काय खरं, काय खोटं ?

एप्रिलची सुरुवातच ‘एप्रिल फूल’ या दिवसाने होते. या दिवशी सावध न राहिल्यास कोणीतरी खोटे बोलून आपली फजिती करते, पण त्याचे खोटे आपण ओळखू शकलो तर त्याचा आनंदही आपल्याला मिळतो.
काय खरं, काय खोटं ?
Summary

एप्रिलची सुरुवातच ‘एप्रिल फूल’ या दिवसाने होते. या दिवशी सावध न राहिल्यास कोणीतरी खोटे बोलून आपली फजिती करते, पण त्याचे खोटे आपण ओळखू शकलो तर त्याचा आनंदही आपल्याला मिळतो.

- डॉ. मालविका तांबे

एप्रिलची सुरुवातच ‘एप्रिल फूल’ या दिवसाने होते. या दिवशी सावध न राहिल्यास कोणीतरी खोटे बोलून आपली फजिती करते, पण त्याचे खोटे आपण ओळखू शकलो तर त्याचा आनंदही आपल्याला मिळतो. एकूण सावधगिरी व सत्य ओळखणे याच्या शिकवणीतून एप्रिल महिन्याची सुरुवात होते. हा गंमतीचा भाग तर खराच, पण तसेही आयुष्यात चुकीच्या गोष्टींवर विश्र्वास ठेवण्याने किंवा सावधगिरी न बाळगण्याने बरेच त्रास, अपघात होऊ शकतात चिकित्साक्षेत्रात काम करत असल्यामुळे बऱ्याचदा समाजात असलेल्या चुकीच्या समजुती आम्हाला आढळून येतात, ज्यांचा लोकांनी नकळत स्वीकार केलेला असतो. पर्यायाने छोटे-मोठे त्रास होताना दिसतात. या एप्रिल फूल दिवसाच्या निमित्ताने काय खरे, काय खोटे याबद्दल आपण जाणून घेऊ.

प्रचलित समज : रोज कमीत कमी आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

वय, प्रकृती, कामाचा प्रकार, राहण्याची जागा यानुसार प्रत्येकाची पाण्याची गरज बदलत असते. कफाच्या व्यक्तीला किंवा थंड प्रदेशातील व्यक्तींना तहान कमी लागते, तर पित्तप्रकृतीच्या लोकांना तहान अधिक लागू शकते. त्यामुळे पाणी पिण्याचा सोपा नियम म्हणजे तहान लागल्यावरच पाणी पिणे. हे तब्येतीसाठी उत्तम असते. आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी पिण्याने अपचन, मंदाग्नीचा त्रास होताना तसेच वृक्कांवर अवास्तव ताण पडताना दिसतो.

प्रचलित समज : जेवताना पाणी पिऊ नये.

पचन व्यवस्थित होण्याकरता जेवण जेवण रसरशीत असणे चांगले असते. त्यामुळे जेवताना मधे-मधे एक-दोन घोट पाणी पिणे आवश्यक असते. उलट, जेवणाआधी किंवा जेवणानंतर एकदम खूप पाणी पिण्याने पचनाचा त्रास वाढण्याचा संभव असतो, त्यामुळे हे कटाक्षाने टाळावे. दिवसात इतर वेळीही एकदम भरपूर प्रमाणात पाणी पिणे टाळणेच इष्ट.

प्रचलित समज : पथ्य न पाळल्यास आयुर्वेदिक उपचार उपयोगी ठरत नाहीत.

आयुर्वेदशास्त्रात आजाराचे मूळ कारण शोधून त्यावर इलाज करायला सांगितलेले आहे. काही आहारपदार्थही सांगितलेले आहेत जे आजार वाढवायला कारणीभूत ठरत असतात. या गोष्टी टाळल्या तर आजार पटकन बरा व्हायला मदत मिळते. पाळलेले पथ्य औषधाला पूरक ठरते. छोट्या छोट्या आजारांमध्ये तर पथ्यच औषधासारखे काम करते. त्यामुळे पथ्य या संकल्पनेला घाबरून न जाता, ती संकल्पना आपल्या चिकित्सकाकडून नीट समजावून घेतली तर अधिक फायदा होताना दिसतो. पथ्य पाळले नाही तरी आयुर्वेदिक उपचार उपयोगी ठरतातच, फक्त आजार बरा व्हायला थोडा वेळ अधिक लागू शकतो.

