सर्दी, खोकल्यामुळे डोक्याला ‘ताप’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cold Cough

शाळेचा व्हॉट्सॲप ग्रुप सकाळी उघडला की ‘मुलाला ताप, सर्दी, खोकला असल्यामुळे तो आज शाळेला येऊ शकणार नाही’ असा मेसेज आजकाल ५-६ पालकांकडून तरी टाकला गेलेला दिसतो.

सर्दी, खोकल्यामुळे डोक्याला ‘ताप’!

- डॉ. मालविका तांबे

शाळेचा व्हॉट्सॲप ग्रुप सकाळी उघडला की ‘मुलाला ताप, सर्दी, खोकला असल्यामुळे तो आज शाळेला येऊ शकणार नाही’ असा मेसेज आजकाल ५-६ पालकांकडून तरी टाकला गेलेला दिसतो. सध्या दवाखान्यातही लहान मुलांची तक्रार घेऊन बरेच पालक येताना दिसतात. पावसाळा व ऋतुबदल या दोन्ही कारणांमुळे सध्या सगळीकडे व्हायरसमुळे होणारे आजार वाढलेले दिसतात. शाळेत मुले सतत एकमेकांच्या संपर्कात येत असल्यामुळे आजार मोठ्या प्रमाणावर व पटकन पसरताना दिसतो. शरीरात कुठल्याही प्रकारचे संक्रमण (इन्फेक्शन) झाले की शरीराचे तापमान वाढताना दिसते, यालाच आपण ‘ताप आला’ असे म्हणतो. आयुर्वेदात तापाला ज्वर असे म्हटलेले आहे. आणि आयुर्वेदाच्या ग्रंथांत ज्वरविभाग हा सर्वांत मोठा विभाग आहे. पावसाळ्यात सर्दी, खोकला असे व्हायरसजन्य आजार वाढलेले दिसतातच, परंतु श्र्वास लागणे, ॲलर्जिक सर्दी, बालदमा इत्यादी त्रासही बळावताना दिसतात. मुलांचे आरोग्य नीट राहावे यासाठी पालक चिंतेत असतात. परंतु व्यवस्थित काळजी घेतली तर या ऋतूतही त्रासांपासून दूर राहता येते.

सर्दी, खोकला, ताप याची चाहूल लागताच सर्वप्रथम पचनावर काम करणे आवश्यक असते, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. मुलांना कोमट पाणी देण्याचा उपयोग होताना दिसतो. जिरे, धणे, बडीशोप, सुंठ वगैरेंपासून बनविलेला हर्बल टी मुलांना दिसताना दिवसातून एकदा मुलांना दिल्यास फायदा होताना दिसतो. या काळात प्यायचे पाणी नागरमोथा, वाळा, रक्तचंदन, सुंठ, पित्तपापडा वगैरे वनस्पती अथवा जलसंतुलन घालून उकळलले असावे. यामुळे तहान तर भागतेच, बरोबरीने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी झाल्याने ताप कमी व्हायलाही मदत मिळते. या काळात शरीरातील अग्नी मंद झाल्यामुळे पचनशक्ती कमी झालेली असते त्यामुळे मुलांचा आहार कमी झालेला दिसतो. या दृष्टीने आहारात शिंगाड्याची खीर, मुगाच्या डाळीचे सूप, मेथी- गाजर-बटाटा-पालक वगैरे भाज्यांचे गरम गरम सूप, थोडे तूप घालून मऊ भात, लसणाची फोडणी घालून केलेल्या हिरव्या पालेभाज्या, गहू-तांदूळ-ज्वारी यांची कण्हेरी वा पेज मुलांना देणे उत्तम ठरते. आवडत असल्यास कुळथाचे सूप गरम भाताबरोबर देणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम ठरते. प्रतिकारशक्ती वाढण्याच्या दृष्टीने रोज एक-दोन वेळा हळदीचे दूध देणे उत्तम ठरते. असे दूध तयार करत असताना त्यात वेलची वा दालचिनी घालता येते. असे दूध पिण्यामुळे सर्दी कमी होते, घशाला सूज आली असल्यास कमी होते, घसा खवखवणे कमी होते. सतत कोरडा खोकला येत असला तर हळदीच्या दुधाचा चांगला उपयोग होताना दिसतो. हळदीचे दूध तयार करण्याकरता नुसती कोरडी हळद दुधात मिसळून चालत नाही तर हळद दुधाबरोबर उकळण्याची विशिष्ट कृती करावी लागते. याबद्दलची सविस्तर माहिती घेण्याकरता यूट्यूब वरील हळदीचा व्हिडिओ नक्की बघावा.

