चिंतातुरता

चिंतातुरता

चिंता निर्माण होण्याची अनेक कारणे असू शकतात. जीवनातील ताण-तणाव हे सर्वांत नेहमी आढळणारे कारण होय. प्रत्येक व्यक्तीला कुटुंबात, कामाच्या ठिकाणी आणि समाजात सतत तडजोड करावीच लागते. ही तडजोड करण्याची क्षमता कमी असली, तर लहान-सहान गोष्टींमुळे मन सारखे विचलित होत राहते. काही व्यक्तींचा स्वभावच लहान-सहान गोष्टींबद्दल चिंता करण्याचा असतो. काही औषधांच्या सेवनाने देखील मन अस्वस्थ होऊ लागते. उलटपक्षी कधी कधी काही औषधे (विशेषतः झोप येण्याकरिता घेतली जाणारी औषधे) अकस्मात घेणे बंद झाले, तर खूप चिंता निर्माण होऊ शकते.

आपल्या मज्जासंस्थेमार्फत अनेक प्रकारची कार्ये होत असतात. काही कार्ये आपण आपल्या इच्छेनुसार करू शकतो. उदाहरणार्थ, बसणे, उठणे, चावणे, हात-पाय हलवून काम करणे, इतर काही कार्ये आपल्या इच्छेनुसार होत नाहीत. उदाहरणार्थ, त्वचेवर घाम सुटणे, डोळ्यांच्या आतल्या बाहुल्या अरुंद होणे किंवा रुंदावणे इत्यादी. या दुसऱ्या प्रकारच्या मज्जासंस्थेला अनैच्छिक मज्जासंस्था म्हटले जाते. शरीराच्या गरजेप्रमाणे आपल्या आपण काय करावयाचे ते ठरवून त्याप्रमाणे इच्छा नसतानादेखील कार्यवाही घडवून आणणे, या प्रकारच्या मज्जासंस्थेला मनाच्या मार्गदर्शनाच्या अभावाने, स्वेच्छेने चालणारी (ऑटॉनॉमिक) मज्जासंस्था म्हणतात. या ऑटॉनॉमिक मज्जासंस्थेत परस्परविरोधी कार्ये करवून आणणारे असे दोन भाग आहेत. एका भागाच्या कार्यामुळे हृदयाच्या स्पंदनाची गती वाढते. डोळ्यांतील बाहुल्या रुंदावतात. मलमूत्र विसर्जनाला अटकाव येतो. या भागाला ‘सिंपथॅटिक’ मज्जा विभाग म्हणतात, तर या विरुद्ध कार्य घडवून आणणाऱ्या अनैच्छिक मज्जासंस्थेला पॅरासिंपथॅटिक मज्जासंस्था म्हणतात. या पॅरॅसिंपथॅटिक मज्जासंस्थेच्या कार्यामुळे हृदयाच्या स्पंदनाची गती संथावते.

मलमूत्र विसर्जनाला चालना मिळते. डोळ्यांतील बाहुल्या अरुंद होतात. चिंतेमुळे शरीरावर होणारे सर्व परिणाम सिंपथॅटिक मज्जासंस्थेच्या उद्दीपनामुळे होतात. चिंतेमुळे शरीरावर होणारे परिणाम लगेच होतात आणि हे परिणाम रुग्णाला तत्काळ जाणवतात. त्यामुळे हे परिणाम हाच आजार होय, अशी रुग्णाची कल्पना होते. या तक्रारींमागे चिंता आहे हे रुग्णाच्या अनेकदा लक्षातसुद्धा येत नाही. शरीरात घडणाऱ्या घटना या कोणत्यातरी आजारामुळे होत असाव्यात असे वाटून रुग्ण डॉक्‍टरांकडे या परिणामांची तक्रार घेऊन येतो. लॅटिन शब्द ‘सोमा’ म्हणजे शरीर. चिंतेमुळे शरीरावर होणारे परिणाम शरीरात घडणाऱ्या विकृतीचाच परिणाम आहे, याची रुग्णाला खात्री वाटू लागते. याला ‘सोमाटायझेशन’ म्हणतात. रुग्णाला त्रास शरीरात जाणवतो. त्यामुळे या त्रासाचा आणि (सुप्त मनातील) चिंतेचा काही संबंध असेल याची रुग्णाला कल्पना येत नाही. उलट पक्षी, रुग्णाच्या तक्रारींचा व मनाचा काही संबंध असेल, असे डॉक्‍टरांच्या बोलण्यात आलेले रुग्णाला पटत नाही. ‘मला कोणतीही काळजी नाही’ असे रुग्ण ठामपणे डॉक्‍टरांना सांगतो. अशा वृत्तीच्या मागे ‘शारीरिक आजार’ हे ‘खरे’ आजार आणि ‘मनाशी’ संबंधित आजार हे ‘काल्पनिक’ किंवा मिथ्या आजार असतात, असा बहुतेकांचा समज झालेला असते. त्यातून, चिंतेमुळे काही शारीरिक बदल घडतातच. उदाहरणार्थ, नाडीची गती वाढणे, निद्रानाश होणे, डोळे दुखणे इत्यादी. या खेरीज बऱ्याच माणसांना त्यांच्या भावना व्यवस्थितपणे शब्दांत सांगता येत नाहीत. वाढत्या वयात, शिक्षणाचा अभाव असल्यास किंवा आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्यास, आपल्या ‘शारीरिक दुखण्याकडे’ डॉक्‍टर अधिक लक्ष देतील, अशीही (चुकीची) कल्पना समाजात आढळते.

