बरं वाटत नाही? dr malvika tambe writes fatigue sickness treatment health | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fatigue

बरं वाटत नाही?

- डॉ. मालविका तांबे

काहीही न करता थकवा येण्याची, बरं वाटत नाही अशी तक्रार घेऊन दवाखान्यात येणाऱ्यांची संख्या सध्या बरीच वाढलेली आहे. कुठलेही काम सुरू करण्यापूर्वी आळस जाणवणे, कुठल्याही गोष्टीत रुची न वाटणे, कुठलेही काम तडीला न नेणे, झोप येत आहे असे सतत वाटत राहणे, सतत जांभया येणे, उत्साह नसणे, चिंताग्रस्त असणे, नैराश्य, Anxiety, पॅनिक अटॅक हे शब्दही वारंवार ऐकण्यात येऊ लागलेले आहेत. म्हणायला आजार काहीही नाही पण नीट जगताही येत नाही ही आजची अनेकांची समस्या आहे.

आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार केला तर जवळजवळ ही सगळी लक्षणे शुक्र व ओजाच्या क्षयामुळे येणारी आहेत. शुक्र व ओज म्हणजे काय? आपण जे अन्न ग्रहण करतो ते सगळे आपल्या शरीरस्थ अग्नीच्या साहाय्याने पचून वेगवेगळ्या धातूंमध्ये परिवर्तित होते, यातील शेवटचा धातू आहे शुक्रधातू म्हणजेच वीर्यधातू. त्यानंतर ओजस म्हणजे शरीराचीमहत्त्वपूर्ण ताकद तयार होते.

ओज खरे तर रस धातू ते शुक्रधातूपर्यंत असलेल्या सातही धातूंचे साररूप असते. आपले संपूर्ण स्वास्थ्य, आपले बौद्धिक कार्य, आपली इंद्रिये, आपले मन हे सगळे ओजाच्या आधारावर अवलंबून असते. रोगासाठी असलेली प्रतिकारशक्तीसुद्धा ओजावरच अवलंबून असते. ओजक्षय झाल्यास अकारण थकवा वाटणे, ग्लानी आल्यासारखे वाटणे, शरीराच्या साध्या साध्या चयापचयाच्या क्रिया व्यवस्थित न चालणे, शरीरात दोषवृद्धी होणे, हाडे दुखणे, सांध्यांमध्ये ताकद न वाटणे, वर्ण खराब होणे, ज्ञानेंद्रियांची कामे नीट न होणे,चुकीच्या वेळी झोप येणे, जास्त प्रमाणात झोप येणे वगैरे त्रास दिसू लागतात.

वीर्य कमी होण्याने शरीरात ताकद कमी होते,आत्मविश्र्वास कमी होतो, सतत कसली तरी भीती वाटत राहते, कुठल्यातरी गोष्टीची आकारण काळजी वाटत राहते, डोळे सतत थकलेले व चमक नसलेले दिसतात, छातीच्या ठिकाणी अस्वस्थपणा प्रतीत होतो, अकारण श्र्वास लागतो, चक्कर येणे असेही त्रास होऊ शकतात. वीर्य व ओजक्षयाच्या कारणांचा विचार केला तर आपल्या आधुनिक आयुष्यामध्ये बरीच कारणे आपण नियमितपणे फेस करत असतो. काही कारणे मानसिक असतात. राग येणे, दुःख होणे, नकारात्मक विचार मनात येणे वगैरे. सध्याच्या काळात प्रत्येकाच्या मागे काहीतरी चिंता असते.

