esakal | लहान मुलांची प्रतिकारशक्ती !
sakal

बोलून बातमी शोधा

Child

लहान मुलांची प्रतिकारशक्ती !

sakal_logo
By
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

न दिसणारे जिवाणू, विषाणू, वाईट तरंग यांपासून बाळाचे रक्षण व्हावे यासाठी आयुर्वेदाने रक्षाकर्म सुचवले आहे. वेखंड, हिंग, पिवळी मोहरी, जवस, लसूण, तांदळाची कणी, कापूर, ओवा यांची भरड घेऊन पुरचुंडी तयार करून ती हा बालकाच्या आसपास म्हणजे बिछान्याजवळ, दरवाजावर बांधून ठेवायची पद्धत आहे. लहान मुले असणाऱ्या प्रत्येक घरात हा उपाय करावा"

लहान मुलांची प्रतिकारशक्ती कशी वाढवावी याची माहिती आपण पाहतो आहोत. वारंवार सर्दी, खोकला, ताप या त्रासांच्या मागे बऱ्याचदा पोटात जंत असणे हे कारण असते. त्यातून मूळ कारण लक्षात न घेता फक्त ताप उतरवण्यासाठी काही औषधे किंवा अँटिबायॉटिक्स घेतली गेली तर प्रतिकारशक्ती अजूनच कमी होते. आयुर्वेदातील उपचार घेतले, जंतांची प्रवृत्ती मोडणारे उपचार घेतले तर सर्दी-तापासारखे त्रासही होत नाहीत, पचन उत्तम राहते शिवाय प्रतिकारशक्ती सुधारते. आयुर्वेदात या दृष्टीने लहान मुलांना बाळगुटी द्यायला सुचवली आहे. जरा मोठ्या मुलांना संतुलन बाल हर्बल सिरप, विडंगारिष्ट देता येते.

महिन्यातून एका आठवड्यासाठी सकाळी अर्धा चमचा वावडिंग चूर्ण मधात मिसळून देण्याचा उपयोग होतो. कढीपत्ता वाटून तयार केलेली चटणी पाव चमचा व गूळ पाव चमचा हे मिश्रण जेवणापूर्वी घेण्यानेही जंतांची प्रवृत्ती कमी होते. न दिसणारे जिवाणू, विषाणू, वाईट तरंग यांपासून बाळाचे रक्षण व्हावे यासाठी आयुर्वेदाने रक्षाकर्म सुचवले आहे. वेखंड, हिंग, पिवळी मोहरी, जवस, लसूण, तांदळाची कणी, कापूर, ओवा यांची भरड घेऊन पुरचुंडी तयार करून ती हा बालकाच्या आसपास म्हणजे बिछान्याजवळ, दरवाजावर बांधून ठेवायची पद्धत आहे. लहान मुले असणाऱ्या प्रत्येक घरात हा उपाय करावा.

रक्षाकर्माचा आणखी एक भाग म्हणजे घरात सकाळ-संध्याकाळ धूप करणे. यासाठी कडुनिंबाची पाने, हळद, वावडिंग, कापूर, गुग्गुळ असा गोष्टी वापरता येतात किंवा संतुलन प्युरिफायर धूप, संतुलन सुरक्षा धूप हे सुद्धा उत्तम परिणाम देणारे असतात. घरातील लहान-थोर सर्वांसाठी धूप उत्तम असतो. आहार हा सुद्धा लहान मुलांच्या एकंदर आरोग्यासाठी, प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाचा पैलू. लहानपणापासून पोषक आहाराची सवय मुलांना लावणे गरजेचे असते. चॉकलेट, बिस्किटे, चिप्स, कोल्ड्रिंक्स, आइस्क्रीम यासारख्या गोष्टींपासून मुलाला शक्य तितके दूर ठेवणे, त्यासाठी घरातील मोठ्या व्यक्तींना संयमदृष्टीने वागणे आवश्यक होय. वरण, भात, भाजी, पोळी, साजूक तूप, राजगिरा-मुगाचा-डिंकाचा लाडू, भिजवलेले बदाम असा घरचा आहार; साळीच्या लाह्या, खारीक, नाचणी सत्त्व, डाळिंब, सफरचंद, द्राक्षे, अंजीर यासारखी चांगली फळे मुलांना द्यावीत.आपण जेथे राहतो तेथे उगवणाऱ्या भाज्या, फळे हे मुलांच्या प्रतिकारशक्तीसाठी अमृतासमान असते.

प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी योगासने, व्यायाम, सूर्यप्रकाशाचा संपर्क हा सुद्धा महत्त्वाचा असतो. सध्याच्या परिस्थितीत घराबाहेर जाणे अशक्यप्राय असल्याने घरच्या घरीच काही ना काही व्यायाम करणे आवश्यक आहे. ७- ८ वर्षांखालील मुले कायम मस्ती करतात. त्यांचे उड्या मारणे, घरातल्या घरात धावाधाव करणे हे सुरूच असते. मात्र त्यापेक्षा मोठ्या मुलांनी फुलपाखरू, हस्तपादासन, सेतुबंधासन, शिशुआसन, भुजंगासन यासाखी सोपी योगासने, दोरीच्या उड्या, लंगडी वगैरे खेळ खेळणे; १०-१२ वर्षापुढील मुलांनी सूर्यनमस्कार घालणे चांगले. सकाळी व संध्याकाळी कोवळ्या उन्हात जर ही योगासने करता अली तर अजूनच चांगले. अगोदर अंगाला अभ्यंग करून मग कोवळ्या उन्हात बसण्याने किंवा खेळण्याने अजून चांगला परिणाम मिळतो. सध्याचा विषाणू, त्याचा स्वभाव, लक्षणे, नंतर उद्भवणाऱ्या समस्या यांचा विचार करून सॅन अमृत पासून बनविलेला हर्बल चहा लहान मुलेही घेऊ शकतात. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते, संसर्ग टाळता येतो हा आत्तापर्यंत अनेक कुटुंबांचा अनुभव आहे. काही कारणास्तव संसर्ग झाला तरी कोणतीही समस्या उत्पन्न न होता पूर्ण बरे होता येते. दोन वर्षाखालील मुलांना दोन चमचे, पुढे पाच वर्षांपर्यंत पाव कप, १२ वर्षांपर्यंत अर्धा कप आणि त्यानंतर एक कप या प्रमाणे सॅन अमृत पासून बनविलेल्या चहाचे प्रमाण वाढवता येते. येऊ पाहणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला वेळीच थोपवणे, तिची आक्रमकता कमीत कमी करणे आणि तिच्यापासून स्वतःला व कुटुंबाला सुरक्षित ठेवणे हे आपल्याच हातात आहे. आयुर्वेदशास्त्राने दिलेली ही कवचकुंडले वापरली तर घरातील बाळ- गोपाळांचे संरक्षण होईल हे नक्की.