गोपालकृष्ण महाराज की जय ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shri krishna janmashtami

जन्माष्टमी हा भारतातच नव्हे तर जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा उत्सव. श्रीकृष्णलीला, श्रीकृष्णांच्या महाभागवताची पारायणे, प्रवचने ही आजही उत्सवाचे स्वरूप देऊन साजरी केली जातात.

गोपालकृष्ण महाराज की जय !

जन्माष्टमी हा भारतातच नव्हे तर जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा उत्सव. श्रीकृष्णलीला, श्रीकृष्णांच्या महाभागवताची पारायणे, प्रवचने ही आजही उत्सवाचे स्वरूप देऊन साजरी केली जातात. श्रीकृष्ण म्हणजे एक आदर्श अपत्य. केवळ स्वतःच्या आई-वडिलांना बंधनातून मुक्त केले म्हणून नव्हे तर आपले इतर नातेवाईक, मित्रमंडळी, बालगोपाळांपासून ते अक्रूर, यादव, पांडव वगैरे सर्व वयाच्या व अधिकाराच्या लोकांना अभिमान वाटेल असा हा जन्म, असे हे कर्तृत्व आणि असा हा आदर्श. जगावेगळे असे काही न करता सर्वसामान्यांप्रमाणे राहून अगदी गल्लीतल्या मुलांमध्ये खेळण्यापासून ते आपल्याहून मोठ्या वयाच्या गोप-गोपींमध्ये रममाण होऊन मिसळून जाणारा; नंदग्राम गोकुळासारख्या लहानशा गावावरची संकटे दूर करणारा तसेच मथुरेसारख्या मोठ्या शहरावर होणाऱ्या अत्याचारासाठी झटणारा; अनेक जुलमी राजांना दंड देऊन तेथील प्रजेला भीतीमुक्त करणारा; स्त्रीला पूजनीय व आदिदेवता मानून तिचा अपमान हा संपूर्ण मानवतेचा अपमान आहे असे समजून स्त्रीची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी अनेक क्लृत्प्या, वेळप्रसंगी कारस्थाने करून स्त्रीला त्रास देणाऱ्यांना, तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांना नेस्तनाबूत करणारा; मल्लविद्येत प्रावीण्य मिळविलेला; उत्तम शरीरसौष्ठव व स्वास्थ्य असलेला; दह्या- दुधाच्या-लोण्याच्या व्यवसायापासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या व्यवसायात व्यवस्थित लक्ष घालून सर्वसामान्यांना समृद्धी मिळवून देणारा; सामाजिक क्रांती करविणारा, प्रत्यक्ष युद्धात सहभागी न होता अर्जुनाकडून त्याचे कर्तव्य करवून घेणारा; अधर्माने लढणाऱ्यांचा पराजय करविणारा; पती म्हणून अनेक राजकन्यांना हवाहवासा वाटणारा; रक्षणकर्ता म्हणून सर्वांना हवाहवासा वाटणारा; श्रीकृष्ण बरोबर असला तर विजय नक्की असा विश्र्वास, खात्री व श्रद्धा उत्पन्न करणारा; आपल्या घरात असेच बालक जन्माला यावे असे प्रत्येक दांपत्याला वाटायला लावणारा असा श्रीकृष्ण.

