रक्‍ताचे गुण 

family doctor
family doctor

रक्‍त शब्द "लाल' या अर्थानेही वापरला जातो. रक्‍त लाल असते, द्रव स्थितीत म्हणजे पातळ असते. रक्‍ताला एक प्रकारचा विशिष्ट तीव्र गंध असतो. रक्‍त शरीरात अव्याहतपणे फिरत असते, श्वासामार्फत आलेला प्राणवायू, अन्नपचनानंतर तयार झालेला आहाररस संपूर्ण शरीरात, शरीराच्या पेशीपेशीपर्यंत पोचविण्याचे काम रक्‍तामार्फतच होत असते. रक्‍ताचा संबंध पित्तदोषाशी सर्वाधिक असतो. त्यामुळे रक्‍त बिघडते तेव्हा पित्तदोषाचा सहभाग हा सहसा असतोच; मात्र, वातदोष किंवा कफदोषामुळेही रक्‍त बिघडू शकते. रक्‍तदोषामुळे रक्‍ताच्या प्राकृत कार्यात बाधा तयार होणे स्वाभाविक असते. उदा. रक्‍तदोषामुळे त्वचा काळवंडते, विविध त्वचारोगांची सुरवात होते, पचन व्यवस्थित होत नाही, स्पर्शसंवेदना बोथट होते, रक्‍ताचे "जीवन' देण्याचे काम व्यवस्थित होऊ न शकल्याने सर्वच शरीरव्यापार मंदावतात, उत्साह, शक्‍ती, रोगप्रतिकारशक्‍ती कमी होतात. 

रक्तदोषाची कारणे 
रक्‍तात दोष तयार होण्यामागे पुढील कारणे असू शकतात. 
*विरुद्ध अन्न अर्थात एकमेकाला अनुकूल नसणारे अन्न एकत्र करून खाणे. उदा. दूध व फळे, दूध व खारट पदार्थ वगैरे 
*त्याग, मूत्रप्रवृत्ती, शिंक, ढेकर, उलटी असे वेग जबरदस्तीने अडवून ठेवणे. 
*भरपेट जेवण करून लगेच व्यायाम किंवा श्रम करणे. 
*उन्हात फार वेळ जाणे. 
*बाहेरून थकून किंवा उन्हातून तापून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिणे. 
*आजच्या काळातील एक मुद्दा म्हणजे, वातानुकूलित खोल्यांमधून सतत आत-बाहेर करणे. 
*दही, मासे, खारट व आंबट पदार्थांचा किंवा आंबवलेल्या पदार्थांचा अतिरेक करणे. 
*दिवसा झोपणे. 
*याखेरीज त्वचारोगात, विशेषतः बरे होण्यास चिकट असणाऱ्या त्वचारोगात, गुरुजनांचा अपमान करणे म्हणजेच ज्ञानाचा अनादर करणे व आपल्याला कल्याणप्रद असलेल्या तत्त्वांच्या विरुद्ध वागणे; चोरी, व्यभिचारादी पापकर्म करणे म्हणजेच ज्यामुळे मानसिक ताण उत्पन्न होईल अशी कर्मे करणे, ही कारणे सांगितलेली आहेत. 
या कारणांमुळे वातादी दोष बिघडतात व ते मुख्यत्वे रस-रक्‍त-धातू तसेच मांसधातू व त्वचेमध्ये रोग उत्पन्न करतात; परिणामी त्वचारोग होतात. 

त्वचारोगाची लक्षणे 
त्वचेचा रंग बदलणे, रॅश येणे, खाज येणे या लक्षणांनी त्वचारोग झाला आहे हे समजतेच; पण पुढील लक्षणे अशी आहेत, जी भविष्यात त्वचारोग होऊ शकतो, याची नांदी देत असतात. 
*त्वचा अचानक गुळगुळीत किंवा खरखरीत होणे. 
*घामाचे प्रमाण वाढणे किंवा घाम यायचा अजिबात बंद होणे. 
*जखम झाली असता ती भरून यायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणे. 
*अंगावर अकारण काटा येणे. 
तेव्हा अशी काही लक्षणे दिसू लागली तर काय चुकीचे घडते आहे, हे वेळीच पाहून त्यानुसार जीवनशैलीत किंवा खाण्या-पिण्यात बदल करणे श्रेयस्कर होय. मात्र, असे बदल वेळेवर केले गेले नाहीत किंवा लक्षणांकडे दुर्लक्ष झाले तर वातादी दोषांमुळे रक्‍त बिघडते आणि त्यातून विविध प्रकारचे "त्वचारोग' निर्माण होऊ शकतात. 

