चला करूया थोडा मनाचाही विचार...!!

आपण आजारी पडलो की अनेकदा रोगाचे निदान करण्यासाठी अनेक शारीरिक चाचण्या करतो, पण एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे आपल्या मनाची, विचारांची चाचणी करणे.
चला करूया थोडा मनाचाही विचार...!!
Summary

आपण आजारी पडलो की अनेकदा रोगाचे निदान करण्यासाठी अनेक शारीरिक चाचण्या करतो, पण एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे आपल्या मनाची, विचारांची चाचणी करणे.

डॉ. श्रेया वैद्य (B.H.M.S., M.A. PSY), होमिओपॅथ आणि मानसोपचारतज्ज्ञ (पुणे)

‘आरोग्यम् धनसंपदा’ हे वाक्य आपण अनेकदा वाचतो, ऐकतो. आरोग्य हीच खरी संपत्ती असा ह्या वाक्याचा अर्थ. परंतु आरोग्य लाभणे आणि ते टिकवणे म्हणजे फक्त शरीर निरोगी ठेवणे का? आपले जीवन हे शरीर, मन आणि आत्मा ह्या तीन सूत्रांनी बनले आहे. निरोगी राहणे म्हणजे शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य चांगले असणे. कोणत्याही रोगाचे मूळ हे मुख्यतः आपल्या आचार, विचार, आहार, विहार ह्यातील बिघाड आणि असंतुलन ह्यामध्ये असते. ह्यातील आचार आणि विचार हे मुख्यत्वे शरीर, मन आणि आत्मा ह्या त्रिसूत्रांपैकी मन ह्या सूत्राशी निगडित आहे.

आपण आजारी पडलो की अनेकदा रोगाचे निदान करण्यासाठी अनेक शारीरिक चाचण्या करतो, पण एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे आपल्या मनाची, विचारांची चाचणी करणे. मनाची, विचारांची चाचणी करणे म्हणजे काय? ही चाचणी करायला कोणत्याही लॅबमध्ये जायची गरज नाही. जेव्हा तुम्ही मनाचे निरीक्षण करायला सुरुवात करता तेव्हाच ह्या चाचणीची सुरुवात होते. क्रोध, चिंता, भय, दु:ख, निराशा, तणाव अशा कोणत्या भावना मनामध्ये घर करून बसल्या आहेत, अव्यक्त स्वरूपात मनात आहेत ह्याचा शोध घेणे गरजेचे असते. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे आपले आपल्या मनाकडे, विचारांकडे होणारे दुर्लक्ष. भावनांची उत्पत्ती ही कायम विचारांमधून होत असते. पण बहुतांशी आपले लक्ष हे भावनेकडे आणि घडणाऱ्या घटनेकडे केंद्रीत असते. खरे तर जर मानसिक स्वास्थ्य चांगले नसेल तर काही काळाने त्याचा परिणाम शरीरावरसुद्धा दिसायला सुरुवात होते. शरीरावर आपण उपचार घेतो पण असा मनातून उद्भवलेला आजार पूर्णपणे बरा होण्यासाठी मनावर उपचार करणे पण गरजेचे असते. मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड, लठ्ठपणा, हृदयविकार, कर्करोग, व्यसनाधीनता ह्यासारख्या रोगांचे भारतातील प्रमाण गेल्या दहा वर्षांमध्ये खूप वेगाने वाढत आहे. हे आजार होण्यामागील कारणांमध्ये एक मुख्य कारण म्हणजे वाढता ताण-तणाव. मनुष्याच्या भोवती असणाऱ्या पसाऱ्यामधून आलेल्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये, महत्त्वाकांक्षा, सगळ्यांपेक्षा पुढे जाण्याची जिद्द आणि सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे झाल्या पाहिजेत ही भावना सध्या आपण अनेकदा अनुभवत असतो.