प्रचलित समज : आयुर्वेदिक औषधे गरम असतात.

शरीरात चालू असलेल्या चयापचय क्रियेमुळे शरीरातील शीतता (वात व कफ) आणि उष्णता (पित्त) यांचे प्रमाण सतत वर-खाली होत असते. आयुर्वेदिक औषधे शरीरात असलेली शीतता व उष्णता यांचे व दोषांचे असंतुलन कमी करायला मदत करतात, त्यांच्यामुळे शरीरात शीतता वाढवणे वा उष्णता वाढणे असे काही होत नाही. त्यामुळे आयुर्वेदिक औषधे गरम पडतात हा समज चुकीचा आहे. काही वेळेस एखाद्या व्यक्तीला एखाद्या वनस्पतीची किंवा औषधातील एखाद्या घटकाची ॲलर्जी असू शकते. पण ती गोष्ट सर्वांसाठी लागू होत नाही.

प्रचलित समज : आयुर्वेदिक औषधांमध्ये धातूंची भस्मे असतात, त्यामुळे ती शरीराला अपायकारक असतात.

आयुर्वेदिक औषधांमध्ये सर्व नैसर्गिक गोष्टी वापरल्या जातात. उदा. वनस्पतींचे वेगवेगळे भाग, प्राणिज वस्तू, धातूंची भस्मे वगैरेंचा समावेश असतो. धातूंची (खनिजांची) भस्मे बनविण्याकरता रसशास्त्र नावाच्या एका महत्त्वाच्या शाखेत समस्त प्रक्रियेचे सविस्तर वर्णन केलेले आहे. या प्रक्रियेनंतर धातूचे स्वरूप पूर्णपणे बदलते. त्यांचा आकार नॅनो पार्टिकलसारखा होतो, त्यामुळे ते शरीरात सहजपणे सामावले जातात. यांचा डोसही खूप कमी प्रमाणात असतो. या औषधांचा वापर प्रकृती व आजारानुसार केला जातो. या औषधांचे गुणवत्ता नियंत्रणाचे निकष खूप कडक असतात. जी गोष्ट इतकी विचारपूर्वक केलेली आहे त्याचा अपाय होण्याचा प्रश्र्नच येत नाही. उलट, आयुर्वेदिक शास्त्रज्ञांनी प्राचीन काळी हे सगळे संशोधन कसे केले असेल, जेणेकरून जेणेकरून ही भस्मे निर्धोकपणे वापरता येतील याचे नवल वाटल्याशिवाय राहत नाही.

प्रचलित समज : मध-तूप किंवा दूध-दही एकत्र घेऊ नये.

आयुर्वेदात विरुद्ध आहार ही संकल्पना फार विस्तृतपणे समजावलेली आहे. मध व तूप असमान प्रमाणात घेतल्यास शरीराला आरोग्यदायी असते, तर समान मात्रेत यांचे सेवन शरीरासाठी चांगले नसते, असे सांगितलेले आहे. तसेच, दूध व दही एकत्र घेणे योग्य नसले तरी पंचामृतात या दोन्ही गोष्टी एकत्र येताना यांच्यावर संस्कार व संयोग (पाककृती) हा नियम लागू असल्याने ते विरुद्धान्न नसते. त्यामुळे आयुर्वेदाचे विरुद्ध आहाराचे नियम आयुर्वेदिक तज्ज्ञाकडून समजून घेऊन त्यांचे पालन करणे अधिक योग्य ठरेल. या व अशा अनेक गैरसमजुतींवर लोक भीतीपोटी किंवा चुकीच्या काळजीमुळे विश्र्वास ठेवतात, दुसऱ्यांना तसे सल्लेही देतात. आपल्याला गरज आहे सजग राहण्याची. सजग राहून प्रत्येक माहिती खरी आहे की खोटी आहे हे विश्र्वासार्ह कसोटीवर पडताळून पाहण्याची. असे केले तर एप्रिलमध्येच काय पण कुठल्याही महिन्यात Fool बनण्याची वेळ येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com