रोगाश्च आहार संभव:! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thali
रोगाश्च आहार संभव:!

रोगाश्च आहार संभव:!

- डॉ. अश्विनी राऊत, अकलूज BAMS

विरुद्ध आहाराच्या नित्य सेवनाने त्वचारोग, पांडुरोग, भगंदर, मूळव्याध, सर्वांग सूज, पचनाचे विकार, चक्कर असे गंभीर आजार उद्भवतात. शिवाय बुद्धी, मन, तेज, बळ, स्मरणशक्ती यांचा नाश होतो. हा विरुद्ध आहार म्हणजे नेमके काय व तो टाळण्यासाठी काय करावे हे आपण आजच्या लेखात बघणार आहोत!

माणूस खाण्यासाठी जगतो की जगण्यासाठी खातो, हा प्रश्न कोंबडी आधी की अंडं आधी अगदी या प्रश्नासारखाच आहे. आहार सर्व सजीव प्राणिमात्रांंची मूलभूत गरज आहेच. काही सजीव केवळ मांसाहार, तर काही केवळ शाकाहारी अन्न सेवन करतात. ‘जसे खावे अन्न तसेच होईल मन’ खूप पूर्वी म्हणून ठेवलेल्या या वाक्याचा अर्थ असा होतो की, सात्त्विक आहार सेवन करणारा शांत आणि दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगतो. राजसिक आणि तामसिक आहार घेणारा त्या त्या आहार गुणधर्मानुसार विचार करतो, तसे वागतो. हल्लीच्या धावपळीच्या जीवनात आहाराकडे पुरेसे लक्ष देणे जमत नाही. जेवणाच्या वेळा योग्य नाहीत, जेवताना अर्धे लक्ष मोबाईल, टीव्ही वा इतर गोष्टींकडे असते.

घाईघाईने अन्न चावणे. बाहेरील पदार्थांवर जास्त भर देणे, अशा सवयींमुळे पुढे जाऊन शरीर आजारांनी वेढले जाते. पचनाचे त्रास, पोट दुखणे, मूळव्याध, स्थौल्य वा कार्श्यता, अम्लपित्त असे एक ना अनेक आजार बळावतात. मानवाला बरेच आजार अयोग्य आहार सवयींमुळे जडतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या शारीरिक क्षमतेनुसार, बलानुसार योग्य मात्रेत समतोल आहार घ्यावा. अयोग्य आहारामध्ये विरुद्ध आहाराचा समावेश होतो. विशिष्ट प्रकारच्या आहार द्रव्यांच्या संयोगाने शरीरास अपाय होतो, त्यास विरुद्ध आहार म्हणतात. ‘विरुद्धमपि चाहारं विध्याद्विषगरोपमम्।’ आचार्य वाग्भटांनी विरुद्ध आहार सेवनाचे परिणाम विषासम सांगितले आहेत. विरुद्ध आहार उदाहरणे-

 • मासे व दूध

 • दूध व आंबट पदार्थ आणि सर्व फळे ....म्हणजेच आचार्य वाग्भट म्हणतात, ‘विरुद्धमम्लं पयसा सह सर्व फलं तथा।’

 • दूध व मांसाहार

 • मुळा, लसूण, कोथिंबीर खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणे.

 • मध आणि तूप सममात्रेत सेवन करणे. म्हणजेच एक चमचा तुपासोबत एक चमचा मध असे न करता एक चमचा तुपासोबत अर्धा चमचा मध असे विषम मात्रेत सेवन करावे.

 • गरम केलेला मध

 • कच्चा मुळा दुधासोबत वा दूध घेण्याअगोदर किंवा नंतर घेणे.

 • मध, खिचडी, दूध एकत्र खाणे

 • थंड-गरम, नवे-जुने, कच्चे-पिकलेले असे पदार्थ एकत्र सेवन करणे.

 • दूध आणि मीठ एकत्र खाणे

 • रात्री दही खाणे.

