अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 29 June 2018

योग्य प्रमाणात घेतलेल्या आहाराचा पोटावर भार जाणवत नाही, हृदयाच्या गतीमध्ये अवरोध उत्पन्न होत नाही, पोटात जडपणा वाटत नाही, इंद्रिये तृप्त होतात, अन्नाचे पचन व्यवस्थित होते, तसेच शरीराची वाढ व्यवस्थित होते. 

चरकसंहितेतील ‘अग्र्यसंग्रह’ या विभागाची आपण माहिती घेतो आहोत. मागच्या आठवड्यात अग्नी कोणकोणत्या कार्यात अग्रणी असतो याची माहिती घेतली. आता या पुढचा विषय जाणून घेऊ. 

जलं स्तम्भनीयानाम्‌ - म्हणजे पाणी स्तंभन करण्यासाठी श्रेष्ठ असते. 

या ठिकाणी पाण्याचा बाहेरून उपयोग केला असता त्याचा काय परिणाम होतो हे सांगितलेले आहे. म्हणून नाकातून रक्‍त येत असले तर डोक्‍यावर पाणी थपथपण्याचा उपयोग होतो. गर्भधारणेसाठी प्रयत्न केले असले, तर शुक्र गर्भाशयात राहावा म्हणून स्त्रीच्या ओटीपोटावर गार पाण्याचे फडके ठेवायला सांगितले जाते. गार पाण्याने स्नान केले, तर त्वचेवरील रोमरंध्रे आकुंचित होतात आणि त्यामुळे शरीरस्थ अग्नी शरीरात केंद्रित होतो आणि चांगली भूक लागते.

मृद्‌भृष्टलोष्ट्रनिर्वापित उदकं तृष्णाच्छर्दि अतियोगं प्रशमनानाम्‌ - मातीचे ढेकूळ गरम करून पाण्यात विझवून तयार केलेले पाणी तहान शमविण्यासाठी, तसेच वमनाचा अतियोग थांबविण्यासाठी सर्वश्रेष्ठ असते. 

मातीचे टणक ढेकूळ अग्नीवर ठेवून विस्तवासारखे लाल होईपर्यंत तापवले जाते व ते पाण्यात विझविले जाते, मग ते काढून घेऊन नीट गाळून घेतलेले पाणी पिण्यासाठी वापरले जाते. मातीचा संस्कार झालेले हे पाणी चविष्ट तर लागतेच, त्याला मातीचा सुगंधही येतो आणि ते साधे पाणी पिऊनही न शमणाऱ्या तहानेवर औषधाप्रमाणे उपयोगी पडते. वमन उपचारातही जर उलटीचे आवेग थांबत नाहीत असे वाटले, तर असे पाणी घोट घोट घेण्याचा उपयोग होतो. उलटी या रोगातही असे पाणी पिता येते.

अतिमात्राशनम्‌ आमप्रदोषहेतूनाम्‌ - आमदोष उत्पन्न करणाऱ्या कारणांमध्ये अतिमात्रेत जेवण करणे हे मुख्य कारण असते. 

आहाराचे प्रमाण व्यक्‍तिसापेक्ष असते. अमुक प्रमाणात आहार घेतलाच पाहिजे असा नियम करता येत नाही, कारण हे प्रमाण त्या त्या व्यक्‍तीच्या अग्नीवर पर्यायाने पचनक्षमतेवर अवलंबून असते. आपण सेवन केलेला आहार प्रमाणापेक्षा अधिक होता का, हे ओळखता यावे यासाठी काही मापदंड ठरवून दिलेले आहेत. चरकसंहितेतील पुढील सूत्रातून हे समजू शकते. 

अतिमात्रं पुनः सर्वदोषप्रकोपणमिच्छन्ति कुशलाः ।
तत्र वातः शूलानार्हामुखशोषमूर्च्छाभ्रमाग्निवैषम्य-पार्श्वपृष्ठकटिसिराकुञ्चनस्तम्भनानि करोति, पित्तं पुनर्ज्वरातीसारान्तर्दाहतृष्णामदभ्रमप्रलपनानि, श्‍लेष्मा तु च्छर्द्यरोचकाविपाकशीतज्वरालस्यगात्रगौरवाणि ।
...चरकसंहिता विमानस्थान

अति प्रमाणात आहाराचे सेवन सर्व दोषांना प्रकुपित करणारे असते असे कुशल वैद्य मानतात. यात प्रकुपित वायूमुळे पोटात वेदना होतात, पोटात गॅस धरून राहतो, अंग दुखते, तोंडाला शोष पडतो, चक्कर येते, पाठ, कंबर जखडते, शिरा जखडतात, अग्नी अन्न नीट पचवत नाही; प्रकुपित पित्तामुळे ताप, जुलाब, शरीराचा दाह, समाधान न होणारी तहान, चक्कर वगैरे लक्षणे उत्पन्न होतात; प्रकुपित कफामुळे उलटी, जेवणात अरुची, अपचन, आळस, शरीर जड होणे यांसारखी लक्षणे उद्‌भवतात. 

यातूनच पुढे आमाची उत्पत्ती होते, ज्याचे पर्यवसान मोठ्या रोगात होऊ शकते. 

यथा अग्निअभ्यवहारो अग्निसंधुक्षणानाम्‌  - अग्नीला कायम प्रदीप्त ठेवण्यासाठी म्हणजेच अग्नीचे काम व्यवस्थित चालू राहण्यासाठी अग्नीच्या क्षमतेनुसार म्हणजे भूक असेल त्या प्रमाणात जेवण करणे हे मुख्य असते. 

म्हणजेच केवळ चवीला आवडते म्हणून जास्ती खाणे आणि वेळ नाही म्हणून किंवा आवडत नाही म्हणून कमी खाणे, न खाणे हे दोन्ही अग्नीला बिघडविणारे असते. भूक लागेल त्या प्रमाणात जेवणे म्हणजे मात्रापूर्वक जेवणे, याची सुद्धा लक्षणे आयुर्वेदाच्या ग्रंथांत दिलेली आहेत, 

कुक्षेरप्रपीडनम्‌ आहारेण, हृदयस्यनवरोधः पार्श्वयोरविपाटनम्‌ अनतिगौरवमुदरस्य, प्रीणनमिन्द्रियाणां, क्षुत्पिपासोपरमः, स्थानासनशयनगमनोच्छ्वासप्रश्वासहास्यसंकथासु सुखानुवृत्तिः, सायं प्रातश्‍च सुखेन परिणमनं, बलवर्णोपचयकरत्वं च, इति मात्रावतो लक्षणमाहारस्य भवति ।
....चरकसंहिता विमानस्थान

आहाराचा पोटावर भार जाणवत नाही, हृदयाच्या गतीमध्ये अवरोध उत्पन्न होत नाही, पोटात जडपणा वाटत नाही, इंद्रिये तृप्त होतात, भूक व तहान शमलेली असते, बसणे, झोपणे, चालणे, उभे राहणे वगैरे क्रिया सहजतेने घडतात, श्वासोच्छ्वास, हसणे, बोलणे वगैरे क्रिया सुखपूर्वक होतात, सकाळी सेवन केलेल्या अन्नाचे संध्याकाळी आणि संध्याकाळी सेवन केलेल्या अन्नाचे पचन सकाळपर्यंत व्यवस्थित होते, पोट व्यवस्थित साफ होते, शरीरशक्‍ती, शरीरकांती तसेच शरीराची वाढ व्यवस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Balaji tambe article