प्रार्थना आणि आरोग्य !

प्रार्थना आणि आरोग्य. थोडा वेगळाच विषय नाही का? प्रार्थना म्हटली की दिसतो देव्हारा आणि आरोग्य म्हटले की दिसतो दवाखाना.
Prayer
PrayerSakal
Summary

प्रार्थना आणि आरोग्य. थोडा वेगळाच विषय नाही का? प्रार्थना म्हटली की दिसतो देव्हारा आणि आरोग्य म्हटले की दिसतो दवाखाना.

- डॉ. मालविका तांबे

प्रार्थनेने मानसिक ताण कमी होतो, विचारांमधील सकारात्मकता वाढते, नैराश्याची भावना कमी होते, उच्च रक्तदाब कमी होतो, नसा मोकळ्या होतात, आजारपण असल्यास त्यात सुधारणा होताना दिसते, हृदयाची ताकद वाढते, व्याधिक्षमत्व वाढते असे संशोधनातून सिद्ध झालेले आहे. प्रार्थना केली की परिस्थितीकडे किंवा आपल्या त्रासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.

प्रार्थना आणि आरोग्य. थोडा वेगळाच विषय नाही का? प्रार्थना म्हटली की दिसतो देव्हारा आणि आरोग्य म्हटले की दिसतो दवाखाना. दोघांचा काय संबंध? आरोग्याच्या परिभाषेत शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक व आध्यात्मिक आरोग्यालाही स्थान दिलेले आहे. रोगाच्या कारणांचा विचार करताना आयुर्वेदात ‘मनोव्यथा’ हे अनारोग्याचे मुख्य कारण सांगितलेले आहे. असे नसते तर योग्य आहार, औषध घेणारा व दिनचर्येचे पालन करणारे कधी कोणी आजारीच पडले नसते. प्रत्यक्षातही आपण बघतो की दीर्घ आजाराचा त्रास असलेले रोगी मनःशांती मिळेल अशा ठिकाणी गेले असता त्यांचा आजार बऱ्यापैकी कमी होतो. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असताना इच्छाशक्ती (will power) चांगली असणारी व्यक्ती लवकर सुधारते असेही अनेकदा पाहायला मिळते. म्हणजे मनाची शक्ती शरीराच्या शक्तीपेक्षा अधिक प्रभावी व ताकदवान ठरू शकते असा आपल्याला अनुभव येतो.

मनाची सत्ता पूर्ण शरीरावर असते, मन शरीरातील प्रत्येक पेशीवर कार्य करू शकते. मन नुसते मेंदूत किंवा हृदयात असते असे नाही, तर ते पूर्ण शरीरात व्याप्त असते. मन आरोग्यवान असले की शरीराचे आरोग्य टिकून राहायलाही मदत मिळते. मनाला भौतिक अस्तित्व नसल्यामुळे मनावर कसे काम करायचे हा मोठा प्रश्र्न. याबद्दल आयुर्वेदात वेगवेगळ्या अनेक पैलूंचा विचार केलेला दिसतो. त्यामुळेच कार्ला येथे पंचकर्मादरम्यान ध्यान, प्रार्थना, योग, स्वास्थ्यसंगीत ऐकणे, निवांत वेळ ठेवणे, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे याही गोष्टींना वेळ देण्याला महत्त्व दिलेले आहे. मनावर काम करण्यासाठी प्रार्थना करणे हा सर्वांत सोपा उपाय आहे असे श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे म्हणत. परंतु बरेचदा प्रार्थना करणे शेवटचा उपाय समजला जातो. बॉलिवूडचा ताठ मानेचा हीरो मंदिरात जाऊन सांगतो, ‘आज तक मेरा सिर कभी नहीं झुका है, आज पहली बार झुक रहा है तेरे सामने भगवान। मेरी मरती हुयी माँ को बचा ले।’ रुग्णाची अवस्था हाताबाहेर गेल्यावर, आता औषधांपेक्षा प्रार्थनेची जास्त मदत होईल असे डॉक्टरही म्हणतात, असे आपण पाहतो. खरे पाहता प्रार्थना नित्यनियमाने केली पाहिजे, ती शेवटच्या क्षणी करण्याचा उपयोग नाही.

