esakal | पर्यावरणाचे रक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणाचे रक्षण

सध्या संपूर्ण विश्‍वाचे पर्यावरण विनाशाच्या काठावर येऊन उभे आहे. विश्‍वाला वाचवायचे असेल तर मनुष्याला स्वतःला बदलण्याची आवश्‍यकता आहे. आयुर्वेद तर म्हणतो की दुराचार, व्यभिचार, भ्रष्टाचार यामुळे माणसे माणसाला ओळखत नाहीत, प्रेमाचा अभाव दिसून येतो, त्या वेळी याला प्रतिसाद म्हणून पर्यावरणसुद्धा बिघडते.

पर्यावरणाचे रक्षण

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com

सध्या संपूर्ण विश्‍वाचे पर्यावरण विनाशाच्या काठावर येऊन उभे आहे. विश्‍वाला वाचवायचे असेल तर मनुष्याला स्वतःला बदलण्याची आवश्‍यकता आहे. आयुर्वेद तर म्हणतो की दुराचार, व्यभिचार, भ्रष्टाचार यामुळे माणसे माणसाला ओळखत नाहीत, प्रेमाचा अभाव दिसून येतो, त्या वेळी याला प्रतिसाद म्हणून पर्यावरणसुद्धा बिघडते.

पर्यावरणाच्या बाबतीत समाजात थोडी तरी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी वर्तमानपत्रात रोज एखादी छोटी बातमी, तसेच टीव्हीवर एखादा पाच मिनिटांचा का होईना छोटा कार्यक्रम ठेवावा, अशी वेळ आलेली आहे. स्वीडनच्या ग्रेटा थुनबर्ग या सोळा वर्षाच्या मुलीने ठिकठिकाणी जाऊन पर्यावरणाबद्दल व्याख्यानांद्वारे माहिती देऊन क्रांती केली. अगदी इंग्लंडच्या ‘हाउस ऑफ पार्लमेंट’मध्ये जाऊनही तिने भाषण दिले. ‘तुम्हाला कळतंय का मी काय बोलतेय ते’, ‘माझा मायक्रोफोन चालू आहे का’, असे ती विचारत असे. प्रथम लोकांना गंमत वाटली, परंतु जनपदोध्वंस (क्‍लायमेट कॅटोस्ट्रोफी) म्हणजे पर्यावरणाचा संपूर्ण नाश यावर ती बोलणार आहे, जनजागृती करणार आहे हे जेव्हा लोकांना कळले तेव्हा लोकांची झोप उडाली. 

‘फॅमिली डॉक्‍टर’ ही पुरवणी सुरू झाल्यापासून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयुर्वेदाची पर्यावरणासंबंधी संकल्पना काय आहे व आपण यासाठी काय करू शकतो यासाठी अनेक अंकांमध्ये लेख लिहिले. एक गोष्ट नक्की की, पर्यावरणाचा तोल सांभाळणे हे काम नुसत्या गाड्या कमी वापरून किंवा एलईडी बल्ब वापरून होण्यासारखे नाही. सध्या संपूर्ण विश्‍वाचे पर्यावरण विनाशाच्या काठावर येऊन उभे आहे. विश्‍वाला वाचवायचे असेल तर मनुष्याला स्वतःला बदलण्याची आवश्‍यकता आहे. आयुर्वेद तर म्हणतो की दुराचार, व्यभिचार, भ्रष्टाचार यामुळे माणसे माणसाला ओळखत नाहीत, प्रेमाचा अभाव दिसून येतो, त्या वेळी याला प्रतिसाद म्हणून पर्यावरणसुद्धा बिघडते. शेवटी विचारांच्या तरंगांचे महत्त्व सगळ्यांना कळलेले आहे. आपल्या वागण्याचा किंवा विचारांचा परिणाम वातावरणावर होत असतो हे ‘क्वांटम सायन्स’ या शाखेचा उदय झाल्यापासून लक्षात यायला लागलेले आहे. तसेच वातावरणात असलेल्या वाईट तरंगांमुळे माणसाच्या कृतीत बदल होतो, आरोग्यावर परिणाम होतो आणि शेवटी मनुष्याची जीवनाचा आनंद घेण्याची क्षमता कमी होते.    भारतीय संस्कृतीत यज्ञयागादी मोठ्या प्रमाणावर होत असत, घरोघरी रोज धूप केला जात असे. यामुळे वातावरणातील नुसत्या विषाणू (व्हायरस) किंवा जीवाणू (बॅक्‍टेरिया) यांचा नाश व्हावा एवढी मर्यादित अपेक्षा नसून एकूण वातावरणात सुगंध पसरावा अशी अपेक्षा असते. जेथे सुगंध असतो तेथे शक्‍ती असते आणि जेथे दुर्गंध असतो तेथे असतो मृत्यू. यज्ञयागादीतून तयार होणाऱ्या धुराबरोबर, तसेच धूपाबरोबरही चांगले विचार प्रक्षेपित करता येतात. म्हणून वेगवेगळ्या अपेक्षा ठेवून वेगवेगळे यज्ञ केले जात असत. यज्ञात ज्या वस्तू समिधारूपाने अर्पण केल्या जातात त्या वस्तू जाळल्या जातात असे नाही, तर मंत्रोच्चारासह केलेल्या यज्ञात तयार झालेल्या धुरापासून वातावरणात सकारात्मक बदल होतात. परंतु दुर्दैवाने या गोष्टींतील विज्ञान लोकांना हलके हलके कळेनासे झाले. त्यामुळे यज्ञ वगैरे प्रक्रियांवर टीका होऊ लागली. हे सगळे थोतांड आहे असे आधुनिक मंडळींना वाटू लागले. साहजिक या सगळ्यांकडे समाजाचे दुर्लक्ष झाले. विज्ञान शाखेने यावर संशोधन करावे, अशी अपेक्षा आहे.

