#FamilyDoctor जागतिक हृदयदिनाच्या निमित्ताने...

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Thursday, 27 September 2018

अवेळी अतिप्रमाणात भोजन करण्याने, प्रकृतीला अहितकर भोजन करण्याने व अग्नीतील बिघाडामुळे पचनसंस्थेत बिघाड होतो व त्याचा परिणाम म्हणून हृदयात विकार उत्पन्न होऊ शकतात. पचण्यास जड, अतिथंड, अतिस्निग्ध पदार्थ खाण्याने, अतिमात्रेत भोजन करण्याने व अतिचिंता करण्याने रसवहस्रोतस बिघडते. रसवहस्रोतसाचे मूळ हृदय व हृदयातून निघणाऱ्या धमन्या असल्याने रसवहस्रोतस बिघडले की त्याचा परिणाम सरळ हृदयावर होताना दिसतो. 

जिवंतपणाची साक्ष देणारा, आपण जन्माला येण्याच्या आधीपासून अविरतपणे काम करणारा अवयव म्हणजे हृदय. शरीरातील बाकीच्या संस्था झोपेत का होईना थोड्या तरी विसावत असती, मात्र हृदयाला क्षणभराची उसंत मिळत नाही. उलट मनाचा, भावभावनांचा उतरता-चढता आलेखही सर्वाधिक हृदयालाच झेलावा लागतो. मग अशा या आपल्या जगण्यासाठी,  रात्रंदिवस काम करणाऱ्या हृदयासाठी आपण काही का करू नये? या वर्षीच्या जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने हा विचार सर्वांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न होतो आहे. आपणही या दिवसाचे औचित्य साधून हृदयाच्या आरोग्यासाठी स्वतःहून काय करू शकतो, याची माहिती घेणार आहोत.

आयुर्वेदात शोणितकफप्रसादजं हृदयम्‌ । असे हृदयाचे वर्णन केलेले आहे. रक्‍तधातूच्या व कफाच्या प्रसादभागापासून म्हणजेच सारभागापासून हृदय तयार होते. शरीरधारणाचे काम करणारा, स्थिरता, शक्‍ती देण्याचे काम करणारा जो प्राकृत कफ आहे, त्याच्या सारभागापासून आणि रक्‍ताच्याही उत्तम अशा सारभागापासून हृदय बनत असते. 

हृदय हा मातृज अवयव असतो. म्हणजेच हृदयावर आईच्या प्रकृतीचा प्रभाव अधिक असतो. म्हणून गर्भधारणेपूर्वी स्त्रीचे रक्‍त, स्त्रीचा कफ प्राकृत असणे, उत्तम स्थितीत असणे आवश्‍यक असते. गर्भधारणेनंतरही गर्भाचे हृदय तयार होत असताना रक्‍तवर्धक, कफपोषक आहार-औषधद्रव्ये घेणे जरुरी असते. 

चेतनेचे स्थान
हृदय हे रक्‍ताभिसरणाचे, अशुद्ध रक्‍त स्वीकारून, फुप्फुसांच्या मदतीने शुद्ध करून, शुद्ध रक्‍ताचा संपूर्ण शरीराला पुरवठा करण्याचे काम करीत असतेच, पण हृदय हे चेतनेचे, प्राणाचे, तसेच मनाचेही स्थान असते. म्हणून फक्‍त शरीराच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर चैतन्यपूर्ण व उत्साही जीवन जगण्यासाठी, उत्तम मानसिक आरोग्यासाठीही हृदयाची काळजी घेणे खूपच आवश्‍यक असते. 

