संक्रांत

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 12 January 2018

संक्रांतीच्या निमित्ताने सूर्योपासनेला सुरवात करावी. थंडी असेपर्यंत तीळ, गूळ यांचे योग्य प्रमाणात सेवन करावे. तिळाच्या तेलाने अभ्यंग करावे. मनातील स्नेहभाव जागृत ठेवावा. असे घडले तर शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्याची नांदी नववर्षाच्या सुरवातीलाच घातली जाईल.

सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, त्या संक्रमणाला ‘संक्रांत’ असे म्हणतात. ‘मकरसंक्रांत’ हा शब्दसुद्धा प्रचलित आहे. कारण या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि या राशीत सूर्याचा प्रभाव कमी होत असल्याने या दिवशी सूर्योपासना, तीळ, गूळ यांपासून बनविलेले पदार्थ खाऊन शरीर उबदार राहण्यासाठी, अग्नी कार्यक्षम ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. 

ज्योतिषशास्त्रानुसार मकर ही थंड स्वभावाची राशी असते, म्हणून मकर राशीत सूर्याचा कमी झालेला प्रभाव वाढविण्यासाठी संक्रांतीच्या निमित्ताने सूर्योपासना करणे आरोग्यासाठी चांगले असते. वेदातही आरोग्यासाठी सूर्याचे महत्त्व अनेक ठिकाणी आलेले आहे.

उद्यन्नादित्यः कृमीन्‌ हन्ति ।
उगवता सूर्य कृमींचा नाश करतो. 
न सूर्यस्य संदृशे मा युयोथाः । 
सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्‍च ।
....ऋग्वेद

सूर्याच्या प्रकाशापासून आमचा कधीही वियोग न होवो. 
संपूर्ण स्थावर (झाडे, दगड वगैरे स्थिर वस्तू) व जंगम (प्राणी, पशू, पक्षी वगैरे हालचाल करू शकणाऱ्या गोष्टी) यांचा सूर्य हा आत्मा होय. या प्रकारच्या वेदसूत्रांमधून सूर्याचे महत्त्व समजते. 

प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचा उपचार म्हणून उपयोग करण्याला ‘आतपस्वेद’ असे नाव दिले आहे. आतपस्वेद हा मुख्यत्वे त्वचारोगात घ्यायला सांगितला आहे. तसेच तो लंघनाचा एक प्रकार आहे असेही सांगितले. 
लंघनप्रकारः आतपसेवनम्‌ ।
मध्यबलस्थूलमनुष्येषु स्थौल्यापनयनाय ।
...चरक सूत्रस्थान

चांगली किंवा मध्यम ताकद असणाऱ्या स्थूल मनुष्याची स्थूलता दूर करण्यासाठी आतपसेवन उपयुक्‍त असते. 

सुश्रुतसंहितेत सूर्यप्रकाशाचे अजूनही फायदे सांगितले आहेत, 
दुष्टव्रणपीडितेषु कुष्ठिषु तैलपानाभ्यङ्‌गाद्‌ अनन्तरमन्तःशोधनार्थं प्रयुक्‍तश्‍चिकित्सोपक्रमः ।

जुना, दूषित व्रण नष्ट करण्यासाठी, त्वचारोग नाहीसा करण्यासाठी, अंतःशुद्धीसाठी केला जाणारा उपचार म्हणजे आतपसेवन होय. 