पर्यावरण वाचवण्यासाठी ‘झाडे वाढवा’ अशी एकमेव हाकाटी सुरू झाली, प्रत्यक्षात ही केवळ घोषणाच राहिली. नद्या, धरणे यांच्यातील पाणी किती वापरायचे, खाणींमधील कोळसा व तेल किती उपसायचे याचे ताळतंत्र राहिले नाही. या सगळ्यांतून हलके हलके पर्यावरणाचा नाश तर झालाच, बरोबरीने वातावरणात उष्णता वाढू लागली. अमुक देश अमुक काळापर्यंत अस्तित्वात राहील, अमुक देश बुडतो आहे, अमुक देशात ज्वालामुखींचा उद्रेक होऊन त्या देशाचा नाश होईल अशा बातम्या ऐकू येऊ लागल्या. 

भारतात स्वच्छता मोहीम सुरू झालेलीच आहे. अनेक देशांनी गेल्या ३०-४० वर्षांपासून त्यांच्या देशात स्वच्छता मोहीम राबविलेली आहे. स्वच्छतेबरोबर कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावणे हीही एक जबाबदारी सगळ्यांवर आहे. प्लॅस्टिकसारख्या विघटन न होणाऱ्या वस्तूंची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी शेवटी सरकारवर येते. अशा गोष्टींची विल्हेवाट कशी लावावी ही समस्या आज भेडसावत आहे. त्यामुळे प्लॅस्टिकसारख्या पर्यावरणाला अहितकर असणाऱ्या गोष्टींच्या वापरावर निर्बंध घालणे आवश्‍यक आहे. आमच्या लहानपणी सकाळी उठून आम्ही हातात पातेले घेऊन दूध आणायला जात असू. हलके हलके दूध काचेच्या बाटल्यांतून मिळू लागले, या बाटल्या धुवून वापरता येत असत. नंतर दूध प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये मिळू लागले. साहजिकच या वापरलेल्या पिशव्यांचे काय करायचे हा प्रश्न समोर उभा राहिला. या पिशव्या वातावरणाला दूषित करण्यासाठीच बनविल्या आहेत की काय अशी शंका यायची वेळ आज आलेली आहे. पॅकिंगसाठी कागदाची खोकी वापरायची म्हटली तरी कागद वनस्पतींपासूनच तयार होतो, त्यामुळे झाडांची तोड अमर्याद प्रमाणात होते. कागदांची विल्हेवाट लावण्यासाठी कागद जाळले गेले तर त्यामुळेही वातावरणात नको असलेल्या वायूंचे प्रमाण वाढून वातावरण प्रदूषित होते. 

अशा प्रकारे आज पर्यावरणाच्या प्रदूषणाचा गहन प्रश्न आज आपल्यासमोर उभा आहे. धाडशी ग्रेटा थुनबर्ग या मुलीच्या निमित्ताने हा विषय पुन्हा एकदा वाचकांसमोर आणण्याचे ठरविले.