रक्तज रोग 
चरकाचार्यांनी रक्‍तज रोग पुढीलप्रमाणे सांगितले आहेत, 
कुष्ठ - विविध त्वचारोग, यात सध्याच्या प्रचलित भाषेप्रमाणे सोरायसिस, एक्‍झिमा वगैरे त्वचारोगांचा समावेश होतो. 
विसर्प - नागीण किंवा हर्पिज. आधुनिक विज्ञानानुसार हा रोग हर्पिज झोस्टर या वायरसमुळे होतो, असे सिद्ध झाले असले तरी, त्याला शरीरात रुजण्यासाठी रक्‍तदुष्टी असावी लागते. 
पिडका - पुटकुळ्या, फोड, पिंपल्स वगैरे 
रक्‍तपित्त - शरीराच्या विविध द्वारांतून उदा. तोंड, नाक, कान, गुद वगैरेंतून रक्‍तस्राव होणे. 
असृग्दर - स्त्रियांच्या बाबतीत योनीद्वारा अति प्रमाणात रक्‍तस्राव होणे. 
गुदमेढ्रास्यपाक - गुद, लिंग किंवा तोंड यांच्या ठिकाणी व्रण निर्माण होणे व तो पिकणे. 
प्लीहा - स्प्लीन आकाराने वाढणे. 
विद्रधि - शरीरावर गळू होणे, विशेषतः एकानंतर एक गळू होत राहणे. 
कामला - कावीळ 
व्यंग - वांग 
अंगावर चकंदळे उठणे, पित्त उठणे 
केसात चाई पडणे 
याखेरीज कोणताही रोग, जो चटकन बरा होत नाही, तो रक्‍तज असतो, असे चरकाचार्यांनी सांगितले आहे. त्यामुळे उपचार करताना अनेकदा रक्‍तधातूकडे लक्ष ठेवावे लागते. 

रक्तदोषावर उपचार 
रक्‍तदोषावर उपचार वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यातही पंचकर्माच्या मदतीने उत्तम प्रकारे होऊ शकतात, बरोबरीने खाण्यात व वागण्यात थोडे बदल करणेही महत्त्वाचे असते. 

जिष्ठा, खदिर, गुडूची, त्रिफळा, दारुहळद, वावडिंग, मुस्ता, कुटकी वगैरे रक्‍तशुद्धीकर वनस्पतींपासून तयार केलेले, महामंजिष्ठादि काढा, पंचतिक्‍त घृत, पंचनिंब चूर्ण, त्रिफळा गुटिका वगैरे विविध कल्प रक्तदोषावर उत्तम परिणामकारक असतात. रक्‍तशुद्धिकर द्रव्यांनी संस्कारित घृतपानानंतर विधिपूर्वक केलेले विरेचन, रक्‍तशोधक औषधांची बस्ती, आवश्‍यकता असल्यास रक्‍तमोक्षण यांचा अप्रतिम फायदा होताना दिसतो. पंचकर्मातील विरेचनानंतर शरीरातील विषद्रव्ये व प्रकुपित दोष शरीराबाहेर टाकले जातात व त्यानंतर तेलाच्या विशेष बस्तीमुळे त्वचा पुन्हा मूळ पदावर येते असा अनुभव आहे. 

याखेरीज रक्त शुद्धीसाठी घरच्या घरी करता येण्यासारखे काही सोपे व मुख्य औषधे तसेच उपचारांना साहाय्यभूत ठरणारे उपाय याप्रमाणे आहेत. 

त्वचा ही अतिशय संवेदनशील असल्याने क्रीम, साबण, शांपू वगैरे कोणत्याही स्वरूपात रासायनिक पदार्थांचा वापर न करता त्याऐवजी नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे चांगले. उदा. अनंतमूळ, दारुहळद, जटामांसी, हळद, मसुराचे पीठ वगैरेंपासून तयार केलेले उटणे किंवा तयार सॅन मसाज पावडर वापरणे, चेहऱ्याला क्रिमऐवजी "संतुलन रोझ ब्युटी'सारखे तेल वापरणे वगैरे. 

-रक्‍तशुद्धीसाठी टाकळ्याचा पालाही उत्तम असतो. त्यामुळे टाकळ्याचा पाला उकळून तयार केलेला काढा स्नानाच्या पाण्यात टाकणे. 
-अनंतमुळाचा छोटा तुकडा (एक सेंटिमीटर) व थोडीशी बडीशेप टाकून केलेला "हर्बल चहा' घेणे. 
-वावडिंग हेही त्वचाविकारावरील श्रेष्ठ औषध आहे. बाजारातून चांगल्या प्रतीचे वावडिंग आणून बारीक करून सकाळ- संध्याकाळ अर्धा अर्धा चमचा मधासह घेणे. 
-पोट व्यवस्थित साफ होत आहे, याकडे लक्ष ठेवणे. तशीच आवश्‍यकता वाटल्यास अविपत्तिकर चूर्ण किंवा गंधर्वहरीतकीसारखी चूर्णे घेणे. 

पथ्य - गहू, ज्वारी, बाजरी, यव, जुने तांदूळ, दुधी, घोसाळी, परवर, कर्टोली, कार्ले, कोहळा, पडवळ, मूग, मसूर, तूर, डाळिंब, द्राक्ष, लिंबू, हळद, आले, जिरे, धणे, केशर, घरचे साजूक तूप वगैरे. 

अपथ्य - नवे तांदूळ, कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची, गवार, वांगे, कांद्याची पात, कच्चा कांदा, सुकवलेल्या भाज्या, अननस, अतिप्रमाणात टोमॅटो, आंबट फळांचे रस, अतिप्रमाणात मीठ, मद्यपान, विरुद्ध आहार, तेलकट व मसालेदार पदार्थ वगैरे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com