स्वेद उपचार समजावतानाही अनेक ठिकाणी उन्हाचा वापर केलेला आढळतो. काही मानसिक रोगांवर उपचार म्हणून उन्हात बसवावे, झोपवावे असे उल्लेख सापडतात. एकंदरच आरोग्य टिकविताना किंवा मिळविताना सूर्याची मोठी आवश्‍यकता असते. सूर्यशक्‍तीचा संबंध आपल्या शरीरातील चेतासंस्थेच्या व हाडांच्या आरोग्याशीही असतो. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे अंधार नाहीसा झाला की निसर्ग जागा होतो व सर्वदूर उत्साह संचारतो, तसेच मेंदू व चेतातंतूंचे अभिसरण व्यवस्थित होण्यासाठी, चेतनत्व येण्यासाठीही सूर्यशक्‍तीची आवश्‍यकता असते. आधुनिक विज्ञानही हेच सांगते की सूर्याच्या किरणांतून मिळणाऱ्या ‘ड’ जीवनसत्त्वाची शरीरात कमतरता उत्पन्न झाली, जी सूर्यप्रकाशाशी संपर्क न राहिल्याने उद्‌भवू शकते, तर तोल जाणे, चक्कर येणे, पाठीमागे पडायला होणे वगैरे त्रास उद्‌भवू शकतात. लहान मुलांमध्ये हाडे मृदू झाल्याने हात-पाय वाकू लागले (उदा. मुडदूस) तर आधुनिक वैद्यकातही ‘सौरचिकित्सा’ म्हणजे सूर्यप्रकाशात बसवणे याच उपायाचा अवलंब केला जातो.

संक्रांतीच्या निमित्ताने तीळ, गूळ यांचा स्वयंपाकात वापर केला जातो, गुळाच्या पोळ्या भरपूर तूप घालून खाण्याची पद्धत रूढ असते. मैत्रीचे प्रतीक म्हणून एकमेकांना तीळ-गूळ दिला जातो. यातही आरोग्यरक्षाणाचाचा हेतू असतो. 

तीळ, गूळ स्वयंपाकघरात असतातच, थंड प्रदेशात तिळाची पूड व मीठ मिसळून तयार केलेली चटणी किंवा तेल सुटे होईपर्यंत तीळ वाटून तयार केलेली चटणी खाण्याची पद्धत रूढ आहे. औषध म्हणूनही तीळ, गुळाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असतो. 

उष्णस्त्वच्यो हिमः स्पर्शः केश्‍यो बल्यस्तिलो गुरुः ।
अल्पमूत्रः कटु पाके मेधाग्निकफपित्तकृत्‌ ।।
...वाग्भट सूत्रस्थान

तीळ वीर्याने उष्ण पण स्पर्शाला शीतल असतात, त्वचेला तसेच केसांना हितकर असतात, ताकद वाढवितात, मुत्राचे प्रमाण कमी करतात, अग्नी तसेच मेधा (ग्रहणशक्‍ती) वाढवितात, कफ-पित्त वाढविणारे असतात. 

पांढरे व काळे असे तिळाचे दोन प्रकार असतात. यातील काळे तीळ औषधाच्या दृष्टीने अधिक गुणकारी असतात. औषध म्हणून तिळाचा उपयोग अनेक प्रकारांनी केला जातो. 

 मूळव्याधीमुळे विशेषतः वात-कफ असंतुलनामुळे गुदभागी सूज, वेदना असता तिळाचा कल्क लावण्याने बरे वाटते. 

कल्कस्तिलानां कृष्णानां शर्करा पांचभागिकः ।
अजेन पयसा पीतः सद्यो रक्‍तं नियच्छति ।।
...वाग्भट चिकित्सास्थान

काळ्या तिळाचा कल्क म्हणजे एक भाग, त्याच्या पाच पट साखर हे मिश्रण बकरीच्या दुधासह योग्य प्रमाणात घेण्याने जुलाबासह रक्‍त पडणे थांबते. 

संपूर्ण तिळाचे झाड जाळून बनविलेला क्षार बकरीच्या दुधात टाकून घेणे मूतखड्यावर उत्तम असते. 

तीळ रजःप्रवर्तन वाढविणारे असतात. अंगावरून कमी जात असल्यास तिळाचा काढा गूळ घालून घेतला जातो. गर्भाशयातला वातदोष कमी करण्याच्या दृष्टीनेही तीळ उत्तम असतात. म्हणूनच बाळंतपणानंतर गर्भाशयाची शुद्धी होण्याच्या दृष्टीने तीळ-ओवा-खोबऱ्याची सुपारी खायची पद्धत आहे. 

