
भाद्रपद महिना सुरू होताहोताच श्रीगणेशांच्या आगमनाचेही वेध लागतात. बुद्धीची देवता म्हणजे श्रीगणेश हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो. आयुर्वेदात बुद्धीचे अनेक पैलू सांगितलेले आहेत.
‘धी’ म्हणजे काय योग्य, काय अयोग्य हे समजायची शक्ती; ‘धृती’ म्हणजे अयोग्य गोष्टींपासून मन व इंद्रियांना दूर ठेवण्याची शक्ती आणि ‘स्मृती’ म्हणजे स्मरणशक्ती. यश, समृद्धी, प्रतिष्ठा, नावलौकिक तसेच आरोग्य सुद्धा या तीन शक्तींवर निर्भर असते. श्रीगणेशोत्सव साजरा करताना याची पायाबांधणी होत असते.
आज मानवाने गाठलेली तांत्रिक प्रगती अचंबित करणारी आहे, मग ती औषधोपचार योजनेत असेल, तपासण्या करणाऱ्या यंत्रांबाबत असेल, दैनंदिन व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या संगणक, टेलिफोन वगैरे यंत्रसामग्रीबाबत असेल किंवा अवकाशतंत्रज्ञानाबाबत असेल.
यालाच जोड म्हणून आज अनेक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटलिजन्स (ए. आय्.)चा वापर मोठ्या प्रमाणावर होतो आहे. यावरून आपल्याला वरवर पाहता मनुष्याने खूप प्रगती केली आहे असे वाटू शकते. पण त्याचवेळी हा ए. आय. मनुष्याला वरचढ तर ठरणार नाही ना, याच्याही चर्चा होताना दिसतात. मला नेहमी असे वाटते की मानवाने केलेली ही सर्व प्रगती भौतिक क्षेत्रातील आहे.
त्याच्यातल्या ‘स्व’ची, स्वप्रेरित नैसर्गिक बुद्धिमत्तेची, आत्मशक्तीची, आध्यात्मिकतेची प्रगती मात्र मागे पडलेली आहे. म्हणूनच अनैतिकता, असमाधान, माणसा-माणसातला दुरावा, स्वार्थप्रेरित प्रवृत्ती ही दिवसेंदिवस वाढते आहे. असे का झाले असावे? एकूण भौतिकतेत जो मनुष्य एवढी प्रगती करू शकतो, तो आध्यात्मिक क्षेत्रात किंवा आपल्या नैसर्गिक प्रगल्भतेत प्रगत का होऊ शकत नाही?
याचे कारण असे की हेतुपुरस्सर असो, वा अनवधानाने असो, मनुष्याच्या मनात अध्यात्म, संस्कार व संस्कृती या सर्व गोष्टी जुनाट आहेत, त्यांचा व्यवहारात उपयोग नाही अशी एक कल्पना रूढ झाली. आता मनुष्य चंद्रावर पोहोचला आहे तेव्हा ज्योतिषशास्त्रातील चंद्राचा विचार करण्याची आवश्यकता नाही किंवा आपल्याला जे दिसत नाही ते अस्तित्वात नाही अशी विचारधारा बळावू लागली.
म्हणजे एकूणच श्रद्धा हा विषय दुर्लक्षित झाला. पण श्रद्धा जोपासण्याची व स्वप्रेरित नैसर्गिक बुद्धिमत्ता (नॅचरल इंटिलिजन्स) पुन्हा विकसित करण्याची वेळ आज आलेली आहे.
पिंड-ब्रह्मांड न्यायाशी सर्वजण सहमत असतात. ब्रह्मांडाचे चालणारे अंशात्मक कार्य पिंड पातळीवर प्रत्येक व्यक्तीद्वारे घडत असते. बाह्य विश्र्वात जी शक्ती ब्रह्मणस्पती, गणपती नावाने रूढ झालेली आहे, त्या शक्तीचे पिंड पातळीवर कार्य चालण्यासाठी मेंदूची योजना केलेली असते.
म्हणून एका बाजूने मेंदूचे आरोग्य कसे राखावे, मेंदू ताण-तणावरहित कसा ठेवावा, सुखे निद्रा कशी घ्यावी, यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे, तर दुसऱ्या बाजूने मेंदूचा विकास होण्यासाठी त्याला मंत्र-ध्वनी-संगीतामार्फत शक्तितरंग कसे पोहोचवावेत, त्याचे भौतिक अस्तित्व नीट राहण्यासाठी कुठल्या प्रकारचे अन्न-रसायने सेवन करावीत याकडे लक्ष देणे भाग आहे. श्रीगणेश उत्सवात या सर्व गोष्टी साधता येतात.
