काळजी यकृताची...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Liver

‘जिगर में दम हैं तो मुझ से मुकाबला करके दिखा’, असे जेव्हा नायक व्हिलनला म्हणतो किंवा नायकाची आई नायकाला म्हणते ‘तू मेरे जिगर का टुकडा है’ असे बॉलिवूडमधील चित्रपटात लहानपणी ऐकत असताना, किंवा मराठीतही ‘माझ्या काळजाचा तुकडा’ असे म्हटलेले ऐकताना वाटत असे की जिगर म्हणजे हृदय.

काळजी यकृताची...!

- डॉ. मालविका तांबे

‘जिगर में दम हैं तो मुझ से मुकाबला करके दिखा’, असे जेव्हा नायक व्हिलनला म्हणतो किंवा नायकाची आई नायकाला म्हणते ‘तू मेरे जिगर का टुकडा है’ असे बॉलिवूडमधील चित्रपटात लहानपणी ऐकत असताना, किंवा मराठीतही ‘माझ्या काळजाचा तुकडा’ असे म्हटलेले ऐकताना वाटत असे की जिगर म्हणजे हृदय. पण मोठे झाल्यावर लक्षात आले की जिगर वा काळीज म्हणजे यकृत, हृदय नव्हे. जिगर वा काळीज हा शब्द मन, हृदय, साहस या तिन्ही अर्थाने पण वापरला जातो.

आपल्या आयुष्यात असलेले यकृताचे महत्त्व जाणवून देण्याकरताच कदाचित इतक्या सगळ्या गोष्टींकरता यकृताला पर्यायवाची म्हणून वापरले असावे. यकृत हे शरीरातील बऱ्याच चयापचय क्रियांसाठी जबाबदार असते. बाळ गर्भाशयात असताना रक्तापासून यकृत तयार होते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे आणि यकृत रक्तवहस्रोतसाचे मूळही असते. आयुर्वेदानुसार यकृत हे पित्ताच्या स्थानांमधील एक स्थान आहे. रसाला रक्तामध्ये परिवर्तित करणे, आहाराचे रूपांतर शक्तीमध्ये करण्यास मदत करणे, पचन व्यवस्थित होण्यास मदत करणे वगैरेंत यकृताचे मोठे योगदान असते. आधुनिक शास्त्रानुसारही शरीरात हिमोग्लोबिन तयार होण्याकरता तसेच ग्लुकोज, कोलेस्टेरॉल, काही महत्त्वाचे प्रोटिन्स तयार करण्यात यकृत महत्त्वाचे कार्य करते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बाइल (पित्त) यकृतात होते, जेणेकरून शरीरात पचनाचे कार्य व्यवस्थित व्हायला मदत होते. शरीरातील येणाऱ्या रासायनिक विषद्रव्यांचा निचरा कार्यही यकृताचेच असते. ही सर्व महत्त्वाचा कार्ये ज्या यकृताकडून घडतात, त्या यकृताची काळजी घेणे किती आवश्यक आहे हे सहज समजू शकते. यकृताच्या कार्यात बाधा आणणाऱ्या गोष्टींबद्दल आयुर्वेदात असे मार्गदर्शन केलेले आहे,

  • फार जास्त प्रमाणात उष्ण व तिखट आहार घेणे.

  • अति प्रमाणात तळलेल्या पदार्थांचे सेवन करणे.

  • अति जड आहार घेणे.

  • चुकीच्या फॅटस् चा आहारात समावेश असणे. उदा. मार्गारिन, ट्रान्स फॅट, रिफाइण्ड तेले.

  • अति प्रमाणात अभिष्यन्दी आहार घेणे.

  • शीतपेये, रेडीमेड अन्न खाण्यामुळे सध्याच्या काळात आपल्या शरीरात वेगवेगळी रासायनिक द्रव्ये जात असतात. जसे. प्रिझर्वेटिव्हज्, कृत्रिम रंग- फ्लेवर्स-स्वीटनर्स- काही थिकनर्स, इमल्सिफायर्स. तसेच प्रक्रिया केलेल्या बऱ्याच गोष्टी आपल्या आहारातून आपल्या शरीरात जात असतात. या सगळ्यांवर कार्य करण्यासाठी यकृताला अधिक मेहनत घ्यावी लागते. याचा परिणाम म्हणूनही आज निरनिराळ्या प्रकारचे आजार होताना दिसत आहेत.

