esakal | #FamilyDoctor नारळ आरोग्याचा कल्पवृक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

#FamilyDoctor नारळ आरोग्याचा कल्पवृक्ष

नारळीपौर्णिमेच्या दिवशी सागराची किंवा एकंदरच जलतत्त्वाची नारळ देऊन पूजा केली जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत शहाळ्याचे पाणी फक्‍त तोंडा-घशाचीच तहान भागवते असे नाही, तर उष्णतेमुळे थकलेल्या शरीरधातूंनाही पुन्हा टवटवीत करू शकते. 

#FamilyDoctor नारळ आरोग्याचा कल्पवृक्ष

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक पौर्णिमेच्या निमित्ताने काही ना काही विशेष उत्सवाची योजना केलेली आढळते. या सर्व पौर्णिमांमध्ये दोन पौर्णिमा अशा आहेत, ज्या वनस्पतींच्या नावे ओळखल्या जातात. एक आहे वटपौर्णिमा व दुसरी आहे नारळीपौर्णिमा. नारळीपौर्णिमेच्या दिवशी सागराची किंवा एकंदरच जलतत्त्वाची नारळ देऊन पूजा केली जाते, तसेच घराघरांत नारळीभाताचा बेत योजला जातो, जणू या दिवसाच्या निमित्ताने नारळाची आठवण सर्वांना व्हावी, असाही यामागचा उद्देश असावा. आपण नारळाचे उपयोग पाहू. फक्‍त नारळीपौर्णिमेलाच नाही तर एरवीसुद्धा नारळाचा आठवण ठेवणे कसे हिताचे आहे हेही पाहू या. 

चरकसंहिता तसेच सुश्रुतसंहितेत नारळाचे उपयोग पुढीलप्रमाणे वर्णन केलेले आहेत,
तालशस्यानि सिद्धानि नारिकेलफलानि च।
बृंहणस्निग्धशीतानि बल्यानि मधुराणि च ।
...चरक सूत्रस्थान

नारिकेलं गुरु स्निग्धं पित्तघ्नं स्वादु शीतलम्‌ ।
बलमांसप्रदं हृद्यं बृंहणं बस्तिशोधनम्‌ ।।
...सुश्रुत सूत्रस्थान

नारळाचे फळ चवीला गोड असते, गुणांनी स्निग्ध व गुरू असते तर शीत वीर्याचे असते, पित्तदोषाचे शमन करते, ताकद वाढवते, मांसधातूचे पोषण करते, हृदयाला हितकर असते व मूत्राशयाची शुद्धी करते. 

याखेरीज स्निग्ध गुणाचे असल्याने नारळ वातदोषाचे शमन करतो व प्राकृत कफाचे पोषण करते. 
नारळाच्या फळाच्या तीन अवस्था असतात, 
१. बाल - यात फक्‍त पाणी असते.
२. मध्य - यात पाणी व मऊ सायीसारखा गर असतो
३. पक्व - यात पाणी कमी होते, तर गर घट्ट व जाड होतो. शेवटी फळातील पाणी पूर्णतः आटून जाते व खोबऱ्याचा गोटा शिल्लक राहतो.

पातळ मलईसारखे खोबरे असलेले शहाळे चवीला अतिशय गोड व तृप्ती करणारे असते.
उन्हाळ्याच्या दिवसांत शहाळ्याचे पाणी फक्‍त तोंडा-घशाचीच तहान भागवते असे नाही, तर उष्णतेमुळे थकलेल्या शरीरधातूंनाही पुन्हा टवटवीत करू शकते. शहाळ्याच्या पाण्याचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ते शरीरात चटकन स्वीकारले जाते व शरीरातील जलाशाची ताबडतोब पूर्ती करू शकते. जुलाबामुळे डिहायड्रेशन होऊ नये म्हणूनही शहाळ्याचे पाणी पिणे उत्तम असते. अर्थात बरोबरीने इतर उपचार नक्कीच करावे लागतात.

उन्हाळ्यामध्ये किंवा शरीरात उष्णता वाढल्याने लघवीला जळजळ होत असल्यास किंवा लघवी पूर्ण होत नाही असे वाटत असल्यास शहाळ्याचे पाणी पिण्याचा अप्रतिम उपयोग होताना दिसतो. मात्र, वृक्काच्या अकार्यक्षमतेमुळे लघवी होत नसल्यास शहाळ्याचे पाणी न देणेच चांगले, कारण त्यामुळे वृक्कावर अतिताण येऊ शकतो. 

काही कारणास्तव तीव्र औषधे घ्यावी लागत असल्यास, त्यामुळे शरीरात निर्माण होऊ शकणारी अतिरिक्‍त उष्णता कमी होण्यासाठी, शक्‍य तेवढी विषद्रव्ये शरीराबाहेर निघून जाण्यासाठी बरोबरीने शहाळ्याचे पाणी नियमित पिण्याचा बराच चांगला उपयोग होतो.
गर्भवतीसाठीही शहाळ्याचे पाणी उत्तम असते. आजकाल बऱ्याच स्त्रियांमध्ये गर्भाशयजल आवश्‍यकतेपेक्षा कमी होताना दिसते, हे शहाळ्याच्या पाण्यामुळे टाळता येऊ शकते (इतर काही कारण नसल्यास).