हृद्रोगामध्ये आनुवंशिकतासुद्धा महत्त्वाची असते. घरात आई, वडील, भाऊ, बहीण वगैरे जवळच्या व्यक्‍तींना हृद्रोगाचा त्रास असेल, तर हृद्रोग होऊ नये, यासाठी खूपच दक्ष राहावे लागते. याशिवाय वजन जास्ती असेल, मधुमेह, रक्‍तदाब यांसारखा विकार असेल, जीवनशैली अनियमित व अतिशय तणावपूर्ण असेल, तर हृद्रोग होण्याची शक्‍यता वाढते. व्यसनाधीन व्यक्‍तींमध्येही हृद्रोग होण्याची शक्‍यता जास्ती असते. आयुर्वेदात हृद्रोगाची अनेक कारणे दिलेली आहेत. हृद्रोग होऊ नये असे वाटत असणाऱ्यांनी या कारणांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करायला हवा.

माधवनिदानात हृद्रोगाची कारणे पुढीलप्रमाणे दिलेली आहेत... 
अत्युष्ण-गुर्वन्न-कषाय-तिक्‍त-श्रमाभिघाताध्यशनप्रसंगैः ।
सचिन्तनैः वेगधारणैश्‍च ।।
...माधव निदान

अतिउष्ण, पचण्यास जड, तुरट, कडू चवीचे भोजन करण्याने, अति श्रम, अति भोजन, शारीरिक वा मानसिक आघात, अति मैथुन (प्रत्यक्ष मैथुनाव्यतिरिक्‍त मानसिक व शारीरिक उत्तेजना होईल, असे चिंतन-चर्चा-दृश्‍य पाहणे, हस्तमैथुन यांचा अतिरेक), अतिचिंता व मलमूत्रादी वेगांचे धारण या कारणांनी हृद्रोग होऊ शकतो. 

याशिवाय धातूंचा क्षय झाल्याने, मल-मूत्र वगैरे वेगांचे धारण करण्याने, रुक्ष वस्तूंचे अतिप्रमाणात सेवन करण्याने, भूक लागली असतानाही व्यायाम करण्याने व स्वशक्‍तीच्या आवाक्‍याबाहेर कार्य करण्याने प्राणवहस्रोतस बिघडते आणि त्याचा परिणाम हृदयावर होतो. अवेळी अतिप्रमाणात भोजन करण्याने, प्रकृतीला अहितकर भोजन करण्याने व अग्नीतील बिघाडामुळे पचनसंस्थेत बिघाड होतो व त्याचा परिणाम म्हणून हृदयात विकार उत्पन्न होऊ शकतात. पचण्यास जड, अतिथंड, अति स्निग्ध पदार्थ खाण्याने, अतिमात्रेत भोजन करण्याने व अतिचिंता करण्याने रसवहस्रोतस बिघडते. रसवहस्रोतसाचे मूळ हृदय व हृदयातून निघणाऱ्या धमन्या असल्याने रसवहस्रोतस बिघडले की त्याचा परिणाम सरळ हृदयावर होताना दिसतो. 

बिघडण्याआधीच काळजी घ्या
हृदय हा एक असा अवयव आहे, ज्याच्यात एकदा बिघाड झाला, की तो अगदी शंभर टक्के बरा झाला, असे सहसा होत नाही. जसे पंकप्रक्षालन न्यायाप्रमाणे चिखलाने बरबटलेले वस्त्र कितीही धुतले तरीसुद्धा पुन्हा पहिल्यासारखे होऊ शकत नाही, तसेच एकदा हृद्रोग झाल्यावर त्रास होत नसला, तरीसुद्धा हृदयाला पोषक औषधे, रसायने, प्रकृतीनुरूप आहार-आचरण याकडे लक्ष द्यायला लागते. यामध्ये पंचकर्मालाही महत्त्वाचे स्थान असते. पंचकर्माने शरीरशुद्धी झाल्यावर हृदयाची कार्यक्षमता वाढायला तर मोठा वाव असतोच, पण पुन्हा पुन्हा हृदयाला धोका उद्भवू नये, यासाठीही पंचकर्मादी आयुर्वेदिक उपचार मोलाची मदत करतात. हृद्रोगामुळे दहा-बारा पावले चालणेही अवघड वाटत असणाऱ्या अनेक व्यक्‍ती आयुर्वेदिक उपचारांनंतर औषध-रसायनांच्या सेवनानंतर काहीही त्रास न होता चालणे, जिना चढणे वगैरे गोष्टी करू शकतात, असा अनुभव आहे. 

