रक्तशुद्धीसाठी व ते रक्त शरीरभर खेळविण्यासाठी फुफ्फुसांवर नियंत्रण मिळविणे प्राणायामाने शक्‍य होते.
रक्तशुद्धीसाठी व ते रक्त शरीरभर खेळविण्यासाठी फुफ्फुसांवर नियंत्रण मिळविणे प्राणायामाने शक्‍य होते.

महत्त्वाचा धातू-रक्‍त

पृथ्वीच्या पाठीवर पाणीरूपी जीवन नदीनाल्यांतून वाहते तसे रक्‍तही मनुष्याच्या शरीरात धमन्यांतून वाहते. ही जीवनसरिता कोरडी पडली म्हणजे रक्‍ताचा दुष्काळ पडला, तर जीवनाची बाग फुलणारच नाही. जिवंत प्राण्याचा सृष्टीशी संबंध जोडणारा ओलावा हा रक्‍ताच्याच रूपाने अस्तित्वात असतो. मनुष्याच्या शरीरात या रक्‍तातील ओलावा शुद्ध करून उत्क्रांत होत होत शेवटी त्याचे परिवर्तन वीर्यापर्यंत होते, ज्याचा उपयोग पुनरुत्पत्तीसाठी होतो.

आपल्या जीवनात रक्‍ताचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आपण आपल्या श्वासाबरोबर प्राणवायू-प्राणशक्‍ती आत घेतो. या प्राणशक्‍तीचा रक्‍ताशी संयोग झाला की रक्‍त तेजोमय व शक्‍तिमय होते व ही शक्‍ती, ही ऊर्जा रक्‍ताद्वारे शरीराच्या सर्व अणुरेणूंपर्यंत पोचवली जाते. म्हणून शरीरात रक्‍त योग्य प्रमाणात असणे गरजेचे असते. 

‘रक्‍ताची नाती’, ‘रक्‍ताचे संबंध’, ‘रक्‍त सांडणे’, ‘रक्‍त जाळणे’ अशा अनेक प्रकारे आपण रक्‍ताचा उल्लेख करीत असतो. रक्‍त हा जरी सप्तधातूंपैकी दुसऱ्या क्रमांकाचा धातू असला, तरी शरीरघटक म्हणून खऱ्या अर्थाने तोच जिवंतपणाच्या अस्तित्वाचा पहिला पुरावा आहे. जिवंत प्राण्याचा सृष्टीशी संबंध जोडणारा ओलावा हा रक्‍ताच्याच रूपाने अस्तित्वात असतो. एखाद्या मृत व्यक्‍तीच्या वा प्राण्याच्या शरीरातील ओलावा संपला, जीवन संपले की जे काही शिल्लक राहील त्या निर्जिवाला दोष कमी असतो. म्हणून पूर्णपणे वाळवून, कमावून वापरलेल्या प्राण्यांच्या कातडीला दोष कमी असतो. गाईचे शिंग, हत्तीचे दात जरी प्राणिज असले तरी त्यापासून आरोग्याला कुठलाही धोका नाही असे समजून वापरले जातात, कारण त्यातील रक्‍तमांसादी ओलावा निघून गेलेला असतो. पृथ्वीशी संबंध जोडताना ज्या ठिकाणी जिवाचे अस्तित्व सुरू होते त्या ठिकाणी पहिल्यांदा जो काही ओलावा मिळतो ते हे रक्‍त. रक्‍त पृथ्वीच्या पोटातील अग्नीच्या रंगाप्रमाणे लाल असते. पृथ्वीचा कारक ग्रह आहे मंगळ व तोही रक्‍तवर्ण असतो आणि त्यामुळे जेथे रक्‍त नाही तेथे पृथ्वीचे वास्तव्य असूच नाही. इतका आहे रक्‍ताचा मोठा संबंध. मनुष्याच्या शरीरात या रक्‍तातील ओलावा शुद्ध करून उत्क्रांत होत होत शेवटी त्याचे परिवर्तन वीर्यापर्यंत होते, ज्याचा उपयोग पुनरुत्पत्तीसाठी होतो. पृथ्वीच्या पाठीवर पाणीरूपी जीवन नदीनाल्यांतून वाहते, तसे रक्‍तही मनुष्याच्या शरीरात धमन्यांतून वाहते. ही जीवनसरिता कोरडी पडली म्हणजे रक्‍ताचा दुष्काळ पडला, तर जीवनाची बाग फुलणारच नाही.  

