संस्कार पाण्याचा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water
संस्कार पाण्याचा!

संस्कार पाण्याचा!

पाण्याने तहान भागते, योग्य प्रमाणात पाणी पिण्याने पचन व्यवस्थित होते, शरीरातील उष्णतेचे नियमन होते. खूप बोलावे लागणाऱ्यांनी किंवा उष्ण प्रकृती असणाऱ्यांना तहान लागेल तसे अधेमधे पाणी पिण्याचा खूप फायदा होतो. तेव्हा पाणीसेवनाचे एक शास्त्र तयार झाले आहे. जेवणापूर्वी पाणी पिण्याने अन्न कमी खाल्ले जाते व अन्न कमी गेल्यामुळे मनुष्य कृश होत राहतो. जेवणानंतर पाणी पिण्याने पाचक रस पातळ झाल्यामुळे, खाल्लेल्या अन्नाचे पचन नीट होत नाही आणि मेद वाढतो. परिणामतः मनुष्य लठ्ठ होतो. जेवताना अधेमधे पाणी पिण्याने पचन संतुलित होऊन फायदा होतो.

ज्याला ‘जीवन’ म्हटले जाते त्या पाण्याचे खरे महत्त्व समजते ते उन्हाळ्यात. उन्हामुळे कासावीस झालेल्या जिवाला तृप्ती मिळते ती फक्त पाण्यामुळे. वातानुकूलित यंत्रणेमुळे कृत्रिम गारवा निर्माण करता आला तरी पाण्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पाणी ते पाणीच! भारतीय परंपरेत जीवनाची सुरुवात, उत्क्रांतीची सुरुवात, प्राणिमात्राच्या अस्तित्वाची सुरुवात झाली मत्स्यावतारात. मत्स्य म्हटले की पाणी आठवतेच. ‘जल बिन मछली’ असूच शकत नाही. हलके हलके कूर्मावतारात जमिनीचा शोध लागला व नंतर वराह, नरसिंह असे जीवनाचे टप्पे सुरू झाले. म्हणतात की या विश्र्वाचा अंत प्रलयानेच म्हणजे, सर्व ठिकाणी पाणीच पाणी, या पद्धतीनेच होणार आहे. ‘निसर्गचक्र’ म्हणून जे काही आपण म्हणतो, त्याची खरी जाणीव पाण्यामुळेच होते. सूर्य उत्तरायणात गेला काय किंवा दक्षिणायनात असला काय, आपल्याला अनुभवायला येते ते पाण्याचे चक्र! वरून पडणाऱ्या पावसाचे पाणी जीवन समृद्ध करते आणि पुन्हा बाष्परूपाने आकाशात परत जाते. जणू काही या पृथ्वीवर काय चालले आहे, कुठल्या स्तरावर सर्व प्राणिमात्र जगत आहेत, याची माहिती वर स्वर्गात देण्याचे काम पाणी करत असते. पृथ्वीच्या पाठीवर घाण वाढली, नद्या प्रदूषित झाल्या, जलप्रवाह आटले, जमिनीखालचे पाणी खोलवर निघून गेले, ही सर्व इत्थंभूत माहिती एखाद्या गुप्तचराप्रमाणे गोळा करून स्वर्गात पोचविण्याचे काम पाणी नक्की करत असणार. हे म्हणण्याचे कारण असे की सध्या झालेल्या प्रयोगांनी असे दिसून आले आहे की पाण्यावर ध्वनीचे, प्रकाशाचे तसेच विचारांचेही संस्कार होतात. विज्ञानाच्या प्रयोगांनी हे पाहताही येते. शास्त्रज्ञांनी पाण्याचा थेंब गोठवून त्याचे फोटो काढले तेव्हा सुसूत्र मंडलासारखी रचना असल्याचे लक्षात आले. सर्जनाची कल्पना असलेल्या ठिकाणी मंडल सुंदर व आकर्षक दिसते व वातावरणात विनाशाची चर्चा असलेल्या ठिकाणी मंडलाची रचना तुटक तुटक व अत्यंत विचित्र दिसते. प्रत्येक नदीच्या पाण्याचे चित्र वेगवेगळे निघते. पाणी हातात घेऊन चांगली कल्पना केली तर पाण्याचे चित्र वेगळे दिसते. पाण्यावर संगीताचाही परिणाम होतो, हे वेगवेगळ्या फोटोंवरून सिद्ध झालेले आहे.

