संसर्गापासून संरक्षण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Infection

संसर्गापासून संरक्षण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सध्या वर्षाऋतू संपून शरदऋतू सुरू होण्याचा, म्हणजे पावसाळा संपून ऑक्टोबर हीट सुरू होण्याचा ऋतुबदलाचा काळ आहे. वर्षाऋतूत पचण्यास हलके, ताजे आणि गरम अन्न खायचे असते. मूग, तूर, कुळीथ वगैरे कडधान्ये; वेलीवरच्या फळभाज्या, मसाल्याचे पदार्थ हे वर्षाऋतूत अनुकूल असतात, तर शरदऋतूत मधुर, कडू चवीचे, वीर्याने थंड, पित्तशामक अन्न सेवन करायचे असते.

लंकेचा राजा रावणाला दहा डोकी होती. राम-रावणाचे युद्ध झाले तेव्हा एक डोके पडले तर दुसरे यायचे, दुसरे कापले तर तिसरे यायचे. वीर मातलीने श्रीरामांना उपाय सांगितल्याशिवाय ही शृंखला संपुष्टात आली नाही. आज आपल्या अवती- भोवती सुद्धा हीच परिस्थिती आहे. एका बाजूने तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत, तर दुसऱ्या बाजूला डेंग्यू, टायफॉइड किंवा अज्ञात विषाणूंमुळे अनेक जण त्रस्त आहेत. श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे सांगत त्याप्रमाणे या सर्वांच्या मुळाशी जाऊन आणि जीवनात आयुर्वेदाचा स्वीकार केल्याशिवाय आपण विजयी होऊ शकणार नाही. ढाल व तलवार ही जशी जोडी असते, तसेच संसर्ग होऊ नये आणि झाला तर त्याच्याशी प्रतिकार अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी आपल्याला तत्पर राहायला हवे. सहसा वातावरणातील मोठा बदल, अस्वच्छता आणि अशक्तता या तीन गोष्टी कोणत्याही संसर्गाला आमंत्रण देणाऱ्या असतात. एक ऋतू संपून दुसरा सुरू होतो. त्या दरम्यान, तसेच प्रत्येक ऋतूत काय खावे, काय टाळावे याचे मार्गदर्शन आयुर्वेदात आहे.

सध्या वर्षा ऋतू संपून शरद ऋतू सुरू होण्याचा म्हणजे पावसाळा संपून ऑक्टोबर हीट सुरू होण्याचा ऋतुबदलाचा काळ आहे. वर्षा ऋतूत पचण्यास हलके, ताजे आणि गरम अन्न खायचे असते. मूग, तूर, कुळीथ वगैरे कडधान्ये, वेलीवरच्या फळभाज्या, मसाल्याचे पदार्थ हे वर्षा ऋतूत अनुकूल असतात. तर शरद ऋतूत मधुर, कडू चवीचे, वीर्याने थंड, पित्तशामक अन्न सेवन करायचे असते. कुळीथ शरद ऋतूत चालत नाहीत, मसाल्याचे जे पदार्थ पित्तवर्धक असतात. उदा. मिरी, हिंग, मोहरी वगैरे शरदात न खाणेच चांगले असते. भूक लागली असता उपाशी राहून चालत नाही. एक ऋतू संपून दुसरा सुरू होतो तेव्हा हा बदल क्रमाक्रमाने करायचा असते. पण जर फक्त आवडी- निवडीचा विचार केला तर दोषांमध्ये बिघाड होतो जो हवेतील संसर्गाला शरीरात रुजण्यासाठी पोषक असतो. स्वच्छता, शुद्धता ही अनेक स्तरांवर विचारात घ्यावी लागते. उदा. पिण्याचे पाणी निर्जंतुक आणि पचण्यास सोपे होण्याच्या दृष्टीने गाळून नंतर २० मिनिटांसाठी उकळून घेतलेले असावे. पाणी उकळताना त्यात वाळा, वावडिंग, अनंतमूळ, यासारखी सुगंधी व जंतुनाशक द्रव्ये किंवा तयार जलसंतुलन टाकणे अजूनच प्रभावी ठरते.

