मधुमेहापासून मुक्ती

मधुमेहापासून मुक्ती

मधुमेह हा आता श्रीमंतांचा आजार राहिलेला नाही. साखरेचं खाणार त्याला मधुमेह होणार, हेही पूर्ण सत्य नाही. मधुमेह हा जीवनशैलीशी आणि आपल्या शरीरातील चयापचय क्रियेशी निगडित असतो. मधुमेहापासून कधीच सुटका नाही, हे खरे असले तरी, एका सहज, सोप्या, योग्य आहार-व्यायाम-तणावमुक्ती व सकारात्मकता वाढवणारी कार्यप्रणालीद्वारे मधुमेहापासून काही प्रमाणात तरी नक्कीच सुटका करून घेता येते.

मधुमेहापासून कधीच सुटका होत नाही हेच आतापर्यंत बहुतांश मधुमेही ऐकत आले आहेत. या कथनात सत्य असले तरी मनुष्याच्या या बिकट आजारापासून मुक्तीचा शोध सुरूच आहे. या आशेमध्येच बरेच काही दडले आहे.


मधुमेह हा शरीरातील चयापचयाच्या क्रियेशी निगडित आहे. एखाद्या व्यक्तीला मधुमेह होतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात इन्शुलिन कमी प्रमाणात निर्माण केले जात असते किंवा शरीरातील पेशी योग्य रीत्या इन्शुलिनला प्रतिसाद देत नाहीत किंवा दोन्हीही स्थिती कारणीभूत ठरतात. काही महिलांना गरोदरपणी मधुमेह होतो. अतिरिक्त साखर पेशंटच्या रक्तात व लघवीत असेल तर त्याला वरचेवर लघवीला जावे लागते, तहानही खूप लागते. तसेच भूक वाढते. वजन वाढते किंवा कमी होते. जखम झाल्यास भरून येण्यास वेळ लागतो. रक्तातील साखर वाढते. ती 140 च्या वर बरेच तास राहिली तर, काही वर्षानंतर हृदय, डोळे, किडनी या महत्वाच्या अवयवांवर परिणाम होतो.
"सकाळ'मधील (11 एप्रिल 2016) एक बातमी पाहा - 'मधुमेहींचे सर्वाधिक विमा दावे'. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे भारतातील मधुमेहीच्या संख्येमध्ये झपाट्यांने वाढ होत आहे. मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये गंभीर रूप धारण केले असल्याने येथील सर्वाधिक नागरिकांनी आरोग्य विम्याचे कवच स्वीकारले आहे. मुंबई आणि दिल्लीमधील सर्वाधिक मधुमेहीनी विमा दावे दाखल केल्याची माहिती एका सर्वेक्षणातून उघड झाली आहे. पंचविशीखालील मंडळीदेखील विमा दावे दाखल करीत असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून उघड झाली आहे.


असे असले तरी, आपण व्यथीत होऊ नका. या सर्व मुद्द्यावर मात करण्यासाठी "फ्रीडम फ्रॉम डायबेटीस' या संस्थेने एक सहज, सोपी योग्य आहार-व्यायाम-तणावमुक्ती व सकारात्मकता वाढवणारी कार्यप्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे पाच हजारहून अधिक मधुमेही औषधांपासून व एक हजारहून अधिक मधुमेही इन्सुलिन पासून पूर्णपणे मुक्त झाले आहेत. या शुद्ध व नैसर्गिक कार्यप्रणालीमुळे अनेक मधुमेही औषध व इन्सुलिन मुक्त आहेत, त्यांनी चक्क "ग्लुकोज टोलरन्स टेस्ट' ही पास केली आहे. ही टेस्ट पास करण्यासाठी, एखाद्या तपासणी केंद्रावर जावून उपाशीपोटी एका वेळेस पंधरा चमचे साखर (म्हणजेच 75 ग्रॅम्स शुद्ध ग्लुकोस) तीनशे मिली पाण्याबरोबर घ्यावी लागते. जुन्या मधुमेहींना ही टेस्ट पास करणे अतिशय अवघड असले तरी अनेकांनी ही टेस्ट पास केली आहे. मधुमेहाबरोबर शेकडोंना अतिरिक्त वजन कमी करण्यास, कोलेस्ट्रोल, रक्तदाब, थाइरॉईड, आम्लपित्त, सांधेदुखी इत्यादी आजारांमध्येही भरपूर फायदा झाला आहे.


