पावसाळ्यात केसांची निगा

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून देश आणि महाराष्ट्रातील निर्बंध शिथिल होत आहेत. लवकरच आपण पुन्हा बाहेर पडू शकणार आहोत आणि नेमके याच काळात पावसाचेही आगमन होत आहे.
Hair care
Hair careSakal

पावसात भिजून आल्यानंतर अनेकदा केस न धुता सुकवले जातात. असे कधीही करू नये. पावसात भिजून आल्यानंतर केसांवरून अंघोळ करूनच ते सुकवा. म्हणजे केसातून कुबट वास येणार नाही आणि त्यांची नीट निगाही राखली जाईल.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून देश आणि महाराष्ट्रातील निर्बंध शिथिल होत आहेत. लवकरच आपण पुन्हा बाहेर पडू शकणार आहोत आणि नेमके याच काळात पावसाचेही आगमन होत आहे. आपल्यापैकी अनेकांना पावसाचा आनंद घ्यायला आणि भिजायला आवडतं, कधी कळत तर कधी नकळत आपण पावसात भिजतो. पावसामुळे आपल्याला कधी सर्दी, कधी ताप तर कधी खोकला होतो. याच पावसाचा आपल्या केसांवरही तितकाच परिणाम होतो, हे आपल्याला माहीत नसते. पावसात केस भिजल्याने कोंडा होणे, डोक्याच्या त्वचेला फंगल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होणे, केसांमध्ये गुंता होणे, केस गळणे, आदी अनेक समस्या होऊ शकतात. त्या न होण्यासाठी आपण पुढीलप्रमाणे काळजी घेऊ शकतो.

  • केस कोरडे राहतील याची खबरदारी घेणे : सुरवातीला पडणाऱ्या पावसात वातावरणातील प्रदूषण, हवेतील काही अशुद्ध घटक पाण्यासोबत मिसळून खाली येतात आणि म्हणून सुरवातीच्या काही पावसाचे पाणी केसांसाठी ॲसिडिक आणि खराब असते. त्याचा केसांवर दुष्परिणाम होतो, त्यामुळे शक्यतो केस पावसाच्या पाण्यापासून कोरडे राहतील याची काळजी घ्यावी. पावसात तुमचे केस चांगले व कोरडे ठेवण्यासाठी छत्रीचा जास्तीत जास्त वापर करा. केस पूर्ण झाकले जातील अशा प्रकारचे रेनकोट किंवा पावसाळी टोपी वापरा.

  • आठवड्यातून दोन वेळा शाम्पूचा वापर : पावसात भिजून आल्यानंतर केसातील खराब पाणी काढून टाकण्यासाठी शाम्पूचा वापर करा. पावसाळ्यात वातावरणातील ओलावा आणि आर्द्रतेमुळे केस तेलकट आणि चिकट होतात. त्यामुळे सर्वांत जास्त केसगळतीची समस्या उभी राहाते. पावसाच्या पाण्याने केसात होणारा कोंडा शाम्पूचा वापर केल्याने निघून जाऊ शकतो. पावसाळा असो वा नसो कधीही स्ट्रॉंग शाम्पूचा वापर करू नये. कारण त्यामुळे केस खराब होतात.

  • केस मोकळे ठेवावेत : पावसाळ्यात केस बांधून ठेवणे योग्य नाही. पावसाचे पाणी केसात साठून तुम्हाला कोंड्याचा आणि उवांचा त्रास होण्याची शक्यता असते. तसेच केसांना मोकळा श्वास घेता येत नाही. तुम्हाला केस बांधायचे असल्यास हलक्या पद्धतीने बांधा.

  • योग्य कंगव्याचा वापर करा : पावसाळ्याच्या दिवसात केस नेहमी भिजत राहतात आणि त्यामुळे केसांमध्ये गुंता होतो. तो सोडवताना केस तुटतात आणि गळतात. अशा वेळी भिजलेले केस विंचरण्यासाठी मोठ्या दातांचा योग्य कंगवा वापरावा. निदान पावसाच्या दिवसात तरी अशा कंगव्याचा वापर करावा. त्यामुळे तुम्ही केसांची योग्यरीत्या काळजी घेऊ शकता.

