नैवेद्यम् आरोग्यसम्पद:

गणपतीला मोदक, मुगाचा लाडू, खिरापत अशा अनेक पदार्थांचा नैवैद्य दाखवला जातो. घरातील लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण अगदी आवडीने हा नैवेद्य खातात.
Navaidya
NavaidyaSakal

गणपतीला मोदक, मुगाचा लाडू, खिरापत अशा अनेक पदार्थांचा नैवैद्य दाखवला जातो. घरातील लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण अगदी आवडीने हा नैवेद्य खातात. आजच्या लेखात आपण त्याच नैवेद्याचे गुणधर्म पाहणार आहोत.

सगळ्यात आवडता बाप्पा कुठला, असे लहान मुलांना विचारल्यास सर्वाधिक मते श्रीगणरायांना मिळतील यात शंकाच नाही. निरागस, प्रेमळ, गुटगुटीत इत्यादी बालकांना शोभणारे गुण आपल्याला या बाप्पामध्ये दिसतात. घरात गणपती असला तर घरातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच मंडळी आनंदात असतात व एकत्र येतात. श्रीगणेशांना बुद्धीची देवता म्हटले जाते. तसे पाहिले तर कुठल्याही वयात बुद्धीची गरज असतेच; परंतु बालवयात बुद्धीचा पाया रोवला जातो म्हणून लहान मुलांचे व श्रीगणरायांचे नाते अधिक घट्ट असावे यात शंका नाही. गणेशचतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात दीड, पाच वा १० दिवस गणरायांची स्थापना केली जाते. अर्थातच या दिवसांमध्ये बाप्पासाठी (खरे पाहता आपल्यासाठीच) वेगवेगळे नैवेद्य केले जातात.

गणरायांना सर्वांत आवडतो तो उकडीचा मोदक. मोदक करताना बाहेरच्या पारीसाठी काढली जाते तांदळाची उकड. तांदूळ पचायला हलके, ताकद देणारे, सर्दी-खोकला-दमा कमी करणारे, पोट साफ करून पचन वाढविणारे आणि नसांना ताकद देणारे असतात. तांदळाची उकड पचायला अधिकच हलकी असते. खोबरे व गूळ ही मोदकाची मुख्य घटकद्रव्ये. गूळ पचनाला मदत करतो, पोट व लघवी साफ व्हायला मदत करतो, भूक वाढायला मदत करतो, लहान मुलांच्या बाबतीत, कॅल्शियम व रक्ताची कमतरता कमी करायला उपयोगी ठरतो. नारळाचे ओले खोबरे, जे ताकद द्यायला, पचन सुधारण्यासाठी, त्वचा नितळ करायला मदत करते. खोबऱ्यापासून कॅल्शियमही मिळते, केस मऊ व तुळतुळीत व्हायला, पोटातील कृमी कमी व्हायला मदत होते. वाढत्या वयाच्या मुलांना खोबऱ्यापासून योग्य प्रमाणाच फॅट-लिपिड्स मिळायला मदत होते. मोदकाच्या सारणात टाकली जाते, वेलची पूड व केशर. यामुळे मोदक सुवासिक तर होतात, बरोबरीने भूक वाढायला मदत होते, यकृताची कार्यक्षमता वाढते, गॅसेस वगैरेंचा त्रास कमी होतो. केशर शुक्र वाढवायला, नसांची ताकद वाढायला, डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी, लहान मुलांच्या बाबतीत ज्वर कमी करायला, पचनासाठीही मदत करते. केशर न्यूरोप्रोटेक्टिव्ह आहे असे सांगितलेले आहे.

केशराच्या सेवनाने स्त्रियांच्या पाळीसंबंधी तक्रारी दूर व्हायला मदत मिळते. केशर महाग असल्यामुळे अनेक ठिकाणी सध्या त्याऐवजी रंग वापरण्यात येतो. परंतु अशा कृत्रिम रंगांमुळे ॲलर्जिक त्रास वाढतात, तसेच किडनी, यकृतासारख्या महत्त्वाच्या अवयवांवर दुष्परिणाम होतात, चयापचयाच्या क्रियेवर अनावश्यक ताण येतो असे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे केशर महाग असले तरी ते थोड्या प्रमाणात वापरणे अंतिमतः फायद्याचेच ठरते. थोडक्यात सांगायचे असा हा पॉवर पॅक मोदक मुलांच्या बुद्धी, मेधा वगैरेंसाठी उपयोगी ठरतो. त्यामुळे मोदक फक्त या १० दिवसांमध्ये १-२ वेळा करण्यापेक्षा लहान मुलांच्या घरात वरचेवर मोदक आहारात असणे श्रेयस्कर ठरते. वाफाळलेल्या उकडीच्या मोदकांवर साजूक तूप टाकून खाल्ल्यास होणारे फायदे अनेकपटीने वाढतात. तूप मेंदूसाठी, बुद्धिवर्धनासाठी, मज्जाधातूसाठी, एकूणच आरोग्यासाठी हितकर असते. तूप ही आपल्याला आयुर्वेदाने दिलेली ठेव आहे.

श्रीगणरायांना आवडणारा दुसरा पदार्थ म्हणजे मुगाचा लाडू. मुगाच्या डाळीचे पीठ, तूप, पीठीसाखर, केशर व वेलची हे वापरून केलेल्या लाडूंमध्ये भरपूर प्रमाणात पोषणमूल्ये तर असतातच, बरोबरीने हे लाडू स्मृती व बुद्धिवर्धनासाठीही उत्तम समजले जातात. १० वी-१२ वीतील विद्यार्थी, इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांनी सॅन ब्राह्मी, ब्रह्मलीन सिरपसारखे रसायन देण्याबरोबर रोज एक मुगाचा लाडू अवश्य द्यावा.

