बाळाचे आरोग्यसंस्कार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mother and Baby

ज्या घरात लहान बाळाचा जन्म होतो ते घर चैतन्य व आनंदाने परिपूर्ण असते. बाळ रंगा-रूपाने कोणावर गेले आहे, बाळ रोज काय नवीन नवीन बाळलीला करते आहे, या सगळ्या चर्चांना घरात उधाण येते.

बाळाचे आरोग्यसंस्कार...

- डॉ. मालविका तांबे

ज्या घरात लहान बाळाचा जन्म होतो ते घर चैतन्य व आनंदाने परिपूर्ण असते. बाळ रंगा-रूपाने कोणावर गेले आहे, बाळ रोज काय नवीन नवीन बाळलीला करते आहे, या सगळ्या चर्चांना घरात उधाण येते. जन्मानंतर पहिले वर्ष बाळाच्या विकासाच्या व आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यांत महत्त्वाचे असते. या काळात बाळाची नीट काळजी घेतली गेली तर त्यांचे पुढचे संपूर्ण आयुष्य व्यवस्थित राहण्यात मदत मिळते. आयुर्वेदातील कौमारभृत्य नावाच्या शाखेमध्ये प्रसव, बाळाचा विकास, त्याला होऊ शकणारे रोग, त्याला होणारा त्रास, त्यावर काय उपचार करता येतील याबाबत सर्व मार्गदर्शन केलेले आहे. सात नोव्हेंबर जागतिक स्तरावर इन्फंट प्रोटेक्शन डे म्हणून साजरा केला जातो. बालकाच्या संपूर्ण आरोग्याविषयी जागरूकता समाजात कशी पसरवता येईल याबद्दल विचार केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेचे २०१९ चे आकडे पाहिले तर जगभरात २४ लाख बालके वयाच्या पहिल्या वर्षात मृत्युमुखी पडलेली आहेत. हा आकडा चिंतनीय आहे. या दिनाच्या निमित्ताने बालकाच्या आरोग्याच्या दृष्टीने आयुर्वेदात केलेले मार्गदर्शन समजून घेण्याचा व त्यानुसार काळजी घेण्याचा आपण प्रयत्न करू या.

बाळाचा जन्म झाल्या झाल्या त्याची प्रतिकारशक्ती खूप कमी असते. अशा काळात त्याला संक्रमण होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच जन्मानंतर पहिले १० दहा दिवस बाळाला व बाळंतिणीला वेगळे ठेवले जाते. या काळात आई-वडील-आजी- आजोबा-डॉक्टर-नर्स खेरीज कुठल्याही व्यक्तीने बाळाला हाताळणे योग्य नव्हे. या काळात बाळ व बाळंतिणीला आरामाची गरज असते. प्रसूतीनंतर इस्पितळातून घरी आल्यावरही बाळ-बाळंतिणीची खोली वेगळी असावी, त्या खोलीत इतरांचा फारसा वावर नसावा. सध्याच्या काळात मात्र बाळाचा जन्म झाल्या-झाल्या अनेक जण पुष्पगुच्छ वगैरे घेऊन हॉस्पटलमध्ये ग्रीट करायला पोचतात व प्रत्येकालाच कौतुकाने बाळाला हातात घेण्याची इच्छा असते. परंतु आयुर्वेदिक नियमांचे पालन केले कर बाळाचा आरोग्य नीट राहायला मदत मिळते. बाळा सव्वा महिन्यांचे होईपर्यंत बाहेरच्या लोकांचे फार प्रमाणात येणे-जाणे किंवा त्याला इतरांनी हाताळण्याची शक्यता जेवढी कमी असेल तेवढे बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने बरे असते. लहान मुलांवर आजूबाजूचे वातावरण व त्यात असलेले विचारतरंग यांचा खूप परिणाम होत असतो. त्यामुळे मूल ज्या घरात जन्म घेते त्या घरातील आई-बाबा, आजी-आजोबा वगैंरेंची बाळाशी व एकमेकांशीही वागणूक व्यवस्थित असणे फार महत्त्वाचे असते. बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण जागरूकता असणे व त्यादृष्टीने आवश्यक ते ज्ञान घेण्याची प्रवृत्ती घरच्या लोकांमध्ये असणे आवश्यक असते. बाळाचा जन्म झाल्यावर केले जाणारे आरोग्यसंस्कार बघू या.

