च्यवनप्राश 

Chyawanprash
Chyawanprash

वय वाढले तरी त्यामुळे होणारी शरीराची झीज कमीत कमी प्रमाणात व्हावी किंवा तारुण्य टिकविणारे द्रव्य म्हणजे वयःस्थापन द्रव्य होय. आवळा हा नुसते वयःस्थापन करतो असे नाही, तर तो अशा प्रकारच्या द्रव्यात श्रेष्ठ, सर्वोत्तम समजला जातो, यावरूनच आवळ्याची महती लक्षात येते. 

च्यवनप्राश जगप्रसिद्ध रसायन आहे असे म्हणायला हरकत नाही. ज्या आवळ्यापासून च्यवनप्राश तयार होतो, तो आवळा मुळात सर्वोत्तम ‘रसायन’ असतो. अर्थातच त्यामुळे च्यवनप्राश नीट बनवला, सर्व घटक उत्तम प्रतीचे वापरून तयार केला, तर ते एक अप्रतिम ‘रसायन’ असते. 

आवळ्यापासून च्यवनप्राश हे एकच नाही, तर इतर अनेक रसायने तयार केली जातात. यासाठी एक वेगळा अध्याय चरकसंहितेत दिलेला आहे. यात सुरुवातीला सांगितलेले आहे, 
करत्रचितानां यथोक्‍तगुणानाम्‌ आमलकानां उद्‌धृनास्थ्नां शुष्कचूर्णितानां पुनर्मार्थे फाल्गुने वा मासे । 
...चरक चिकित्सास्थान 

कार्तिक महिन्याच्या शेवटापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत जेव्हा आवळा आपल्या रस, वीर्याने परिपूर्ण झालेला असतो, तेव्हा झाडावरून हाताने तोडून गोळा करावा. 
याठिकाणी लक्षात घ्यायची मुख्य गोष्ट म्हणजे झाडावर उत्तम पोसला गेलेला, रस-वीर्याने परिपूर्ण झालेला आवळाच औषधात वापरणे अपेक्षित असते. पूर्ण वाढ होण्यापूर्वीच झाडावरून गळून पडलेले आवळे वापरणे योग्य नाही. याशिवाय उत्तम कसदार जमिनीमध्ये तयार झालेला; गंध, रूप व चव उत्तम असलेला, पुरेसा रस असलेला आवळाच रसायन म्हणून वापरण्यास योग्य असतो, असेही ग्रंथकार सांगतात. 
वृष्यं रसायनं रुच्यं त्रिदोषघ्नं विशेषतः । 
वमनप्रमेहशोफपित्तास्रश्रमविबन्धाध्मानविष्टम्भघ्नम्‌ ।। 

...धन्वंतरी निघण्टु 
आवळा शुक्रधातूला पोषक, रसायन गुणांनी परिपूर्ण असतो, रुची वाढविणारा असतो; त्रिदोषांचे संतुलन करण्यास समर्थ असतो, विशेषतः पित्तदोषाचे शमन करतो; ताप, दाह, उलटी, प्रमेह, शोथ, रक्‍तपित्त, श्रम, मलावष्टंभ, पोटफुगी वगैरेंसाठी औषध म्हणून उपयुक्‍त असतो. 

‘इदं वयःस्थापनानां श्रेष्ठम्‌’ असेही चरकसंहितेमध्ये म्हटलेले आहे. वय वाढले तरी त्यामुळे होणारी शरीराची झीज कमीत कमी प्रमाणात व्हावी किंवा तारुण्य टिकविणारे द्रव्य म्हणजे वयःस्थापन द्रव्य होय. आवळा हा नुसते वयःस्थापन करतो असे नाही, तर तो अशा प्रकारच्या द्रव्यात श्रेष्ठ, सर्वोत्तम समजला जातो, यावरूनच आवळ्याची महती लक्षात येते. 

