकाणी पाणी आहे का हेच बघितले जाते.

निसर्गचक्र म्हणून जे आपण अनुभवतो त्यात पाण्याची भूमिका सर्वांत महत्त्वाची असते. पावसाळ्यात येणाऱ्या पावसाचे पाणी जीवन समृद्ध करते तेच पाणी उन्हाळ्यात बाष्परूपाने आकाशात परत जाते. जणू काही या पृथ्वीवर काय चालले आहे, कुठल्या स्तरावर सर्व प्राणिमात्र जगत आहेत, याची माहिती वर स्वर्गात देण्याचे काम पाणी करत असते. पृथ्वीच्या पाठीवर घाण वाढली, नद्या प्रदूषित झाल्या, जलप्रवाह आटले, जमिनीखालचे पाणी खोलवर निघून गेले, ही सर्व इत्थंभूत माहिती वर आकाशात पोचवण्याचे काम पाणीच करू शकते. जणु इथली सर्व माहिती गुप्तचराप्रमाणे गोळा करून स्वर्गात पोचवण्याची जवाबदारी पाण्यावर आहे. असे म्हणण्याचे कारण काय तर सध्या झालेल्या प्रयोगांनी असे दिसून आले आहे की पाण्यावर ध्वनीचे, प्रकाशाचे.

एवढेच नाही तर विचारांचे संस्कार होतात. विज्ञानाच्या प्रयोगांनी हे पाहताही येते. शास्त्रज्ञांनी पाण्याचा थेंब गोठवून त्याचे फोटो काढले तेव्हा त्यावर झालेल्या संस्कांरांनुसार ते वेगवेगळे येत असल्याचे लक्षात आले. म्हणजे सर्जनाची कल्पना असलेल्या ठिकाणी मंडल सुंदर व आकर्षक दिसते तर वातावरणात विनाशाची चर्चा असलेल्या ठिकाणी मंडलाची रचना तुटक तुटक व अत्यंत विचित्र दिसते. प्रत्येक नदीच्या पाण्याचे चित्र वेगवेगळे निघते. पाणी हातात घेऊन चांगली कल्पना केली तर पाण्याचे चित्र वेगळे दिसते. पाण्यावर संगीताचाही परिणाम होतो हेसुद्धा वेगवेगळ्या फोटोंवरून सिद्ध करता येते.

सांगायचा हेतू असा की पाणी संवेदनशील असल्यामुळे जगातल्या सर्व संस्कृतींमध्ये पूर्वापार काळापासून पाण्याला महत्त्व दिलेले आढळते. म्हणूनच मक्केला जाणाऱ्यांसाठी ‘झमझम’, चर्चसाठी ‘होली वॉटर’, भारतात ‘तीर्थ व शंखोदक’ यांचे महत्त्व वर्णन केलेले आहे. पाण्यामध्ये विचार समाविष्ट होत असल्यामुळे चुकीच्या जागेचे पाणी पिऊ नये. केवळ स्पर्शाचेच नाही तर विचारांचेसुद्धा पाण्यावर परिणाम होतात हे लक्षात घेऊन, पाणी पिण्यापूर्वी मनातील चांगल्या विचारांचा त्यावर संस्कार करावा असे म्हणतात. हातात पाणी घेऊन शाप वा आशीर्वाद देणे हेही आपण पुराणांत तरी पाहतोच. पैशावर पाणी सोडणे असा वाक्प्रचारही प्रचारात आहे.

आयुर्वेदात पाणी सेवनाचे बरेच नियम दिलेले आहे. उदा. जेवणापूर्वी पाणी पिण्याने अन्न कमी खाल्ले जाते व अन्न कमी गेल्यामुळे मनुष्य कृश होत राहतो. जेवणाच्या नंतर पाणी पिण्याने पाचक रस पातळ झाल्यामुळे, खाल्लेल्या अन्नाचे पचन नीट होत नाही व मेद वाढतो, परिणामतः मनुष्य लठ्ठ होतो मात्र जेवताना अधे मधे घोटघोट पाणी पिण्याने पचन संतुलित होऊन फायदा होतो. ‘रात्री झोपताना पाणी प्याल्यास रात्री उठावे लागते’, असे जे लोक म्हणतात त्यांनी असे लक्षात घ्यायला हवे की लवकर जेवले व जेवताना थोडे थोडे पाणी प्यायले तर अनायसेच जेवण व झोपण्यात तास-दीड तासाचे अंतर राहू शकते.