सुवर्णप्राशन संस्कार - जन्म झाल्या झाल्या स्वच्छ धुतलेल्या सहाणेवर थोडेसे नैसर्गिक मध व साजूक तूप किंवा नुसते मध घेऊन त्यात शुद्ध २४ कॅरट सोन्याचे बिस्कीट उगाळावे आणि बाळाच्या पित्याने, आईने किंवा घरातील मोठ्या व्यक्तीने हे चाटण उजव्या हाताच्या स्वच्छ बोटाने बाळाला चाटवावे. याला सुवर्णप्राशन संस्कार म्हणतात. सुवर्णप्राशन संस्कार जन्माच्या पहिल्या दिवसापासून सुरू करून पहिले सहा महिने करावा. हा संस्कार केल्याने त्याच्या आयुष्याची वृद्धी होते, प्रतिकारक्षमता वाढते, बुद्धी व प्रज्ञा यांना बळ मिळते. मुख्य म्हणजे बालक एकपाठी होते, म्हणजे एकदा ऐकलेले-शिकवलेले त्याच्या लक्षात राहते. खरे तर सोने हा आयुष्यभर घेण्यासाठी उत्तम रसायन आहे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. त्यामुळे देण्याच्या दृष्टीने सोपेपण याला व मात्राही व्यवस्थित असावा या दृष्टीने संतुलन बालामृत हे रसायन मुलांना जन्माच्या पहिल्या दिवसापासून वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत द्यावे. मध लहान बाळाला द्यावा की नाही याबद्दल काहींच्या मनात शंका असते. पण नैसर्गिक मध बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम सांगितलेला आहे. त्यामुळे मनात कुठलेही शंका न ठेवता बाळाला बालामृत-मध द्यायला हरकत नसते.

अभ्यंग व धुरी - पहिल्या वर्षात बाळाच्या विकासाला मदत करण्यासाठी व प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी आयुर्वेदात शास्त्रोक्त अभ्यंग तसेच धुरी करायला सांगितलेली आहे. रोज सकाळी बाळाला संतुलन बेबी मसाजसारख्या सिद्ध तेलाने हलक्या हाताने अभ्यंग करून नंतर शक्यतोवर अर्धा-एक तासाने अंघोळ घालावी. स्नानाच्या वेळी संतुलन बेबी मसाज पावडरसारखे नैसर्गिक घटकांपासून बनविलेले उटणे वापरावे. अभ्यंग-उटणे नियमित वापरण्यामुळे हाडे व स्नायू बळकट व्हायला मदत मिळते, तसेच त्याची त्वचा कोमल व तेजस्वी होते, बाळाला शांत झोप लागायला मदत मिळते. स्नानानंतर बाळाचे अंग मऊसर वस्त्राने कोरडे करून नंतर टेंडरनेस धुपासारख्या धुपाची बाळाला धुरी द्यावी. यात असलेल्या चंदन, गुग्गुळ, वाळा, ओवा, बाळंतशोपा वगैरे वनस्पतींमुळे बाळाचा कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होण्यापासून प्रतिबंध होतो. वारंवार सर्दी, खोकला, ताप त्रासांपासून बाळ चार हात दूर राहण्यास मदत मिळते. अभ्यंग व धुरी याबाबतची अधिक माहितीसाठी क्यूआर कोड स्कॅन करून व्हिडिओ बघावा.