कुलाला अभिमान ठरावा असे श्रीकृष्णासारखे अपत्य, मग तो मुलगा असो वा मुलगी, जन्माला येण्यासाठी गर्भसंस्कारांचे महत्त्व खूपच असते. कंसाने तुरुंगात टाकल्यामुळे वसुदेव-देवकी यांना संपूर्ण विश्रांती मिळाली व ईशचिंतन घडले. सर्व प्रजेचे संकट दूर करून रक्षण करणारे अपत्य आपल्या पोटी जन्माला येणार अशी श्रद्धा व विचार त्यांच्या मनात पक्का झाला आणि म्हणून श्रीकृष्णांचा जन्म झाला. प्रथम दांपत्याच्या मनात असा विश्र्वास, आत्मविश्र्वास किंवा श्रद्धा रुजली पाहिजे की होणारे अपत्य हे केवळ एक मूल झाल्याचे समाधान असण्यापुरते असू नये तर ते अपत्य संपूर्ण मानवजातीला काहीतरी उपकारक ठरेल असे असावे. मुख्य म्हणजे अपत्याचा जन्म ही संकल्पना असावी, अपघात नसावा. एखादे काम करायचे असल्यास त्यासाठी मंडळी सुटी काढतात, वेळ काढतात, योग्य ऋतू पाहतात व कार्याची आखणी करतात. त्याप्रमाणे गर्भधारणा ही आकस्मिक व अनपेक्षित नसावी तर त्यासाठी व्यवस्थित पूर्वनियोजन केलेले असावे. देवकीची पहिली सात मुले कंसाने वधली. आठव्या वेळी कृष्णाऐवजी कंसाच्या हातात आलेली आदिमाया त्याच्या हातातून निसटून अवकाशात लुप्त झाली. तिचा आठवा पुत्र, श्रीकृष्ण नेदाघरी वाढू लागला.

कारागृहात असल्यामुळे म्हणा, किंवा तशी योजना असल्याने म्हणा, गर्भातील अपत्यावर श्रद्धा संस्कारांचे परिणाम झालेच. तसेच गर्भातील प्रत्यक्ष देवत्व असलेल्या श्रीकृष्णांमुळे मातेचे आरोग्य, मानसिकता वगैरे गोष्टी पण संतुलित राहिल्या. हा सर्व श्रीकृष्णमहिमा लक्षात घेऊन ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तकाच्या वेळी गर्भवतीच्या शयनकक्षात एखादा सुंदर श्रीकृष्णांचा फोटो असावा अशी कल्पना मनात आली. अशा सुंदर फोटोकडे पाहिल्यावर आपल्याला श्रीकृष्णासारखे बालक व्हावे अशी इच्छा उत्पन्न होऊन श्रीकृष्णकृपेने तसे घडेल सुद्धा अशी यामागची संकल्पना. श्रीकृष्णांच्या गोपीवस्त्रहरण (आत्म्यावर चढविलेले मुखवटे काढल्याशिवाय परमात्मदर्शन नाही हे सांगण्यासाठी), द्रौपदीवस्त्रपूरण (स्त्रीसन्मान व प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी), कालियामर्दन (जलशुद्धिकरणासाठी), कंसनिर्दालन (दुष्टप्रृत्तींचा नाश करण्यासाठी) अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी प्रसिद्ध असल्या तरी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी व लोककल्याणासाठी, त्यांच्या उद्योग व्यवसाय संवर्धनासाठी व त्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी केलेला प्रयत्न. मित्रमंडळींवर केलेले अतिशय प्रेम. दूध-दुभत्याच्या वाढीसाठी व बालकांना आवश्‍यक असलेले दूध, लोणी, तूप योग्य वेळी मिळावे म्हणून स्वीकारलेला ‘माखनचोर‘ हा आरोप. मथुरेच्या बाजारातील जाचक करआकारणी विरोधात केलेले आंदोलन. गो-सेवा व दुधा-तुपाचे महत्त्व वाढविल्यामुळे श्रीकृष्णांना ‘गोपाल’ हे नामाभिधान मिळाले.

