आरोग्याचे सर्वोत्तम लक्षण

आरोग्याचे सर्वोत्तम लक्षण

अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)
क्षेत्र कोणतेही असो, त्यातील सर्वोत्तम जे असेल त्याचा ठसा कायम राहतो. आरोग्याच्या किंवा चांगल्या सवयींच्या बाबतीतही जे सर्वांत चांगले ते कधी बदलत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करूनही चालत नाही. आयुर्वेदातील अग्र्यसंग्रह या दृष्टीने फार महत्त्वाचा होय. मागच्या अंकात आपण वैद्यांनी सांगितलेल्या सूचनांना डावलणे हे सर्वांत मोठे अरिष्ट असते हे पाहिले. आता या पुढचा भाग पाहू या.

अनिर्वेदो वर्त्तलक्षणानाम्‌ -  वार्त्त म्हणजे आरोग्य, शारीरिक, तसेच मानसिक दृष्टीने निरोगी अनुभूती यासाठी मनाची उदासीनता, स्वतःला कमी लेखण्याची प्रवृत्ती, सतत दुःखी राहण्याची मानसिकता हे सर्वांत मोठे विघ्न होय. 

यावरून परिपूर्ण आरोग्यामध्ये मनाची व स्वतःच्या मानसिकतेची किती मोठी भूमिका असते हे लक्षात येते. आयुर्वेदात आरोग्यरक्षणासाठी केलेल्या मार्गदर्शनात ‘सद्‌वृत्त’ हा एक मोठा विभाग. यात शरीराच्या हिताचा, शरीराच्या आरोग्याचा जसा विचार केला, त्याहीपेक्षा मन व इंद्रियांचे संतुलन नीट राहण्याला अधिक प्राधान्य दिले. 

तत्र इन्द्रियाणां समनस्कानाम्‌ उपतप्तानाम्‌ अनुपतापाय प्रकृतिभावे प्रयतितव्यं एभिर्हेतुभिः तद्यथा सात्म्येन्द्रियार्थसंयोगेन बुद्‌ध्या सम्यक्‌ वेक्ष्यावेक्ष्य कर्मणा सम्यक्‌ प्रतिपादेन देशकालात्मगुणविपरीतोपासनेन च इति; तस्मात्‌ आत्महितं चिकीर्षता सर्वेण सर्वं सर्वदा स्मृतिमास्थाय सद्‌वृत्तमनुष्ठेयम्‌ ।

मन आणि इंद्रिये यांचा समभाव आरोग्यासाठी आवश्‍यक असतो. तेव्हा प्रकृती उत्तम राहावी यासाठी मन, इंद्रिये संतप्त होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहावे. विवेकबुद्धीचा वापर करून देश, काल व आपली प्रकृती यांचा विचार करून आहार-विहाराची योजना करावी आणि सदैवे हितचिंतकांची आठवण ठेवून सद्‌वर्तन ठेवावे. 

मन उत्साहित व सकारात्मक राहण्यासाठी आणि चांगल्या गोष्टींकडे आकृष्ट होण्यासाठी ‘सत्त्व’गुणयुक्‍त असणे गरजेचे असते. रज आणि तम हे मनाचे दोष सांगितले जातात. या दोषयुक्‍त मनाकडून प्रज्ञापराध घडला की अनारोग्याला आमंत्रण मिळत असते. 

यच्च अन्यदीदृशं कर्म रजोमोहसमुत्थितम्‌ ।
प्रज्ञापराधं तं शिष्टा ब्रुवते व्याधिकारणम्‌ ।।
....चरक शारीरस्थान

रज व तम गुणाने आविष्ट झालेले मन जेव्हा इंद्रियांकडून चुकीची कार्य करवून घेते तेव्हा त्याला ‘प्रज्ञापराध’ असे म्हणतात आणि ते रोगाचे मुख्य कारण असते. 

मनामध्ये रज, तम दोष वाढू नयेत, म्हणजेच मन नियंत्रणात राहावे यासाठी बुद्धी मदत करत असते. 