प्रार्थना म्हणजे दुसरे तिसरे काही नसून स्वतःच्या मनाला सकारात्मक विचार देण्याचा मार्ग असतो. प्रार्थनेने मानसिक ताण कमी होतो, विचारांमधील सकारात्मकता वाढते, नैराश्याची भावना कमी होते, उच्च रक्तदाब कमी होतो, नसा मोकळ्या होतात, आजारपण असल्यास त्यात सुधारणा होताना दिसते, हृदयाची ताकद वाढते, व्याधिक्षमत्व वाढते असे संशोधनातून सिद्ध झालेले आहे. प्रार्थना केली की परिस्थितीकडे किंवा आपल्या त्रासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. मनावर काम करण्याकरता ‘शब्द’ खूप उपयोगी ठरतात. शब्द हे तलवारीसारखे कापू शकतात, तसेच ते मलमासारखे कामही करू शकतात. त्यामुळे चांगल्या शब्द बोलणे, चांगले विचार ठेवणे हेही प्रार्थनेसारखे काम करते. तसेच प्रार्थनेमध्ये मंत्र, स्तोत्र यांचाही उपयोग करता येतो.

प्रार्थना करण्याकरता फार मोठी तयारी, विशिष्ठ जागा वगैरे लागत नाही. आत्मसंतुलन, कार्ला येथे सकाळी योगासनांच्या सत्राची, पंचकर्मात केल्या जाणाऱ्या स्नेहन, विरेचन आदी उपचारांची सुरुवात मंगलाचरण, ॐकार प्रार्थना वगैरेंपासून होते. आत्मसंतुलनमध्ये रोज ‘ॐ सह ना ववतु’ ही प्रार्थना केल्यावरच जेवण सुरू केले जाते. असे केल्यामुळे जेवणाची एक प्रकारचे समाधान व तृप्ती लाभते असा आजवरचा अनेकांचा अनुभव आहे. संतुलन फार्मसीत औषधप्रकियांच्या सुरू करण्याआधी अगत्याने प्रार्थना केली जाते. आत्मसंतुलन येथे श्री गुरुजींनी ‘यॉफ - शांति मैत्री संयोग (YOPF – Yoga for Peace and Friendship)’ ही संकल्पना गेली ४० वर्षे राबवली आहे. यात जगभरातील अनेक सदस्य व्यक्तिगत स्तरावर एकत्रित येऊन विश्र्वातील सर्वांना सुख, आरोग्य, समृद्धी, समाधान, शांती व मैत्री यांचा लाभ व्हावा यासाठी प्रार्थना करतात. याचे खूप चांगले परिणाम पाहण्यात आलेले आहेत. एकदा संतुलनच्या क्लिनिकमध्ये एका लहान मुलगा आला होता. त्याच्या संपूर्ण अंगावर सूज होती, किडनी फेल्युअरची लक्षणे दिसत होती.

चिप्स व स्नॅक्सशिवाय तो काहीही खायला तयार नसतो, घरचे साधे जेवण त्याला अजिबात आवडत नाही, खूप समजावले पण तो ऐकत नाही, असे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले. मी त्याला म्हटले, ‘काही हरकत नाही, रोज संध्याकाळी तुझ्या आवडत्या बाप्पासमोर प्रार्थना कर की घरचे साधे पण पौष्टिक जेवण तुला आवडू लागू दे.’ त्याने ही प्रार्थना २-३ महिने केली. आश्र्चर्य म्हणजे त्याने स्वतःहून घरचे जेवण जेवायला सुरुवात केली. त्याचा अपथ्यकर आहार आपोआप सुटला. प्रार्थनेद्वारा आपल्या मन व मेंदूकडे संदेश पोहोचवता येतात, याचे यापेक्षा मोठे उदाहरण कोणते असू शकेल? सध्याच्या काळात काउंसिलिंगला खूप महत्त्व आलेले आहे. प्रार्थना करणे हे स्वतः स्वतःला केलेले काउंसिलिंग होय, असे मला वाटते. आपल्या शब्दांची, विचारांची, भावनांची ताकद मोठी आहे, त्याचा परिणाम जीवनातील अनेक गोष्टींवर होऊ शकतो, गरज आहे ती याची जाणीव ठेवण्याची. या विषयावर आजवर बरेच संशोधन झालेले आहे, व पुढेही होईल. जीवन सुखी ठेवण्याकरता प्रार्थनेसारखा सोपा मार्ग प्रत्येकाने दररोज ५-१० मिनिटे अनुसरावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com