ताण रक्तदाबाचा!

‘दहा वर्षांपासून माझी ब्लडप्रेशरची गोळ सुरू आहे’ हे किंवा अशा प्रकारचे वाक्य सध्या इतक्या सहजतेने म्हटले जाते की विचारता सोय नाही.
Blood Pressure
Blood PressureSakal

‘दहा वर्षांपासून माझी ब्लडप्रेशरची गोळ सुरू आहे’ हे किंवा अशा प्रकारचे वाक्य सध्या इतक्या सहजतेने म्हटले जाते की विचारता सोय नाही. ‘आयुर्वेदात ब्लडप्रेशर कमी करण्याची गोळी असते का’ असा प्रश्र्नअनेकांना पडलेला दिसतो. ब्लडप्रेशर (रक्तदाब) हा खूप कमी असून चालत नाही किंवा खूप वाढूनही चालत नाही. पण आयुर्वेदाच्या दृष्टीने योग्य निदान केले, रक्तदाबाची संप्राप्ती समजून घेतली आणि त्यानुसार योग्य उपचार केले तर उत्तम उपयोग होताना दिसतो.

वैद्यकशास्त्राने सर्वसामान्यपणे किती रक्तदाब असताना आरोग्य व्यवस्थित आहे याबाबत अनेकांचे अवलोकन करून त्यावरून सामान्य रक्तदाब किती असावा याची एक संख्या निश्र्चित केलेली असते. तेव्हा कुणाचा रक्तदाब थोडासा मागे-पुढे असला तर रोग झाला असे नव्हे. रक्तदाब कमी-अधिक झाल्याची लक्षणे शरीरावर दिसत असली परंतु रक्तदाब मोजल्यावर ती संख्या ठीक असल्यामुळे होत असलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष केले गेले तरी पुढे शरीराचा घात होऊ शकतो. ज्यावेळी अन्नपचन नीट होत नाही आणि शरीरात पित्त, ॲसिडिटी वाढलेली असते अशा वेळी रक्तदाब कमी-जास्त होऊ शकतो.

विरेचनासारख्या प्रक्रियेने नुसत्या पोटातीलच नव्हे तर सर्व शरीरातील पित्ताला शुद्ध करणे, आपल्या प्रकृतीला कोणता आहार मानवणारा आहे हे समजून घेऊन त्यानुसार आहार करणे, ज्या ऋतूत पित्त वाढते त्या ऋतूत पित्तकर गोष्टी न खाणे अशी काळजी घेतल्यास अशा प्रकारचा रक्तदाब बरा होऊ शकतो. शरीरात उत्पन्न झालेला जड मल आतड्यातून विष्ठेमार्फत बाहेर जातो तसेच मूत्रमार्गाने द्रवमल बाहेर जातो. मूत्रमल बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत काही अडचण निर्माण झाली, या प्रक्रियेत ज्यांचा मोलाचा वाटा असतो ती मूत्रपिंडे (किडनीज्‌) व्यवस्थित काम करू शकली नाहीत तरी रक्तदाब वाढतो.

इतर काही कारणांमुळे रक्तदाब कमी-अधिक होत राहिला तर त्याचा परिणाम अन्नपचनावर व मूत्रपिंडांवरही होतो. म्हणून जसे पोट साफ होणे आवश्‍यक असते तसे मूत्रविसर्जन साफ व विशिष्ट दाबाने होणे आवश्‍यक असते. तसेच मूत्रावाटे शरीराला आवश्‍यक असणारे घटक शरीराबाहेर जात नाहीत यावरही लक्ष ठेवणे आवश्‍यक असते.

हृदयात दोष उत्पन्न झाला किंवा रक्तदाबामुळे हृदयावरच परिणाम होऊ लागला तर त्यामुळेही रक्तदाब उघडकीला येतो. रक्तदाबाचा त्रास होण्यासाठी सध्याच्या काळातील सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे मनावरचा अतिरिक्त ताण. सध्या या कारणामुळे रक्तदाबाचा विकार असणाऱ्या अनेक व्यक्ती आढळतात. एकूणच जीवनात नको इतक्या मोठ्या उड्या मारणे, तुलनात्मक जीवन जगणे, इतरांप्रमाणे आपल्यालाही सगळ्या सुखसोयी मिळाव्यात असा अट्टहास बाळगणे, पैशाचा, संपत्तीचा हव्यास धरणे यामुळेही रक्तदाब वाढतो असे दिसते.

व्यवसाय वाढविण्याच्या हेतूने सतत चिंताग्रस्त राहणे, खोटी आश्र्वासने देऊन व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करणे, चुकीच्या मार्गाने संपत्ती उभी करणे यामुळेही अनेकांचा रक्तदाब वाढलेला दिसतो. रक्तदाबाचा संबंध मनाशी असल्यामुळे मानसिक ताण दूर करण्याचा प्रयत्न करणे हाच इलाज सर्वप्रथम करणे आवश्‍यक आहे. ज्या सवयींमुळे मनावर ताण येतो अशा गोष्टी सोडणेही आवश्‍यक आहे.

