आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा.

दक्षिणायनात सूर्य थंडावा व पाणी म्हणजे जीवन देण्यास सुरवात करतो व उत्तरायणात उष्णता वाढून तीच जलशक्ती परत घेण्यास सुरवात करतो.
Summer Temperature
Summer TemperatureSakal
Summary

दक्षिणायनात सूर्य थंडावा व पाणी म्हणजे जीवन देण्यास सुरवात करतो व उत्तरायणात उष्णता वाढून तीच जलशक्ती परत घेण्यास सुरवात करतो.

पृथ्वीच्या स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्याने सूर्य पूर्वेला उगवला तरी सहा महिने उत्तरेकडे व सहा महिने दक्षिणेकडे सरकतो. मकरसक्रांतीच्या आरंभापासून ते कर्कसंक्रांतीच्या आरंभापर्यंत सूर्याची गती उत्तरेकडे असते म्हणून त्यास उत्तरायण म्हणतात. साधारण मार्गशीर्ष महिन्यात (२१ डिसेंबर) उत्तरायणास सुरवात होते व त्यात शिशिर, वसंत व ग्रीष्म ऋतूंचा समावेश होतो. आषाढ महिन्यापासून (२१ जून) दक्षिणायनास प्रारंभ होतो व त्यात वर्षा, शरद व हेमंत ऋतूंचा समावेश होतो. दक्षिणायनात सूर्य थंडावा व पाणी म्हणजे जीवन देण्यास सुरवात करतो व उत्तरायणात उष्णता वाढून तीच जलशक्ती परत घेण्यास सुरवात करतो. हे सर्व निसर्गतः चक्राकार गतीने सुरू असते.

आपल्याला काही मिळाले की बरे वाटते पण द्यायची वेळ आली की नकोसे होते. म्हणूनच देणारा तो ‘देव’ असे समजले जाते. मदत, कर्ज घेताना आनंद होतो पण परत करण्याच्या वेळी नाना क्लृप्त्या लढवून टाळाटाळ केली जाते. पण जलतत्त्वाशिवाय जीवन नाही, किंबहुना पाण्यालाच ‘जीवन’ म्हणतात. खरेतर माणसामाणसातील आपुलकी, ओलावा हेच जीवन! पण पाण्यावाचून जगण्याची कल्पनाच करवत नाही. प्रत्येक प्राण्याच्या शरीराचे एक विशिष्ट तापमान असते.

माणसाच्या शरीराचे तापमान सामान्यतः ९८.६ फॅरनहीट असते. पण त्यात बदल होऊ लागला की अस्वस्थता जाणवते. शरीरात जवळ जवळ दोन तृतीयांश पाणी असते व यामुळे शरीर आतून किंवा बाहेरून उष्णतेने तापू लागले की शरीरातील पाणी कमी होऊ लागते व जीव अस्वस्थ होतो. उन्हामुळे त्वचा काळी पडणे, डोळ्यांची आग होणे, लघवी कमी होणे, शौचाला-लघवीला जळजळ होणे, चक्कर येणे, याबरोबरच शरीरात रुक्षता जाणवते. पावसाळ्यातही रोगांची जास्ती काळजी घ्यावी लागते पण उन्हाळ्यात जरा जरी निष्काळजी राहिले तरी छोटे मोठे त्रास होण्याचा संभव अधिक असतो.

  • यादृष्टीने सकाळच्या थंड वेळेचा उपयोग करून घेण्यासाठी लवकर उठणे, मोजका व्यायाम करणे फायद्याचे ठरेल. एरवी वर्षभर इतरांना टोप्या घालण्याचे काम केले तरी उन्हाळ्यात न लाजता टोपीचा वापर स्वतः करता येईल. पूर्वी टोपीच्या आत कांदा ठेवत असत. आता तसे केले नाही तरी डोक्यावर चांगले हेअर ऑइल लावावे आणि रात्री झोपताना डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवाव्यात.

  • मुलांना सुट्ट्या असल्यामुळे परगावी जायचे असेल तर उन्हाच्या वेळचा प्रवास टाळावा. थंड हवेच्या ठिकाणी गेले तरी दुपारचे ऊन टाळावे. पळीभर पाण्याने तीन वेळा आचमन करण्याने जी तृप्ती मिळते त्याचा अनुभव उन्हाळ्यात नक्कीच घेता येईल. बाहेरून उन्हातून फिरून आले की उभ्या उभ्या आणि ढसाढसा थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक पिणे कटाक्षाने टाळावे. मध- लिंबू-पाणी, गुलाबाचे सरबत, बडीशेप-वाळा यांचे सरबत उन्हाळ्यात अवश्‍य घ्यावे. गॅस मिसळलेल्या रासायनिक वासांच्या बाटलीबंद शीत पेयांचे भूत बाटलीतच बंद करून ठेवावे.