घरामध्ये, शक्य असल्यास घराच्या आसपासही धूप करणे. सकाळ, संध्याकाळ देवासमोर दिवा लावणे, सुगंधी फूल वाहून उदबत्ती लावणे ही प्रथा धार्मिक वा आध्यात्मिक स्वरूपाची वाटली तरी यामागे वातावरण शुद्ध होणे, आसमंतातील जीवजंतूंचा व दुष्ट शक्तींचा नाश होणे हाही उद्देश असतो. हा उद्देश सफल होण्यासाठी खऱ्या साजूक तुपाचा दिवा, नैसर्गिक द्रव्यांपासून बनविलेली उदबत्ती जाळायला हवी. पेटत्या निखाऱ्यावर गुग्गुळ, लाख, कापूर, कडुनिंब, वेखंड वगैरे द्रव्ये किंवा अनेक जंतुनाशक द्रव्यांपासून तयार केलेला संतुलन प्युरिफायर धूप जाळणेही उत्तम होय. तुळस, कडुनिंब वगैरे झाडे घराच्या आसपास लावण्याने वातावरण शुद्ध राहून संक्रमणापासून दूर राहणे शक्य होते. वर्षा ऋतू संपण्यापूर्वी घरातील भिंतीवर, लाकडाचे फर्निचर असले तर त्यावरही बुरशी आलेली दिसते, त्यातच भिंतीला ओल वगैरे असली तर तेही संसर्गाला पूरक कारण ठरू शकते. तेव्हा व्हिनेगरच्या मदतीने बुरशी स्वच्छ करणे, डीह्यूमिडीफायर किंवा निखाऱ्यांच्या मदतीने ओल नाहीशी करणे हे सुद्धा आवश्यक. वातशामक सुगंधी द्रव्यांनी सिद्ध तेलाचा अभ्यंग करणे, सुगंधी, जंतुनाशक द्रव्यांपासून बनविलेल्या उटण्याने अंघोळ करणे, अंघोळीनंतर सुगंधी उटी लावणे या आयुर्वेदाने सांगितलेल्या गोष्टी म्हणजे एक प्रकारचे जंतुसंरक्षक कवचच असते. साथीचे रोग होऊ नयेत व फैलावू नयेत यासाठी वैयक्तिक पातळीवर हे उपाय योजणे उत्तम होय.

संसर्गाला पूरक असणारे तिसरे आणि सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे अशक्तपणा. ढालीवर घेतलेला वार जसा हानी करत नाही, तसाच सशक्त शरीरातही एक तर संसर्ग होत नाही, झाला तरी हानिकारक ठरत नाही. यादृष्टीने च्यवनप्राश, सॅनरोझ वगैरे रसायनांचे नियमित सेवन करणे, आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश असू देणे, केवळ रुचीपायी रोज विविधतेच्या नादी न लागता भारतीय सकस, पोषक अन्नाचे सेवन करणे हे सर्व गरजेचे असते. रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहावी यासाठी सॅन अमृत हर्बल चहासुद्धा उत्तम गुणकारी दिसून आलेला आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना दिवसातून एकदा हा चहा घेता येतो, तो चवीलाही छान लागतो.

संतुलनचे सितोपलादी चूर्ण सुद्धा यादृष्टीने प्रभावी ठरते. संसर्ग होऊ नये यासाठी रोज एक चमचा सितोपलादी चूर्ण गरम पाणी किंवा मधात मिसळून घेणे उत्तम असते. सध्या गुळवेल सर्वांच्या परिचयाची झालेली आहे. गुळवेल, सुंठ, धणे, हळद, तुळशी, गवती चहा, दालचिनी हे सर्व एकत्र करून ठेवले व यातील दोन चमचे मिश्रणात चार कप पाणी टाकून ते अर्धा कप शिल्लक राहीपर्यंत उकळून, गाळून घेतलेला काढा पिण्याने संसर्गाला प्रतिबंध होतो. निदान झालेले असले तरी इतर उपचारांच्या बरोबर हा काढा घरच्या घरी घेता येतो. तेव्हा प्रत्येकाने आपापल्या परीने ही काळजी घेतली तर संसर्गापासून सर्वांचेच संरक्षण होऊ शकेल.

- डॉ. भाग्यश्री झोपे

loading image
go to top