हृद्रोग म्हणजे सरळ शस्त्रकर्म, अशी भीती जनसामान्यांच्या मनात असते, पण शस्त्रकर्माशिवाय हृदयरोग बरा झाल्याची अनेक उदाहरणे असतात. 

हृदयाची ताकद वाढविण्यासाठी, हृदयाच्या स्नायूंमध्ये पुन्हा शक्‍ती आणण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांचा उत्तम उपयोग होऊ शकतो. आहारद्रव्यांपैकी घरचे साजूक तूप, मध, खडीसाखर या गोष्टी; औषधद्रव्यांपैकी अर्जुन, मनुका, पुनर्नवा, कमळ वगैरे, तसेच सुवर्ण, हीरक, शृंग वगैरे द्रव्यांची योग्य योजना केली असता हृदयाची ताकद वाढण्यास उत्तम हातभार लागतो. उत्तम प्रतीच्या या द्रव्यांपासून तयार केलेली औषधे घेतली की हृदयाची कार्यक्षमता वाढू शकते.

हृदयवाहिन्यांमध्ये अवरोध (आर्टरी ब्लॉक) होणे हा हृदयरोगातील महत्त्वाचा रोग होय. हृदयाचा इटका (हार्ट अटॅक) येण्यामागे हे मुख्य कारण असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अवरोध झाल्यामुळे हृदयाच्या ज्या भागापर्यंत रक्‍त पोचत नाही तो भाग झटका येऊन गेल्यावर कायमचा अशक्‍त होऊन बसतो. म्हणूनच हृदयाचा झटका (हार्ट अटॅक) येणे टाळणे खूप महत्त्वाचे असते. अवरोध झालेल्या वाहिन्या शस्त्रकर्माने उघडता येणे शक्‍य असले किंवा नवीन वाहिन्या टाकून हृदयाला रक्‍तपुरवठा पुरेसा मिळण्याची व्यवस्था केली, तरी असा अवरोध होण्याची प्रवृत्ती मुळापासून बदलणे आवश्‍यक असते. प्रवृत्ती तशीच राहिली व नुसतेच शस्त्रकर्म केले, तर बहुधा पुन्हा नवीन नवीन अवरोध तयार होऊ शकतात. अर्थातच दर वेळेला शस्त्रकर्म करणे शरीराच्या दृष्टीने अवघड होत जाते. प्रकृतीनुरूप योग्य औषधांची योजना केली, विशेषतः शरीरशुद्धी, आयुर्वेदिक उपचार व हृद्‌बस्तीसारखे विशेष उपचार करून घेतले, तर त्यामुळे अवरोध कमी होऊ शकतो, नाहीसाही होऊ शकतो. 

अनुभूत योग
बृहत्वातचिंतामणी, सुवर्णसूतशेखर, प्रभाकर वटी, श्वासचिंतामणी यांसारखे अनेक अनुभूत योग आयुर्वेदामध्ये दिलेले आहेत. यांची योग्य प्रकारे योजना केल्यास अशा केसेसमध्ये उत्तम गुण येऊ शकतो. 

हृदयाचा झटका (हार्ट अटॅक) मुळात यायलाच नको, पण बऱ्याचदा हृदयवाहिन्यांमधील अवरोध वेळीच लक्षात येत नाही, झटका आल्यानंतरच निदान होते. पण, एकदा निदान झाल्यावर तरी पुन्हा अशा प्रकारे अटॅक येणार नाही उलट असलेली अवरोधही नाहीसा व्हावा म्हणून निश्‍चित प्रयत्न करता येतात व या प्रयत्नांना उत्तम यश येते. एकापेक्षा अधिक वेळा झटके आले, की हृदय उत्तरोत्तर अधिकाधिक अशक्‍त होते आणि त्याचा दुष्परिणाम संपूर्ण शरीरावर झाल्याशिवाय राहात नाही. 