पाण्याने तहान भागते, योग्य प्रमाणात पाणी पिण्याने पचन व्यवस्थित होते, शरीरातील उष्णतेचे नियमन होते. खूप बोलावे लागणाऱ्यांनी किंवा उष्ण प्रकृती असणाऱ्यांना तहान लागेल तसे अधेमधे पाणी पिण्याचा खूप फायदा होतो. तेव्हा पाणीसेवनाचे एक शास्त्र तयार झाले आहे. जेवणापूर्वी पाणी पिण्याने अन्न कमी खाल्ले जाते व अन्न कमी गेल्यामुळे मनुष्य कृश होत राहतो. जेवणानंतर पाणी पिण्याने पाचक रस पातळ झाल्यामुळे, खाल्लेल्या अन्नाचे पचन नीट होत नाही व मेद वाढतो, परिणामतः मनुष्य लठ्ठ होतो. जेवताना अधे मधे पाणी पिण्याने पचन संतुलित होऊन फायदा होतो. सध्या तर पाण्याची गंमतच आहे. जे पाणी शुद्ध असल्याचा दावा करून खूप महाग किमतीत विकले जाते त्यांचे रिपोर्ट््स असे येतात की त्यापेक्षा घरातील साध्या नळाचे पाणी शुद्ध आहे असे म्हणण्याची वेळ येते. पाणी शुद्ध करायची अनेक प्रकारची यंत्रसामग्री उपलब्ध आहे. पाण्यात नुसता कचरा, बॅक्टेरिया, जीवजंतू आहेत किंवा नाहीत एवढेच पाहणे महत्त्वाचे नाही. पाणी गाळून तर घ्यायलाच पाहिजे. त्यात कुठलेही जड पदार्थ, माती वगैरे नाहीत याची खात्री हवीच, तसेच पाणी उकळणेही आवश्‍यक आहे. जेवढा अधिक अग्निसंस्कार पाण्यावर करावा तेवढे पाणी पचनाला हलके व सहजगामी होऊन सर्व शरीराला फायदा होतो. पाणी उकळताना त्यात शुद्ध सोने टाकले तर असे सुवर्णसिद्ध जल आरोग्यासाठी अत्युत्तम असते.

जगात दोनतृतीयांश पाणी आहे. आपल्या शरीरातही खूप प्रमाणात पाणी असते. शरीरात पाणी असल्याने सर्व वातावरणाचा, ग्रह-ताऱ्यांचा, चुंबकीय व विद्युततरंगांचा परिणाम शरीरावर व मनावर होतो. आपल्या शरीरात पाणी असल्यानेच बहुधा म्हटले जाते ‘थांब, तुला एकदा माझे पाणी दाखवतो.’ पाणी चढवलेली तलवारच दुसऱ्याला ‘पाणी पाजू’ शकते. अशा तऱ्हेने पाणी शब्दाच्या अनेक कल्पना जनमानसात रुजवून पाण्याचे महत्त्व दाखवून दिले आहे. ‘जीवन’ शब्दाचे सार्थक पाण्यातच होत असल्याने आपल्या परंपरेत पाण्याला अधिक महत्त्व दिले आहे. इतकेच नाही तर आपल्या मेंदूत असलेले पाणी, मेंदूजलावर (सेरेब्रो स्पायनल फ्लुइड) संस्कार करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ‘उदकशांत विधी’ तयार केला आहे. सध्या पुन्हा ‘वास्तुशास्त्र’ प्रचलित होत आहे. ईशान्येला पाणी असावे; पश्र्चिमेला वरुणदेवता असल्याने पश्र्चिमेला पाणी चालते; आग्नेयेला अग्निदेवता असल्याने तेथे पाणी नसावे. एकूण पाणी आपल्या आत-बाहेर सर्व ठिकाणी व्यापून राहिले आहे.

सप्तमहासागर, अनेक तलाव व विहिरी, सर्व आकाशही पाण्यानेच भरलेले आहे. तेव्हा आपल्या चहूबाजूने असलेल्या पाण्याची आपण काळजी घेतली पाहिजे. वरुणदेवतेची प्रार्थना केली की सुखसमृद्धीला तोटा नाही. मृतसमुद्र अशीही एक संकल्पना आहे. त्या ठिकाणच्या पाण्यात खूप मीठ असल्याने मनुष्य पाण्यावर तरंगतो, एकदम हलकेपणाचा अनुभव येतो. काही ठिकाणी जमिनीतून पाण्याबरोबर वर येणारे क्षार किंवा गंधकासारख्या पदार्थामुळे ते पाणी उपचाराचे माध्यम होते. पाण्यावर संस्कार करून अनेक प्रकारे उपयोग करता येतो. पाण्यावर भौतिक पातळीवर अग्निसंस्कार, शक्तीच्या पातळीवर सुवर्णसंस्कार आणि सूक्ष्म पातळीवर चांगल्या विचारांचा, मंत्रांचा, स्वास्थ्यसंगीताची संस्कार झालेला असला तरच असे पाणी खरोखरच ‘जीवन’ संज्ञेचे सार्थक करणारे म्हणता येईल.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित.)

Web Title: Article Writes Rite Of Water

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :waterarticle
go to top