केल्याने देशाटन...

प्रवास हे जीवनाचे महत्त्वाचे अंग होय. वर्षातून किमान एकदा तरी घरातील सर्वांनी मिळून कुठेतरी फिरायला जायचे, निसर्गाचा आनंद घ्यायचा किंवा एखादी प्रेक्षणीय वास्तू.
Journey
JourneySakal
Summary

प्रवास हे जीवनाचे महत्त्वाचे अंग होय. वर्षातून किमान एकदा तरी घरातील सर्वांनी मिळून कुठेतरी फिरायला जायचे, निसर्गाचा आनंद घ्यायचा किंवा एखादी प्रेक्षणीय वास्तू.

प्रवास हे जीवनाचे महत्त्वाचे अंग होय. वर्षातून किमान एकदा तरी घरातील सर्वांनी मिळून कुठेतरी फिरायला जायचे, निसर्गाचा आनंद घ्यायचा किंवा एखादी प्रेक्षणीय वास्तू, मंदिर बघायचे, त्यानिमित्ताने विमानप्रवास करायचा ही कल्पना चांगलीच. मात्र, प्रवासाचा आनंद घ्यायचा असला, खऱ्या अर्थाने त्यातील क्षण न्‌ क्षण अनुभवायचा असल्यास, प्रवासादरम्यान आरोग्य बिघडणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

एक काळ असा होता, की लोक प्रवासासाठी हिमालयाकडे जात असत. ती यात्रा एवढी खडतर असे की अनेक जण परत येत नसत, म्हणून केवळ म्हातारपणी अशा यात्रांना जावे, अशी प्रथा त्या काळी पडली होती. आपल्या भारतीय ऋषिमुनींनी जशी अनेक तीर्थक्षेत्रे, स्वयंभू स्थाने निर्माण केली तशी परमेश्र्वराने आणि निसर्गाने अनेक लहान-मोठ्या नद्या, तलाव, डोंगर अशा अनेक आश्र्चर्यकारक वस्तू उत्पन्न केल्या. प्रवास केल्याने हे सर्व तर पाहता येतेच, पण बरोबरीने यामागे ज्ञानसाधना, लोकसंग्रह आणि घराबाहेर पडून केलेली सेवा या गोष्टी असल्यामुळे प्रवास महत्त्वाचा होय.

सध्या प्रवास खूप सुखसोयीचा झाला आहे. प्रवासाच्या कक्षा विस्तारल्या आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्‌’ असे म्हणून उन्हाळ्याच्या सुटीत जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या ब्राझीलमधील मामाकडे जाणे किंवा जपान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, युरोप अशा ठिकाणी असलेल्या ओळखींच्याकडे वा नातलगांकडे जाणे किंवा तेथे वास्तव्य करणाऱ्यांनी सुटीत भारतात येणे हे फारसे अप्रूप राहिलेले नाही. सध्या प्रवासाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. बऱ्याच वेळा मंडळी जवळपासच्या माथेरान, महाबळेश्र्वर, पंचमढी, उटी, सिमला, मनाली अशा थंड हवेच्या ठिकाणी किंवा श्रीकृष्णांची द्वारका, वृंदावन, श्रीरामांची अयोध्या, श्रीशंकरांची काशी, अमरनाथ अशी स्थाने आवडीप्रमाणे ठरवितात.

आरोग्य महत्त्वाचे

या सर्व यात्रा करत असताना स्वतःचे आरोग्य टिकवणे महत्त्वाचे असते. कारण यात्रेचा आनंद घेण्यासाठी स्वतःच्या दाही इंद्रियांचे आरोग्य ठीक असण्याची गरज असते. प्रवासाला बाहेर पडले असताना पोट बिघडले तर सर्व प्रवास वाया गेल्यातच जमा असतो. यात्रेत वेगळ्या हवामानात फिरण्यामुळे डोकेदुखी, डोळे येणे, पाय दुखणे, गुडघे दुखणे असा त्रास होऊ लागला तरी यात्रा वाया जाते. म्हणून यात्रेच्या दरम्यान आरोग्याकडे खूप लक्ष द्यावे लागते. यात्रा मागदर्शन करणाऱ्या कंपन्या किंवा व्यक्ती कुठल्या ऋतूत कुठे जावे याचे मार्गदर्शन करतात. जेथे जाणार आहे त्या ठिकाणच्या हवामानासाठी कुठले कपडे घ्यावेत, पादत्राणे कशी असावीत तसेच अन्य कोणत्या वस्तू बरोबर असाव्यात हे सुचवितात, जेणेकरून प्रवासात त्रास होऊ नये. उंच डोंगरावर असलेल्या स्थानांवर जातेवेळी ओवा कुटून त्यात कापूर घालून बरोबर ठेवावा. विरळ हवामानाच्या ठिकाणी श्र्वास घ्यायला त्रास होण्याची शक्यता असते.