हृदयातील झडपांमध्ये काठिण्य येणे हासुद्धा एक हृदयरोग होय. यात मुख्यतः वाताचे असंतुलन असते. वाताला संतुलित करून झडपांचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग होऊ शकतो. याही रोगात शस्त्रकर्माने कृत्रिम झडप टाकण्याचे तंत्र विकसित झाले असले, तरी सहसा अशी कृत्रिम झडप काही वर्षांनी बदलणे क्रमप्राप्त असते. त्याऐवजी योग्य उपचारांद्वारा झडपांमधले हे काठिण्य शक्‍य तेवढे दूर करणे व वाढू न देणे अधिक श्रेयस्कर असते. 

आहार-आचाराचे नियम
हृद्रोगावर मुळापासून उपचार करताना आणि पुन्हा पुन्हा त्रास होऊ नये, यासाठी आहार-आचरणात पुढीलप्रमाणे नियम सांभाळता येतात, 
आहार पचनाकडे लक्ष देणे, प्रकृतीनुरूप व पचण्यास हलके अन्न खाणे, आहारात आले, सुंठ, मिरी, हिंग, जिरे वगैरे दीपक, पाचक द्रव्यांचा, तसेच सात-आठ चमचे साजूक तूप, शुद्ध ताजे दूध यांचा समावेश असू देणे. 
आठवड्यातून एक दिवस रात्रीचे लंघन करणे, यामुळे पोटाला विश्रांती मिळते व पचन व्यवस्थित राहण्यास मदत मिळते. 
नियमित चालायला जाणे, प्रकृतीनुरूप आसने करणे. 

अनुलोम-विलोम, ॐकार गुंजन व ध्यानसंगीत यांच्या मदतीने शरीरात प्राणसंचार व्यवस्थित व्हावा व हृदयाला प्राणशक्‍तीचा पुरेसा पुरवठा व्हावा, याकडे लक्ष देणे. 

तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने हृदयाची ताकद वाढवणारी, सुहृदप्राश, कार्डिसॅन प्लस वगैरे हृदयाची कार्यक्षमता वाढवणारी रसायने नियमित सेवन करणे. 
नियमित अभ्यंग करणे, विशेषतः छाती-पोट व पाठीवर रोजच हलक्‍या हाताने तेल जिरवणे. 

वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्‍त पंचकर्म व त्या मागोमाग औषधांचा संस्कार केलेल्या तुपाची हृद्‌बस्ती घेणे. हृदयरोगाचे स्वरूप, कारण, तीव्रता वगैरे अनेक गोष्टींचा विचार करून प्रकृतीनुरूप नेमके उपचार योजावे लागतात. हृदयरोगात औषधोपचारांबरोबरच पथ्य-अपथ्य सांभाळणेही खूप महत्त्वाचे असते. ‘योगरत्नाकरा’त या विषयी असे सांगितलेले आहे, 
तैलाम्लतक्रगुर्वन्नकषायश्रममातपम्‌ ।
रोषं स्त्री न चिन्ता वा भाष्यं हृद्रोगवांस्त्यजेत्‌ ।।
...योगरत्नाकर

तेल, आंबट पदार्थ, आंबट दही-ताक वगैरे पदार्थ, पचायला अवघड अन्न, तुरट पदार्थ हृद्रोगात वर्ज्य समजावेत, परिश्रम करू नयेत, उन्हात जाऊ नये, राग, मैथुन, चिंता, अति बोलणे टाळावे. 

तांदूळ, साळीच्या लाह्या, जव, मूग, परवर, कारले वगैरे गोष्टी हृद्रोगात पथ्यकर होत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Balaji Tambe Article on World Heart Day