esakal | अन्नाने बदला स्वभाव
sakal

बोलून बातमी शोधा

Food

अन्नाने बदला स्वभाव

sakal_logo
By
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

जसजसे मनुष्य सात्त्विक अन्न खात जाईल तसतसे त्याचे विचार चांगले होतात, त्याला मानवता धर्माची चाड उत्पन्न होते, मानवतेसाठी काही तरी करावे, दानधर्म करावा, समाजाला मदत करावी असे विचार त्याच्या स्वभावात रुजू लागतात. परंतु माणसे बहुतांशी तामसिक अन्न खाण्याकडे प्रवृत्त होतात व त्यामुळे कामक्रोधादी रिपू जास्त तयार होतात.

आपण आत्तापर्यंत सात्त्विक अन्नाची प्रशंसा पाहिली. सात्त्विक अन्न खाल्ल्यास विचार सात्त्विक होतात व ते आनंदाचे मुख्य कारण आहे. परंतु सवयीमुळे माणसे तामसिक अन्न खाणारी झालेली असतात. ही सवय सोडण्यासाठी प्रथम थोडा राजसिक आहार घ्यायला सुरुवात करावी, यामुळे राजसिक विचार तयार होऊन राजसिक कर्मे सुचायला लागतात. असे झाल्यावर सात्त्विक आहार घेण्यास सुरुवात केली की सात्त्विक प्रवृत्ती तयार होते, पूर्ण सात्त्विक अन्न खावेसे वाटते. श्रीकृष्ण राजसिक अन्नाविषयी म्हणत आहेत, ‘कट्वम्ल-लवणात्युष्ण-तीक्ष्ण-रूक्ष-विदाहिनः ।आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥ गी.१७-९।। ’

यावर माऊली म्हणतात,‘ऐसें खारट अपाडें । राजसा तया आवडे । उन्हाचेनि मिषे तोंडें । आगीचि गिळी ।। ।। ज्ञा.१४१।। आणि राखेहुनि कोरडे । आंत बाहेरी येकें पाडें । तो जिव्हादंशु आवडे । बहु तया ।। ।। ज्ञा.१४४।।’ असे अन्न टाळले की सात्त्विकाकडे जाणे शक्य होऊ शकेल. तामसिक आहाराविषयी भगवंत म्हणत आहेत, ‘यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत्‌ । उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्‌ ।।गी. १७-१०।। जे भोजन अर्धवट शिजलेले, रसहीन, दुर्गंध सुटलेले, शिळे, उच्छिष्ट, अपवित्र असते ते तामसी व्यक्तीला प्रिय असते. यावर माउली म्हणतात,’ निपजले अन्न तैसें । दुपाहरी कां येरें दिवसें । अतिकरे तैं तामसें । घेईजे तें ।।ज्ञा.१५५।। जया का आथि निष्पत्ती । जेथ रसु धरी व्यक्ती । तें अन्न ऐसीं प्रतीती । तामसा नाहीं ।। ज्ञा.१५७।।’ अन्न नेहमी रसयुक्त असावे. फळ झाडावर व्यवस्थित पिकलेले असावे. हे सगळे लक्षात ठेवून आपण अन्नाचा स्वीकार केला तर मनुष्याला चांगले विचार सुचतील, मानवता वाढीला लागेल, सध्याच्या परिस्थितीत सात्त्विक विचारांची, सात्त्विक प्रवृत्तीची निकड आहे. यासाठी आपल्याला आपले अन्न बदलण्याची आवश्यकता आहे. असे केल्यास आपले जीवन आनंदमय होऊ शकेल.

व्यावहारिक भाषेत सांगायचे झाले तर तळलेले, खूप झणझणीत-तिखट, मांसाचे तुकडे असलेले, पचायला जड असलेल्या डाळी वगैरे, कोरडे पदार्थ हे तामसिक अन्नात मोडतात. पित्त वाढविणारे, तिखट, अधिक प्रमाणात वीर्य असणारे कोरडे पदार्थ हे राजसिक अन्नात मोडतात. दूध, तांदूळ, मुगाची डाळ, पचायला हलक्या असणाऱ्या वेलीवरच्या भाज्या हे सात्त्विक अन्नात येते. हे सर्व लक्षात ठेवले तर आपल्याला अन्नाचा आनंद घेता येईल, गोरगरिबांना आपण काही देतो आहोत याचा आनंद घेता येईल, पाहुण्या-रावळ्याला बरोबर घेऊन जेवण्याचा आनंद घेता येईल, अन्नदान करता येईल. मनुष्यमात्रात मानवता निर्माण झाली तर मनुष्यावर येणारी संकटे कमी होतील. एका बाजूने ज्ञानेश्र्वरमाउली, संत तुकारामांसारख्या थोर व्यक्तींनी व दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्म्याने आहाराविषयी केलेल्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करण्याचे धाडस माणूस करतो. अशा वेळी जेवणामुळे अडचणी उत्पन्न होणार हे निश्र्चित असते.

एका बाजूने अन्नाचा परिणाम आपल्या स्वभावावर होतो व दुसऱ्या बाजूने स्वभावाचा परिणाम अन्नावर होतो. म्हणजे जसजसे मनुष्य सात्त्विक अन्न खात जाईल तसतसे त्याचे विचार चांगले होतात, त्याला मानवता धर्माची चाड उत्पन्न होते, मानवतेसाठी काही तरी करावे, दानधर्म करावा, समाजाला मदत करावी असे विचार त्याच्या स्वभावात रुजू लागतात. परंतु कुठे बिनसते हे कळत नाही. माणसे बहुतांशी तामसिक अन्न खाण्याकडे प्रवृत्त होतात व त्यामुळे कामक्रोधादी रिपू जास्त तयार होतात. अन्न साधे, पचायला हलके व सात्त्विक असावे; क्वचित प्रसंगी राजसिक अन्नाचा स्वीकार केला तरी हरकत नसते. मनुष्याला आनंदमय जीवन जागावे असे वाटत असते. शरीर आरोग्यवान नसेल तर आनंद कुठला? राजसिक, तामसिक अन्नामुळे मनुष्य कुठल्या ना कुठल्या रोगाने ग्रस्त होतोच, ज्यामुळे तो सुखी जीवनाला पारखा होतो. मनुष्य सर्व प्रकारचे प्रयत्न करत असतो, खूप पैसे मिळवत असतो, खूप काम करत असतो, या अपेक्षेने की त्याला आनंदात जगता यावे. पण आनंदाने जगण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे असते आरोग्यवान शरीर. आरोग्यवान शरीरासाठी भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे सात्त्विक अन्नाची योजना करणेच इष्ट आहे.

loading image
go to top