घर घ्यायचे असल्यास कर्ज मिळेल की नाही ही चिंता, आपल्याला चांगले गुण मिळतील की नाही अशी विद्यार्थ्याला चिंता वगैरे वगैरे. पूर्वीच्या काळी लोकांना चिंता नसे असे नव्हे, तर तेव्हा चिंतेला आयुष्याचे केंद्र बनविण्याची पद्धत नव्हती. जे काही असेल ते आपण एकत्रितपणे सामोरे जाऊ अशी भावना पूर्वीच्या काळी असायची, आता प्रत्येकाच्या आयुष्यात वैयक्तिक ताण-तणाव फार प्रमाणात वाढलेले आहे. तसेच फार प्रमाणात प्रवास करणे हा सुद्धा आज सध्याच्या काळातील नकारात्मक मुद्दा आहे. सगळ्यांकडे गाड्या असल्यामुळे लोक सध्या फार प्रवास करतात. पूर्वीच्या काळी गरज असली तरच प्रवास केला जायचा. सध्या लॉँग ड्राईव्हवर जाऊन आनंद करण्याची पद्धत रूढ होते आहे. त्यामुळे पण शरीरात वात वाढून ओज व वीर्य कमी होताना दिसते.

आहार हा तर वीर्य व ओजाकरता सगळ्यात महत्त्वाचा असतो. वीर्य व ओज यांच्या पोषणाकरता लागणारे अन्न तेही त्याच्याचसारखे लागते. हे दोन्ही तुपासारखे दिसणारे, मधासारखा गंध असणारे, गुरु, स्निग्ध असतात असे वर्णन संहितेत सापडते. सध्याच्या काळात गुरु पदार्थ असतील तर ते आपल्याला आहारातून वर्ज्य करायला सांगतात. वीर्य व ओज कमी व्हायचे दुसरे मुख्य कारण उपवास. सध्याच्या काळात वजन कमी ठेवण्याच्या दृष्टीने किंवा आरोग्यासाठी कमी खाणे, उपवास करणे स्वास्थ्यासाठी उत्तम असते अशी समजूत दृढ झालेली आहे. त्यामुळेही वीर्य व ओज कमी होताना आढळते. याचा अर्थ असा नाही की खूप खाण्याने वीर्य व ओज वाढते. पण उचित गोष्टी उचित मात्रेत खाणे खूप महत्त्वाचे असते.

आहारातून मिळणाऱ्या वीर्याचा व ताकदीचा विचार केला तर सध्याच्या काळात सगळ्या संकल्पना बदललेल्या दिसतात. भात आपल्या शरीरात सगळ्यात जास्त वीर्य तयार करण्यासाठी मदत करू शकतो, तो सध्याच्या काळात आहारबाह्य केलेला आहे, तसेच दूध, साखर, तूप वगैरे वीर्य व ओजवृद्धीकर गोष्टी खाण्यातून वर्ज्य करायला सांगितले जाते. त्याऐवजी वेगवेगळी डाएट फॅड अस्तित्वात आलेली दिसतात. उदा. वेगवेगळ्या प्रकारची सॅलड, गाईच्या दुधाच्या जागी वेगवेगळ्या धान्यांपासून बनविलेले दूध, सोयामिल्कपासून तयार केलेले दही, पनीरच्या जागी टोफू वगैरे कस नसलेले, सार नसलेल्या पदार्थांचा समाजात प्रचार केला जातो आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तरुण पिढीची आहाराच्या बाबतीत दिशाभूल केली जात आहे. घरचा चौरस आहार सोडा, पण बाहेर गेल्यावर कंफर्ट फूडच्या नावाखाली सगळ्या प्रकारचे जंक फूड खाल्ले जात आहे. वडापाव, पावभाजी, बर्गर, फ्राइज, चिप्स वगैरे यातीलच काही पदार्थ. यांच्या सेवनामुळे त्रास वाढायला लागले की आरोप त्यातील तेलावर ढकलून घरी पदार्थ बनविताना गृहिणी वाजवी प्रमाणात तेल-तूप वापरत असली तर त्यावरही निर्बंध आणले जातात.

म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. येणाऱ्या पिढाला ताकदवान ठेवायचे असेल तर त्यांच्या आहाराची काळजी आयुर्वेदिक रित्या घेतलीच पाहिजे. व त्याच बरोबरीने रसायनांची जोडही द्यायला हवी. शतावरी, अश्र्वगंधा, विदारीकंद, मनुका, आवळा सारख्या अनेक वनस्पती वापरून तयार केलेली च्यवनप्राश, धात्री रसायन, आत्मप्राश, शतानंत, शतावरी कल्पवगैरे संतुलनची उत्पादने मुलांना आवर्जून द्यावी.

