#FamilyDoctor दीपावली

#FamilyDoctor दीपावली

अंधार भीती उत्पन्न करतो, मनाला गोंधळात टाकणारा असतो, दिशांबद्दल अज्ञान उत्पन्न करणारा असतो; तसेच थकवणारा, ग्लानी आणणारा असतो. याच्या विरुद्ध प्रकाश भीती घालवतो, आजूबाजूच्या वस्तुस्थितीचे नेमके ज्ञान करून देतो, उत्साह आणि स्फूर्तिदायक असतो. दीपावली हा तर प्रकाशाचा उत्सव. त्यामुळे अगोदर ग्रीष्म, नंतर वर्षाऋतूमुळे शरीराला आलेला थकवा, मनाला आलेली मरगळ दूर करून बुद्धीला पुन्हा धारदार करण्यासाठी आणि हा प्रभाव संपूर्ण वर्षभर टिकण्यासाठी दीपावलीमध्ये सर्व बाजूंनी प्रकाशाची योजना केलेली असते.

तिन्हीसांजेला ‘शुभं करोति कल्याणम्‌’ हा श्‍लोक म्हणून आरोग्य, धन, संपदेसाठी प्रार्थना करणे, मनातील नकारात्मकतेचा विनाश होण्यासाठी ज्योतीला नमस्कार करणे, ही आपली भारतीय संस्कृती... आणि म्हणूनच ज्या उत्सवात एखाद-दुसरा दीप नाही, तर दिव्यांची रांग लावायची असते, तो दीपावली उत्सव भारतातील सर्वांत महत्त्वाचा उत्सव समजला जाणे स्वाभाविक आहे. दीपावली ज्या ऋतूत येते, ज्या प्रकारे साजरी केली जाते, ज्या गोष्टी दीपावलीच्या निमित्ताने केल्या जातात, त्या सर्वांच्या मागे पक्के विज्ञान आहे व त्यातून मनुष्य, प्राणी, वृक्षवल्ली या सर्वांचे आरोग्य टिकावे, त्यांना सुख-समाधान मिळावे हाच उद्देश आहे. दीपावली साजरी करताना हा उद्देश सफल होईल आणि त्यात कोणतेही गालबोट लागणार नाही यासाठी आपणही काळजी घ्यायला हवी. 

दीपावली येते ती हिवाळ्याच्या सुरवातीच्या दिवसांत. भारतीय कालगणनेनुसार संपूर्ण वर्षाचे उत्तरायण व दक्षिणायन असे दोन मुख्य भाग होतात. दक्षिणायनाच्या मध्यात दीपावली येते. दक्षिणायनात सृष्टीचे, मनुष्याचे, प्राणिमात्रांचे बल क्रमाक्रमाने वाढत असते म्हणून याला ‘निसर्गकाळ’ असेही म्हटले जाते. 

दक्षिणाभिमुखेऽर्के कालमार्गमेघवातवर्षाभिहतप्रतापे, शशिनिचाव्याहतबले, माहेन्द्रसलिलप्रशान्तसन्तापे जगति, अरुक्षा रसाः, प्रवर्धन्तेऽम्ललवणमधुरा यथाक्रमं तत्र बलमुपचीयते नृणामिति ।।
....चरक सूत्रस्थान

दक्षिणायनात सूर्य मेघ, वर्षा, वायू यांच्यामुळे क्रमाक्रमाने सौम्य होत जातो, चंद्राची शीतलता वाढत जाते, त्यामुळे तो सर्व प्राणिमात्रांना, धन-धान्य वनस्पतींना तृप्त करण्यास समर्थ असतो. निसर्गातही मधुर, लवण, आम्ल या रसांची अभिवृद्धी होते आणि मनुष्याच्या शरीरात क्रमाक्रमाने ताकद वाढू लागते. 
वर्षा, शरद आणि हेमंत या तीन ऋतूंचा दक्षिणायनात समावेश होतो आणि यापैकी शरद ऋतूतील आश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी, 

