वडिलोपार्जित दमा 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 20 January 2017

प्राण हा सर्व ठिकाणी ओतप्रोत भरलेला असतो, फक्‍त त्याचे आकर्षण करण्याची म्हणजेच जिवंत राहण्याची कला साधता यायला पाहिजे. पण फुप्फुसांमध्ये अवरोध निर्माण होण्यामुळे श्वसनाला त्रास होऊन प्राणशक्‍ती कमी पडू शकते. प्राणशक्‍ती कमी पडण्याची क्रिया पिढ्यान्‌ पिढ्या चालू राहिली, तर पेशी व गुणसूत्रांवर संस्कार होऊन दोष पुढच्या पिढीकडे संक्रमित होतात. चुकीच्या वागण्यामुळे येणाऱ्या विकारात दम्याचा नंबर वरचा असला, तरी वडिलोपार्जित "संपत्ती' म्हणूनही दमा येऊ शकतो.

काही कारणाने हार्ट अटॅक येऊन हृदय बंद पडते असे दिसले, तरी त्यावर विशिष्ट उपचार केल्यास किंवा इलेक्‍ट्रिक शॉक दिल्यास हृदय पुन्हा चालू झाले असे बऱ्याच वेळा दिसून येते. अशा वेळी प्राणशक्‍तीने त्या व्यक्‍तीला सोडून जायचे ठरविलेले नसते. एकदा का प्राणाने शरीर सोडून जायचे ठरवले, की क्षुल्लक कारणानेही मृत्यू येतो. प्राण हा सर्व ठिकाणी ओतप्रोत भरलेला असतो, फक्‍त त्याचे आकर्षण करण्याची म्हणजेच जिवंत राहण्याची कला साधता यायला पाहिजे. धूम्रपानासारख्या नाना तऱ्हेच्या व्यसनांनी वा वातावरणातील प्रदूषणामुळे सतत भीतीच्या दबावाखाली जगल्यामुळे किंवा छातीच्या दम्यासारख्या रोगामुळे प्राणाचे आकर्षण कमी होते आणि जीवन नकोसे वाटायला लागते. 

पृथ्वीवर दोन तृतीयांश पाणी असले, तरी मनुष्य आकाशाकडे नजर ठेवून जगणारा प्राणी आहे, नव्हे तर सर्वच प्राणी आकाशाकडे डोळे लावून असतात. याची कारणे दोन आहेत. एक म्हणजे पृथ्वीवरचे पाणी शुद्ध होऊन आकाशातूनच येते व प्राणऊर्जा या आकाश व वायुतत्त्वाच्या रूपाने प्राणिमात्रांना मिळू शकते व त्यावर जीवन चालू शकते. त्या ऊर्जेचे रूपांतर करून ती शरीरोपयोगी करण्यासाठी पाण्याची आवश्‍यकता असते, म्हणून पाण्याला "जीवन' म्हटले जाते. पण जीवनासाठी पाण्यापेक्षा "प्राण' अधिक आवश्‍यक आहे. 

हा प्राण सर्व शरीरभर सतत पसरत राहावा यासाठी दोन गोष्टींची आवश्‍यकता असते. यातील पहिली गोष्ट म्हणजे प्राणयुक्‍त हवा फुप्फुसांपर्यंत आणणे व तिचा जलतत्त्वाच्या आधीन असलेल्या रक्‍ताचा प्राणवायूशी संयोग करून प्राणशक्‍ती सर्व शरीरभर खेळविणे. फुप्फुसे व सर्व शरीरभर ज्यामुळे रक्‍तपुरवठा होतो ते हृदय या दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 

माणसाचे लक्ष प्रामुख्याने जडतत्त्वाकडे लागले, की आकाशतत्त्वाचा वा वायुतत्त्वाचा अभाव होऊन श्वसनामध्ये अडचणी येऊ लागतात. पृथ्वी व जलतत्त्वाचे आधिक्‍य असलेला कफ फुप्फुसांमध्ये साठल्यास फुप्फुसांमध्ये हवा जायला जागाच उरत नाही. त्यामुळे फुप्फुसांमध्ये आलेल्या रक्‍ताला प्राण मिळू शकत नाही. प्रत्येक गोष्ट वरवर करायची सवय लागली किंवा वरवरच्या बाह्य देखाव्यावर मनुष्य अधिक भाळू लागला, आतल्या औषधापेक्षा बाहेरच्या वेष्टणाला अधिक किंमत आली, गुणांपेक्षा रूपाला अधिक किंमत आली, सर्व लक्ष रुपयांकडे लागले की या सर्वांचा परिणाम शरीरावरही दिसतो, श्वास खोलवर फुप्फुसांपर्यंत जातच नाही. असा वरवर श्वास घेण्याने रक्‍त कमी पडणे, प्राणशक्‍ती कमी पडणे, अशक्‍तता जाणवणे वगैरे सर्व त्रास वाढतात. जेथे प्राणशक्‍ती नाही तेथे कुजण्याची वा रोगाची क्रिया लवकर होऊ शकते. फुप्फुसे शंभर टक्के कार्यक्षम असणे आवश्‍यक आहे, परंतु सिगारेटसारखी व्यसने असली, तर फुप्फुसांमध्ये निकोटिनसारखी द्रव्ये साठतात व त्रास व्हायला सुरवात होते. खाण्या-पिण्यातून येणारा, शरीरात न विरघळणारा अंश रक्‍ताबरोबर फुप्फुसांमध्ये जाऊन साठला तर फुप्फुसांमध्ये घट्ट आवरण तयार होण्याची शक्‍यता वाढते व त्यामुळे फुप्फुसांची शक्‍ती कमी होऊन श्वासाला त्रास होतो. चुकीच्या वातावरणामुळे, पर्यावरणदोष म्हणता येईल अशा दोषामुळे, अति घातक व अति तीक्ष्ण रसायनांच्या वाफा सतत फुप्फुसांपर्यंत गेल्यामुळे फुप्फुसांना सूज येणे, फुप्फुसांमध्ये अवरोध निर्माण होणे असे अनेक त्रास होऊ शकतात, जेणेकरून श्वसनाला त्रास होऊन प्राणशक्‍ती कमी पडू शकते. प्राणशक्‍ती कमी पडण्याची क्रिया पिढ्यान्‌ पिढ्या चालू राहिली, तसेच पिढ्यान्‌ पिढ्या खाण्या-पिण्याच्या सवयी घराण्यात चालू राहिल्या तर पेशी व गुणसूत्रांवर संस्कार होऊन दोष पुढच्या पिढीकडे संक्रामित होतात. 