शहाळ्याचे पाणी थकलेल्या मनाला व मेंदूलाही पुन्हा स्फूर्ती देणारे असते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी, ताण असणाऱ्या बुद्धिजीवी व्यक्‍तींनी अधूनमधून शहाळ्याचे पाणी पिणे उत्तम होय. 
अर्धशिशीमुळे किंवा ऊन लागल्यामुळे डोके दुखत असल्यास शहाळ्याचे पाणी खडीसाखर घालून घेण्याचा उपयोग होतो.

नारळाच्या ओल्या खोबऱ्यापासून काढलेले ‘नारळाचे दूध’ हे अत्यंत पौष्टिक असते. लहान मुलांना सहा महिन्यांनंतर बाहेरचे अन्न सुरू करतात, त्यावेळी हे नारळाचे दूध थोड्या प्रमाणात देणे उत्तम असते. आधुनिक संशोधनानुसार नारळाच्या दुधात मोनोलॉरिन नावाचे विशेष तत्त्व असते, जे रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी अत्यावश्‍यक असते आणि ते नारळाच्या दुधाखेरीज फक्‍त स्तन्यात सापडते. म्हणून लहान मुलांसाठी तसेच इतरांसाठीही नारळाच्या दुधाचा आहारात समावेश करणे उत्तम होय. ओले खोबरे किसून वा खवून त्यावर नारळाच्याच पाण्याचा हबका मारून मिक्‍सरच्या साहाय्याने पांढरेशुभ्र असे नारळाचे दूध काढता येते. 

पित्तदोष वाढल्याने पोटात जळजळ होत असल्यास किंवा व्रण झाल्याने पोटात दुखत असतानाही नारळाचे दूध थोडे थोडे घेण्याचा चांगला उपयोग होतो.

पोटामध्ये जंत झाले असताना साधारण ५० मिली इतके नारळाचे दूध अनशापोटी घ्यावे व नंतर तासाभराने प्रकृतीनुरूप दोन-तीन चमचे एरंडेल घ्यावे. याने जुलाब होऊन जंत पडून जातात.
केस गळत असल्यास नारळाचे दूध केसांच्या मुळाशी अर्ध्या तासासाठी लावून ठेवावे व नंतर शिकेकाई, नागरमोथा वगैरे मिश्रणाने धुवावे. 

ओले खोबरे आरोग्यासाठी उत्तम असते. नारळाचा खवलेला कीस रोजच्या स्वयंपाकात वापरणे उत्तम असते, याने पदार्थ रुचकर तर होतोच, पण खोबऱ्यातील स्निग्ध गुणामुळे पोटातील आतड्यातील नाजूक श्‍लेष्मल आवरणाचे रक्षण होते, विशेषतः मिरचीसारख्या पदार्थांची तीक्ष्णता व उष्णता बाधण्याची शक्‍यता कमी होते. याच कारणास्तव त्रयोदशगुणी विड्यात किसलेले खोबरे टाकायचे असते.

काही व्यक्‍तींना पूर्ण तयार झालेले खोबरे पचण्यास जड पडू शकते, परंतु शहाळ्यातील पातळ खोबरे वा मलई पचायला अतिशय हलकी असल्याने कुणालाही चालू शकते. नारळाच्या दुधाप्रमाणेच शहाळ्यातील खोबरे अतिशय पौष्टिक व विशेषतः मांसधातूची ताकद वाढविणारे असते, त्यामुळे लहान मुलांच्या आहारात अवश्‍य समाविष्ट करावे. 

सातत्याने संगणकावर किंवा उन्हात, प्रखर दिव्यांच्या उजेडात काम करावे लागणाऱ्यांनी शक्‍य तेव्हा शहाळ्यातील पातळ खोबरे खाण्याची सवय ठेवल्यास डोळ्यांची आग होणे, डोके दुखणे, चक्कर येणे वगैरे त्रास दूर राहण्यास मदत मिळेल. 

मांसधातूप्रमाणेच शहाळ्यातील मलई शुक्रधातूसाठीही पोषक असते. त्यामुळे गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्यापूर्वी स्त्री-पुरुषांनी शहाळे खाणे हितकर ठरते.

शहाळ्याची मलई त्वचेसाठीही उत्तम असते. चेहरा, मान, हातापायाचे तळवे यावर शहाळ्याची मलई चोळून लावल्यास त्वचेचा खरखरीतपणा दूर होतो, त्वचा उजळते व अकाली सुरकुत्यांना प्रतिबंध होतो. 

नारळाची करवंटीदेखील उपयुक्‍त असते. करवंटीपासून तेल मिळू शकते. हे तेल त्वचाविकारात उपयोगी पडते. करवंटीचे बारीक-वस्त्रगाळ चूर्ण हिरड्यांवर लावले असता हिरड्या घट्ट व्हायला मदत मिळते, हिरड्यांतून पू, रक्‍त वगैरे स्राव होणे थांबते. 

अशा प्रकारे नारळाचे उपयोग समजून घेतले तर त्याचे कल्पवृक्ष हे नाव कसे यथार्थ आहे हे लक्षात येते.

loading image