काळाचाही मनावर मोठा ताण असतो. स्वतःसाठी विशिष्ट वेळ देऊन मनाला शांत करण्याचा प्रयत्न करणे हाही रक्तदाबावरचा इलाज असू शकतो. म्हणूनच योग, ध्यान, संगीत या गोष्टी सध्या प्रचलित झालेल्या दिसतात. तसेच श्र्वासोच्छ्वास नीट झाला नाही म्हणजेच प्राणशक्तीचे आकर्षण नीट झाले नाही तर केवळ रक्तदाबच नव्हे तर अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होऊ शकतात म्हणून प्राणायामाचे महत्त्व मोठे आहे.

तेव्हा रक्तदाब दूर करण्यासाठी मनाला ताब्यात ठेवणे, मनाला प्रिय असलेल्या कल्पनांना गोंजारत राहण्यापेक्षा सर्व शरीरव्यवस्थेला व बरोबर बाह्यजगताशी असणाऱ्या संबंधाला श्रेयस्कर असलेल्या कल्पना अवलंबणे अधिक गरजेचे असते. म्हणून मेंदूच्या आरोग्यावर खास लक्ष ठेवणे आवश्‍यक असते. स्वतःचे स्नायू, शरीर बलदंड व्हावे यासाठी माणसे प्रयत्नशील असतात, त्यादृष्टीने आहार-विहार करण्यावर भर देतात. परंतु मेंदूच्या आत असलेली विशिष्ट केंद्रे व मेंदूच्या सभोवताली असलेला सोमरस यांच्या आरोग्याकडे सहसा लक्ष दिले जात नाही, त्यासाठी काही खास प्रयत्न केले जात नाहीत. तेव्हा मेंदूला व मेंदूला मदत करणाऱ्या नाक, कान व डोळे यांचे आरोग्य नीट ठेवणे खूप आवश्‍यक असते.

रक्तदाब असणाऱ्यांनी तळलेले, तेलकट पदार्थ शक्यतो टाळणे चांगले असते. चीज, श्रीखंड, मांसाहार, अंडी, वाटाणा, पावटा, चवळी, हरबरा वगैरे पचायला जड असणाऱ्या व वातवर्धक गोष्टी टाळणे, कच्चे मीठ किंवा वरून मीठ घ्यायची सवय सोडणे हे सुद्धा श्रेयस्कर असते. रक्तदाब असणाऱ्यांसाठी रोज ३०-३५ मिनिटे चालायला जाणे, योगासने करणे फायदेशीर असते, मात्र शरीराला थकवणारे व्यायामप्रकार टाळणे योग्य. रात्री लवकर झोपणे, प्रकृतीनुरूप किमान सहा ते सात तास शांत झोप लागेल याकडे लक्ष ठेवणे हे सुद्धा रक्तदाबाच्या रुग्णांसाठी आवश्‍यक होय.

रक्ताभिसरणाला मदत होण्यासाठी, रसरक्तधातूंच्या गतीचे नियमन करण्यासाठी व शरीरातील रक्तवाहिन्यांतील काठिण्य नष्ट होण्यासाठी ‘अभ्यंग’ करणे हा एक श्रेष्ठ व सहज करता येण्यासारखा उपाय होय. मात्र, अभ्यंगासाठी वापरलेले तेल आयुर्वेदिक पद्धतीने शास्त्रशुद्ध रित्या तयार केलेले असावे. अशा शास्त्रशुद्ध अभ्यंगाची विशेषता अशी की याने कमी झालेला रक्तदाब पुन्हा पूर्ववत होऊ शकतो तसेच वाढलेला रक्तदाब कमी होऊ शकतो.

पादाभ्यंग करणे, रात्री झोपण्यापूर्वी नाकात साजूक तूप किंवा नस्यसॅन घृत टाकणे, आयुर्वेद शास्त्राने सांगितलेले स्नेहन-स्वेदनपूर्वक पंचकर्म, विशेषतः विरेचन, बस्ती या उपक्रमांचा रक्तदाबात उत्कृष्ट फायदा होताना दिसतो. बरोबरीने मूळ कारणानुरूप शिरोधारा, शिरोबस्ती, कर्णपूरण, पिंडस्वेदन वगैरे उपचार उत्तम फायदा करणारे आहेत.

शवासन, योगनिद्रा या योगातल्या क्रियांचा वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी खूप उपयोग होतो. आत्मसंतुलन केंद्रात असंख्य रुग्णांनी अनुभव घेतल्यानंतर युनिव्हर्सिटी संलग्न संशोधनातून ‘संतुलन योगनिद्रा’ संगीताचा उपयोग सिद्ध झालेला आहे. तेव्हा अशा योगनिद्रा संगीताचाही रक्तदाब नियंत्रणासाठी उपयोग करता येतो. एकूण थोडीशी काळजी घेतली तर रक्तदाब व्यवस्थित राहून आपल्या जीवनयात्रेत शरीराचा प्रकाश, ओज, औरा (प्रभा) व्यवस्थित दिसू शकेल.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com