esakal | अतिरेक आरोग्य मार्गदर्शनाचा 
sakal

बोलून बातमी शोधा

Excessive Health Guidance

अतिरेक आरोग्य मार्गदर्शनाचा 

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे

केवळ ऐकीव माहितीच्या आधारे आहारयोजना न करता आपली प्रकृती काय आहे, आपण लहानाचे मोठे कुठे झालो, आपण राहतो तेथील भौगोलिक परिस्थिती काय, तेथे काय अनुकूल ठरेल , काय टाळावे लागेल, कोणत्या ऋतुमानात कसे अन्न खावे हे सर्व आयुर्वेदशास्त्राच्या मदतीने समजून घेणे व त्यानुसार आहारयोजना करणे श्रेयस्कर होय. प्रत्येकाने एकदा का होईना, पण वैद्याकडे जाऊन स्वतःची प्रकृती काय आहे, आपल्यासाठी काय अनुकूल आहे, कोणत्या गोष्टी कधीतरी खाल्ल्या तर चालण्यासारखे आहे, कोणत्या गोष्टी पूर्णतः वर्ज्य करायला हव्यात हे समजून घेणे आवश्‍यक असते. 

निसर्गात असणारी विविधता हे निसर्गाचे एक लक्षण असते, तसे व्यक्‍ती तितक्‍या प्रकृती ही आयुर्वेदातील पदोपदी प्रत्ययाला येणारी संकल्पना आहे. ज्याप्रमाणे अगदी जुळी भावंडे असली तरी त्यांच्यात काही ना काही फरक असतो. दोन व्यक्‍ती अगदी एकसारख्या आहेत असे म्हटले तरी त्यांच्या वागण्या-बोलण्यात, विचार करण्यात फरक असणे स्वाभाविक असते, तसेच आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यातही प्रत्येक जण वेगवेगळा असतो. आरोग्याचा एकच नियम सरसकट सगळ्यांना तसान्‌ तसा लागू पडणे अगदी क्वचितच होते. म्हणूनच सध्या सोशल मिडियाच्या माध्यमाद्वारे सरसकट सर्वांना, तेही शंभर टक्के उपयोगी पडणाऱ्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्याकडे सावधानतेने पाहण्याची गरज आहे. 

उदाहरणादाखल पाहायचे तर तांदूळ हे सर्वांच्या परिचयाचे, संपूर्ण जगाला माहिती असणारे धान्य. पण फक्‍त दिसायला सुरेख आणि सुगंधाला उत्तम म्हणून बासमती भात बारा महिने खाणे हे प्रत्येक प्रकृतीला सोसवते असे नाही. मात्र त्याच वेळी तांदूळ कोणतेही असो, तो वर्षभर ठेवून नंतर भात करण्यापूर्वी भाजून घेतला व भांड्यात ठेवून शिजवून खाल्ला तर तो सरसकट सर्वांना मानवणारा असतो. त्यातही काही व्यक्‍तींसाठी, विशेषतः कफदोष होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी तो शिजवताना वरची पेज काढून टाकणे अत्यंत गरजेचे असते. थोडक्‍यात प्रकृतीनुरूप, दोषानुरूप तांदळाची वेगवेगळ्या प्रकारे योजना करणे भाग असते. हे सर्व बारकावे एका सर्वसामान्य नियमात मांडता येत नाहीत, म्हणून प्रत्येकाने एकदा का होईना, पण वैद्याकडे जाऊन स्वतःची प्रकृती काय आहे, आपल्यासाठी काय अनुकूल आहे, कोणत्या गोष्टी कधीतरी खाल्ल्या तर चालण्यासारखे आहे, कोणत्या गोष्टी पूर्णतः वर्ज्य करायला हव्यात हे समजून घेणे आवश्‍यक असते. 

सध्या जग लहान होत चाललेले आहे. तीस-चाळीस वर्षांपूर्वी ज्या पदार्थांची नावे सुद्धा माहिती नव्हती ते पदार्थ किंवा ती फळे, भाज्या आपल्या घरात येऊन पोहोचलेल्या आहेत. या गोष्टी आयुर्वेदाच्या निकषांवर पडताळून घेणे हे सुद्धा आवश्‍यक होय. केवळ सोशल मिडियावरील गुणगानामुळे भारावून जाऊन आपण जेथे राहतो, त्या जमिनीत, त्या ऋतुमानात जे पिकते त्याकडे दुर्लक्ष करून अनोळखी द्रव्यांना आपलेसे करणे हे सुद्धा टाळायला हवे. उदा. भारतात हजारो वर्षांपूर्वीपासून थंड प्रदेशाच्या देशात मोहरी किंवा तिळाचे तेल, साधारण हवामानाच्या देशात शेंगदाण्याचे तेल आणि उष्णता अधिक असणाऱ्या देशात खोबरेल तेल वापरण्याची परंपरा आहे, मात्र सध्या या सर्व पारंपरिक तेलांवर ऑलिव्ह ऑईल, सूर्यफूल तेल, करडई तेल यांनी मोठी गदा आणल्याचे दिसते. मात्र आयुर्वेदात दिलेले करडई तेलाचे गुणधर्म पाहिले तर त्याची वास्तविकता ध्यानात येईल. 
कुसुम्भतैलमुष्णं च विपाके कटुकं गुरु । 
विदाही च विशेषेण सर्वदोषप्रकोपणम्‌ ।। 

...चरक सूत्रस्थान 
करडईचे तेल उष्ण वीर्याचे, तिखट विपाकाचे व पचायला जड असते. शरीरात दाह निर्माण करते व सर्व दोषांना प्रकुपित करते. 