आरोग्यासाठी कृपा हवी गोपालकृष्णांची व सेवा हवी गाईची. दूध, दही, लोणी, तूप याशिवाय माणसाचे आणि गोमय, गोमूत्र याशिवाय वनस्पतींचे व शेतीचे आरोग्य नीट राहणारच नाही, तसेही ‘गो’ (इंद्रिये) ही बाह्यवस्तूकडे आकर्षित होणारी असतात आणि त्यांना ‘पाल’ म्हणजे त्यांच्यावर विजय मिळवून तनाचे व मनाचे संपूर्ण आरोग्य देणारा तो ‘गोपाल’. जीवनाचे महाभारत हे पूर्वी झालेल्या कौरव-पांडवांच्यात झालेल्या महाभारतापुरते मर्यादित नसून त्याच पंचेंद्रियांचा खेळ आजवर चालू आहे. आणि त्याविरुद्ध कर्माचा खेळ चालू असताना त्यातून उत्पन्न झालेला अहंकार इंद्रियांवर आरूढ होण्याचा प्रयत्न करत राहतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या काळवाचक, स्थळवाचक, प्राणिवाचक, जातिवाचक बंधनात न राहता, जे ज्ञान जीवनाला सर्वतोपरी उपयोगी पडणार आहे, ते मिळविण्याचा प्रयत्न केला, पांचभौतिक देहात असलेल्या इंद्रियांच्या पांचभौतिक स्वभावातून आलेले गुण-अवगुण, इंद्रियांच्या सवयी एका बाजूला आणि कशाचाही आधार नसलेला अहंपणा दुसऱ्या बाजूला हा भेद समजून घेऊन मूळ तत्त्वाला समजून घेतले तरच जीवन सुखी होऊ शकते. श्रीकृष्ण हे जसे श्रीविष्णूंचे अवतार तसेच श्रीधन्वंतरी हे सुद्धा श्रीविष्णूंचेच अवतार. त्यामुळे जीवन सुखी करण्यासाठी जीवन जगण्यासाठी काय करावे, कसे राहावे याचे मार्गदर्शन श्रीकृष्ण त्यांच्या कृतीतून, जीवनातून देतात. आयुर्वेदात अग्नीला भगवान म्हटलेले आहे.

तसेच श्रीमद्‌भगवद्‌गीतेतही म्हटले आहे, अहं वैश्र्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः । प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्‌ ॥१५-१४॥ सर्व प्राण्यांच्या देहात स्थित असलेले चैतन्यतत्त्व वैश्र्वानर अग्नीरूप होऊन प्राण व अपान यांनी युक्त होत्साता चारी प्रकारचे अन्न पचवतो. प्राण व अपान हे अग्नीमुळे आहेत, प्राण अपान गेले की जीवन संपून जाते. भक्ष्य (चावून खाण्याचे), पेय (पिण्याचे), लेह्य (चाटण्याचे) व चोष्य (चोखण्याचे) असे चार प्रकारचे अन्न असते. या चारीही प्रकारचे अन्न मी पचवतो असे भगवंत म्हणत आहेत. यासाठी मूळ व्यवस्था नीट असणे आवश्‍यक असते. यासाठी प्रकृतीला अनुरूप संतुलित आहार, योगासने, प्राणायाम, नैसर्गिक जीवनपद्धती यांचा शरीराला आधार असणे आवश्यक असते. मूळ आरोग्याकडे लक्ष न देता शरीराला फक्त रासायनिक औषधे, इंजेक्शने, शस्त्रकर्म यावर चालवण्याचा उपयोग नाही. केवळ भौतिक शरीराचा विचार करण्याचाही उपयोग नाही. ‘प्रसन्नात्मेन्द्रियमनः’ हे लक्षात घेऊन आत्म्याच्या एकूण संकल्पनेला समजून घेऊन केलेला उपचार हा खरा उपचार. म्हणून आयुर्वेदासारखे भारतीय वैद्यकशास्त्र रोगाच्या लक्षणांवर लक्ष देत नाही, तर रोग होण्यामागचे मूळ कारण काय आहे, कुठला प्रज्ञापराध म्हणजे नैसर्गिक धर्माविरुद्ध झालेली चूक घडल्यामुळे रोग झाला आहे, ज्या परमतत्त्वावर जीवन उभे आहे त्यात व व्यक्तीमध्ये फारकत का झाली हे समजून घेण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे समत्व स्थापित करण्याची आयुर्वेदाची संकल्पना आणि श्रीकृष्णांची ‘समत्वं योग उच्यते’ ही संकल्पना या मुळाच एकच आहेत.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेद द्वारा संकलित)

Web Title: Article Writes Shri Krishna Janmashtami

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..