च्यवनप्राश तयार करताना पूर्ण तयार झालेला व रसरशीत आवळा वापरावा असे सांगितलेले असते. चरक, शारंगधर बहुतेक संहितांमध्ये च्यवनप्राश अवलेह वर्णन केलेला आहे. च्यवनप्राश प्रभावी होण्यासाठी त्यात वापरलेली द्रव्ये तर उत्तम प्रतीची असावी लागतातच व बरोबरीने च्यवनप्राश बनविण्याची पद्धतही शास्त्रोक्‍त असावी लागते. च्यवनप्राश अतिशय प्रसिद्ध असल्याने आजकाल अनेक जण तो बनवितात; पण त्यासाठी ग्रंथोक्‍त योग्य पद्धत माहीत असणे व त्या पद्धतीने च्यवनप्राश बनविण्याचा अनुभव गाठीशी असणे आवश्‍यक आहे. 

च्यवनप्राश तयार करण्यासाठी आवळे तर मुख्य लागतातच; पण सुमारे चाळीस इतर रसायनद्रव्ये, रक्‍तशुद्धिकर द्रव्ये, त्रिदोषशामक द्रव्ये लागतात, ज्यांचा काढा करायचा असतो. याशिवाय आवळ्याचा गर परतण्यासाठी तेल व तूप लागते, पाक बनविण्यासाठी साखर लागते व सरतेशेवटी वरून टाकण्यासाठी सुमारे पंचेचाळीस द्रव्यांची, तसेच इंधन, भांडी, मनुष्यबळ वगैरेंची आवश्‍यकता असते. च्यवनप्राश बनविण्यासाठी अनुभव असावा लागतो. आज आपण च्यवनप्राश बनविण्याची थोडक्‍यात माहिती पाहणार आहोत. 
१. रसरशीत ताजे आवळे निवडून पाण्याने स्वच्छ धुवावेत व नंतर रात्रभर पाण्यात भिजत घालावेत (पाण्यात थोडेसे मीठ घालावे). 
२. काढा करायच्या द्रव्यांचे बारीक तुकडे करून रात्रभर पाण्यात भिजत घालावेत. 
३. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व आवळे पाण्यातून काढून पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवावेत. 
सर्व आवळे सुती कापडात बांधून पोटली तयार करावी. 
भिजलेल्या सर्व वनस्पती पाण्यात कुस्करून घ्याव्यात. 
४. काढा करण्यासाठी आवश्‍यक तेवढे पाणी घेऊन या सर्व वनस्पती त्यात घालून काढा बनविण्यासाठी मंद आचेवर ठेवणे. या वेळी आवळ्यांची पोटली अधांतरी लटकत ठेवावी. 
५. आवळे शिजल्यावर पोटली बाहेर काढून घ्यावी. 
६. एकीकडे मंद आचेवर काढा उकळणे सुरू ठेवावे. 
७. शिजलेल्या आवळ्यांमधून बिया काढून टाकाव्यात. 
८. आवळ्याच्या फोडी ४० मेशच्या स्टेनलेस स्टीलच्या चाळणीवर अथवा सुती कपड्यावर घासून आवळ्याच्या गरातील धागे काढून टाकून बीविरहित व धागेविरहित गर जमा करावा. या गरालाच मावा म्हणतात. 
९. योग्य आकाराच्या जाड बुडाच्या स्टेनलेस स्टीलच्या किंवा कल्हई असलेल्या पातेल्यात तेल व तुपावर मंद आचेवर पाण्याचा अंश उडून जाईपर्यंत मावा परतावा. या वेळी मावा करपणार नाही वा इकडे तिकडे उडणार नाही अशी काळजी घेणे आवश्‍यक असते. 
१०. एका बाजूला काढा साधारण एक चतुर्थांश होईपर्यंत उकळावा. 
११. तयार झालेला काढा कापडातून गाळून घ्यावा व काढ्याची द्रव्ये बाजूला टाकून द्यावी. 
१२. गाळलेला काढा साधारण घट्ट होईपर्यंत उकळवत ठेवावा. 
१३. साखरेचा पाक करून घ्यावा. 
१४. साखरेचा पाक, घट्ट केलेला काढा व आवळ्याचा परतलेला मावा एकत्र करून हे सर्व मिश्रण मंद आचेवर ठेवून चाटण- अवलेह होईपर्यंत ठेवावा. या वेळी अवलेह करपणार नाही याकडे लक्ष ठेवावे लागते. 
१५. जवळ जवळ अवलेह तयार होत आला आहे असे वाटले, की प्रक्षेप द्रव्ये घालावीत व सर्व मिश्रण एकजीव करावे. 
१६. अवलेह गार झाल्यावर त्यात मध घालून नीट एकत्र करावे. 
१७. च्यवनप्राशची गुणवत्ता व प्रभाव वाढविण्यासाठी सोन्याचा वर्ख, चांदीचा वर्ख, वसंतमालिनी, मकरध्वज वगैरे द्रव्ये मधात मिसळून टाकता येतात. 
१८. तयार झालेला च्यवनप्राश योग्य आकाराच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवावा व आवश्‍यकतेप्रमाणे वर्षभर वापरावा. 
सूचना - आवळे आम्ल रसाचे असल्यामुळे च्यवनप्राश बनविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत एल्युमिनियम वा हिंदालियमची भांडी, चमचे, झाकण्या वापरू नयेत. 