शारीरिक आजार आहेत किंवा कसे हे प्रथम पाहणे आवश्‍यक असते. विशेषतः थॉयरॉईड ग्रंथींचे कार्य जास्त होणे, हायपर थॉयरॉयडिझम या आजारात एक प्रमुख लक्षण म्हणजे वजन कमी होत जाणे हे आहे. आजार वाढल्यावर डोळे मोठे दिसू लागतात. (वटारल्यासारखे), तळहात गरम असतात. रक्ताच्या तपासणीवरून थॉयरॉईडचे काम कसे चालले आहे, याचा अंदाज येतो. रेडिओॲक्‍टिव्ह आयोडिन अपटेक या तपासणीतून थॉयरॉईड ग्रंथीच्या कामाची निश्‍चित माहिती कळू शकते.

कॅफॅनसारखे रेणू देखील चिंतातुरतेने निर्माण होणाऱ्या तक्रारींसारख्या तक्रारींना जबाबदार असतात. चहा, कॉफी, कोला पेये, चॉकलेट अशा पदार्थांतून कॅफॅनसारखा रेणू शरीरात जातो. काही व्यक्ती या रेणूला संवेदनक्षम असतात. जी माणसे नियमित मद्यपान करतात किंवा बेंझोडायासिपीन प्रकारची (मनःशांतीसाठी) औषधे रोज सेवतात, त्या व्यक्तींनी हे रेणू घेण्याचे अकस्मात बंद केले तरी त्यांना असाच त्रास होणे संभवते. कॉफी आणि तंबाखू यांचे सेवन कोणीही मर्यादितच ठेवावे. अकस्मात बंद करू नये.

चिंतातुर व्यक्तीला तपासताना विविध शारीरिक बदल सापडतात. नाडीची गती जलद असणे, छातीत धडधड होणे, तुलनेने क्षुल्लक श्रमाने धाप लागणे, तळहातावर थंड घाम सुटणे, तोंड कोरडे पडणे, मळमळ जाणवणे, पोटात अस्वस्थ्य जाणवते. अधूनमधून जुलाब होणे, लघवीला वारंवार जावे लागणे, लघवीला गेल्यावर लघवी सुटण्यास वेळ लागणे, लघवी होईल अशी भावना जाणवल्यास घाई होणे, तोल जातो आहे अशी भावना होणे, क्षणमात्र भान हरपून पडणे, डोके ‘हलके झाल्यासारखे’ वाटणे, कपाळाच्या बाजूने आवळल्यासारखे डोके दुखणे, हात-पाय-पाठ-कंबर दुखणे, सारखे अस्वस्थ वाटते, हाताची बोटे थरथर कापणे यांसारख्या शारीरिक घटकांचा उगम मज्जासंस्थेतून चिंतेच्या परिणामाने होतो. सिंपथॅटिक मज्जासंस्थेच्या कार्यामुळे व्यक्ती सदैव जागृत राहते. एक प्रकारची अनामिक भीती वाटत राहते. सहनशक्ती मर्यादित होते. त्यामुळे राग चटकन येतो. एकाग्रता होत नाही. परिणामी, अभ्यास होत नाही. स्वास्थ्य लाभत नाही. झोपेत व्यत्यय येतो. सहसा झोप लागण्यास वेळ लागतो.

