
रक्षण बालकांचे !
आयुर्वेदाच्या आठ अंगांपैकी एक महत्त्वाचे अंग म्हणजे कौमारभृत्य तंत्र. यात स्त्री आरोग्यापासून गर्भधारणा, बाळाचा जन्म, बालकाचे आहार-आचरण, रोग, उपचारापर्यंत सर्व गोष्टींचे विस्तृत मार्गदर्शन केलेले आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हटले जाते मात्र आयुर्वेदातील कौमारभृत्य तंत्रानुसार त्याचे आरोग्य गर्भधारणेपूर्वीच ठरत असते. संपूर्ण गर्भसंस्कार ही संकल्पना यावरच आधारलेली आहे. बालकांच्या आरोग्याशी निगडीत अशीच एक आगळीवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना म्हणजे ‘बालग्रह !’ ‘बाल’ म्हणजे बालक आणि ‘ग्रह’ म्हणजे ग्रासणे, पकडणे, बाधित होणे. ज्यामुळे बालक व्याधीने ग्रासले जाते, ज्यामुळे बालकाच्या आरोग्यावर बाधा येते ते बालग्रह होत.
बालग्रह हा केवळ एक रोग नाही तर बालग्रहाच्या अंतर्गत ‘नेमके कारण लक्षात न येणारे’ अनेक रोग येतात. सामान्य तर्कबुद्धीला समजू न शकणाऱ्या बालकांमधे आढळून येणाऱ्या रोगांचे वर्णन आणि त्यावरचे उपचार ‘बालग्रहां’तर्गत दिलेले आढळते. सर्वसामान्यतः ग्रहबाधा म्हटले की त्याभोवती भीतीचे वलय आपोआप येते पण प्रत्यक्षात बालग्रह हे बालकाचे रक्षण करणारे असतात. या बाबतीत एक कथा सुश्रुतसंहितेत सांगितली आहे.
असुरांचा निःपात करण्यासाठी कार्तिकेयाने शंकर-पार्वतीच्या पोटी जन्म घेतला. त्याला बालवयातच असुरांशी लढून त्यांच्यावर विजय मिळवायचा असल्याने अर्थातच त्याचे कुणीतरी रक्षण करणे अत्यावश्यक होते. यासाठी पार्वती, महादेव, अग्नी व कृत्तिका यांनी मिळून बालग्रह तयार केले व या बालग्रहांच्या मदतीने बालकार्तिकेयाने असुरांचा संहार केला.
लढाई संपली, विजय मिळाला आणि देवांनी कार्तिकेयाला देवांचे सेनापतीपद बहाल केले. पण आता बालग्रहांना काम उरले नाही, तेव्हा त्यांनी स्वतःच्या निर्वाहासाठी काही काम मिळण्याची विनंती कार्तिकेयांजवळ केली. कार्तिकेयांनी महादेव शंकरांकडे याविषयी विचारणा केली असता महादेवांनी त्यांच्यावर पृथ्वीतलावरच्या समस्त बालकांची जबाबदारी टाकली.
मात्र बरोबरीने एक गोष्ट सांगितली की ज्या घरात, ज्या कुलात, देव (आपल्यापेक्षा वरचढ शक्ती), पितर (पूर्वज, आई-वडील), ब्राह्मण (ज्ञानी जन), साधू (सज्जन), गुरु, अतिथी यांना महत्त्व दिले जात नाही, ज्यांची वागणूक निसर्गनियमांना धरून नसते, जे अपवित्र, अशुद्ध राहतात, जे स्वतः कष्ट न करता दुसऱ्यांच्या जिवावर आपली उपजीविका चालवितात, जे आपल्या कमाईतील थोडा सुद्धा हिस्सा समाजाला देत नाहीत, शास्त्रांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करत नाहीत अशा लोकांच्या घरात शिरून त्या घरातील बालकांमध्ये रोग उत्पन्न करा. भगवान शंकरांची आज्ञा शिरोधार्य समजून बालग्रह पृथ्वीतलावर आले आणि अशाप्रकारे बालग्रह रोगांची सुरुवात झाली.
बालग्रह हा विषय आयुर्वेदातील दैवव्यपाश्रयचिकित्सेमधे येतो. ज्याप्रमाणे पुनर्जन्मावर सर्वांचा विश्र्वास असला तरी पुनर्जन्म संकल्पना विज्ञानाच्या प्रयोगांच्या निकषावर सिद्ध करणे अवघड असते, तसेच बालग्रहावरील काही चिकित्सा सिद्ध करून दाखविणे वा त्यांची प्रचिती ताबडतोब देणे खूप अवघड असते. सध्या अशा तऱ्हेचे उपचार करणारे तंत्र-मंत्र समजणारे अधिकारी वैद्य सध्या कमी झालेले, जवळजवळ मिळेनासे झालेले दिसतात.
बालग्रहावर इलाज करत असताना जोपर्यंत औषधे किंवा तत्सम शारीरिक उपचार केले जातात तोपर्यंत त्यातील आयुर्वेदिक विज्ञान तरी समजू शकते परंतु जेव्हा ग्रहबाधानिवारण म्हणून जेव्हा अंगारे, धूप, मंत्र, वेगवेगळ्या ग्रहांच्या शांती वा यज्ञयागादी करण्याची आवश्यकता भासते तेव्हा त्यावर विश्र्वास ठेवणे सर्वांनाच जमत नाही. उदा. मूल आश्र्लेषा नक्षत्रावर जन्माला आले तर त्यासाठी शांतिविधी करणे, गोप्रसव शांत किंवा बालकाचा नामकरण विधी करणे, बालकाला सुपात ठेवून त्याचा गाईकडून वास घेण्याच्या निमित्ताने त्याला गाईच्या सहवासात ठेवणे अशा विधीतील संपूर्ण विज्ञान समजले नाही तरी धूमचिकित्सेने बराच फायदा होऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर यज्ञयागादि गोष्टीही कुठल्यातरी विज्ञानावर आधारित असतील हा अंदाज बांधला जातो.