अशा प्रकारे तयार केलेला च्यवनप्राश दीर्घकाळ टिकू शकतो व रस या गुणांनी परिपूर्ण असतो. 
च्यवनप्राशची उपयुक्‍तता आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये याप्रकारे सांगितलेली आहे - 
मेधा, स्मृती, आकलनशक्‍ती चांगली राहते; कांती, वर्ण, त्वचा उजळते, तेजस्विता येते; मन प्रसन्न राहते; हृद्रोग, खोकला, दमा, तृष्णा, वातरक्‍त, उरोग्रह, शुक्रदोष, मूत्रदोष, विविध वात-पित्त विकारांवर च्यवनप्राश उपयुक्‍त असतो. रसायन म्हणून सेवन केल्यास मनुष्य अकाली वृद्धत्वापासून, तसेच सर्व रोगांपासून दूर राहू शकतो. 

च्यवनप्राश संपूर्ण वर्षभर सेवन करता येतो, फक्‍त हिवाळ्यातच नाही. लहान मुलांनासुद्धा च्यवनप्राश देता येतो. पाच वर्षांपेक्षा लहान मुलांना पाव चमचा, दहा वर्षांपर्यंत अर्धा चमचा आणि नंतर एक चमचा या प्रमाणात च्यवनप्राश घेता येतो. साधारण पस्तिशीनंतर याच च्यवनप्राशमध्ये रौप्य, सुवर्ण वगैरे द्रव्ये मिसळून केलेले संतुलन आत्मप्राश घेणे अधिक प्रभावी असते. मधुमेह असणाऱ्यांसाठी किंवा मधुमेहाची आनुवंशिकता असणाऱ्यांसाठी कमी साखर टाकून स्पेशल च्यवनप्राश बनविता येतो. तसेच, हृदयासंबंधित विकार असणाऱ्यांसाठी संतुलन सुहृदप्राशसुद्धा बनवला जातो. आपापल्या वयानुसार व रोगाच्या प्रवृत्तीनुसार योग्य तो च्यवनप्राश कायम घेणे आरोग्यासाठी उत्तम असते. 

अजिबात साखर न टाकता बनविलेला किंवा चूर्ण स्वरूपातील च्यवनप्राश सध्या बाजारात मिळत असला तरी यातून च्यवनप्राशचे अपेक्षित असणारे सर्व फायदे मिळतीलच असे नाही. कारण च्यवनप्राश ही योजना आयुर्वेदाने प्राश म्हणून सांगितलेली आहे आणि ते रसायनही आहे, तेव्हा त्यात रस असणे आवश्‍यक आहे. तेव्हा संस्कार नीट करून बनविलेला शास्त्रशुद्ध च्यवनप्राश घरातील सर्वांनी वर्षभर सेवन करणे हे श्रेयस्कर होय.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com