  • उन्हाळ्यात घाम येण्याचे प्रमाण वाढणे साहजिक असते, शरीराचे तापमान आटोक्यात राहील यासाठी खरे तर ही निसर्गाने केलेली योजना असते. मात्र कपडे ओले होतील इतका घाम येणे, घामाला एक प्रकारचा तीक्ष्ण गंध असणे फारच त्रासदायक असते. हे टाळण्यासाठी स्नानाच्या वेळी कुळथाचे पीठ, वाळा, अनंत मूळ, नागरमोथा वगैरे द्रव्यांपासून तयार केलेले उटणे लावण्याचा उपयोग होतो. स्नानानंतर काखेमध्ये किंवा अति प्रामणात घाम येणाऱ्या इतर ठिकाणी तुरटीचे बारीक चूर्ण लावण्याचाही उपयोग होतो.

  • संवेदनशील त्वचा असणाऱ्यांना, विशेषतः लहान मुलांना उन्हाळ्यात घामोळ्या येताना दिसतात. यावर दूर्वांचा रस लावण्याचा किंवा शतधौतघृत लावण्याचा उपयोग होतो. अनंतमूळ व चंदन यांचे बारीक वस्त्रगाळ चूर्ण भुरभुरण्यानेही घामोळ्या कमी होताना दिसतात.

  • उन्हाळ्यात हाता-पायांची आग होणे ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळणारी तक्रार असते. यावर सर्वांत उत्तम उपाय म्हणजे पादाभ्यंग करणे. आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करण्याने उष्णता कमी होते. उपलब्धता असल्यास दूर्वांच्या हिरवळीवर सकाळ संध्याकाळ अनवाणी पायांनी चालण्याने तळपायांचा दाह कमी होण्यास मदत मिळते.

  • उन्हाळ्यात संपूर्ण अंगाचाही दाह होऊ शकतो. अशा वेळी कलिंगडाच्या सालीच्या आत असणारा पांढरा गर अंगावर लावण्याचा उपयोग होतो. कलिंगड अर्धे कापून आतला गर काढून घेतल्यानंतर राहणारे हेल्मेट डोक्यावर ठेवल्याने डोक्यातील उष्णता कमी होते.

  • गुलकंद व मोरावळा हे दोन आयुर्वेदिक योग म्हणजे उन्हाळ्यातील वरदानच होत. देशी गुलाबाच्या गुलाबी नाजूक पाकळ्या व खडीसाखरेपासून सूर्याच्या उष्णतेच्या साहाय्याने तयार केलेला शुद्ध गुलकंद, तोही जर प्रवाळयुक्त असला तर त्यामुळे उष्णतेचा त्रास निश्र्चित कमी होतो.

  • मेंदीची ताजी पाने वाटून तयार केलेला लेप तळपाय व तळहातांवर लावण्यानेही आग कमी होते.

  • उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्या लागणे म्हणजे लघवीची जळजळ होणे, लघवी कमी प्रमाणात होणे वगैरे त्रास होऊ शकतात. यावर धणे-जिऱ्याचे पाणी पिण्याचा, साळीच्या लाह्यांचे पाणी पिण्याचा उपयोग होतो. लिंबू-सरबत किंवा कोकम सरबत तर प्रसिद्ध आहेतच, पण वाळा-चंदनाचे आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेले पेयही उन्हाळ्यात उपयोगी ठरते मातीच्या छोट्या माठामध्ये ग्लासभर पाणी त्यात थोडे वाळ्याचे चूर्ण, ज्येष्ठमध, साळीच्या लाह्या, देशी गुलाबाच्या ताज्या किंवा वाळलेल्या पाकळ्या भिजत घालाव्यात. सकाळी हे सर्व मिश्रण हाताने कुस्करावे किंवा रवीने घुसळावे व गाळून घ्यावे. त्यात चमचाभर खडीसाखर मिसळून प्यावे. अशा सरबताने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते, तहान शमते, ऊन लागत नाही व उन्हाळा सुसह्य होतो.

  • कधी कधी उन्हाळ्यात रात्री फारशी भूक लागत नाही अशा वेळी मुगाचे कढण प्यावे. मूग वीर्याने थंड असून पचायला हलके असतातच पण ताकद कायम ठेवणारेही असतात. मुगाचे कढण बनवण्याची पद्धत अशी - अर्ध्या वाटी मुगाच्या डाळीत आठ कप पाणी, आवळकाठीचे पाच-सहा तुकडे, पाच- सहा मनुका व चवीपुरते सैंधव घालून शिजवावे. योग्य प्रकारे शिजल्यावर गाळून घेऊन प्यावे. याने उन्हाळ्यात होणारा पित्ताचा त्रास म्हणजे हाता- पायाच्या तळव्यांची रसरस होणे, डोळे जळणे, लाल होणे, एकसारखी तहान लागणे वगैरे लक्षणे कमी व्हायला मदत होते.

अशाप्रकारे उन्हाळ्यात आवश्यक ती काळजी घेतली तर उन्हाच्या झळांचा त्रास न होता आरोग्याचा आनंद घेता येईल हे नक्की.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com