#FamilyDoctor अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)

डॉ. श्री बालाजी तांबे
Sunday, 14 October 2018

मन आनंदी अवस्थेत असेल तर ते तृप्त म्हणजे समाधानी होऊ शकते. मन शोकग्रस्त असले तर शरीराचे पोषण होऊ शकत नाही, शरीर निरोगी अवस्थेत राहू शकत नाही. शरीरपोषण व समाधानी मन यांच्या संयोगातून शांत झोप लागणे शक्‍य होते.

चरकसंहितेतील अग्र्यसंग्रहात थकवा घालविण्यामध्ये स्नान हे सर्वश्रेष्ठ कसे हे आपण पाहिले. आता या पुढचा विषय बघू.

मन आनंदी अवस्थेत असेल तर ते तृप्त म्हणजे समाधानी होऊ शकते. मन शोकग्रस्त असले तर शरीराचे पोषण होऊ शकत नाही, शरीर निरोगी अवस्थेत राहू शकत नाही. शरीरपोषण व समाधानी मन यांच्या संयोगातून शांत झोप लागणे शक्‍य होते.

चरकसंहितेतील अग्र्यसंग्रहात थकवा घालविण्यामध्ये स्नान हे सर्वश्रेष्ठ कसे हे आपण पाहिले. आता या पुढचा विषय बघू.

हर्षः प्रीणनानाम्‌ - तृप्ती करणाऱ्या साधनांमध्ये हर्ष हा श्रेष्ठ होय. 
तृप्ती म्हणजेच समाधान, सुख आणि हर्ष म्हणजे आनंद. मन जर आनंदी अवस्थेत असेल तर ते तृप्त म्हणजे समाधानी होऊ शकते. मन आनंदी असले तर शरीरही सु-अवस्थेत राहते, म्हणजेच निरोगी राहते. 

शोकः शोषणानाम्‌ - शरीरशोषाला कारणीभूत मुख्य कारण म्हणजे शोक होय. 

कितीही चांगले खाल्ले-प्यायले, शरीराची काळजी घेतली तरी जर मन शोकग्रस्त असले तर शरीराचे पोषण होऊ शकत नाही, शरीर निरोगी अवस्थेत राहू शकत नाही. 

या दोन्ही सूत्रांवरून शरीरावर मनाचा असणारा प्रभाव स्पष्ट होतो. म्हणून शरीराची जेवढी काळजी घ्यायची, त्याहीपेक्षा अधिक काळजी मनाची घ्यायला हवी. याचा अर्थ मनाला हवे तसे वागणे असा होत नाही, चांगले काय, वाईट काय याची समज मनाला असणे, अक्षयच सुख ज्यात आहे, सर्वांच्या कल्याणाची भावना ज्यात आहे अशा गोष्टींमध्ये मनाला रमवणे असा होतो. 

निवृत्तिः पुष्टिकराणाम्‌ - सुख हे पुष्टीचे कारण असते. 
‘हसा आणि लठ्ठ व्हा’ ही उक्‍ती प्रसिद्ध आहेच. मात्र या ठिकाणी पुष्टी म्हणजे लठ्ठपणा असा अर्थ अपेक्षित नाही, तर शरीराचे व्यवस्थित पोषण या अर्थाने पुष्टी हा शब्द वापरला आहे. सुख असले की ते शरीराच्या पोषणाचे एक मुख्य कारण असते असे या ठिकाणी सांगितले आहे. 

पुष्टिः स्वप्नकराणाम्‌ - झोप आणणाऱ्या कारणांमध्ये पुष्टी म्हणजे शरीराचे व्यवस्थित पोषण हे मुख्य कारण असते. 

सहसा झोप न येणे हे मनाशी जोडले जाते, मात्र या सूत्रातून स्पष्ट होते की ते शरीराच्या पोषणाशीही तेवढेच जोडलेले आहे. शरीर अस्वस्थ असले, अशक्‍त असले तरी त्यामुळे झोपेमध्ये अडथळा उत्पन्न होऊ शकतो. शांत झोप लागण्यासाठी आयुर्वेदात पुढील उपचार सुचविलेले आहेत.