चिंता निर्माण होण्याची अनेक कारणे असू शकतात. जीवनातील ताण-तणाव हे सर्वांत नेहमी आढळणारे कारण होय. प्रत्येक व्यक्तीला कुटुंबात, कामाच्या ठिकाणी आणि समाजात सतत तडजोड करावीच लागते. ही तडजोड करण्याची क्षमता कमी असली, तर लहान-सहान गोष्टींमुळे मन सारखे विचलित होत राहते. काही व्यक्तींचा स्वभावच लहान-सहान गोष्टींबद्दल चिंता करण्याचा असतो. काही औषधांच्या सेवनाने देखील मन अस्वस्थ होऊ लागते. उलटपक्षी कधी कधी काही औषधे (विशेषतः झोप येण्याकरिता घेतली जाणारी औषधे) अकस्मात घेणे बंद झाले, तर खूप चिंता निर्माण होऊ शकते. हीच गोष्ट मद्यपानाच्या बाबतीत खरी आहे. रोज बरीच दारू पिणाऱ्या व्यक्तीने एकाएकी दारू पिणे थांबविले, तर त्या व्यक्तीला खूप चिंता येऊ लागते. काही शारीरिक व्याधींमुळेसुद्धा व्यक्ती चिंतातूर होतात. उपरनिर्दिष्ट थॉयरॉईड ग्रंथीचे कार्य जास्त होऊ लागले किंवा कमी झाले, तरी चिंतातुरता निर्माण होते. अर्धशिशी (मायग्रेन) वा डोळेदुखीच्या प्रकारात व्यक्तीला चिंतेने ग्रासते.

फिट्‌स येण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यांत टेंपोरल लोब एपिलेप्सी नावाच्या प्रकारात व्यक्ती चिंतातुर होते. मेंदूत गाठ झाली (ब्रेन ट्यूमर) तरी माणूस सचिंत होतो. अनेक वेळा डोक्‍याला मार लागला तरी माणसे चिंतातूर होतात. विविध मानसिक विकारांत माणसांना चिंता होण्याचा विकार जडतो. विशेषतः खिन्नता (डिप्रेशन) या विकारात माणसाला कसली तरी चिंता होत राहते. चिंता नसणारा माणूस ‘सुखी माणसाचा सदरा’ या गोष्टीतील व्यक्तीप्रमाणे असतो!

चिंतेमुळे इतक्‍या व्यक्तींना इतक्‍या प्रकारचे त्रास होतात, की ‘चिंतातुरते’चे निदान इतक्‍या कमी प्रमाणात होते याचे आश्‍चर्य वाटते. याचे खरे कारण उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांच्या डोळ्याच्या समोर एक ‘झापड’ असते. शारीरिक आजारांबद्दल डॉक्‍टर्स आणि रुग्ण इतके जागरूक असतात, की प्रत्येक शारीरिक त्रासाला कोणता ना कोणता शारीरिक आजार जबाबदार असावा या कल्पनेने सगळे लक्ष शारीरिक दोषांच्या शोधातच गुंतलेले असते. स्वाभाविकपणे मानसिक ताण, चिंता, खिन्नता अशा मानसिक दोषांकडे लक्ष दिले जात नाही. काही डॉक्‍टरांना वाटते, की रुग्णाच्या आजारात नाही.

‘मानसिक’ अस्वास्थ्याचा भाग आहे, असे रुग्णाला सांगितले तर डॉक्‍टर-पेशंट संबंधाला बाधा पोचेल. रुग्णाला मानसिक आजाराचे निदान पटणार नाही. कदाचित रुग्ण आपले उपचार सोडून दुसऱ्या वैद्यकीय व्यावसायिकाकडे जाईल. काही रुग्णांच्या बाबतीत हे खरेही असेल. रुग्णाला काय सांगावयाचे, कसे सांगावयाचे, किती सांगावयाचे, ‘मानसिक’ हा शब्द कसा टाळावयाचा याबाबत प्रत्येक डॉक्‍टराने दक्षता पाळावी लागते, त्याला हुषारी आणि चातुर्य यांचा योग्य उपयोग करावा लागतो. वैद्यकीय व्यवसायात सर्वस्वी ‘रामशास्त्री प्रभुणे’ किंवा ‘राजा हरिश्‍चंद्र’ होणे रुग्णाच्या हिताचे ठरत नाही. कधीतरी ‘नरो वा कुंजरोवा’ म्हणणे सुज्ञपणाचे ठरते. रुग्णाचे हित कशात आहे व ते कसे गाठावे हे ओळखण्यास बुद्धिमत्ता आणि ‘चलाखी’ यांचा उपयोग करावा लागतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com