आहार - आहार हा आरोग्यासाठी सर्वांत महत्त्वाचा असतो. आयुर्वेदाच्या मतानुसार पहिले सहा महिने बाळाला आईचे स्तन्यपान करवावे. हे शक्य नसल्यास आईला पुरेसे दूध येत नसल्यास गाईच्या दुधात, पाणी व वावडिंगाचे चार दाणे घालून उकळून, संस्कारित करून बाळाला द्यावे. डबाबंद पावडरपासून बनविलेले दूध देणे टाळावे. सहा महिन्यांनंतर अन्नप्राशन संस्कार करून बाळाला हळू हळू बाहेरच्या आहाराची सवय करावी. पचायला जड आहार वर्षानंतरच सुरू करणे योग्य. बाळाची पचनशक्ती कमी असल्यामुळे घाई-गडबड करून बाळाला वेगवेगळे पदार्थ देण्याचा प्रयत्न केल्यास बाळाच्या शरीरातील पचनाग्नी विकृत होऊन पुढे बरेचसे आजार होताना दिसतात. पचनाच्या मदतीकरता आपल्याकडे बळगुटी देण्याची पद्धत आहे. पोट फुगणे, गॅसेस, घट्ट शी, पातळ शी, सर्दी-खोकला वगैरे त्रास बाळगुटीच्या वापराने कमी होतात. बाळाचे अन्नप्राशन झाल्यानंतर गुटीबरोबर बाल हर्बल सिरप देण्याचा फायदा होतो. बाळाची झोप व्यवस्थित असली तर त्याचे पचनही व्यवस्थित राहते तसेच वजन व्यवस्थित वाढते. झोप नीट होण्यास व मज्जासंस्थेचे कार्य नीट राहून बाळाच्या विकासाचे टप्पे (माइल स्टोन्स) व्यवस्थित पार पडण्याकरता आयुर्वेदात शिरोपिचू सुचविलेला आहे. जन्मापासून तुपात भिजवलेला कापसाचा बोळा टाळूवर ठेवणे किंवा ब्रह्मलीन तेलाचे काही थेंब टाळूवर लावणे उपयोगी ठरते.

रक्षाकर्म - बाळ व बाळंतिणीच्या अजून काही गोष्टी आयुर्वेदात सुचवलेल्या आहेत. घरात स्वास्थसंगीत, मंत्र, गर्भसंस्कार संगीत लावणे चांगले. सकारात्मक उर्जेकरता घरात एखादा तेला-तुपाचा दिवा लावावा. शक्य असल्यास संपूर्ण घरात संतुलन प्युरिफायर धूप किंवा संतुलन सुरक्षा धूप सकाळ-संघ्याकाळ करावा. बाळाच्या पाळण्याला किंवा त्याच्या पलंगाला वेखंड, हिंग, जवस, मोहरी, लसूण वगैरेंपासून बनविलेली रक्षापोटली बांधायला सांगितलेली आहे.

बाळाच्या विकासाची नोंद - सध्याच्या काळामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर प्रत्येक प्रसंगाचे फोटो काढण्याची पद्धत आहे. अशाच प्रकारे बाळाच्या विकासाच्या सगळ्याच टप्प्यांची नोंद करणे अधिक उत्तम ठरू शकेल. जन्मानंतर त्याचे वजन कसे वाढते आहे, त्याच्या दूध पिण्याच्या वेळा, शी-शूच्या वेळा यांची नोंद करणे योग्य ठरते. बाळ मान कधी धरायला लागले, नजर कधी स्थिर झाली, आवाजाच्या दिशेने मान वळवायला कधी सुरुवात केली, पालथे कधी पडू लागले, गादी ओली करणे कधी बंद झाले वगैरे त्याच्या विकासाच्या टप्प्यांची नोंद ठेवणे उत्तम. बाळाला कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन कधी झाले, त्याला कुठल्या प्रकारची औषधे कधी व किती प्रमाणात दिली गेली याचही नोंद ठेवणे उत्तम. बाळावर कुठले संस्कार केले याचीही नोंद ठेवावी. पुढे कुठला आजार झाल्यास अशा प्रकारच्या नोंदणीचा उपयोग होऊ शकतो. आयुर्वेदात सुचवल्यानुसार माता-पित्याने व घरातील इतरांनी बाळासाठी वेळ देऊन बाळाची व्यवस्थित काळजी घेऊन बाळावर केलेल्या आरोग्याचे संस्कारांची अनमोल ठेव बाळाला जन्मभर पुरू शकेल.