अभ्यंगो मूर्ध्नि तैलनिषेवणं गात्रस्योद्वर्तनं संवाहनानि शालिगोधूमादिनिर्मितं स्निग्धं मधुरं भोजने बिलेशयानां विष्किराणां मांसरसा द्राक्षादिफलोपयोगो मनोज्ञशयनासनयानानि च ।...सुश्रुत शारीरस्थान

अभ्यंग - अंगाला वातशामक व शरीराचा थकवा दूर करू शकणाऱ्या द्रव्यांनी संस्कारित तेलाचा अभ्यंग करण्याने शांत झोप यायला मदत मिळते. रात्री झोपण्यापूर्वी असा अभ्यंग केल्यास अधिक चांगले. यातच ‘पादाभ्यंग’ही अंतर्भूत आहे. पादाभ्यंग घृत पायाच्या तळव्यांना लावून काशाच्या वाटीने तळपाय घासल्यास डोके शांत होऊन झोप लागायला मदत मिळते. 

मूर्ध्नि तैलनिषेवणम्‌ - डोक्‍याला तेल लावल्याने, विशेषतः टाळूवर ब्राह्मी, जास्वंद वगैरे शीतल व शामक द्रव्यांनी संस्कारित केलेले खोबरेल तेल भरपूर प्रमाणात लावल्याने/थापल्याने व संपूर्ण डोक्‍याला हेच तेल लावल्याने डोके शांत होते व शांत झोप यायला मदत मिळते. कानात तेल टाकण्याचा तसेच नाकात पातळ केलेल्या साजूक तुपाचे थेंब टाकण्याचाही फायदा होतो.

गात्रस्योद्वर्तनं संवाहनम्‌ - अंघोळीच्या अगोदर अंगाला उटणे लावण्याने व अंग तेल लावून चोळून घेतल्यानेही रात्री झोप यायला मदत मिळते.

शालिगोधूमादिनिर्मितं भोजनम्‌ - गहू, तांदूळ यापासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश जेवणामध्ये केल्याने, नियमित दूध घेतल्याने, उचित प्रमाणात साखर खाल्ल्याने, दूध, साखर घालून तयार केलेली खीर, शिरा, हलव्यासारखे पदार्थ अधूनमधून खाल्ल्याने प्राकृत कफ संतुलित राहून शांत झोप यायला मदत मिळते.

स्निग्धं मधुरं भोजनम्‌ - दोन्ही वेळच्या जेवणात पुरेशा प्रमाणात स्निग्ध व मधुर रसाचा समावेश असावा. याने प्राकृत कफदोष संतुलित स्थितीत राहतो व त्यामुळे शांत झोप यायला मदत मिळते. उलट गोड चव टाळली आणि कोरडे अन्न खाल्ले तर वात-पित्तदोष अतिप्रमाणात वाढून झोप कमी होते. याच कारणामुळे बहुतेक सगळ्या मधुमेहाच्या रोग्यांना शांत झोप येत नाही. थोड्या प्रमाणात साखर खायला सुरुवात केली, दूध-तुपासारखे आरोग्यदायी स्निग्ध पदार्थ पुरेसे घेतले की त्यांनाही शांत झोप येऊ शकते.

सरस - मांसाहार करणाऱ्या व्यक्‍तींनी फक्‍त सूप बनवून घेण्याचाही झोप यायला उपयोग होतो. 

द्राक्षादिफल - द्राक्षे, बदाम, जर्दाळू यांसारख्या फळांचे सेवन करण्यानेही वात-पित्तदोषांचे शमन होऊन शांत झोप यायला मदत मिळते. 

नि - मनाला आवडेल, प्रिय वाटेल असे अंथरूण, पांघरूण वापरल्याने व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मन आनंदी, समाधानी ठेवण्याने शांत झोप यायला मदत मिळते.

अशा प्रकारे शरीरपोषण व समाधानी मन यांच्या संयोगातून शांत झोप लागणे शक्‍य होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr shri balaji tambe article