रात्री जागरण, दिवसा झोपणे, मल-मूत्र-शिंका-खोकला गॅसेस आदी १३ वेगांचे धारण करणे, अचानक मानसिक आघात होणे, मद्यपानाची अथवा अन्य चुकीच्या गोष्टींची सवय असणे, अनैसर्गिक औषधांचा फार प्रमाणात वापर करणे, कुठल्याही प्रकारच्या व्यायामाचा अभाव, ताण-तणाव- चिडचिड-अकारण राग-राग करणे वगैरे गोष्टीही यकृताच्या कार्यात बाधा आणू शकतात. या सर्वांमुळे यकृताच्या कार्यात बिघाड होण्यास सुरुवात झाल्यास पोट साफ न होणे, भूक व्यवस्थित न लागणे, फार तहान लागणे, लघवी गढूळ होणे, उलटीची भावना होणे, चेहऱ्यावरची व शरीरावरची एकंदर तेजस्विता कमी होणे, जिभेवर थर जमणे, मळमळ होणे, तोंडात कडू पाणी येणे, ढेकर येणे वगैरे सामान्य लक्षणे दिसतात. या त्रासांकडे वेळेवर लक्ष न दिल्यास नंतर संपूर्ण शरीरावर सूज येणे, शरीराचा दाह होणे, शरीर व सांधे खूप जास्त प्रमाणात दुखणे, डोळे पिवळे पडणे, अति थकवा, झोप न येणे, कावीळ होणे वगैरे त्रास होताना दिसतात. असे त्रास आज मोठ्या प्रमाणावर दिसायला लागलेले आहेत.

सध्याच्या काळात पित्ताशयात खडे होणे, सिऱ्हॉसिस, फॅटी यकृत, कावीळ अशा प्रकारचे त्रास मोठ्या प्रमाणावर दिसायला लागलेले आहेत. खूप तरुण-तरुणी फॅटी लिव्हर तसेच पचनाच्या तक्रारी घेऊन येताना दिसतात. यकृताला त्रास होतो आहे असे लक्षात आल्यावर दीपन व पाचन औषधांबरोबरच पोट साफ होण्याची औषधे सुरू करावीत, उदा. संतुलन अन्नयोग, संतुलन पित्तशांती, सॅनकूलच नियमाने घेण्यास सुरुवात करावी. अन्न ताजे, पचायला हलके तसेच यकृतावर ताण न येऊ देणारे असावे. त्यामुळे अर्थातच बाहेरचे अन्न, जंक फूड टाळलेलेच बरे. पाणी उकळून कोमट असताना घेणे उत्तम. सुवर्णसंस्कारित जल घेणे अधिक उत्तम. जेवणामध्ये सुंठीचे चूर्ण, जिरे, वेलची, हळद यांचा वापर नक्की करावा. रोजच्या न्याहारीपूर्वी गोमूत्र घेणे उत्तम. तज्ज्ञांच्या सल्ल्याने काही ओषधे गोमूत्राबरोबर घेता येतात. रोज शहाळ्याचे पाणी पिणे, भिजविलेल्या मनुका सेवन करणे सुरू करावे. ऋतूनुसार ताजा उसाचा रस हितकर ठरतो. डाळ-तांदूळ-दुधी अशा प्रकारच्या गोष्टी आहारात ठेवाव्या. रात्रीच्या आहारात जव-मूग-मसुराचे सूप घेणे उत्तम ठरते.

रोज सूर्यनमस्कार, प्राणायाम, चालणे, शक्य असल्यास योगासने करणे, पोहणे, सायकल चालवणे वगैरे सोपे पण शरीरावर उत्तम काम करणारे व्यायाम नक्की करावे. यकृत बरे नसल्यास शरीराची ताकद कमी झालेली असते त्यामुळे या काळात जिममध्ये जाणे टाळणेच बरे, कारण व्यायाम अति प्रमाणात झाल्यास धोका संभवू शकतो. न चुकता संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेलासारखे तेल पोटावर हलक्या हाताने घडाळ्याच्या दिशेने लावावे तसेच याच तेलाचे २-३ थेब बेंबीवर नक्की सोडावेत. कोरफडीचा ताजा गर थोड्या तुपावर शेकून त्यात हळद टाकून सकाळी अनशापोटी घेणे उत्तम ठरते. वैद्यांच्या सल्ल्याने आरोग्यवर्धिनी वटी, पुनर्नवासव, भूनिम्बादी काढा, अविपत्तिकर चूर्ण वगैरेंची योजना करता येते. वर सांगितल्याप्रमाणे यकृतावर सगळ्या विषद्रव्यांचा निचरा करण्याची जबाबदारी असते. त्याच्या कामाला हातभार लावण्यासाठी संतुलन पंचकर्म करून शरीरशुद्धी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. यातील विरेचन, बस्ती हे उपचार फार उत्तम. या सगळ्यांचा विचार करता असा त्रास सुरूच होऊ नये या हेतूने आपल्याला आयुर्वेदाच्या मदतीने दिनचर्येमध्ये बदल करून घेता येतील.

Web Title: Dr Malvika Tambe Writes Liver Care Health

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..