चुकीच्या वागण्यामुळे येणाऱ्या विकारात दम्याचा नंबर वरचा असला तरी वडिलोपार्जित "संपत्ती' म्हणूनही दमा येऊ शकतो. असा आलेला दमा लहानपणापासूनच बालकाला त्रास देतो, यालाच बालदमा म्हटले जाते. 

बालकाची वाढ होणे अपेक्षित असताना बालदमा असल्यामुळे रक्‍त व प्राणशक्‍ती कमी पडली तर मुले विकासाच्या बाबतीत मागे पडण्याची शक्‍यता असते. मुले नेहमी हिंडती-फिरती, दंगामस्ती करणारी, उड्या मारणारी असतात, पण या वयात बालदम्यामुळे प्राणशक्‍ती कमी पडल्यास त्यांना त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे वागता येत नाही. त्यामुळे ती खुजी वा एकलकोंडी होऊ शकतात, त्यांना रक्‍त कमी पडल्याचे वा श्वसनाचे त्रास असू शकतात. 

बालदम्यावर इलाज करताना मुलाला औषध देता येते, पण बालदम्यावरचे खरे औषध म्हणजे बालदमा होऊ न देणे. बालदमा होऊ न देण्यासाठी गर्भधारणेपूर्वी स्त्री-पुरुषाने इलाज करणे आवश्‍यक असते, तसेच गर्भधारणा झाल्यानंतर आतील अपत्याला बालदम्यासारखे त्रास जन्मतःच येऊ नयेत म्हणून "गर्भसंस्कार' करणे अत्यंत आवश्‍यक असते. ज्यांच्या घरात आईकडून वा वडिलांकडून दमा हा विकार आहे ते अपत्यप्राप्तीपूर्वी व्यवस्थित पंचकर्मादी उपचार करवून घेऊन नंतर काही दिवस औषधोपचार घेऊन गर्भधारणेला प्रवृत्त झाले व गर्भधारणा झाल्यावरही गर्भसंस्कारांची विशेष काळजी घेतली, तर बालदम्यापासून कदाचित सुटका मिळू शकेल. 
सध्या बालदमा हा चिंतेचा विषय झालेला आहे. कारण सध्या बहुतांशी अपत्यप्राप्ती योजनापूर्वक केली जात नाही. तसेच आजारी पडल्याशिवाय शरीराचे सर्व्हिसिंग (म्हणजे संपूर्ण शरीराची काळजी घेऊन प्रत्येक पेशीमध्ये नवचैतन्य ओतून शरीराचे शुद्धीकरण करून घेणे) केले जात नाही. "तहान लागली की विहीर खोदायला जाणे' या पद्धतीने वागल्यामुळे घराण्यात दमा, फुप्फुसांचे इतर रोग वा रक्‍त कमी असण्याचे विकार असतील तर ते पुढच्या पिढीत येऊ नये यासाठी काळजी घेतली जात नाही. म्हणून असा काही रोग घराण्यात असणाऱ्यांनी अधिकच काळजी घेणे आवश्‍यक असते. 
सुदृढ मूल होण्यासाठी सर्वांनीच काळजी घेणे आवश्‍यक असते. गर्भवतीच्या इच्छा, आवडीनिवडी, डोहाळे पुरवायचे असले तरी प्रकृती पाहून आहाराची योजना करणे आवश्‍यक असते, अन्यथा कफवृद्धी होऊन नंतर मुलाला त्रास होऊ शकतो. 
लहान मुलाची वागणूक आई-वडिलांच्या शिस्तीवर अवलंबून असते, त्यामुळे मुलाने काहीतरी चुकीचे केल्याने दमा झाल्याची शक्‍यता कमी असते. तरीही चुकीच्या वेळी पाण्यात भिजणे, ओल्या डोक्‍यावर वारा लागणे किंवा थंडीत पावसाळ्यात आइस्क्रीम, श्रीखंड, सीताफळ, फार आंबट गोष्टी वगैरे खाण्याने दम्याचा त्रास होऊ शकतो. बालदमा निपटून काढायचा असेल तर गर्भधारणेपूर्वीच स्त्री-पुरुषांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: asthma