अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Monday, 25 June 2018

आम तयार होतो तोच मुळी अग्नीच्या मंदतेमुळे आणि जखडण हे लक्षण आम वाढल्याचे निदर्शक असते. त्यामुळे आम आणि जखडण दूर करण्यासाठी मंद झालेल्या अग्नीला पुन्हा कार्यक्षम करणे अनिवार्य असते. 
मागच्या अंकात आपण ज्येष्ठमध आरोग्यासाठी कसा उत्तम असतो याची माहिती पाहिली. आता आपण यापुढची माहिती घेऊ.

आम तयार होतो तोच मुळी अग्नीच्या मंदतेमुळे आणि जखडण हे लक्षण आम वाढल्याचे निदर्शक असते. त्यामुळे आम आणि जखडण दूर करण्यासाठी मंद झालेल्या अग्नीला पुन्हा कार्यक्षम करणे अनिवार्य असते. 
मागच्या अंकात आपण ज्येष्ठमध आरोग्यासाठी कसा उत्तम असतो याची माहिती पाहिली. आता आपण यापुढची माहिती घेऊ.

चन्दनं दुर्गन्धहरदाहनिर्वापणलेपनानाम्‌ - चंदन हे दुर्गंधाचा नाश करण्यामध्ये व दाह शांत करणाऱ्या लेपांमध्ये सर्वश्रेष्ठ असते. 
चंदन घराघरांत असते, कारण ते अतिशय उपयोगी असते. शरीरावर कोठेही आग होत असली, तर चंदन उगाळून लावण्याने लगेच बरे वाटते. तापामध्ये डोके दुखत असेल तर कापूर, थोडेसे केशर आणि चंदन उगाळून तयार केलेला लेप लावण्याने डोके शांत होते. उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी चंदन, वाळा, गुलाब, अनंतमूळ या थंड द्रव्यांची उटी अंगाला लावण्याची पद्धत असते. यामुळे घामाला वा अंगाला येणारा तीव्र गंधसुद्धा कमी होतो. पित्तामुळे उलट्या होत असल्या तर उगाळलेल्या चंदनात थोडी खडीसाखर मिसळून थोडे थोडे चाटण्याचा उपयोग होतो. लघवीला व्यवस्थित होत नसली, दाह होत असला, तीव्र गंध असला तर कपभर दुधात अर्धा चमचा चंदनाचे गंध मिसळून घेण्याचा उपयोग होतो. 

वायुः प्राणसंज्ञाप्रदानहेतुः - प्राण (जीवन) व संज्ञा देणाऱ्या कारणांमध्ये वारा म्हणजेच हवा सर्वांत महत्त्वाची होय. 

अन्नपाण्यावाचून मनुुष्य काही काळ जगू शकतो, मात्र हवा मिळाली नाही तर काही मिनिटांतच प्राण धोक्‍यात येऊ शकतात. अर्थात, हवा शुद्ध असणे गरजेचे असते. शुद्ध मोकळी हवा ज्या ठिकाणी खेळती असेल, अशा ठिकाणी राहणे हे आरोग्यासाठी उत्तम असते. त्यामुळे शक्‍य तेव्हा मोकळ्या हवेत जाणे, योगासने, व्यायाम करताना सुद्धा खोलीत खेळती हवा असणे, घरातल्या घरात वॉकरवर चालण्यापेक्षा घराबाहेर मोकळ्या हवेत चालायला जाणे हे अधिक लाभदायक असते.

अग्निरामस्तम्भशीतशूलोद्वेपनप्रशमनानाम्‌  आम, जखडण, थंडी, वेदना, कंप यांना शांत करण्यासाठी अग्नी उत्तम होय. 

या ठिकाणी अग्नी हा शब्द शरीरातील अग्नी (जाठराग्नी) आणि बाह्य वातावरणातील अग्नी या दोघांना उद्देशून वापरलेला आहे. 
आम तयार होतो तोच मुळी अग्नीच्या मंदतेमुळे आणि जखडण हे लक्षण आम वाढल्याचे निदर्शक असते. त्यामुळे आम आणि जखडण दूर करण्यासाठी मंद झालेल्या अग्नीला पुन्हा कार्यक्षम करणे अनिवार्य असते. 
अति प्रमाणात केलेले भोजन तसेच पचायला जड, अतिशय कोरडे, थंडगार, अप्रिय, मलावष्टंभ करणारे, जळजळ करणारे, अपवित्र, विरुद्ध अन्न सेवन करणे, चुकीच्या वेळी जेवणे तसेच काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, लज्जा, शोक, उद्वेग, भय, अहंकाराने मन उपतप्त झालेले असताना जेवण या सर्व कारणांमुळे अग्नी मंदावतो आणि आमदोष तयार होतो. यावर लंघन, उकळलेले गरम पाणी पिणे, आमपाचक-अग्निदीपक औषधांची युक्‍तिपूर्वक योजना करणे यांसारखे उपाय योजावे लागतात. आम कमी झाला की शरीराचे जखडणेसुद्धा कमी होते. जखडण, थंडी, वेदना, कंप यावर बाहेरून शेक करण्याचाही उपयोग होतो. शेक म्हणजेच स्वेदनाची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे, 
स्तंभगौरव शीतघ्नं स्वेदनं स्वेदकारणम्‌ ।
ज्यामुळे जखडलेपण दूर होते, ज्यामुळे जडपणा कमी होतो, ज्यामुळे थंडी नाहीशी होते, ज्यामुळे घाम येतो ते स्वेदन होय. 

स्वेदन स्थानिक करता येते किंवा संपूर्ण शरीरावर करता येते. संपूर्ण शरीराला शेकायचे असेल तर विशेष पेटी वापरता येते. स्थानिक स्वेदनासाठी सहसा गरम पाण्याची पिशवी किंवा रुई, एरंड, निर्गुडी वगैरे वातशामक वनस्पतींची पाने वापरता येतात किंवा एखाद्या पोटिसाची मदत घेता येते. शेकोटी करून सुद्धा अग्नीच्या मदतीने शेक घेता येतो. 

अग्र्यसंग्रहातील उर्वरित माहिती आपण पुढच्या वेळी घेऊया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family Doctor