पावसाळ्यातील सर्दी-ताप-खोकला

पावसाळ्यात आरोग्य कसे सांभाळावे या विषयी आपण माहिती घेतो आहोत. आहार या दृष्टीने महत्त्वाचा असतो.
Cold
ColdSakal

भारतीय संस्कृतीनुसार चातुर्मास व त्यानिमित्ताने खाण्यात केलेले बदल, उपवास हे आयुर्वेदातील वर्षा ऋतुचर्येशी मिळते जुळते आहेत. मात्र उपवासाच्या नावाखाली वेफर्स, साबुदाण्याचे, शेंगदाण्याचे विविध पदार्थ यांचा अतिरेक होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी.

पावसाळ्यात आरोग्य कसे सांभाळावे या विषयी आपण माहिती घेतो आहोत. आहार या दृष्टीने महत्त्वाचा असतो. पावसाळ्यात अग्नी मंदावलेला असतो त्यामुळे अन्न कमी प्रमाणात आणि पचायला सोपे असायला हवे. पहिल्या पावसाचा आनंद भजी वगैरे खाऊन साजरा केला की नंतर मात्र तळलेले पदार्थ वर्ज्य करणे चांगले. दुपारचे जेवण साधारणपणे बाराच्या आसपास आणि संध्याकाळचे जेवण आठच्या आसपास करणे, संध्याकाळी मऊ खिचडी किंवा भाजी भाकरी, कधी मूग डाळीचे कढण, कधी आमसुलाचे सार अशा साध्या गोष्टींचे सेवन करणे, पालेभाज्या आम्ल विपाकी म्हणजे पचनानंतर आंबट रसात परिवर्तित होत असल्याने या ऋतूत पालेभाज्यांपेक्षा वेलीवर येणाऱ्या फळभाज्या, भाजून घेतलेला तांदूळ, ज्वारी, बाजरी, भगर, राजगिरा वगैरे धान्ये, मूग-तूर यासारखी पचायला सोपी कडधान्ये यावर भर देणे चांगले. पनीर, चीज, सोयाबीन, अंडी, मांसाहार वगैरे पचायला जड गोष्टी तसेच पावटा, चवळी, वाल, वांगे, कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची यासारख्या वातदोष वाढविणाऱ्या गोष्टी टाळणे चांगले.

जेवण ताजे व घरचे असणे, हळद, आले, कढीपत्ता, आमसूल, दालचिनी, तमालपत्र, ओवा, धणे, बडीशेप, दगडफूल, पुदिना, कोथिंबीर या मसाल्याच्या पदार्थांचा रुचिनुसार वापर करणे हे सुद्धा सर्दी-खोकला-ताप असे त्रास होऊ नयेत यासाठी उपयोगी ठरते. भारतीय संस्कृतीनुसार चातुर्मास व त्यानिमित्ताने खाण्यात केलेले बदल, उपवास हे आयुर्वेदातील वर्षा ऋतुचर्येशी मिळते जुळते आहेत. मात्र उपवासाच्या नावाखाली वेफर्स, साबुदाण्याचे, शेंगदाण्याचे विविध पदार्थ यांचा अतिरेक होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. उन्हाळ्यात अनेकांना थंड पाण्याने स्नान करण्याची सवय असते. पावसाळ्यात व हिवाळ्यात मात्र कोमट वा बरे वाटेल एवढे गरम पाणी वापरणेच चांगले. अंगाला अगोदर छान अभ्यंग केला, नंतर सुगंधी तसेच वातशामक उटणे लावून स्नान केले तर त्वचा उत्तम राहील, वातदोषही संतुलनात राहील. अभ्यंगासाठी संतुलन अभ्यंग तीळ तेल आणि उटण्यासाठी सॅन मसाज पावडर वापरणे उत्तम होय. अशा अभ्यंगस्नानाने थकवा, अंगदुखी, निरुत्साह सुद्धा दूर होतो, भूक चांगली लागते पर्यायाने प्रतिकारशक्ती सुधारते.

पावसाळ्यात वातावरणात गारवा असतो. वाहनातून प्रवास करताना किंवा रात्री झोपताना कानाला, कपाळाला गारवा बाधू नये यासाठी स्कार्फ गुंडाळणे चांगले. अधूनमधून किंवा शक्य असल्यास रोजच साध्या पाण्याचा किंवा तुळशी, पुदिना, ओवा, गवती चहा यापैकी मिळतील ती द्रव्ये उकळत्या पाण्यात टाकून वाफारा घेण्याचाही उपयोग होते. सध्या यासाठी इलेक्ट्रिक उपकरण वापरण्यात येते, मात्र त्याची रोजच्या रोज स्वच्छता ठेवणे, प्रत्येक वेळी नवीन पाणी घेणे आवश्यक असते. पावसाळ्यातील दमटपणा जंतुसंसर्गाला आमंत्रण देणारा असतो. घालायचे कपडे नीट कोरडे असणे, पावसात भिजल्यामुळे केस वगैरे ओले झाले असतील तर ते नीट कोरडे करणे, घरात सकाळ-संध्याकाळ धूप करणे, शक्य असल्यास घरात तीळतेलाचा नंदादीप ठेवणे, डीह्युमिडीफायर सारख्या उपकरणांचा वापर करणे हे सुद्दा पावसाळ्यात प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक होय.

सुरुवातीपासून वर्षा ऋतुचर्या सांभाळली तर सर्दी-खोकल्यासारखा त्रास होणारच नाही, पण तरी काही लक्षणे दिसू लागली तर मधात मिसळून सितोपलादी चूर्ण घेणे, गरम पाण्याचा वाफारा घेणे, छातीत कफ जाणवत असला तर रुईची पाने गरम करून त्यांचा शेक घेणे, संतुलन फॉर्म्युला के२ हा काढा घेणे, वैद्यांच्या सल्ल्याने श्र्वासकुठार, ज्वरांकुश वगैरे औषधे सुरू करणे चांगले. बरे वाटत नसताना इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, भूक लागेल तेव्हा माफक प्रमाणातच अन्न घेणे हे सुद्धा आवश्यक. अशा प्रकारे आयुर्वेदातील मार्गदर्शनाचा अंगीकार केला तर पावसाळ्यासारख्या अवघड ऋतूतही आरोग्य टिकवता येईल, पावसाळ्याचा आनंद घेता येईल आणि तिसऱ्या लाटेपासून स्वतःचे व प्रियजनांचे रक्षण करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com