गणरायांसाठी तिसरा नैवैद्याचा पदार्थ म्हणजे खिरापत. बुद्घी खिरापतीसारखी वाटली जात नाही, असे म्हटले जाते ते खरे असले तरी खिरापत सेवनाने बुद्धी वाढते हेही खरे. म्हणूनच श्रीगणेशांच्या प्रिय पदार्थांमध्ये खिरापतीचा नंबर वरचा आहे. आपल्याकडे खिरापतीच्या बऱ्याच पाककृती प्रचलित आहेत, आज येथे एक खिरापतीची आयुर्वेदिक पाककृती देत आहोत. ती घरी आवर्जून करून बघावी. खिरापतीमध्ये असते खसखस. खसखस मेंदूसाठी उत्तम असते, मेंदूची कार्यक्षमता वाढवते, झोप नीट येण्यात मदत करते, कॅल्शियमची पूर्तता करते त्यामुळे वाढत्या वयाच्या मुलांची हाडे मजबूत व्हायला मदत मिळते. काजू, बदाम, अक्रोड, चारोळी स्मृतिवर्धनासाठी उत्तम असतात. खडीसाखर शीतल गुणधर्माची व शक्तिवर्धक असते. मेंदू सतत कार्य करत असतो, तेथे रक्ताची अधिक प्रमाणात पूर्ती होत असते, त्यामुळे तेथील उष्णता वाढते. वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी खडीसाखरेची मदत होते. साखरेमुळे मुले हायपर ॲक्टिव्ह होतात अशा गैरसमजामुळे सध्या मुलांना साखर देणे टाळले जाते. सध्या मुले चिडचिडी व संतापी होत आहेत अशीही तक्रार अनेक पालकांकडून ऐकू येते. यात काही संबंध आहे का, हे पाहणे योग्य ठरेल.

खिरापतीत वापरल्या जाणाऱ्या मनुका रक्तवाढीसाठी, पचन सुधारण्यासाठी, पोट साफ होण्यासाठी मदत करतात. अशी ही परिपूर्ण खिरापत फक्त गणपतीच्या १० दिवसांत खाणे योग्य आहे का याचा विचार व्हावा. घरात वाढत्या वयाची मुले असतील तर खिरापत साठवून ठेवता येते व रोज १-२ चमचे मुलांना खायला देता येते. आपल्या शास्त्रांनी अशा गोष्टी दिलेल्या आहेत ज्यामुळे आरोग्यासाठी तर लाभ होतोच, बरोबरीने या गोष्टी सणासुदीशी जोडल्या गेल्यामुळे मानसिकता सकारात्मक राहण्यासाठी मदत होते. गणेशोत्सवात रोज आरत्या म्हटल्या जातात, स्तोत्र, अथर्वशीर्ष वगैरेंचे आवर्तने केली जातात. श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांनी स्वास्थ्यसंगीतावर संशोधन करून संगीताचे शरीर, मनावर होणारे चांगले परिणाम सिद्ध केलेले आहेत. या संशोधनावर आधारित त्यांनी ‘ॐकार गणेश’ हा अल्बम प्रसिद्ध केलेला आहे. लहान मुलांच्या बाबतीत डीलेड माइलस्टोन्सचा त्रास असेल, बोलण्याबाबत काही त्रास असेल तर औषधांबरोबर मुलांना ॐकार गणेश ही सीडी ऐकवल्याचे उत्तम परिणाम मिळतात, असा अनुभव आहे. म्हणूनच मुलांना रोज सकाळी वा संध्याकाळी एखादे गणपतीचे स्तोत्र, अथर्वशीर्ष ऐकवण्याची वा त्यांच्याकडून म्हणवून घेण्याची जबाबदारी घरातील कोणीतरी घेतली तर श्रीगणनायक आपल्याला प्रसन्न होतील हे नक्की.

पौष्टिक खिरापत...

  • सुके खोबरे - एक वाटी

  • खसखस - अर्धी वाटी

  • खडीसाखरपूड - एक वाटी अथवा चवीनुसार

  • काजू - अर्धी वाटी

  • बदाम - अर्धी वाटी

  • चारोळी - अर्धी वाटी

  • अक्रोड - अर्धी वाटी

  • मनुका किंवा बेदाणे (इच्छा असल्यास) - अर्धी वाटी

  • वेलचीपूड - अर्धा चमचा

कृती - कल्हई केलेल्या पितळेच्या कढईत मंद आचेवर किसलेले खोबरे भाजून घ्यावे. गार झाल्यावर हातानेच चुरावे. खसखस मंद आचेवर भाजून खलबत्ता किंवा मिक्सरमध्ये थोडी बारीक करावी. बेदाणे सोडून बाकी सर्व सुक्या मेव्याची पूड करून घ्यावी. सगळ्या गोष्टी एका पातेल्यात घेऊन व्यवस्थित मिश्रण करावे. तयार झालेली खिरापत हवाबंद डब्यात भरून ठेवावी, साधारण एक महिना टिकते. रोज १-२ चमचे या प्रमाणात मुलांना खायला द्यावी.

- डॉ. मालविका तांबे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com