सिगरेटी ओढणे, रात्री बाहेर जाऊन दारूची पार्टी करणे हे तरुण पिढीमध्ये स्टेटस सिम्बॉल झालेले आहे. बऱ्याच महाविद्यालयीन मुलांना तंबाखू, मादक पदार्थ यांच्याही सवयी लागलेल्या दिसतात. या सगळ्यांपासून मुलांना लांब ठेवणे गरजेचे आहे. हीच मुले पुढे जाऊन नोकरी, स्वतःचा व्यवसाय करतात तेव्हाही अयोग्य जीवनशैलीचा आधार घेतल्याने वीर्यनाशाकडे जातात.पर्यायाने ‘बरं वाटत नाही’ हा प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळू लागलेला आहे.

मोठ्या एमएनसीमध्ये काम करणाऱ्यांना होणाऱ्या त्रासांना एक वेगळे मस्त नाव दिलेले आहे ते म्हणजे ‘बर्न्ट आउट सिंड्रोम’. असे म्हटले जाते की लोकांना कामामुळे व ताणामुळे नैराश्य तर येतेच, पण त्यांना त्यांचे काम करायची मनापासून इच्छा होत नाही. बर्न्ट आउट सिंड्रोम हाही ओजक्षयाचे किंवा वीर्यक्षयाचे एक लक्षण आहे.

ओजक्षय कमी करण्यासाठी संपूर्ण शरीराला नियमितपणे शास्त्रोक्त सिद्ध तेलाने अभ्यंग केलेला उत्तम. तसेच मानसिक ताण कमी करण्याच्या दृष्टीने रोज रात्री पादाभ्यंगसारखे सिद्ध तूप तळपायांना लावून पादाभ्यंग करणे उत्तम. मन प्रसन्न राहण्याच्या दृष्टीने वेगवेगळे छंद जोपासावेत, थोडा वेळ स्वतःसाठी काढावा, सतत मोबाइल, टीव्ही पाहणे टाळावे, दिनचर्येत योगासनांना स्थान द्यावे, प्राणायामाकरता वेळ द्यावा, चांगले संगीत ऐकावे.

श्रीगुरु डॉ.बालाजीतांबे यांचे स्पिरीट ऑफ हार्मनी, शिव वगैरे स्वास्थ्यसंगीत ऐकण्याचा अशा प्रकारच्या त्रासांवर लगेच फरक पडतो असा अनेकांचा अनुभव आहे. चांगल्या लोकांना भेटावे, गप्पा माराव्या, चांगल्या गोष्टी ऐकाव्या, चांगले वाचन करावे. या सगळ्यांचा आपल्या शरीरात ओजवृद्धीसाठी उपयोग होऊ शकतो.

थोडक्यात काय तर आजारी नसताना आजारपण आले आहे असे वाटत असले तर नक्कीच आपल्याला आयुर्वेदशास्त्राची मदत घेणे भाग आहे. निसर्गाचे व नैसर्गिक राहणीमानाचे महत्त्व आपल्याला आयुर्वेदशास्त्राशिवाय कोणीही सांगू शकत नाही. निसर्गाच्या विरुद्ध केलेल्या वर्तनामुळे नेहमीच नुकसान होते हे लक्षात ठेवावे.

सध्या निसर्गाने दिलेला सगळ्यात मोठा फटका असा की आज अनेकांमध्ये आढळणारी व्हिटॅमिन बी १२ व डीसारख्या महत्त्वाच्या पोषक तत्त्वांची कमतरता. ही तर सुरुवात आहे. आपण असेच वागत राहिलो तर यापुढे किती गोष्टी आपल्यापर्यंत पोचविण्याची दारे निसर्ग बंद करणार आहे हे आपल्याला आज कळू शकत नाही. वेळीच जागे झालो तर ‘बरं वाटत नाही’च्या जागी मला ‘मस्त वाटते आहे’ ही पायरी आपण गाठू शकू.