काळजी हृदयाची

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 15 September 2017

ओज ही हृदयातील विजेसारखी शक्‍ती आहे, ती एका क्षणात पायाच्या अंगठ्यापासून ते मेंदूपर्यंत सगळीकडे पोचते. ही शक्‍ती आपल्या शरीरात आहे म्हणून आपली सर्व कामे होतात. व्यायाम करून शक्‍ती मिळते असे आपण म्हणतो, पण मुळात व्यायाम करायलाही शक्‍ती असणे आवश्‍यक असते.

हृदय हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. अनेक वेळा आपण पाहतो, की कुठल्याही तऱ्हेची पूर्वसूचना न देता व्यक्‍तीला हार्ट ॲटॅक येतो. माझ्या माहितीतले एक उदाहरण आहे. एका डॉक्‍टर मुलीचे डॉक्‍टर मुलाशी लग्न झाले, मुलीचे वडील मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते. रात्री लक्ष्मीपूजन वगैरे झाले सर्व मंडळी झोपी गेली. दुसऱ्या दिवशी मुलीचे वडील थोडे लवकर उठले, ड्रॉइंग रूममधील इकडे तिकडे पडलेली फुले जरा झाडून टाकावीत या हेतूने झाडू घेऊन ओणवे झाले ते गेलेच. 

घरी लग्नाची धामधूम चाललेली आहे, लग्नाच्या दोन दिवस आधी मुलीच्या वडिलांना हृदयाचा झटका आल्याने सर्वजण चिंतेत पडले की आता काय करावे? लग्नाच्या आधी घरच्या कुणाला हार्ट ॲटॅक वगैरे आल्यास लग्न लांबणीवर टाकता येतेच असे नाही, कारण नंतर एक-दोन महिन्यांत लग्नाचा हॉल कोठे मिळणार?

लग्नतारखेच्या आसपास जवळच्या व्यक्‍तींपैकी असे कुणाला झाल्यास त्यात सामाजिक भागही लपलेला असतो. माझ्या माहितीत एका मुलाचे लग्न ठरले होते. लग्नाच्या तीन-चार दिवस आधी मुलाच्या वडिलांना हार्ट ॲटॅक आला, त्यांना रुग्णालयामध्ये नेले. नवरा मुलगा व त्याचा एक मित्र माझ्याकडे विचारायला आले, ‘‘ही मुलगी पांढऱ्या पायाची व अपशकुनी आहे की काय? मी हे लग्न करू की नको?’’

मला असेही एक उदाहरण माहीत आहे, की एका व्यक्‍तीला हार्ट ॲटॅक आला, त्याची बाहेरगावी राहणारी बहीण त्याला पाहायला येऊ शकली नाही, तर त्यांच्यात जन्माचे वितुष्ट आले. सांगायचा अर्थ असा, की काहीही पूर्वसूचना न देता हार्ट ॲटॅक आल्यास अनेक प्रकारचे घोटाळे होऊ शकतात. 

आपल्या शरीराचे चार भाग असतात. 
मानेवरचे डोके, ज्याच्यावाचून आपले चालत नाही. खांद्यावर नुसते डोके असून चालत नाही तर त्यात असलेला मेंदू कार्यक्षम असणेही आवश्‍यक असते.
दुसरा छातीचा. फुप्फुस व हृदयाचा भाग. सर्व शरीराला रक्‍ताभिसरण या भागातून होते.
तिसरा पोटाचा भाग. अन्न पचवायचे व शक्‍ती बनवायची हे या भागाचे कार्य.  
चौथा कंबरेच्या खालचा भाग. यात पाय, उपस्थ हे अवयव येतात. चालणे व मैथुन हे या भागाचे कार्य.

माणसाचे स्वभावही असे चार प्रकारचे असू शकतात. काही माणसे बुद्धिवादी असतात, ती खूप कष्ट करतात. यात म्युनिसिपालटीच्या दिव्याखाली अभ्यास करून वकील किंवा डॉक्‍टर होणारी मंडळी असतात. मला बुद्धी होती, पण मला आई-वडिलांनी काही सुविधा पुरवली नाही किंवा आज म्युनिसिपालटीच्या दिव्याचा उजेड जरा कमी आहे, अशा तक्रारी ही माणसे करत बसत नाहीत. अशी माणसे समाजासाठी व स्वतःसाठी विधायक कार्य करताना दिसतात. 

समाजात व्यवस्थापन करणारी (ॲडमिनिस्ट्रेटिव्ह) काही मंडळी असतात. ही मंडळी मोठ्या जबाबदारीचे काम पार पाडतात. 

तिसऱ्या प्रकारची मंडळी व्यापारी मंडळी. तुम्ही मला हे द्या, मी तुम्हाला ते देतो या तऱ्हेचे काम ही मंडळी करतात.

