esakal | आवेग
sakal

बोलून बातमी शोधा

आवेग

तहानेकडे दुर्लक्ष केले तर कंठाला शोष पडतो, बहिरेपण येते, थकवा येतो, दम लागतो, हृदयात वेदना होतात. अश्रू धरून ठेवण्याने सर्दी होते, डोळ्यांशी संबंधित रोग होतात, हृदयाशी संबंधित विकार होतात, तोंडाची चव बिघडते, चक्‍कर येते. पुरेशी झोप न घेण्याने फार जांभया येतात, डोळ्यांवर झापड येते, विविध शिरोरोग होतात, डोळे जड होतात, तर श्वासाची गती रोखून धरण्याने पोटात गोळा, हृद्रोग आणि मानसिक गोंधळ, चक्कर यांप्रकारचे त्रास होतात.

आवेग

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com

निरोगी दीर्घायुष्य जगायचे असले तर काही नियम पाळणे भाग असते, यातीलच एक महत्त्वाचा नियम म्हणजे नैसर्गिक आवेगांचे धारण न करणे. ‘चरकसंहिता’ या आयुर्वेदाच्या एका मुख्य संहितेत या विषयाला एक संपूर्ण अध्याय वाहिलेला आहे, ज्यात कोणता आवेग धरून ठेवण्याने काय होते आणि त्यावर काय उपचार करायचे असतात याची माहिती दिलेली आहे, आत्तापर्यंत आपण भूक, ढेकर, शिंक, उलटी वगैरे बऱ्याच आवेगांची माहिती घेतली. आज आपण याच्या पुढच्या माहिती घेऊया. 

तहान
तहान लागली की जीव कासावीस होतो, मनुष्य काहीही करून पाणी किंवा तत्सम पेय मिळवितो आणि तहान शमवतो; परंतु काही कारणामुळे तहान लागूनही पाणी प्यायले गेले नाही तर पुढील त्रास उद्‌भवतात. 
कण्ठास्यशोषो बाधिर्यं श्रमः श्वासो हृदि व्यथा ।
पिपासानिग्रहात्‌ तत्र शीतं तर्णभिष्यते ।।
...चरक सूत्रस्थान

तहानेकडे दुर्लक्ष केले तर कंठाला शोष पडतो, बहिरेपण येते, थकवा येतो, दम लागतो, हृदयात वेदना होतात. यावर शीतल आणि तृप्ती मिळेल असे अन्नपान योजावेत. 
या ठिकाणी शीतल म्हणजे तापमानाने तसेच गुणाने शीतल असे दोन्ही अर्थ घ्यावे लागतात. मात्र, तापमानाने शीतल म्हणताना फ्रीजमधील थंडगार तापमान अपेक्षित नाही. उदा. धान्यक हिम किंवा सारिवादी हिम करून पिण्याने तहानेचा अवरोध केल्याने होणारे रोग दूर होतात. हिम बनविण्यासाठी औषधी वनस्पती कुटून सहा पट पाण्यात रात्रभर भिजत घालायच्या असतात, सकाळी हाताने कुस्करून गाळून घेऊन मग त्यात खडीसाखर मिसळून प्यायचे असते. 

धान्यक हिम बनविण्यासाठी वरील प्रमाणात धणे पाण्यात भिजत घालायचे असतात व दुसऱ्या दिवशी गाळून घेतलेले पाणी खडीसाखर मिसळून प्यायचे असते. 

सारिवादी हिम बनविण्यासाठी सारिवा, धमासा, रक्‍तचंदन, गुलाबाचे फूल, कमळाचे फूल वगैरे वनस्पतींचे मिश्रण पाण्यात भिजत घालायचे असते व वरील पद्धतीने हिम बनवायचा असतो.

षडंगोदक म्हणजे नागरमोथा, पर्पटक, रक्‍तचंदन, सुगंधी वाळा, सुंठ यांच्यासह उकळलेले पाणी पिण्यानेही तृष्णा शांत होते, तहानेचा अवरोध केल्याने होणाऱ्या त्रासांचे शमन होते. बरोबरीने तांदळाची पेज, मऊ भात, मुगाची मऊ खिचडी यांसारखे तृप्ती देणारे अन्नपदार्थ सेवन करता येतात. 

अश्रू
भावनातिरेकाने डोळ्यात अश्रू येतात हा सर्वांचा अनुभव असतो. आनंदाश्रू असोत किंवा दुःखाचे अश्रू असोत, ते मुद्दाम धरून ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक असते. 
प्रतिश्‍यायोऽक्षिरोगश्‍च हृद्रोगश्‍चारुचिर्भ्रमः ।
बाष्पनिग्रहात्‌ तत्र स्वप्नो मद्यं प्रियाः कथाः ।। 
     ...चरक सूत्रस्थान

 

अश्रू धरून ठेवण्याने सर्दी होते, डोळ्यांशी संबंधित रोग होतात, हृदयाशी संबंधित विकार होतात, तोंडाची चव बिघडते, चक्‍कर येते. यावर उपाय म्हणजे पुरेशी झोप घेणे, प्रकृतीला मानवेल त्या प्रकारचे आणि त्या प्रमाणात मद्य घेणे आणि मनाला प्रिय गोष्टी ऐकणे. 

थोडक्‍यात, मनाला धीर येईल अशा सर्व गोष्टी करण्याने आणि पुरेशी विश्रांती घेण्याने अश्रू अडवून ठेवल्यामुळे होणारे विकार दूर होतात.

झोप
झोप हासुद्धा असाच एक नैसर्गिक आवेग. हा आवेग अडवून ठेवण्याचे प्रमाण सध्या फार वाढलेले दिसते. मात्र यामुळे पुढील त्रासांना आमंत्रण मिळत असते.
जृर्म्भास्तंद्रा च शिरोरोगाक्षिगौरवम्‌ ।
निद्रावधारणात्‌ तत्र स्वप्नः संवाहनानि च ।।
...चरक सूत्रस्थान

वेळच्या वेळी व पुरेशी झोप न घेण्याने फार जांभया येतात, डोळ्यांवर झापड येते, विविध शिरोरोग होतात, डोळे जड होतात, यावर उपाय म्हणजे पुरेशी झोप घेणे आणि अंग दाबून घेणे.

श्वासगती
श्रमश्वास म्हणजे परिश्रमांनंतर लागणारा दम. उदा. भरभर चालणे, पळणे, जिना चढणे वगैरे श्रमांनंतर काही वेळासाठी धाप लागते, त्याला श्रमश्वास म्हणतात.
गुल्महृद्रोगसंमोहाः श्रमनिश्वासधारणात्‌ ।
जायन्ते तत्र विश्रामो वातघ्नाय क्रिया हिताः ।।
...चरक सूत्रस्थान


श्रमामुळे वाढलेली श्वासाची गती रोखून धरण्याने पोटात गोळा, हृद्रोग आणि मानसिक गोंधळ, चक्कर याप्रकारचे त्रास होतात, यावर विश्रांती आणि वातनाशक उपचार घेणे हितावह असते. यात अंगाला तेल लावणे, शेक घेणे, ताजे व गरम अन्न खाणे, मृदू विरेचन घेऊन पोट साफ करणे, वातनाशक औषधी, काढे, बस्ती यांची योजना करणे वगैरे उपचार समाविष्ट होतात.