अशा यज्ञयागात मुख्यत्त्वे तांदूळ, धूप, पळस, उंबर, शमी, दूर्वा अशा वनस्पतींचे हवन केले जाते. यांचे हवन केल्यानंतर वातावरणात पसरलेला धूर व त्या वनस्पतीचा अति सूक्ष्म अंश उपयोगी पडत असावा असे म्हणता येते. आयुर्वेदात केवळ शारीरिक, भौतिक मर्यादांचा विचार न करता मनःशक्ती व आत्मशक्ती यांचाही विचार केलेला असल्याने मनावर विशेष संवेदना कोरल्या जाव्यात आणि मंत्रशक्तीच्या आधारावर शरीराच्या अंतर्गत व्यवस्थेत इच्छित बदल करता यावेत अशी योजना केलेली असावी हे लक्षात येते.
म्हणून आपल्याकडे ऐन संध्याकाळच्या वेळी लहान बाळाला बाहेर फिरवून आणल्यावर, त्यातल्या त्यात एखाद्या विहीर-तलावावर किंवा जंगलसदृश प्रदेशातून फिरवून आणल्यावर अचानक बाळ रडू लागले किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन आल्यावर जर बालकाला त्रास होऊ लागला तर बाळाला दृष्ट लागली असावी असे मानण्याची पद्धत आहे. पण एवढे मात्र नक्की की बालक जर अचानक रडायला लागले, त्याला उलट्या, जुलाब, ताप वगैरे रोगाची पूर्वलक्षणे सुरू झाली तर देवाजवळ प्रार्थना करून अंगारा लावल्यावर किंवा रामरक्षा म्हणून अंगारा लावल्यावर, आपल्या इष्ट देवतेचे, गुरुंचे स्मरण करून बाळाच्या मस्तकावर हात ठेवल्यावर बाळ बरे झाले असे सांगणारी अनेक मंडळी भेटतात. ज्यांच्यावर असा काही प्रसंग आलेला असतो ते विज्ञानाने सिद्ध करण्याची वाट न पाहता इलाज करून गुण मिळवितात.
बालग्रहाची बाधा होऊ नये यासाठी प्रयत्न करणे सर्वांत श्रेयस्कर कारण बहुतेक सर्व बालग्रह कष्टसाध्य म्हणजे बरे होण्यास अवघड समजले जातात. नवजात बालकासाठी ‘जातमात्र संस्कार’ करायला सांगितले आहेत. त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्यामुळे अर्थातच बालग्रहांची बाधा होण्यास प्रतिबंध होऊ शकतो. जन्मल्यावर करावयाचा सुवर्णप्राशन संस्कार, नवजात बालकाला सुगंधी द्रव्यांच्या साहाय्याने स्नान घालणे, अंगाला सुगंधी व विशिष्ट प्रभाव असणाऱ्या द्रव्यांचा संस्कार केलेल्या तेलाचा अभ्यंग करणे, जंतुसंसर्गाला प्रतिबंध करू शकणाऱ्या व बरोबरीने दुष्ट, दूषित विचार तरंगांचा, शक्तींचा नाश करणाऱ्या द्रव्यांचा धूप घेणे वगैरे बालक परिचर्येतील सर्व गोष्टी बालग्रहरोगांना प्रतिबंध करण्यासाठी उपयोगी असतात. गर्भधारणेपूर्वी व गर्भ राहिल्यानंतरच्या नऊ महिन्यांत गर्भवतीने आयुर्वेदीय गर्भसंस्काराप्रमाणे वागणे आवश्यक असते. मूल अंगावर स्तन्यपान करत असताना मातेने आचार, विचार व आहार यावर शास्त्रसंमत नियोजन करणे आवश्यक असते. अशा प्रकारे, जन्मणाऱ्या अपत्यास बालग्रहरोगांपासून दूर ठेवणे सोपे जाते.
तरीही काही कारणास्तव बालग्रहाने ग्रासल्याची लक्षणे दिसू लागली तर त्यावर खालील प्रमाणे उपचार करता येतात. बालकाला पवित्र, स्वच्छ, जेथे कशाचीही भीती नसेल अशा शांत ठिकाणी ठेवावे, दिवसातून तीन वेळा त्या ठिकाणची जमीन स्वच्छ करावी, २४ तास अग्नी तेवत असावा, मोहरी, सुगंधी फुले, पाने, रक्षा वगैरे गोष्टी ठिकठिकाणी ठेवलेल्या असाव्यात, बालकाला जुन्या तुपाचा अभ्यंग द्यावा, बालकाला निंब, पांगारा, जांभूळ, बला, वायवर्णा, आरग्वध, कदंब, करंज वगैरे द्रव्यांच्या काढ्याने स्नान घालावे व नंतर वेखंड, ओवा,करंज, कुष्ठ वगैरे द्रव्यांच्या काढ्याने स्नान करवावे व नंतर वेखंड, ओवा, करंज, तूप यांच्या मिश्रणाचा धूप द्यावा व त्या त्या बालग्रहासाठी जे विशिष्ट उपचार सांगितले आहेत, ते करावेत. सामान्य बालरोगातलेही उपचार करावेत. तेव्हा बालग्रहाचा खरा परिहार करायचा असेल तर चुकीचा आहार-विहार-आचार टाळणे व एकूणच नैतिक मूल्यांवर आधारित जीवन जगणे आवश्यक असते.
(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)