कोरोनाने लावल्या चांगल्या सवयी!

‘कोरोना, जा जा जा’ म्हणताना तो खरोखरच गेला. कोरोनाने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागली, बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे अशा बातम्या सर्व ठिकाणांहून येऊ लागल्या.
Hand Wash and Mask
Hand Wash and MaskSakal

बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुणे, कपडे बदलणे वगैरे गोष्टी आपल्याला आत्मसात कराव्या लागतील. प्रत्येक ठिकाणी गर्दी व धक्काबुक्की करण्यात काहीच साध्य होत नाही. तेव्हा सोशल डिस्टंसिंग पाळणे, तोंडावर मास्क बांधणे या सवयी कायमच्या अंगी बाणवून घ्याव्या लागतील.

‘कोरोना, जा जा जा’ म्हणताना तो खरोखरच गेला. कोरोनाने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागली, बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे अशा बातम्या सर्व ठिकाणांहून येऊ लागल्या. सर्व व्यवहार मूळ पदावर येऊ लागले. प्रत्येकाला हायसे वाटले. कारण खरोखरच केवळ रोग झालेल्यांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठीच कोरोना हे मोठे संकट होते. पोटासाठी करायचा व्यवसायच करता येईनासा झाला तर माणसाने करावे तरी काय? असा कुठला व्यवसाय आहे की जो केवळ घरी बसून करता येईल? असे कुठले शिक्षण आहे की वर्षानुवर्षे शाळेत न जाता घरात बसून शिकता येईल? गुरुकुल पद्धती तर आता अस्तित्वात नाहीच. परंतु शाळा-कॉलेजात न जाता फोनवर, आय पॅडवर शिक्षण होऊ शकेल व त्यातून पुढे जीवनासाठी, उपजीविकेसाठी साधन मिळवता येईल ही कल्पना चुकीचीच आहे. त्यामुळे कोरोना आपले हात आखडते घेतो आहे हे पाहून सर्वांनाच हायसे वाटले.

चाकरमान्यांना कामावर जाता येईल याचा आनंद झाला, बारीक-सारीक धंदा करणाऱ्यांना रोज थोडा माल विकून रोजी-रोटी कमवून आपले जीवन पुढे चालवता येईल याचा आनंद झाला, एकूणच घरात अडकलेल्या माणसांचे ताण कमी होतील याचा आनंद झाला. एकूणच सर्वांनाच आनंद झाला. पण खरोखर हा रोग मागे गेला आहे का, याची चर्चा संपलेली नाही. दुसरी लाट ओसरत असताना पावसाळा तोंडावर आहे, तसेही पावसाळ्यात आजार वाढतात, पुढची लाट येणारच नाही असेही सांगता येत नाही. हे सगळे अशासाठी समजून घ्यायचे की आपल्याला काही सवयी आता कायमच्याच लावून घ्यायची गरज आहे. नुसत्या व्हिटॅमिन्स व मिनरल्सच्या गोळ्या खाऊन प्रतिकारशक्ती वाढणार नाही, त्यासाठी चालणे, व्यायाम, योग, प्राणायाम या गोष्टी कराव्याच लागतील, शरीरशुद्धी ठेवावीच लागेल. सकाळची शाळा असलेली मुले बऱ्याच वेळा स्नान न करताच शाळेत जातात. रात्रभराच्या झोपेनंतर शरीराची चेतासंस्था नीट जागृत झाली नसेल तर शाळेत शिकवलेले किती लक्षात राहील, त्याचा किती उपयोग होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याने स्नानादी नित्यकर्म करूनच शाळेत जाणे इष्ट असते. नेहमीचे पदार्थ खाण्यापिण्याच्या बाबतीत कंटाळा येतो म्हणून जिभेचे चोचले पुरवण्यासाठी रोज काही तरी वेगळे खाणे बंद करून आपल्या कुटुंबात असलेल्या चालीरीतींप्रमाणे डाळ-भात-पोळी-चटणी-कोशिंबीर-ताक, अधून मधून काही गोड या जेवणावरच आपल्याला यावे लागेल.

बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुणे, कपडे बदलणे, वॉशरूमला जावे लागले तर हाय-पाय स्वच्छ धुणे, या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. प्रत्येक ठिकाणी गर्दी व धक्काबुक्की करण्यात काहीच साध्य होत नाही. तेव्हा सोशल डिस्टंसिंग पाळणे, तोंडावर मास्क बांधणे या सवयी कायमच्या अंगी बाणवून घ्याव्या लागतील. मंदिरातील अफाट गर्दीमुळे धक्काबुक्की करत दर्शन घेण्याने कुठला देव पावणार व कुठले फायदे होणार हे लक्षात येत नाही. तेव्हा काही चांगल्या सवयी आपल्याला अंगी बाणवाव्या लागतील. पैसे प्रत्येकाला हवेत, तसेच करिअरही प्रत्येकाला हवे. जीवनाची दोन अंगे आहे, एक पैसा व दुसरी श्रद्धा.

श्रद्धा म्हणजेच परमेश्र्वर. याही दृष्टीने आपल्याला काही करणे आवश्यक असेल. ‘देव आहे’ हे विसरून चालणार नाही, त्याचे अस्तित्व मान्य करावेच लागले. त्यासाठी आत्मचिंतन, ध्यानधारणा, शांतता, लोकसेवा अशा प्रकारांनी परमेश्र्वराची सेवा करावी लागेल. या सर्व सवयी अंगी बाणवाव्या लागतील. आपल्याला मिळालेल्या काही रकमेतील काही पैसा दानधर्म वगैरेंसाठी खर्च करावा लागतो असे लक्षात घेऊन तीही सवय लावून घ्यावी लागेल. ज्यांच्याजवळ सोय आहे, त्यांनी थोडी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेने तशी सवय लावून घ्यावी लागेल. आता तरी शहाणे होऊन आपण वर सांगितल्याप्रमाणे वागलो नाही तर पुन्हा पुन्हा वादळे, अतिवृष्टी व अवकाळी पाऊस, करपणारी शेते, वाढलेली उष्णता वगैरे गोष्टींना सामोरे जायची वेळ येईल. हे सर्व टाळण्यासाठी आपणा सर्वांना मानवतेकडे वाटचाल करणे आवश्यक आहे व त्यासाठी काही सवयी बदलणे आवश्यक आहे. असे केले तर आपल्याला निसर्ग कोपला वगैरे तक्रारी करायला जागा राहणार नाही. आपण आपल्या सवयी बदलून काळजी घेणे इष्ट ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com