वसुबारसेच्या दिवशी दीपावली सुरू होते. या दिवसांमध्ये शरीरशक्‍ती मध्यम असते, शरीरातील स्नेहभाग म्हणजे शरीरावश्‍यक स्निग्धता, शरीरातील रसभाव हासुद्धा मध्यम स्वरूपाचा असतो आणि अग्नीची कार्यक्षमतासुद्धा दिवसेंदिवस सुधारण्याच्या मार्गावर असते. शरीरात होणाऱ्या या बदलांना विचारात घेऊन त्यांचा आरोग्यप्राप्तीसाठी कसा वापर करून घ्यायचा याचा अनुभव देणारा उत्सव म्हणजे दीपावली. पावसाळ्यातील दमटपणा किडा-कीटकांना, जीवजंतूंना पोसत असतो. पावसाळ्यात आजारी पडण्याची, कोणता ना कोणता जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यता वाढलेली असते, हे आपण जाणतो. घरातही लाकडापासून बनविलेल्या वस्तूंवर किंवा भिंतीवर वगैरे बुरशीचे डाग पडू शकतात. हे जीवजंतूंना पोषक वातावरण शरदातील उष्णतेमुळे बदलू लागते आणि याला पूरक म्हणून दीपावली सुरू होण्याआधी घराची अगदी कानाकोपऱ्यांपर्यंत साफसफाई, रंगरंगोटी करण्याची पद्धत असते. घराला झेंडूची फुले व आंब्याची पाने यांचे तोरण बांधले जाते. आंब्याची पाने तिन्ही दोष कमी करतात व मनाला आल्हाद देणारी असतात असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. झेंडूची फुले रक्‍तदोष नष्ट करणारी, जखमेतील पू, स्राव सुकवणारी म्हणजेच जंतुनाशक सांगितलेली आहेत. म्हणून दिवाळी, दसरा वगैरे पावसाळ्यानंतर येणाऱ्या सणांमध्ये झेंडूची फुले, आंब्याची पाने यांना अधिक महत्त्व असते. 

दीपावलीमध्ये दीप प्रज्वलनालाही खूप महत्त्व असते. पणत्या असोत, आकाशकंदील असो, दिव्यांची रोषणाई असो, आकाशात केलेली आतषबाजी असो, या सणामध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी प्रकाशाची, उजेडाची योजना केलेली असते. प्रकाश हा अंधाराचा नाश करतो. अंधार कसा असतो हे आयुर्वेदात याप्रमाणे सांगितलेले आहे. 

तमो भयावहं मोहदिङ्‌ग्मोहजनकं भवेत्‌ ।
.....निघण्टु रत्नाकर 

अंधार भीती उत्पन्न करतो, मनाला गोंधळात टाकणारा असतो, दिशांबद्दल अज्ञान उत्पन्न करणारा असतो, तसेच थकवणारा, ग्लानी आणणारा असतो. याच्या विरुद्ध प्रकाश भीती घालवतो, आजूबाजूच्या वस्तुस्थितीचे नेमके ज्ञान करून देतो, उत्साह आणि स्फूर्तिदायक असतो. दीपावली हा तर प्रकाशाचा उत्सव. त्यामुळे अगोदर ग्रीष्म, नंतर वर्षाऋतूमुळे शरीराला आलेला थकवा, मनाला आलेली मरगळ दूर करून बुद्धीला पुन्हा धारदार करण्यासाठी आणि हा प्रभाव संपूर्ण वर्षभर टिकण्यासाठी दीपावलीमध्ये सर्व बाजूंनी प्रकाशाची योजना केलेली असते.

दीपावलीमध्ये तेलाचे दीप लावण्याची परंपरा आहे. पणती असो, समई असो किंवा अखंड तेवणारा नंदादीप असो; त्यासाठी तिळाचे तेल वापरण्याची जी पद्धत आहे त्यामागेही विशेष कारण आहे. आयुर्वेदात ज्या ज्या वेळी वातावरणशुद्धीसाठी, जंतुसंसर्ग दूर राहावा यासाठी उपाय सुचवले, त्या प्रत्येक वेळी तीळ तेलाचा अखंड दिवा लावण्याचा उल्लेख केलेला आढळतो. उदा. सुश्रुत संहितेत शस्त्रकर्म केल्यानंतर पहिल्या काही तासांत रुग्णाला संसर्ग होऊ नये यासाठी जी विशेष काळजी घ्यायला सांगितली, त्यात इतर अनेक उपायांच्या बरोबरीने रुग्ण झोपतो त्या खोलीत तेलाचा अखंड दिवा जळत राहावा असे सांगितले आहे. तसेच, बाळाच्या जन्मानंतर बाळबाळंतीण ज्या खोलीत राहात असतील, तेथेही रात्रंदिवस तेलाचा दिवा लावायला सांगितले आहे. यावरून तिळाच्या तेलाचे दिवे लावण्याने वातावरणातील दोष दूर होतात, जंतुसंसर्गाला प्रतिबंध होतो आणि आरोग्य टिकण्यास हातभार लागतो हे समजू शकते. 