गेली दोन वर्षे सर्वजण एका संकटाचा सामना करत आहोत. कोविड १९ मुळे आपल्या रोजच्या जीवनात अनेक बदल झाले आहेत. ह्या छोट्या - मोठ्या बदलांमुळे प्रत्येक जण कमी-जास्त प्रमाणात ताण-तणावास सामोरे जात आहे. अनेक शोधांमधून हे समोर आले आहे की कोविड १९ नंतर अनेकजणांचे चिंतेचे, ताणाचे प्रमाण वाढले आहे. हा ताण कसा ओळखायचा आणि ताण कमी करण्यासाठी काय करू शकतो हे आपण जाणून घेऊयात. ताण जेव्हा सहन होत नाही तेव्हा रोज सतत छोट्या छोट्या कारणांवरून चिडचिड होणे, सतत थकवा येणे, रोजच्या कामा मधील रस कमी होणे, मूडस्विंग होणे, निराश वाटणे, असमाधानी वाटणे अशा अनेक गोष्टी अनुभवणे सुरू होते. तणावाचे अजून एक कारण म्हणजे वाटणारी चिंता. काही छोटे बदल आपण विचारांमध्ये आणि आचरणात केले जसे आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, आपल्या कार्यकौशल्यावर काम करणे आणि भविष्यकाळात जगण्या ऐवजी आजच्या दिवसाचा प्रत्येक क्षण जगणे असे केले तर, आपण मोठ्या प्रमाणात चिंतेवर मात करण्यात यशस्वी होऊ शकतो आणि पर्यायाने ताण देखील कमी होतो. हल्लीच्या काळात ‘स्ट्रेस’ हा शब्द आपण सर्वच जण अगदी सहजपणे आणि अनेकदा वापरतो. रोजच्या जीवनात असे अनेक घटक आहेत ज्यामुळे आपण स्ट्रेस अनुभवतो. वेगवेगळ्या घटनांमधून आपण अनेक सकारात्मक आणि नकारात्मक भावना अनुभव असतो.

अनेकदा घडणाऱ्या घटना आपण बदलू शकत नाही, थांबवू ही शकत नाही पण आपण आपले विचार नक्कीच बदलू शकतो. विचारांना योग्य दिशा मिळाली तर हा स्ट्रेस नक्कीच कमी होऊ शकतो. ह्या बरोबरच स्ट्रेस कमी करण्यासाठी, मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी अजून एक पर्याय म्हणजे त्या स्ट्रेसच्या मागचा स्त्रोत शोधणे. मला स्ट्रेस जाणवतोय हे बऱ्याचदा आपण ओळखतो पण तो नक्की काय काय घटकांमधून निर्माण झाला आहे हे शोधणे गरजेचे असत. हे शोधण्याची पहिली पायरी म्हणजे आत्मनिरीक्षण करणे. स्वतःच्या विचारांकडे, वागणुकीकडे लक्ष देणे, कोणती अशी गोष्ट झाली की मला तास होतो हे शोधणे, स्वतःच्या आवडी-निवडी जाणून घेणे, कोणत्या परिस्थितीमध्ये, लोकांमध्ये आपण कम्फर्टेबल असतो अशा अनेक गोष्टींचा शोध घेणे. ह्यामुळे आपण स्वतःमध्ये गरजेप्रमाणे बदल घडवून आणू शकतो. आणि अर्थातच ताण - तणावाचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतो. आजच्या धावत्या युगात आपण सर्वांबरोबरीने पुढे जावे अशी प्रत्येकाची इच्छा असते.

पण ह्या सगळ्यात आपला खरा आनंद कशात आहे हे शोधायला आणि त्या गोष्टी करायला आपण विसरून जातो व त्यामुळे अनेक भौतिक सुखाचे टप्पे पार केले असले तरी आपण असमाधानी होतो. मग मानसिकरीत्या थकवा जाणवणे, निराशा वाटणे, व्यसनाधीनता वाढणे, लहान वयात उच्च रक्तदाब यांसारख्या आजाराला सामोरे जाणे, अशी बरीच आवाहन आपल्या समोर उभी ठाकतात. म्हणूनच रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आठवड्यातून एकदा ब्रेक घेऊन स्वतःला रिचार्ज करणे गरजेचे आहे. भौतिक सुखाच्या पलीकडे जाऊन आपला आनंद कशात आहे हे शोधणे व ते आवर्जून करणे गरजेचे आहे. रोज नियमित व्यायाम करणे, आहार योग्य ठेवणे गरजेचे आहे.

जसे सर्दी खोकला झाल्यास आपण डॉक्टरांकडे जातो तसेच मानसिक आरोग्याच्या तक्रारी भेडसावतील तेव्हा वेळोवेळी, त्याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांकडून उपचार करून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. शरीराबरोबरच मनाची काळजी घ्या आणि सुदृढ राहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com