सध्या तर पाण्याची गंमतच आहे. जे पाणी शुद्ध असल्याचा दावा करून खूप महाग किमतीत विकले जाते त्यांचे रिपोर्टस्‌ असे काही येतात की त्याऐवजी नळाचे पाणी शुद्ध आहे असे म्हणण्याची वेळ येते. सध्या पाणी शुद्ध करायची अनेक प्रकारची यंत्रसामग्री उपलब्ध आहे. पाण्यात नुसता कचरा, बॅक्टेरिया, जीवजंतू आहेत किंवा नाहीत एवढेच पाहणे महत्त्वाचे नाही. पाणी गाळून तर घ्यायलाच पाहिजे. त्यात कुठलेही जड पदार्थ, माती वगैरे नाहीत याची खात्री हवीच, तसेच पाणी उकळणेही आवश्‍यक आहे. जेवढा अधिक अग्निसंस्कार पाण्यावर करावा तेवढे पाणी पचनाला हलके व सहजगामी होऊन सर्व शरीराला फायदा होतो.

जगात दोनतृतीयांश पाणी आहे. आपल्या शरीरातही खूप प्रमाणात पाणी असते. शरीरात पाणी असल्याने सर्व वातावरणाचा, ग्रह-ताऱ्यांचा, चुंबकीय व विद्युततरंगांचा परिणाम शरीरावर व मनावर होतो. आपल्या मेंदूत असलेल्या पाण्यावर म्हणजे मेंदूजलावर (सेरेब्रो स्पायनल फ्लुइड) संस्कार करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ‘उदकशांत विधी’ तयार केला आहे. वास्तुशास्त्रानुसार ईशान्येला पाणी असावे; पश्चिमेला वरुणदेवता असल्याने पश्चिमेला पाणी

असले तर चालते; आग्नेयेला अग्निदेवता असल्याने तेथे पाणी नसावे अशा गोष्टी पाहिल्या जातात. एकूण पाणी आपल्या आत-बाहेर सर्व ठिकाणी व्यापून राहिले आहे. या चहूबाजूने असलेल्या पाण्याची आपण काळजी घेतली पाहिजे. वरुणदेवतेची प्रार्थना केली की सुखसमृद्धीला तोटा नाही.

मृतसमुद्र (डेड सी) अशीही एक संकल्पना आहे. त्या ठिकाणच्या पाण्यात खूप मीठ असल्याने मनुष्य पाण्यावर तरंगतो, एकदम हलकेपणाचा अनुभव येतो. डोळे मिटून अशा पाण्यावर तरंगताना योग्य संगीताचा वापर केला तर जणू आपण समाधी अवस्थेला पोचलेलो आहोत असाही अनुभव येऊ शकतो. काही ठिकाणी जमिनीतून पाण्याबरोबर वर येणारे क्षार किंवा गंधकासारख्या पदार्थामुळे ते पाणी उपचाराचे माध्यम होते. पाण्यावर संस्कार करून त्याचा अनेक प्रकारे उपयोग करता येतो.

पाण्यात साधे मीठ मिसळून पाय बुडवले असता पाय दुखणे, पाय सुजणे हे त्रास कमी होताना दिसतात. अंघोळीच्या टबमध्ये किंवा कमीत कमी नाभीपर्यंत कंबर, मांड्या बुडतील अशा छोट्या टबमध्ये गरम पाण्यात बसण्याने किडनी व मूत्राशयाच्या विकारांवर चांगला उपयोग होतो. त्या पाण्यात विशेष औषधांचा काढा टाकला तर फायदा निश्चितच वाढतो. पाण्यामध्ये सोने उकळवून सुवर्णसिद्धजलाचा सर्वांना सहज करता येण्यासारखा स्वस्त सोपा उपचार सुचवून तर आयुर्वेदाने सोने पाण्यावर तरंगविण्याची जणू जादूच दाखवली आहे.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून ‘संतुलन आयुर्वेद’द्वारा संकलित.)

टॅग्स :article