‘निश्‍चयात्मिका बुद्धी’ अर्थात निश्‍चयाप्रती पोहोचवणारी ती बुद्धी असे सांगितले जाते. बुद्धी ही जणू एखाद्या न्यायाधीशाप्रमाणे काम करत असते, सारासारविचार करून एका निर्णयाप्रत आणण्याचे काम बुद्धीचे असते. मनाची दोलायमानता संपुष्टात आणून अचूक निर्णय घेणे शुद्ध बुद्धीमुळेच शक्‍य असते. ः शुद्धौ बुद्धिप्रसादः असेही सांगितले आहे. अर्थात मन शुद्ध असले तरच बुद्धी अचूक निर्णय देते. मन जेवढे शुद्ध असेल तेवढी बुद्धीचा निर्णयक्षमता अचूक आणि योग्य असते. मनाची कार्ये सांगताना चरकाचार्य म्हणतात,

इन्द्रियाभिग्रहः कर्म मनसः स्वस्यनिग्रहः । 
उहो विचारश्‍च ततः परः बुद्धिः प्रवर्तते ।।
...चरक शारीरस्थान

इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे तसेच स्वतःवर नियंत्रण ठेवणे हे मनाचे कार्य होय. तसेच ‘उह’ म्हणजे ‘अमुक गोष्ट केल्यास असे होईल’, ‘याचा परिणाम असा होईल’ अशा संभावनांचा विचार करणे व ‘विचार’ म्हणजे लाभदायक काय, हानिकारक काय याचा निश्‍चय करणे या सर्व गोष्टी मन करत असते व यावर बुद्धी आपला निर्णय घेते.

कैकदा बुद्धीचा निर्णय अचूक असला तरी इंद्रियांना आज्ञा देणारे मन असल्याने बुद्धीच्या विरुद्ध क्रिया मनाकरवी होऊ शकते. आपण सर्वांनीच कधी ना कधी हे अनुभवलेले असेल. 

अपचन झालेले असताना, भूक लागलेली नसताना चीज बर्गर, पावभाजी खाऊ नये हे बुद्धीला माहीत असते, बुद्धी ही गोष्ट मनाला बजावतही असते. पण मनाचा स्वतःवर आणि रसनेंद्रियावर ताबा नसल्यास बुद्धीची आज्ञा उल्लंघून रसनेंद्रियाकडून चीज बर्गर खाण्याची चूक घडते व त्याचा परिणाम निश्‍चितच भोगावा लागतो. म्हणून मनाचे महत्त्व सर्वाधिक आहे, एकदा मन नियंत्रणाखाली आले की बुद्धी, अहंकार, इंद्रिये सर्वच ताब्यात राहतात व सगळे शरीर-मानस व्यापार सुरळीत चालतात. म्हणूनच आयुर्वेदशास्त्रच नाही तर बाकी योगशास्त्र, अध्यात्मशास्त्रही ‘मनावर ताबा ठेवणे’ ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट मानतात व त्या दृष्टीने उपायही सांगतात.

सत्त्वगुणाचे प्राधान्य असणारे मन शुद्ध, प्रसन्न व संशयरहित असते आणि अशा मनाचे स्वतःवरही पूर्ण नियंत्रण असते. मन हे अन्नमय आहे हे (मनाची उत्पत्ती अन्नापासून होते) हे सर्वच प्राचीन भारतीय शास्त्रांनी आणि आधुनिक विज्ञानानेही मान्य केले आहे. आपण जे खाऊ तसे आपले मन घडत जाते म्हणूनच आयुर्वेदशास्त्रात सात्त्विक आहाराची प्रशंसा केली आहे. आहाराबरोबरच मनावर नियंत्रण  ठेवण्यासाठी ‘योगः चित्तवृत्तिनिरोधः’ अर्थात अष्टांग योगाचा अभ्यास करावा असे सांगितले जाते. अध्यात्मशास्त्रानुसारही तपस्या, दान, ध्यान वगैरे गोष्टी मनाच्या सात्त्विकतेसाठी सांगितल्या जातात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com