या ऋतूत पचायला जड गोष्टी, अति प्रमाणात आंबट गोष्टी, अति थंड पदार्थ, मांसाहार वगैरे आहारातून टाळलेले श्रेयस्कर ठरते. वाढत्या वयातील मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तसेच शरीरात ताकद चांगली राहण्याकरता च्यवनप्राशसारखे रसायन रोज देणे उत्तम. हे चवीला तर चांगले असतेच, खायला सोपे असते व त्यात असलेल्या आवळ्यामुळे शरीराची ताकद वाढायला मदत मिळते. मधात मिसळून सितोपलादी चूर्ण, ब्राँकोसॅन सिरप घेणे तसेच वैद्यांच्या सल्ल्याने आयुर्वेदात सांगितलेल्या औषधांची योजना करणे उपयोगी ठरते. असा त्रास होत असताना काळी मिरी, सुंठ, लवंग, पुदिना वगैरेंचा काढा देण्याची योजना वैद्यांच्या सल्ल्याने करावी. शक्य असल्यास सॅन अमृत पासून बनविलेला काढा दिवसातून दोन वेळा मुलांना द्यावा. ताप-सर्दी-खोकला असताना स्नान न करणे श्रेयस्कर असते, त्याऐवजी पाण्यात वाळा, कडुनिंब उकळून त्या पाण्याने स्पंजिंग करणे बरे. ताप-सर्दी- खोकला असताना मुलांना बाहेर खेळण्यास पाठवू नये, घरीच आराम करावा. सकाळच्या वेळी तेल वा तूप घालून सायनस मोकळे करणे, त्यानंतर दीर्घश्र्वसन करणे उत्तम. तसेही नियमाने तेल वा तूप नाकात घालण्याचा फायदा मिळतोच. संतुलन अभ्यंग सेसमी किंवा कोकोनट सिद्ध तेल हलक्या हाताने शरीरास लावल्यास शीण कमी व्हायला मदत मिळते तसेच शरीराची प्रतिकारक्षमता वाढते.

ताप असल्यास पादाभ्यंग करण्याचा उत्तम उपयोग होतो. निलगिरी तेलाचे ४-५ थेंब उकळत्या पाण्यात घालून वाफारा घेण्याचाही फायदा होतो. अशा प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून (प्रतिबंधात्मक) किंवा त्रास होत असल्यास धूपन करण्याचाही उत्तम उपयोग होतो. यासाठी संतुलन टेंडरनेस धूप व संतुलन प्युरिफायर धूप पूर्ण घरात केल्याने अशा प्रकारचे संसर्ग होण्यास प्रतिबंध होतो असा आजवरचा अनुभव आहे. धूप सूक्ष्म स्तरावर काम करतो. आयुर्वेदात तर नवजात बालकाला संतुलन टेंडरनेस धुपासारख्या धुपाने धूपन करायला सांगितलेले आहे. हे रक्षोघ्न कर्म आहे म्हणजे असा धूप आजार पसरविणाऱ्या जंतूंना कमी करतो. थोड्या मोठ्या मुलांना जलनेती शिकवणे फायद्याचे असते. त्रास नसताना जलनेती केल्यास सायनस मोकळे राहून जंतुसंसर्गापासून दूरराहता येते तसेच श्र्वास व्यवस्थित घेता येतो. नाक फार चोंदलेले असले तर ओव्याच्या पुरचुंडीने सायनस शेकण्याचा फायदा होतो. फार प्रमाणात खोकल्याचा त्रास असणाऱ्यांना ज्येष्ठमधाची काडी तोंडात ठेवण्याचा उपयोग होतो. पाव चमचा तुळशीच्या ताज्या पानांच्या रसात अर्धा चमचा मध घालून सकाळ-संध्याकाळ घेतल्यास फायदा होतो. तुळशीची १-२ पाने चावून खाल्ल्याचाही उपयोग होतो. सर्दी-खोकला झाल्यावर हे उपाय करणे चांगलेच.

ताप आला की लोक घाबरतात. पण ताप हा रोग नसून रोगाचे लक्षण आहे. ताप हे शरीरात आलेल्या संसर्गाशी लढा देण्यामुळे आलेले एक लक्षण असू शकते. त्यामुळे नुसती ताप उतरवण्याची औषधे देण्याचा नेहमीच फायदा होतो असे नाही. सर्दी- खोकला कमी करण्यासाठी मुलांना अनेक वेळा प्रतिजैविके दिला जातात. परंतु अशा प्रकारच्या त्रास होत असताना प्रत्येक वेळी प्रतिजैविकांची गरज असतेच असे नाही. फार प्रमाणात व वारंवार प्रतिजैविके दिल्यामुळे शरीराच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो (इम्युन रिस्पॉन्सवर), पचनसंस्था बिघडते, परिणामतः मूल मोठे झाल्यावरही बऱ्याच प्रकारचे त्रास होताना दिसतात. त्यामुळे काहीही त्रास होत असला तर स्वतःहून प्रतिजैविके वापरण्यापेक्षा कुठल्या प्रकारच्या औषधांची गरज आहे याचा निर्णय घेणे योग्य ठरते. अशा प्रकारे नीट काळजी घेतली तर पावसाळ्यात सतावणाऱ्या सर्दी, खोकला, ताप, श्र्वसनसंस्थेचे आजार वगैरेंवर मात करायला मदत मिळू शकते.

Web Title: Dr Malvika Tambe Writes Cold Cough Fever Sickness

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..