प्रसन्नात्मेन्द्रियमनः ही आयुर्वेदाची आरोग्यसंकल्पना. इंद्रिये म्हटली की साहजिकच शरीर आणि शरीराचे दोष, मल, अग्नी हे सर्व आलेच. मन हे इंद्रियांकडून आत्म्याला प्रसन्न करण्यासाठी किंवा आत्म्याच्या आनंदासाठी काम करून घेण्यासाठी एक मॅनेजर, एक संकल्पना किंवा प्रोग्रॅम. विश्र्वाचा मालक म्हणजेच परमात्मा यानेच केवळ खूष व्हावे हा उद्देश नसून शरीर, मन व आत्मा या तिघांनाही आनंद व्हावा.
भारतीय संस्कृतीमधे योजलेल्या गणेशोत्सवासारखे सर्व सण-उत्सवांचा हाच तर उद्देश असतो. आनंद म्हटले की त्यात फायदा-तोटा नसतो, आनंदामध्ये कमी-जास्त काही नसते. आनंदामध्ये असते समत्व आणि श्रेयस.
या सर्व संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी सर्व इंद्रियांचा गोषवारा असलेला मेंदू तसेच मेंदूत सर्वांना एकमेकांशी संपर्कात आणून काम करून घेणारे मन व त्यापलीकडे असणारी परमात्मजाणीव असल्यामुळे मनुष्याच्या मेंदूचे आरोग्य म्हणजेच व्यक्तीचे आरोग्य असे म्हणायला हरकत नाही.
सध्या मेंदूचे विकार वाढत आहेत, तसेच इंद्रियव्यापारासंबंधित विकार वाढत आहेत, मनाशी संबंधित असलेले विकार वाढत आहेत व प्रसन्नत्व हरवलेले दिसते आहे. म्हणूनच श्रीगणपती ही कलियुगाची देवता आहे असे म्हटले असावे.
मेंदूमध्ये वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळी केंद्रे असतात. यात बोलण्याचेही एक केंद्र असते. मेंदूत साठवलेली माहिती व अनुभव गोळा करून संभाषण करणे, डोळ्यांनी पाहिलेल्या वस्तूंचे शब्दात रूपांतर करणे, आजूबाजूची मंडळी काय बोलतात याचा विचार करून हा नाद शब्दरूपाने पुन्हा स्मृतीत साठवणे ही सर्व कामे या केंद्रामार्फत चालते.
या केंद्राची संकल्पना, या केंद्राची शक्ती, या केंद्राचा अधिपती म्हणजेच वाचस्पती-गणपती. विचार हे सुद्धा शब्दरूपच असतात. विचार करताना तसेच बोलताना एकचित्त होणे व एकाग्र होणे खूप गरजेचे असते. सर्व विचारांना योग्य जागी घेऊन जाण्याचे काम मन करत असते. पण मन हे वाहन आहे, ते विचारांना इकडे तिकडे फिरवते.
मनाची एकाग्रता, निश्र्चलता आणि मुख्य म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे विवेकबुद्धी. मेंदू, मन, बुद्धी या सर्व गोष्टी स्थिर होण्यासाठी (अथर्व या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे स्थिर), श्रीगणेशदेवतेशी संपर्क साधण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी जी योजना केलेली आहे, जे मंत्र लिहिलेले आहेत, त्यातील एक आहे अथर्वशीर्ष.
अथर्वशीर्षात एक ऋचा आहे, ‘सैषा गणेशविद्या’. गणेश-विद्या म्हणजे लिपीचे शास्त्र. देवांची लिपी म्हणवल्या जाणारी देवनागरी लिपी ही अनेक तज्ज्ञांच्या मते सर्व प्राचीन लिपींचे मूळ आहे. श्रीगणेश हे वाचस्पती आहेत तसेच ते उत्तम लेखनिकही आहेत. म्हणून तर महाभारत या महाकाव्याचे लेखन साक्षात श्रीगणेशांच्या हस्ते झालेले आहे. वाणीवर सर्व जगाचा व्यवहार अवलंबून असतो.
कारण आपण एकटे नाही आहोत, तर संपूर्ण जग आपल्या बरोबर आहे हे केवळ संभाषणातूनच किंवा एकमेकांशी संपर्कातूनच माणसांना कळत असते. या संभाषणाचा, संपर्काचा आनंद अवर्णनीय असतो. यासाठी सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे माध्यम आहे आवाज, शब्द आणि भाषा. लेखन हे पण आवाजाचेच चित्रीकरण असते म्हणूनच श्री गणपती हे वाचस्पती आणि उत्तम लेखनिकही आहे.
त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने नुसती आरास, सजावट व करमणुकीचे कार्यक्रम यांच्यावर भर न देता, भारतीय ऋषीमुनींचा या उत्सवामागचा खरा उद्देश लक्षात घेण्याची आज वेळ आलेली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने रोज तूपाचा किंवा तेलाचा दिवा लावून श्रीगणेशस्तोत्र, श्रीअथर्वशीर्ष किंवा ‘ॐ गँ गणपतये नमः’ वगैरे शास्त्रशुद्ध पद्धतीने गाणे, सामाजिक व सामुदायिक एकात्मतेसाठी प्रयत्न करणे तसेच गरजवंतांना मदत करणे हे व्रत उपयोगी पडेल.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)