 • कच्चे अंडे दुधात घेणे

 • साबुदाणा आणि दही एकत्र खाणे

 • काशाच्या भांड्यात दहा दिवसांपर्यंत ठेवलेले तूप खाणे.

 • जेवणानंतर आइस्क्रीम खाणे वा थंड पिणे.

वरील विरुद्ध आहाराच्या नित्य सेवनाने त्वचारोग, पांडुरोग, भगंदर, मूळव्याध, सर्वांग सूज, पचनाचे विकार, चक्कर असे गंभीर आजार उद्भवतात. शिवाय बुद्धी, मन, तेज, बळ, स्मरणशक्ती यांचा नाश होतो.

विरुद्ध आहार आणि त्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी जेवणाच्या योग्य पद्धती माहीत असणे आवश्यक आहे.

 • आहारात विरुद्ध आहार येणार नाही याची काळजी घ्यावी.

 • जेवताना ताटात हवे तेवढे, गरजेनुसार अन्न वाढून घ्यावे.

 • स्वच्छ, शांत ठिकाणी मन लावून जेवावे.

 • जेवताना मोबाईल, टीव्ही पाहू नये. पेपर वा पुस्तक वाचू नये. सर्व लक्ष जेवणावर केंद्रित करावे.

 • अन्न व्यवस्थित चावून खावे.

 • एकावेळी पोट गच्च भरेल एवढे जेवू नये. पोटाचा एक चतुर्थांश भाग शिल्लक राहील इतके अन्न सेवन करावे.

 • आचार्य वाग्भटांनी एकाच श्लोकात स्पष्ट सांगितले आहे ‘समस्थुलकृश भक्तमध्यान्तप्रथमाम्बुपा:।’ म्हणजेच,

 • जेवणाच्या सुरुवातीला पाणी प्यायल्यास मनुष्य कृश म्हणजेच अशक्त होतो. कारण जेवणाच्या अगोदर पाणी प्यायल्याने भूक कमी होऊन आवश्यक जेवण सेवन केले जात नाही. त्यामुळे अशा सवयीने शरीरास हवी ती पोषकद्रव्ये न मिळाल्याने मनुष्य अशक्त होतो.

 • जेवणाच्या मध्ये पाणी प्यायल्यास मनुष्य सडपातळ होतो. म्हणजेच जेवताना मधेमधे घोटघोट पाणी प्यायल्याने अन्नास रुची येते. शिवाय वजन नियंत्रित राहून आवश्यक पोषक घटक मिळतात.

 • जेवणाच्या शेवटी पाणी प्यायल्यास मनुष्य स्थूल होतो. कारण जठराग्नी शांत होऊन पचनक्रिया कमकुवत होते.

 • जेवताना सुरुवातीला गोड पदार्थ खावेत. जेवणाच्या मध्ये आंबट वा खारट पदार्थ आणि शेवटी रुक्ष म्हणजे चपाती भाजी असे पदार्थ खावेत. जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याने वजन वाढते.

 • जेवण बनवताना आणि वाढताना मन, चित्त शुद्ध असावे.

 • जेवणानंतर अर्ध्या तासाने शतपावली करावी. जेवणानंतर लगेचच झोपू नये. दुपारी पाच ते दहा मिनिटांची वामकुक्षी घ्यायला हरकत नाही. दुपारी अतिवेळ झोपल्याने कफ वाढून विकारांना निमंत्रण मिळते.

अशा प्रकारे अन्नाचा मिथ्यायोग, अतियोग, अयोग यामुळे रोगांचे हे त्रिविध हेतू प्रबळ होऊन आजार उद्भवतात. म्हणून योग्यवेळी, योग्य मात्रेत, योग्य आहार सेवन केल्याने, ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्। आतूरस्य विकार प्रशमनंच।’ स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याची रक्षा करणे आणि रोगी व्यक्तीचे रोग दूर करणे. आचार्य चरकांनी सांगितलेले हे आयुर्वेदाचे प्रयोजन साध्य होईल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top