चौथ्या प्रकारची मंडळी बुद्धीच्या, शिक्षणाच्या मागे लागत नाहीत. जे काही निसर्गतः असेल त्यावर ही मंडळी जगतात. उदा. एखाद्याला निसर्गाने बाहुबल दिलेले असले तर हमाली करू व जगू असे म्हणत आनंदाने जगतात. 

शरीरातील पाय व कंबरेच्या खालच्या संस्थेला जरा काही अडचण झाली तर चालत नाही. त्यांना लगेच अडचण येऊ शकते. जरा एखादेदिवशी जास्त चालणे झाले तर पाय दुखायला लागतात, कोणाकडून तरी दाबून घ्यावे असे वाटते. मैथुन झाल्यावर लगेच एक प्रकारचा थकवा जाणवतो. त्यामुळे या अवयवांना झालेला त्रास लगेच कळतो. 

पोटाची संस्था व्यापाऱ्यासारखी असते. तुम्हा जसे अन्न द्याल तसे पचवून ते आपल्याला शक्‍ती देतात. भलते सलते काही पोटात टाकले तर ते दुसऱ्या मिनिटाला तक्रार नोंदवत नाहीत, पण एक-दोन दिवसांत पोट दुखायला लागते. लहान मूल रडायला लागले तर पोटावर तेल लावूून शेकून त्याला बरे वाटते आहे का हे नेहमी पाहावे. आताच्या क्षणी मूल रडते आहे, कारण काल त्याच्या आईने खाल्लेल्या जडान्नाने मुलाला आज अपचन झाले असावे, असा अंदाज बांधता येतो. मला काही त्रास होतो आहे, मला थोडे बरे नाही अशी तक्रार ही संस्था थोडी उशिरा नोंदवते.   

तिसरी संस्था असते व्यवस्थापनासारखी. हृदय व फुप्फुसे या प्रकारे काम करतात. शहराचे नियोजन वा सैन्यात वगैरे काम करणारी मंडळी सर्व व्यवस्था पाहतात. जिथे जे आवश्‍यक आहे तेथे ते पुरवितात. त्याप्रमाणे संपूर्ण शरीराला रक्‍ताभिसरण व प्राण या दोन इंद्रियांद्वारे पोचविण्याची व्यवस्था होते. संपूर्ण शरीराला लागणारा प्राण हा प्राणवायूतून मिळतो व प्राणवायू श्वासोच्छ्वासाद्वारे मिळतो. हृदय व फुप्फुसे रात्रंदिवस जागरूक असतात व रात्रंदिवस काम करत राहतात. शरीराची सुव्यवस्था पाहतात. समजा रस्त्यात वाहतूक खोळंबली तर पोलिस स्वतःला होणाऱ्या त्रासाकडे लक्ष न देता प्रथम वाहतुकीची कोंडी सोडविण्याकडे आणि रहदारी पुन्हा नीट सुरू करण्यामागे लागतो. ज्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा आला आहे ते वाहन किंवा कारण शोधून काढून त्याला कोर्टात नेणे वगैरे काम नंतरचे असते. 

तसेच आपल्या बेताल वागण्यामुळे हृदयाला त्रास व्हायला लागला तर हृदय लगेच आपला त्रास नोंदवत नाही. स्वतःला होणारा त्रास ते बिचारे भोगत राहते व काम निपटण्याचा प्रयत्न करत राहते. त्रास हाताच्या बाहेर गेल्यासही ते तक्रार करत नाही, पण एकेदिवशी ते कोलमडून पडते. पाय व पोट लगेच तक्रार करतात, म्हणून त्यांच्याकडे लगेच लक्ष दिले जाते. हृदय मात्र उच्च पातळीवर व जबाबदारीच्या पदावर असल्याने ते तक्रार करत नाही. आपण पाहतो, की मोठ्या हुद्द्यावर असलेला व्यवस्थापक त्याच्या हाताबाहेर गोष्टी गेल्यास एक दिवस राजीनामा देऊन मोकळा होतो. तसेच हृदयावर अत्याचार होत राहिल्यास ते एक दिवस बंद पडते. कुणाला शाबासकी दिली तर बरे वाटते, पण हृदयाला आपण शाबासकीही देत नाही. आपण त्याच्यावर सारखे लोड टाकत राहतो. एक दिवस ते कंटाळते व बंद पडते. त्यामुळे हृदयाने तक्रारी केल्या तर सोयीचे होईल. वैतागलेला प्रत्येक मनुष्य राजीनामा देतो असे नाही, तो आपली तक्रार वरिष्ठांकडे नोंदवतो. तसेच ओव्हरलोड झालेले प्रत्येक हृदय बंद पडते असे नाही, तर काही वेळा काही व्यक्‍तीमध्ये हृदय तक्रार नोंदवतेसुद्धा. पण लोक बहुधा त्याच्याकडे लक्ष देत नाहीत.

