आवेग- मूत्रप्रवर्तन

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 24 November 2017

कोणताही आवेग हा वातामुळे असतो, कारण वेग, गती हा फक्‍त वाताचाच गुण आहे. आवेगात जी हालचाल असते, मलमूत्रादी भाव शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी जी गती आवश्‍यक असते, ती वातामुळे असते. आवेग आला की तो धरून ठेवण्यानेही वात प्रकुपित होतो, तसेच आवेग आला नसताना त्याला जबरदस्तीने प्रवृत्त करण्यानेही वात प्रकुपित होतो. 

आयुर्वेदाचा मुख्य उद्देश आहे आरोग्यरक्षण. रोग होऊ नये यासाठी काय करावे, काय करू नये याविषयी अतिशय सविस्तर आणि सध्याच्या काळातही लागू पडेल असे मार्गदर्शन आयुर्वेदात दिलेले आहे. ‘स्वस्थवृत्त’ हा विषय यासाठीच समजावलेला आहे. यातील एक मुख्य मुद्दा म्हणजे आरोग्याचे रक्षण करायचे असेल तर नैसर्गिक आवेगांचे धारण करू नये, तसेच आवेग आला नसताना त्याला जबरदस्तीने प्रवृत्तही करू नये. याचे महत्त्व पुढील सूत्रावरून स्पष्ट होते.

रोगाः सर्वेऽपि जायन्ते वेगोदीरणधारणैः ।
....अष्टांगहृदय सूत्रस्थान

वेगधारण किंवा वेग उदीरण ( जबरदस्तीने प्रवृत्ती) केल्याने सर्व प्रकारचे रोग होऊ शकतात.

निदानस्थानात म्हणजे ज्याठिकाणी रोगाची कारणे, रोगाची लक्षणे, रोग होतो म्हणजे शरीरात नेमके काय बदल होतात, काय बिघाड होतात वगैरे विषयांची माहिती दिलेली आहे, तेथेही बहुतेक सर्व रोगाच्या कारणांच्या यादीमध्ये ‘वेगधारण’  याचा अंतर्भाव केलेला आढळतो. चरकसंहितेमध्ये तर एक संपूर्ण अध्याय फक्‍त वेगधारण या विषयाला वाहिलेला आहे. याचे नाव ‘न वेगान्‌ धारणीयम्‌’ असे आहे. यात अगदी सुरुवातीला चरकाचार्य म्हणतात, ‘ स्वतःच्या प्रकृतीला हितकर आहार सेवन केल्यानंतर त्याचे पोटात नीट पचन झाल्यानंतर, त्यातील सार अंशाने शरीरातील रस-रक्‍तादी धातूंचे पोषण झाले व उरलेला मलभाग मल-मूत्ररूपाने शरीराबाहेर निघून गेला की आरोग्य टिकून राहते. मात्र मल-मूत्रादी वेगांचे धारण केले तर हितकर आहार-आचरण करूनही आरोग्य चांगले राहू शकत नाही.’ म्हणून नैसर्गिक आवेग कोणकोणते असतात हे माहिती करून घेणे, त्यांचा अवरोध न करणे आणि अवरोध केल्यास शरीराची काय हानी होते हे समजून घेणे आवश्‍यक होय. ‘आयुर्वेद उवाच’मध्ये आपण क्रमाने या सर्व विषयाची माहिती करून घेणार आहोत. 

दिवसातून अनेकदा उत्पन्न होणारा नैसर्गिक आवेग म्हणजे मूत्रप्रवर्तनाचा आवेग. हा अडवून ठेवण्याचे किंवा जबरदस्तीने प्रवृत्त करण्याचे प्रमाणही सर्वाधिक असते. कधी कामामध्ये व्यस्त असल्यास, कधी स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यास, कधी प्रवासामध्ये असल्यास लघवीचा वेग अडवून धरला जातो. तसेच कधी घराबाहेर पडण्यापूर्वी किंवा प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी लघवीची भावना नसली तरी सुद्धा नंतर गैरसोय नको म्हणून आधीच जबरदस्तीने मूत्रप्रवर्तन केले जाते. आयुर्वेदात या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी अहितकर सांगितल्या आहेत. कोणताही आवेग हा वातामुळे असतो, कारण वेग, गती हा फक्‍त वाताचाच गुण आहे. पित्त आणि कफाच्या ठिकाणी स्वतःची अशी गती नसते. आवेगात जी हालचाल असते, मलमूत्रादी भाव शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी जी गती आवश्‍यक असते ती वातामुळे असते आणि आवेग आला की तो धरून ठेवण्यानेही वात प्रकुपित होतो, तसेच आवेग आला नसताना त्याला जबरदस्तीने प्रवृत्त करण्यानेही वात प्रकुपित होतो. 

सर्वांत पहिला आणि दिवसातून अनेकदा उत्पन्न होणारा आवेग म्हणजे मूत्राचा आवेग. हा अडवून ठेवण्याने पुढील त्रास होऊ शकतात.

बस्तिमेहनयोः शूलं मूत्रकृच्छ्रं शिरोरुजा ।
विनामो वंक्षणानाहः स्यात्‌ लिंगं मूत्रनिग्रहे ।।
....चरक सूत्रस्थान

बस्ती म्हणजे ओटीपोटात आणि मूत्रप्रवृत्ती जेथून होते त्या ठिकाणी वेदना होणे.

मूत्रप्रवृत्ती अडखळत, थोडी थोडी व कष्टपूर्वक होणे.
वेदनेमुळे मनुष्य पुढे झुकणे.

वंक्षण प्रदेशात म्हणजे ओटीपोट, कंबरेच्या खालचा भाग या ठिकाणी वायू अडकून पडल्यासारखे वाटणे. 

अर्थात हे त्रास एकदा-दोनदा किंवा कधीतरी आवेग धरून ठेवण्याने होत नाहीत, पण दररोज किंवा अनेकदा आवेग धरून ठेवण्याची सवय लागली तर हळूहळू हे त्रास संभवतात. तेव्हा मूत्राचा आवेग धरून ठेवण्याची सवय तर नसावीच, पण कधीतरी आवेग अडविण्याने, जितका वेळ आवेग धरून ठेवू, तितक्‍या प्रमाणात वाताचा प्रकोप होत असतो हे कायम लक्षात ठेवणे चांगले. 

मूत्राचा आवेग धरून ठेवण्याने उत्पन्न होणारे रोग किंवा असंतुलन शांत करण्यासाठी काय उपचार घ्यावेत याची माहिती आपण पुढच्या वेळी घेऊ या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. balaji tambe article urination