आयुर्वेदात ‘अष्टोत्तरमंगल’ अशी एक संज्ञा आलेली आहे. यात १०८ गोष्टींचा समावेश आहे आणि या पाहण्याने, यांना स्पर्श केल्याने किंवा ऐकण्याने सर्व शुभ होते, अशुभाचा, अमंगलाचा म्हणजेच नकारात्मकतेचा नाश होतो. या १०८ गोष्टींमध्ये ‘प्रदीप’ म्हणजे ‘तेवत असलेला दिवा’ याचा उल्लेख आहे. याही दृष्टीने दीपावलीमध्ये सकाळ- संध्याकाळ तेलाचे दिवे लावणे महत्त्वाचे होय. 

लहान मुलांच्या सृजनात्मकतेला वाव मिळावा या हेतूने घराघरांत किल्ला बनवणे, आकाशकंदील तयार करणे, सर्वांनी एकत्र येऊन घर स्वच्छ करणे, सजवणे या गोष्टींना दीपावलीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असते. दीपावलीचे वैशिष्ट्य हे, की ती एक दिवसापुरती सीमित नसते, तर गुरुद्वादशी म्हणजे आश्विनातील कृष्ण द्वादशीपासून ते कार्तिकातील शुद्ध तृतीयेपर्यंत हा महोत्सव चालतो. यातील पहिला मान आहे तो निसर्गाचा, म्हणजे पशुधनाला. सवत्स गाईचे पूजन करून, तिला चांगले अन्न देऊन आरोग्यासाठी प्राण्यांची आवश्‍यकता आहे यावर जणू दरवर्षी शिक्कामोर्तब केले जाते. दीपावलीच्या सणात प्राण्यांनाही समाविष्ट करून घेण्याने मनुष्य- निसर्गाचा संबंध संतुलित असल्याचीही ग्वाही मिळते. 

वसुबारसेनंतर येते धनत्रयोदशी. आयुर्वेदाची देवता म्हणजेच पर्यायाने आरोग्याची देवता असणाऱ्या धन्वंतरींची पूजा या दिवशी केली जाते. धन्वंतरींनी हातात घेतलेले जलौका व अमृतकलश हे योग्य वेळी शरीरशुद्धी व नियमित रसायन सेवन यांचे द्योतक असतात. शरद ऋतूत शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचन, बस्ती वगैरे उपचार करून घेतले आणि दीपावलीपासून प्रकृतीला अनुरूप व संपन्न वीर्यवान औषधांपासून तयार केलेले रसायन सेवनास सुरवात केली, तर ते आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरावे. शरद ऋतूत पित्तदोषाचा प्रकोप होत असतो. या पित्ताला संतुलित करण्यासाठी दीपावली उत्सवाच्या पूजेत साळीच्या लाह्या, धणे यांचा प्रसाद दाखविला जातो व सेवन केला जातो. 

यानंतर येतात नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन. या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करण्याची पद्धत असते. अभ्यंग आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचा असतो, हे आयुर्वेदातील या श्‍लोकावरून समजते. 

सुस्पर्शोपचिताङ्‌गश्‍च बलवान्‌ प्रियदर्शनः ।
 भवत्यभ्यङ्‌गनित्यत्वात्‌ नरोऽल्पजर एव च ।।
... चरक सूत्रस्थान

नियमित अभ्यंगाने त्वचा कोमल होते, सर्व अंगप्रत्यंग उचित म्हणजे हवे तसे सौष्ठवपूर्ण होतात, ताकद वाढते व ती व्यक्‍ती सुंदर, दर्शनीय होते. नियमित अभ्यंग करणाऱ्या व्यक्‍तीचे वय वाढले तरी वृद्धत्वाची लक्षणे अल्प मात्रेतच प्रकट होतात. अर्थातच वृद्धत्वापाठोपाठ येणारे कष्ट, त्रास यांना प्रतिबंध होतो. अभ्यंगस्नानात अभ्यंगाबरोबरच उटण्याचाही समावेश असतो. आयुर्वेदात उटणे लावण्यास उद्वर्तन म्हटले जाते. 
उद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलायनम्‌ ।
स्थिरीकरणमानां त्वक्‌ प्रसादकरं परम्‌ ।।


उटण्याने अनावश्‍यक, मलरूप कफदोष स्वच्छ होतो. मेदाचे विलयन झाल्याने लठ्ठपणा कमी होतो. त्वचा प्रसन्न अर्थात स्वच्छ, मऊ, नितळ व तेजस्वी होते. अकाली सुरकुत्या पडत नाहीत आणि सर्व अवयव रेखीव व स्थिर दिसतात.