सूर्यफुलाच्या बियांपासून तेल काढले जाते ते सुद्धा आरोग्यदायी असल्याचा दावा केला जातो मात्र सूर्यफुलाचे तेल करडई, तीळ वगैरे तेलांप्रमाणेच उष्ण असते. त्यामुळे सूर्यफुलाचे तेल रोजच्या वापरासाठी योग्य म्हणता येत नाही. विशेषतः उष्णतेचा, पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी, पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींनी, तसेच उष्ण प्रदेशात राहणाऱ्यांनी हे तेल न वापरणेच चांगले असते. मक्‍याच्या तेलाचा वापर तळण्यासाठी, बेकिंगसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण मका हा थंड पण वातूळ असतो, तसेच निःसत्त्व असतो, त्यामुळे मक्‍याचे तेल स्वयंपाकासाठी वापरणे सयुक्तिक नसते. 

भाज्यांच्या बाबतीतही काय चांगले, काय नाही याची पारख असणे गरजेचे होय. आपला भारत देश भाज्यांच्या बाबतीत इतका समृद्ध आहे की खरे तर आपल्याला परदेशी भाज्यांकडे आकर्षित होण्याची गरजच नाही. आयुर्वेदात सर्व भाज्यांचे गुणधर्म , फायदे-तोटे दिलेले आहेत. सामान्य नियमाच्या भाषेत सांगायचे तर आयुर्वेदात वेलीवर येणाऱ्या फळभाज्यांची आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रशस्ती केलेली आहे. कच्च्या भाज्या खाणे, भाज्यांचे रस काढून पिणे, फक्‍त पालेभाज्याच खाणे हे करण्यापूर्वी आयुर्वेदशास्त्र काय म्हणते हे नक्की पाहायला हवे. पालेभाज्या आम्लविपाकी म्हणजे शरीरात गेल्यावर आंबटपण वाढविणाऱ्या असतात, तसेच आधुनिक विज्ञानानुसार रेषा व फायबर देणाऱ्या असल्याने पचायला तितक्‍याशा सोप्या नसतात. शिवाय त्या कोणत्या पाण्यावर पोसल्या गेल्या आहेत हे माहिती असणेही गरजेचे असते. तेव्हा सरसकट नुसत्या पालेभाज्या खाणे प्रकृतीसाठी अवघड ठरू शकते. ब्रोकोली, पिवळी-लाल ढोबळी मिरची, बेबी कॉर्न वगैरे गोष्टी नेहमीच्या भाज्यांपेक्षा अधिक मोबदला देऊन विकत घेतल्या जातात, ऑलिव्ह तेलात परतून अर्धवट कच्च्या स्वरूपात आवडीने खाल्ल्या जातात, पण आरोग्यासाठी हे वाटते व प्रसार केला जातो तितके हितकर असतेच असे नाही. ब्रोकोली ही कोबी-फ्लॉवरच्या जातीतील गड्ड्याच्या स्वरूपात येणारी भाजी, ती जमिनीतील रासायनिक खते, कीटकनाशके अधिक प्रमाणात शोषून घेते, शिवाय कोबी-फ्लॉवरप्रमाणे वातूळही असते. ज्याप्रमाणे सेंद्रिय पद्धतीचा कोबी-फ्लॉवर कधीतरी खाल्ला तर चालू शकतो त्यापेक्षा ब्रोकोली निराळी नाही. ढोबळी मिरची तर मुळातच मिरची, तिच्यात उष्णता वाढविण्याचे गुणधर्म असतात. तसेच ढोबळी मिरची वातवृद्धी सुद्धा करते. डोकेदुखी, उलटी, आम्लपित्त, पोटात वायू धरून पोट डब्ब होणे, वारंवार पोट दुखणे वगैरे तक्रारीमध्ये भोपळी मिरची अपथ्यकर असते. या भाज्या कधीतरी थोड्या प्रमाणात खाल्ल्या तर एकवेळ हरकत नाही, मात्र सोशल मिडियातील सल्ल्यानुसार खाव्या म्हणून रोजच आहारात ठेवल्या तर त्याचे दूरगामी दुष्परिणाम स्वाभाविक होत. 

फळांच्या बाबतीतही सावधानता बाळगणे गरजेचे होय. आयुर्वेदाने त्या त्या ऋतुमानात व हवामानात येणारी फळे काही विशिष्ट नियम सांभाळून खाण्याचा सल्ला दिलेला असतो. सातासमुद्रापलीकडची फळे आणण्यासाठी फळांवर ज्या प्रक्रिया कराव्या लागतात त्या आरोग्याला पूरक असतीलच असे नाही. शिवाय अशी फळे आपल्या प्रकृतीला मानवतीलच असे नाही. चव घेण्यापुरती किंवा कधीतरी थोड्या प्रमाणात किवी, स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुट चाखणे वेगळे. द्राक्षे, पपई, अंजीर, डाळिंब वगैरे आपल्या भारतीय फळांऐवजी भलतीच फळे खाणे हा टाळणे सुद्धा आवश्‍यक. 
अशा प्रकारे केवळ माहितीच्या आधारे आहारयोजना न करता आपली प्रकृती काय आहे, आपण लहानाचे मोठे कुठे झालो, आपण राहतो तेथील भौगोलिक परिस्थिती काय, तेथे काय अनुकूल ठरेल , काय टाळावे लागेल, कोणत्या ऋतुमानात कसे अन्न खावे हे सर्व आयुर्वेदशास्त्राच्या मदतीने समजून घेणे व त्यानुसार आहारयोजना करणे श्रेयस्कर होय.