जसे म्युनिसिपालटीने बोर्ड लावून लोकांना आवाहन केले, की तुम्ही सर्व कचरा एकत्र टाकल्याने आमचे नियोजन कोलमडले आहे, तेव्हा ओला कचरा, कोरडा कचरा, काचेचे तुकडे वगैरे कचरा वेगवेगळ्या बॅगेमध्ये भरावा, म्हणजे शहराचे व्यवस्थापन करणे सोपे होईल. अशा नोटिशीकडे लोक बघतात कुठे? कालांतराने संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडते. तसेच काही लोक हृदयाने दिलेल्या पूर्वसूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात व केव्हा तरी संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडते. यामुळेच परदेशात निघालेले असता विमानात बसल्यावर ॲटॅक येणे, परदेशात कुठेतरी ॲटॅक येणे असे घडताना दिसते. कुठल्यातरी प्रगत देशात असताना त्रास झाला, तर सेवा उत्तम मिळते. पण बिल येते भारतातील बिलाच्या दसपट आणि कुठल्यातरी लहान देशात गेले असले तर उपचारांची योग्य सोय होऊ शकत नाही. 

तेव्हा मुळात आपल्याला या अवयवांनी काही सूचना दिल्या तर त्याकडे दुर्लक्ष करणे बरोबर नाही. मी नेहमी म्हणतो, की हिमालयाच्या यात्रेला गेले असता आजारी पडू नये, कारण तेथे काही त्रास सुरू झाल्यास डोंगरात डॉक्‍टर वा वैद्य मिळणे अवघड असते. तसेच तेथे जवळच्या हॉस्पिटलमध्ये न्यायलाही एक-दोन दिवस लागू शकतात. पण खूप वेळा काही सूचना न मिळता अटॅक येतो. या अचानक येणाऱ्या संकटामुळे लोकांच्या मनात हार्ट ॲटॅकबद्दल धसका असतो. 

याच्याच पलीकडे असतो मेंदू, तो तर पूर्वसूचना अजिबात देत नाही. मेंदू म्हणजे आपल्या शरीरातील ब्रह्मसत्ता आहे. मेंदूचे कार्य म्हणजे एखादे गाव चालविण्यासारखे नाही तर, सर्व जग चालविण्यासारखे आहे. मेंदूला फक्‍त आपले शरीर चालवायचे नसते तर त्याला बाहेरच्या जगाशी संबंध ठेवायचा असतो. मेंदूला काही देणे-घेणे नसते, तो ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेव सर्व गोष्टी उत्पन्न करत राहतो, त्याची काहीही अपेक्षा नसते. मेंदूचेही तसेच असते. मेंदू कधीच तक्रार करत नाही. यदाकदाचित त्याने सूचना दिली तर ती चार मिनिटांची असते. चार मिनिटात सर्व संपते. हृदयाला अटॅक आला तर मेंदूला रक्‍त मिळत नाही. अटॅक आल्यावर हृदयाला दाबून, मसाज वगैरे करण्यासाठी अर्धा तास मिळू शकतो, पण मेंदूचा रक्‍तपुरवठा बंद पडला तर चार मिनिटात मेंदू खलास होतो. त्यामुळे प्रयत्नांती हृदय सुरू झाले तरी मेंदूचा मात्र खूपसा भाग निकामी झालेला असू शकतो.

या सर्व कारणांनी हृदयाबद्दल सगळ्याच्या मनात धास्ती असते. हृदय रक्‍ताभिसरण करते, पण मुळात हृदय स्फुल्लिंगाचे (स्पार्क) ठिकाण आहे. त्या स्फुल्लिंगामुळे जे ओज तयार होते त्याची सर्व शरीराला आवश्‍यकता असते. जनित्र (जनरेटर) चालू केले, की एका विशिष्ट क्षणी त्यातून वीज निर्माण होते, दिवे एक क्षणभर बारीक होऊन एकदम लख्ख पेटतात. एका वेळी सगळीकडे वीज जाते. 

असेच हृदयाचेही असते. ओज ही हृदयातील विजेसारखी शक्‍ती आहे, ती एका क्षणात पायाच्या अंगठ्यापासून ते मेंदूपर्यंत सगळीकडे पोचते. ही शक्‍ती आपल्या शरीरात आहे म्हणून आपली सर्व कामे होतात. व्यायाम करून शक्‍ती मिळते असे आपण म्हणतो, पण मुळात व्यायाम करायलाही शक्‍ती असणे आवश्‍यक असते. हृदय व फुप्फुसे ही जोडी स्त्री-पुरुषाच्या जोडीसारखी आहे. स्त्री-पुरुषाची जोडी नीट असली तर जीवनाचा रथ नीट चालतो, तसेच हृदय-फुप्फुसांची जोडी शरीराला शक्‍ती देण्याचे काम करते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balaji tambe article heart care