  • योग्य आहार : कोणताही हंगाम असला तरीही केसांच्या काळजीसाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. प्रोटीन, लोह आणि ओमेगा असणारे पदार्थ तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करून घ्या. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते. केसगळतीचे प्रमाण कमी होते आणि या पदार्थांमधून मिळणाऱ्या प्रथिनांमुळे तुमच्या केसांमध्ये चमकही येते. फास्ट फूड खाणे टाळा.

  • पावसाळ्यात द्या केसांना नवा कट : पावसाळ्यात केसांची काळजी घेणे त्रासदायक वाटते त्यांच्यासाठी सोपी टीप म्हणजे सलून/पार्लरमध्ये जाऊन नवा हेअरकट करून येणे. पावसाळ्यात केस लहान केले की तुम्हाला त्याची निगा राखणं सोपे जाते. त्यामुळे पावसाळ्यात केस कापणे हा सोपा उपाय आहे.

  • नैसर्गिक गोष्टींचा वापर केसांसाठी करा : तुमच्या स्वयंपाकघरामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्याचा तुमच्या केसांची काळजी करण्यासाठी उपयोग करता येतो. तुम्ही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या वस्तूंचाही वापर करून बघावा. घरातील अशा वस्तूंमध्ये रसायनही नसतं. उदाहरणार्थ तुम्ही कंडिशनर म्हणून आवळा, रिठा अथवा शिकेकाई यांचा वापर करू शकता. तसेच पिकलेली केळी, मध, दही, लिंबू, कोरफड अशा रोजच्या वापरातल्या आणि सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करून विविध हेअर मास्क बनवून केसांची काळजी घेऊ शकता.

  • गरम तेलाचा मसाज : पावसाळ्यात किंवा थंडीत अधून मधून केसांना गरम तेलाचा मसाज करणे योग्य आहे. आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून एकदाच असा मसाज करावा. केसांना वारंवार गरम तेल लावणे योग्य नाही. त्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. केसांच्या बाबतीत नेहमी काळजी घ्यावी लागते. अन्यथा केस लवकर खराब होतात.

पावसात भिजून आल्यानंतर केस न धुता तसेच सुकवले जातात. असे कधीही करू नये. पावसातून भिजून आल्यानंतर केसांवरून अंघोळ करूनच केस सुकवा. म्हणजे केसातून कुबट वास येणार नाही आणि केसांची नीट निगाही राखली जाईल. गरम पाण्यात कडुलिंबाची थोडी पाने घालून ते उकळून, कोमट करून त्या पाण्याने केस धुतल्यास पावसाळ्यात केसांमध्ये होणाऱ्या फंगल, बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासून नैसर्गिक संरक्षण मिळेल. तसेच केसातील कोंडा व खाज कमी होण्यास मदत होईल.

पावसाळ्यातील केसांच्या समस्यांवर होमिओपॅथीत उत्तम औषधे उपलब्ध आहेत ती पुढील प्रमाणे :

१. ह्रस टॉक्स : डोक्यामध्ये आद्रतेमुळे होणारे त्वचेचे विकार, खाज, पावसात भिजल्यावर होणारे दुष्परिणाम.

२. विन्का माइनर : केसांमध्ये गुंता होणे, डोक्याला खाज येणे, कोंडा होणे.

३. डल्कामारा : पावसाळ्यातील थंड वारा किंवा आद्रतेमुळे, होणारे आजार, डोक्यामध्ये होणारे फंगल इन्फेक्शन, कोंडा.

४. थुजा : कोरडे, रुक्ष केस, केस गळणे, केस पातळ होणे.

५. फोस्फोरस : पुंजक्यामध्ये केस गळणे, केस कोरडे होणे, केस लवकर पांढरे होणे.

अशी अजून अनेक होमिओपॅथिक औषधे आहेत. ती केसांच्या समस्येसाठी त्याच्या गुण विशेषावरून आणि लक्षण-साधर्म्यावरून दिली जातात. आपण काही समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने अशी औषधे ही घेऊ शकता.

केस हा आपल्या सर्वांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे. त्याची जास्तीतजास्त योग्य रीतीने काळजी घेतल्यास औषधांची फारशी गरजही आपल्याला भासणार नाही. येणाऱ्या पावसाळ्यात केसांकडे विशेष लक्ष देऊन काळजी घेतल्यास केसांच्या फारशा समस्या निर्माण होणार नाहीत.

- डॉ. हृषिकेश कि. भुजबळ, कन्सल्टींग होमिओपॅथ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com