esakal | डोकेदुखी !
sakal

बोलून बातमी शोधा

Headache

डोकेदुखी !

sakal_logo
By
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

कामाच्या वाढत्या व्यापामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास आता मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याचे आढळून येत आहे. वेगवेगळ्या कारणांनी होणाऱ्या डोकेदुखीवरील उपाय आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

डोके दुखायला लागले की काही सुचत नाही. कधी विश्रांती घेतल्यास डोके दुखणे थांबू शकते, मात्र कधी कधी नाना तऱ्हेचे उपचार करूनही पुन्हा पुन्हा डोकेदुखी उद्भवते, तेव्हा मात्र त्यावर योग्य उपचार घेणे अपरिहार्य असते. डोकेदुखीची कारणे आयुर्वेदात याप्रमाणे दिलेली आहेत. मल, मूत्र, शिंक वगैरे नैसर्गिक प्रवृत्तींना अडवून ठेवणे. दिवसा झोपणे व रात्री जागरण करणे, अति मद्यपान किंवा अंमल चढणाऱ्या वस्तूंच्या आहारी जाणे, डोक्यावर जोराचा वारा लागणे, अति मैथुन करणे, न आवडणारा वास घेणे, धूळ, धूर, अतिशय थंडी किंवा कडक उन्हाच्या संपर्कात येणे, पचण्यास जड गोष्टींचे अति सेवन करणे, अतिशय थंड पाणी पिणे, डोक्याला मार लागणे, अश्रूंना अडवून ठेवणे किंवा खूप रडणे, शरीरात आमदोष वाढणे, अतिशय मानसिक कष्ट होणे, जनपदोध्वंसातील देश आणि काळ बिघडणे वगैरे. वात, पित्त, कफदोषांपैकी ज्या दोषामुळे डोके दुखत असेल त्यानुसार डोकेदुखीचे स्वरूप बदलते, उदा.

  • वातदोषामुळे होणाऱ्या डोकेदुखीमध्ये एकाएकी, क्षुल्लक कारणाने सुद्धा डोके खूप दुखू लागते. डोकेदुखी रात्री अधिक वाढते. डोक्यावर गरम वस्त्र आवळून बांधल्याने तसेच डोक्याला शेक करण्याने या प्रकारचे दुखणे कमी होते.

  • पित्तदोषामुळे डोके दुखते तेव्हा डोके व डोळ्यांची आग होते, श्र्वास गरम भासतो, दिवसा वेदना वाढतात तसेच गरम गोष्टी नकोशा वाटतात; डोक्याला थंड स्पर्शाने बरे वाटते; रात्री वेदना कमी होतात.

  • कफदोषामुळे डोके दुखते तेव्हा बरोबरीने डोके जड, जखडल्यासारखे वाटते; चेहऱ्यावर, डोळ्यांखाली सूज आल्यासारखी वाटते; वात-पित्ताच्या मानाने वेदना कमी असतात.

वातामुळे डोके दुखत असल्यास कानात तेल टाकता येते, नाकात तूप घालता येते, डोक्याला वातशामक तेल लावण्याचाही उपयोग होतो. पित्तामुळे डोके दुखत असल्यास दुधात भिजविलेली आवळकाठी बारीक करून त्याचा डोक्यावर लेप लावल्यास बरे वाटते. दुधात तूप-साखर व थोडे केशर घालून पिण्याचाही फायदा होतो. ऊन लागून पित्त वाढत असल्यास कोकमाचे तेल व नारळाचे तेल गरम करून एकत्र करून थंड झाले की डोक्याला लावण्याने बरे वाटते. गुलाबपाण्यात चंदन उगाळून त्याचा डोक्यावर लेप लावण्यानेही बरे वाटते. कफामुळे डोके दुखत असल्यास आल्याच्या रसात थोडीशी पिंपळी उगाळून त्यात थोडे सैंधव व गूळ मिसळून सेवन करण्याने बरे वाटते. सर्दीमुळे डोके दुखत असल्यास दुधात किंवा पाण्यात दालचिनी उगाळून लेप लावल्यास बरे वाटते. निर्गुडी, कडुनिंब, आघाडा यांचा पाला पाण्यात घालून त्याचा वाफारा घेतल्यानेही कफदोषाशी संबंधित डोकेदुखी दूर व्हायला मदत मिळते.

अर्धे डोके दुखत असल्यास केशराचा संस्कार केलेले तूप नाकात टाकण्याचा उपयोग होतो. सुपारीच्या झाडाला कधीकधी निसर्गतःच अर्धी सुपारी येते, अशी अर्धी सुपारी पाण्यासह उगाळून तयार केलेला लेप दुखत असणाऱ्या बाजूवर लावण्यानेही अर्धशिशी दूर होते असा वृद्धवैद्याधार आहे. इतर शिरःशूळ म्हणजे क्षयामुळे, कृमींमुळे होणारा शिरःशूळ, अनंतवात, शंखक वगैरेंवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार योग्य उपचार करणेच आवश्‍यक असते. कधी कधी मलावरोधामुळे किंवा अपचनामुळे सुद्धा डोके दुखू शकते. तापामुळे, रक्तदाब वाढल्यामुळे सुद्धा डोके दुखू शकते. स्त्रियांच्या बाबतीत डोकेदुखीचा संबंध मासिक पाळीशी निगडित असू शकतो. अंगात उष्णता, कडकी अधिक असणाऱ्यांनाही वारंवार डोकेदुखी होण्याची शक्यता असू शकते. सध्याच्या काळात संगणकावर दीर्घकाळ काम करणाऱ्यांमध्ये, रात्रपाळी करावी लागणाऱ्यांमध्ये, प्रखर प्रकाशात, अति गोंगाटाच्या ठिकाणी काम करणाऱ्यांमध्येही डोकेदुखीची प्रवृत्ती वाढते आहे असे दिसते. वारंवार डोके दुखण्याची सवय असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा काही गोष्टी खालीलप्रमाणे होत,

  • आठवड्यातून किमान दोन वेळा पादाभ्यंग करणे

  • रात्री झोपताना नाकात साजूक तूप किंवा अधिक गुण यावा म्हणून नस्यसॅन घृतासारखे औषधी तूप घालणे

  • संगणकावर काम करणाऱ्यांनी डोळ्यात सॅन अंजन सारखे उष्णता कमी करण्यास मदत करणारे अंजन घालणे.

  • स्त्रियांनी स्त्री संतुलनाकडे, विशेषतः पाळी नियमित आणि व्यवस्थित येण्याकडे लक्ष ठेवणे.

  • उन्हात किंवा वाऱ्यात जावे लागल्यास डोक्याला पुरेसे संरक्षण देण्याकडे लक्ष देणे.

  • डोक्याला नियमित, कमीतकमी दोन वेळा तरी वातशामक व केसांना हितकर औषधी द्रव्यांनी संस्कारित तेल लावणे.

  • रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे.

loading image
go to top