दिने दिने कृष्णतिलं प्रकुंचं समश्नतः शीतजलानुपानम्‌ ।
पोषो शरीरस्य भवत्यनल्पः दृढीं भवन्त्यामरणाच्च दन्ताः ।।

रोज काळे तीळ चावून खाल्ले व वरून थंड पाणी प्यायले तर दात बळकट बनतात.
जखमेवर तिळाचा कल्क लावला असता जखम कोरडी पडत नाही, उलट लवकर भरून येते. 
वाटलेले तीळ अंगाला लावून स्नान केले असता त्वचा स्निग्ध व सुकुमार बनते. 
अर्थात तिळाचे हे सर्व उपयोग अतिशय प्रभावी असले तरी त्यांचा प्रयोग करताना तीळ उष्ण असतात हे निश्‍चितपणे लक्षात घ्यावे लागते. प्रकृती, हवामान, शरीरातले पित्तदोषाचे प्रमाण या गोष्टी लक्षात घेऊनच तिळाचा उपयोग करायचा असतो. 

गूळ उसाच्या रसापासून बनवितात हे सर्व जण जाणतात, पण गूळ बनविण्याच्या प्रक्रियेत उसाच्या रसावरची मळी काढणे आवश्‍यक असते. मळी काढून तयार झालेला शुद्ध गूळ चवीला मधुर, वात-पित्तशामक व रक्‍तधातूला प्रसन्न करणारा असतो. 

गूळ वर्षभर ठेवून जुना झाला की मग वापरायचा असतो. नवीन गुळामुळे कफदोष वाढू शकतो, तसेच अग्नीची कार्यक्षमता कमी होते, याउलट जुना गूळ गुणांनी श्रेष्ठ असतो. 

स्वादुतरः स्निग्धो लघुरग्निदीपनो विण्मूत्रामयशोधनो रुच्यो हृद्यः पित्तघ्नो वातघ्नस्त्रिदोषघ्नो ज्वरहरः सन्ताप शान्तीप्रदः श्रमहरः पाण्डुप्रमेहान्तकः पथ्यश्‍च । ...राजनिघण्टु

जुना गूळ चवीला गोड, रुचकर, स्निग्ध, पचायला हलका असतो, अग्नीदीपन करतो, मल-मूत्र वाढण्याने झालेले रोग दूर करतो. हृदयासाठी हितकर असतो, त्रिदोषांचे शमन करतो, ताप दूर करतो, संताप दूर करून मन शांत करतो, श्रम नाहीसे करतो, पांडू, रक्‍ताल्पता व प्रमेह वगैरे व्याधींमध्ये पथ्यकर असतो. 

थकून भागून आलेल्याला गुळाचा खडा देण्याची पद्धत असते कारण तो ताप-संताप दूर करून श्रम नाहीसे करू शकतो. 

गूळ रक्‍तधातूपोषक व गर्भाशयाची शुद्धी करणारा असतो. त्यामुळे बाळंतपणानंतर घेण्यास उत्तम असतो. 

थंडीच्या दिवसांत जेवणात तूप-गूळ खाण्याने थंडीचे निवारण होते, शिवाय ताकद वाढते. 

तिळाप्रमाणेच गुळाचीही आयुर्वेदाने खूप स्तुती केलेली असली तरी गूळही उष्ण असतो, हे लक्षात घ्यावे लागेल. शिवाय गूळ पचला नाही किंवा अशुद्ध स्वरूपातला गूळ सेवन केला तर त्यामुळे जंत होऊ शकतात, मेदधातू वाढू शकतो.

अशा प्रकारे संक्रांतीच्या निमित्ताने सूर्योपासनेला सुरवात केली, थंडी असेपर्यंत तीळ, गूळ यांचे योग्य प्रमाणात सेवन केले आणि मनातील स्नेहभाव जागृत ठेवला तर शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्याची नांदी नववर्षाच्या सुरवातीलाच घातली जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balaji tambe article makar sankranti