सगळ्या मधुमेहींनी हे जाणणे अतिशय गरजेचे आहे की त्यांच्या शरीरात साखरेच्या व्यवस्थापनामध्ये अडथळे येण्याआधी काही अन्य मूळ कारणे असतात. ज्यामुळे त्यांना मधुमेह होतो. त्यात महत्वाचे म्हणजे - शरीरात चरबी वाढणे, आम्लता वाढणे व पोषकद्रव्यांचा अभाव निर्माण होणे. बहुतांश टाइप 2 मधील मधुमेहींमध्ये या तिन्ही बाबींचा कमी जास्त प्रमाणात समावेश असतो. टाइप 2 मधुमेह साधारणपणे 95 टक्के भारतीयांमध्ये आहे. तो वयाच्या पंचविशीनंतर सहसा होतो व गोळ्यांची सुरुवात होते. टाइप 1 मधुमेह साधारणतः पाच टक्के भारतीयांमध्ये आहे, हा लहानपणी होतो आणि यात बाहेरून इन्सुलिन घ्यावेच लागते. म्हणून जे टाइप 2 मधुमेही चरबी कमी करतात, आम्लता कमी करतात आणी पोषकद्रव्य वाढवतात, त्यांच्यात आमुलाग्र बदल घडतो.
हे साध्य करण्यासाठी, "रोज आरोग्यसंपन्न हिरवी स्मूदी घ्या व उत्तम आरोग्य मिळवा' हे संस्थेचे ब्रीदवाक्‍य झाले आहे. आजवर लाखो मधुमेही महाराष्ट्र व देशभर दर रोज स्मूदीचे सेवन करून स्वतःचे कल्याण करून घेत आहेत. स्मूदीची पाककृती अशी आहे - पालक, चुका, चाकवत, राजगिरा इत्यादी पालेभाज्यांपैकी एका भाजीची सात-आठ पाने व्यवस्थित धुऊन मिक्‍सर मध्ये टाकावीत. पुदिना वीस-पंचवीस पाने व विड्याचे एक पान त्यातच घालावे. कधीतरी तुळस, कढीपत्ता, कोथिंबीर आलटून पालटून चवीनुसार वापर करू शकतात. एक फळ शरीरातील साखरेचा अंदाज घेऊन वापरावे. रक्त तपासणीत जेवणापूर्वीची साखर शंभरपेक्षा जास्त व जेवल्यानंतरची साखर (दोन तासांनंतर) 140 पेक्षा जास्त असल्यास सफरचंद किंवा पेर वापरावा. कमी असल्यास केळे किंवा चिक्कू वापरता येतो. या बरोबर दालचिनी पावडर व काळी मिरी पावडर चिमुट भर, सैंधव मीठ अर्धा चमचा, अर्ध्या लिंबाचा रस वापरावा. पाणी एक ग्लास घालून तीन मिनिटे फिरवावे. न गाळता ही हिरवी स्मूदी सकाळी उठल्यानंतर शक्‍यतो एका तासाच्या आत प्यावी. स्मूदीचे प्रमाण वाढविले की, प्रकृतीही वेगाने सुधारते. घरातील लहान मुलांना व निरोगी सदस्यांनाही ही स्मूदी द्यावी. त्यांना खजूर किवां अजून गोड फळ घालून दिल्यास खूप आवडते. थोडक्‍यात सांगायचे झाले तर, हिरवी स्मूदी सर्वच परिवारासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे.


याव्यतिरिक्त नाश्‍त्यामध्ये मोड आलेली कडधान्ये, डाळींचे धिरडे, डोसे, अप्पे, थालीपीठ यावर भर द्यावा. पोहे, उपमा टाळावा. जेवणात धान्य, डाळ, भाजी व सलाड समप्रमाणात खावे. जेवणानंतर दोन तासाने एखादा आठ-दहा पायऱ्यांचा जीना क्षमतेनुसार वर खाली करावा. याने जेवणानंतरची साखर लवकर आटोक्‍यात येते.


"फ्रीडम फ्रॉम डायबेटीस' या चळवळीचा मूळ उद्देश संपूर्ण भारतातील व जगातील मधुमेही व्यक्तींना इन्शुलिन व औषधांच्या मुक्तीच्या मार्गाचे प्रशिक्षण, प्रेरणा व सहाय मिळावे. त्यांनी औषधमुक्त उत्साही, निरोगी जीवन जगावे. यासाठी बेसिक, इंटेन्सिव्ह, निवासी शिबिर, कुकिंग क्‍लास इत्यादि उपक्रम राबविले जातात.


चला तर मग, आपण आपली शुभ प्रभात आरोग्यदायी हिरवी संजीवनी स्मूदीने सुरु करू आणि मधुमेहापासून मुक्त होण्याच्या दिशेने पाऊल टाकू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com