तेलात किंवा दुधात उटणे कालवून संपूर्ण अंगाला लावता येते व कोमट पाण्याने स्नान करता येते. उटणे लावण्याने अतिरिक्‍त प्रमाणात येणाऱ्या घामाचे प्रमाण कमी होते आणि उटण्यातील सुगंधी द्रव्यांमुळे मनही प्रसन्न होते. चंदन, अगरू, वाळा, हळद यांसारख्या सुगंधी, कांतिवर्धक द्रव्यांनी युक्‍त उटणे उदा. सॅन मसाज पावडर आपल्या व पर्यावरणाच्या आरोग्यासाठीही १०० टक्के सुरक्षित असते. दीपावलीपुरते म्हणायचे झाले, तर नरकचतुर्दशी, पाडवा, भाऊबीज या तिन्ही दिवशी अभ्यंगस्नान करायचे असते. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने पुढे येणाऱ्या संपूर्ण हिवाळ्यात अभ्यंगस्नान नियमित करणे अत्युत्तम होय. 

पाडव्याच्या दिवशी पत्नीने पतीला आणि भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने भावाला औक्षण करायचे असते. पतीने पत्नीला तसे भावाने बहिणीला काहीतरी भेटवस्तू द्यायची असते. यामुळे नात्यातील दुरावा नाहीसा होण्यासही मदत मिळते. 

शरद ऋतू सुरू झाला, की शरीरस्थ अग्नीची कार्यक्षमता क्रमाक्रमाने सुधारण्याच्या मार्गावर असते. दीपावलीतील तेजाची, प्रकाशाची अग्नी कार्यक्षम होण्यासही मदत मिळत असतेच. या अग्नीला यथायोग्य इंधन म्हणजे चांगले पोषक अन्न मिळत राहणे गरजेचे असते. यादृष्टीने दीपावलीमध्ये फराळाला महत्त्व आलेले आहे. प्रदीप्त अग्नीने रसादी धातू जाळून टाकू नयेत व त्यांची कार्यक्षमता क्रमाक्रमाने वृद्धिंगत व्हावी यासाठी या ऋतूत स्निग्ध, आंबट, खारट पदार्थ खाण्यास सुचवलेले असते. म्हणूनच दीपावलीच्या फराळात चकली, शेवेसारखे तळलेले, खारट, तिखट पदार्थ असतात, तसेच अनारसा, करंजी, लाडूसारखे शुक्रपोषक रसायन पदार्थही असतात. यालाच जोड म्हणून या दिवसांत आयुर्वेदिक रसायनांचे सेवन केले, तर ते आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम असते. तसे पाहता रसायन पूर्ण वर्षभर खाणे उत्तमच असते; पण पचनशक्‍ती उत्तम असलेल्या कालावधीत रसायन सेवनाचा सर्वोत्कृष्ट उपयोग होत असल्याने दीपावलीत रसायन खाण्याचा शुभारंभ करणे श्रेयस्कर होय. च्यवनप्राश, धात्री रसायन, ‘सॅन रोझ’, ‘मॅरोसॅन’, ‘संतुलन चैतन्य कल्प’, ‘शतावरी कल्प’ वगैरेसारखी रसायने दीपावलीत व नंतरही सेवन करणे आरोग्यासाठी उत्तम असते. 

अशा प्रकारे ज्या उत्सवात आहाराबरोबरीने आचार- विचारांना महत्त्व आहे, नातेवाइकांच्या बरोबरीने मित्रमंडळी, आप्तजन, समाजाबरोबरचे नातेसंबंध जपण्याला महत्त्व आहे; प्राणी, वनस्पती, वातावरण, देव-देवता वगैरे सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे, असा हा दीपावलीचा महोत्सव सर्वांसाठी शुभ ठरो, हीच प्रार्थना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com