अशा वेळी ओवा-कापूर या पुरचुंडीचा वास घेतल्यास बरे वाटते. चहाची सवय असली, तर पाणी उकळण्यासाठी छोटी केटलबरोबर ठेवावी, काही हॉटेलमध्ये अशी केटल ठेवलेली असते. पाणी उकळून त्यात स्वतःला आवडणारा चहा किंवा वनस्पतीजन्य चहा (हर्बल टी) बनवून घेता येतो.

प्रवासात साखरेची आवश्‍यकता अधिक असते. म्हणून प्रवासात सुकडी किंवा मुगाचे लाडू असे काहीतरी जवळ ठेवणे महत्त्वाचे असते. सकाळचा नाश्‍ता, दोन वेळा जेवण अशी सोय यात्रा कंपन्यांनी केलेली असली, तरी त्यांनी दिलेले पदार्थ आपल्याला आवडणारे व मानवणारे असतीलच असे नाही. तेव्हा पोटाला आधार असावा यादृष्टीने स्वतःची काही तरी व्यवस्था केलेली असावी. वेगवेगळ्या प्रदेशात फिरत असताना तेथील नवीन नवीन पाककृतींचा आस्वाद घेण्याची इच्छा होते, परंतु प्रवासात आयुर्वेदाने सांगितल्यानुसार अर्धपोटी राहणे इष्ट ठरते. प्रवासात पाणी उकळूनच प्यावे. सीलबंद पाण्याची बाटली मिळाली तरी त्यातील पाणी आपल्याजवळ असलेल्या इलेक्ट्रिक केटलमध्ये उकळून पुन्हा बाटलीत भरून घ्यावे. एकूण अशा प्रकारे पोटाची व्यवस्था चांगली झाली की शरीराच्या इतर भागांकडे लक्ष देता येते.

शरीर म्हणजेच सर्व नाही हे खरे असले तरी मन शरीरातच असते. आपल्याला झोपायचे असते तेव्हा ज्या गादीवर झोपायचे आहे त्या गादीने कुरकुर करून चालत नाही; अन्यथा आपली झोपमोड होते, तशातलाच हा प्रकार आहे. तेव्हा प्रवासात शरीराकडे लक्ष देणे भाग असते. प्रवासाला जाणाऱ्या सगळ्यांना पाठदुखी वा गुडघेदुखी असते असे नाही, पण प्रवासात असताना आयुर्वेदात सांगितलेले शांती किंवा कुंडलिनी तेलासारखी आरोग्य टिकविण्यासाठीही उपयोगात आणण्याजोगी तेले वापरावीत, जेणेकरून पाठ, पाय, पोटऱ्या किंवा गुडघे दुखण्याचा त्रास होत नाही. गुडघेदुखीसाठी वापरण्यात येणारे बाम वगैरे उष्ण गुणधर्माचे असतात. त्याऐवजी आयुर्वेदातील ही शीत गुणधर्माची तेले गुडघे, पाठ दुखत असताना दुखणे कमी होण्यासाठी व दुखत नसली तर त्यांचे आरोग्य टिकविण्यासाठी वापरणे श्रेयस्कर ठरते.

दिसायला चांगले दिसो वा न दिसो आणि ती सगळीकडे विसरण्याची शक्यता असली तरी प्रवासात टोपी जवळ असावी. सूर्य असला तर उन्हाचा त्रास होऊ नये व सूर्य नसला तर थंड हवेचा त्रास होऊ नये अशा दोन्ही कारणांसाठी टोपी उपयोगी पडते. साठीनंतरच्या व्यक्तींनी चालताना हातात काठी अवश्‍य वापरावी.

प्रवासात एखादे स्थळ कमी-जास्त पाहिले तरी फारसा फरक पडत नाही, पण पैशांचा मोबदला पूर्ण मिळतो आहे असे प्रवाशांना वाटावे या हेतूने यात्रा कंपन्या त्यांना दिवसभर पळवत ठेवतात. प्रवासादरम्यान आराम करावासा वाटत असला, कणकण वाटत असली, जरासे डोके दुखत असले, भूक नसली, शौचाला व्यवस्थित झालेली नसली तर एखादे स्थळ सोडून दिले तरी हरकत नसते, ते आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. शिवाय एखादा दिवस आराम केल्यावर पुढच्या स्थळांचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे घेता येतो.

थोडेसे पैसे वाचविण्यासाठी कमी पैसे घेऊन अधिक स्थळांची यात्रा घडविण्याच्या कंपन्यांबरोबर प्रवास करणे प्रत्येकाला झेपेलच असे नसते. प्रवासाला नेहमी यात्राकंपन्यांबरोबरच जावे लागते हे खरे नाही, वळकटी पाठीवर घेऊन चार मित्रांबरोबर हिमालय, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, वेगवेगळे किल्ले वगैरे ठिकाणी जाता येते. अशा वेळी ठिकठिकाणी मार्गदर्शक मिळतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली छान प्रवास होऊ शकतो, सहलीचा उत्तम अनुभव मिळू शकतो.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com