रक्‍त दूषित झाले तर त्याचा बाह्यवातावरणाशी असलेला संबंध दुरावायला लागतो, त्वचा कोरडी व रोगग्रस्त होते, त्वचेचे रोग उत्पन्न होतात किंवा त्वचा, डोळे यांच्यात रक्‍ताचा लाल रंग दिसू लागतो. जनुकातील संकल्पनेप्रमाणे (संरचनेप्रमाणे), पूर्वजन्माच्या गुणदोषाप्रमाणे व खाल्लेल्या अन्नाच्या गुणदोषाप्रमाणे येणारे सर्व गुणदोष प्रथम रक्‍तातच येतात. म्हणूनच ‘रक्‍ताचे संबंध’ असे म्हटले जाते. 

ओलावा आतला
असे हे महत्त्वाचे रक्‍त, जे शरीराबाहेर बनविण्याची क्रिया अजून तरी सापडलेली नाही. इतकेच नव्हे तर रक्‍त आत असलेल्या जलतत्त्वासकट सांभाळावे लागते म्हणूनच त्यात कुठलाही जंतुसंसर्ग किंवा कुठलाही दोष होणार नाही यावर लक्ष ठेवावे लागते. रक्‍त वाळवून चूर्ण बनविले व चूर्ण या स्वरूपात उपलब्ध झाले तर त्याची काळजी घेणे खूप सोपे होईल. पण रक्‍तधातू कायम द्रवच असतो, कायम ओलाव्याला धरूनच राहतो. बहुतेक प्राणिज पदार्थ अशा पद्धतीने आत असलेल्या प्राणिज ओलाव्यामुळे अधिक कार्यक्षम व गुणकारी ठरतात. उदाहरणच द्यायचे झाले तर दूध, मध हे पदार्थ सांगता येतील. हे पदार्थ जवळ जवळ कोरडे होतच नाहीत. तात्पुरते कोरडे केले तरी त्यांच्यात लगेचच ओलावा धरला जातो. म्हणून हे पदार्थ शरीरात लगेच गुणकारी ठरतात. शरीरात रक्‍त तयार करण्यासाठी त्यांचा लगेच उपयोग होतो, किंबहुना हे जीवन वाढविणारे, जीवनाला आरोग्यवान करणारे अत्यंत प्रभावी पदार्थ ठरतात. 

रक्‍तक्षय होणे, रक्‍त तयारच न होणे, रक्‍तातील महत्त्वाचे घटक कमी होणे वगैरे त्रास सुरू झाल्यास एकूणच जीवनात कराव्या लागणाऱ्या संघर्षासाठी शक्‍ती कमी पडू लागते. हवेतील प्राणवायू किंवा प्राणशक्‍ती ओढून घेण्याचा रक्‍ताचा गुण कमी झाला तरीसुद्धा खूप त्रास होऊ शकतो. तेव्हा रक्‍तक्षय हा विकार एका अर्थाने उपचार करण्यासाठी अवघड समजायला हरकत नाही.

पुरुषांच्या बाबतीत रक्‍तातील हिमोग्लोबिन १४ ते १६ च्या दरम्यान व स्त्रियांच्या बाबतीत १२ ते १४ च्या दरम्यान असणे सामान्य समजले जाते. परंतु स्त्रियांची मानसिकता, त्यांच्या शरीराची कोमलता, त्यांना निसर्गाने दिलेला मासिक धर्म यामुळे त्यांच्या शरीरातील रक्‍त कमी होण्याकडे प्रवृत्ती असते. हा दोष दूर केला नाही तर स्त्रीचे आयुष्य कठीण होऊ शकते. तर मग पूर्ण रक्‍तक्षय झाला किंवा रक्‍तात असणारे घटक कमी झाले व नको असलेले घटक वाढले तर आयुष्य कसे होईल याची कल्पना करणे अवघड आहे. 

प्राणायाम उपयुक्त
अपघातप्रसंगी किंवा शस्त्रक्रियेच्या वेळी अधिक रक्‍तस्राव पर्यायाने रक्‍तक्षय होऊ शकतो. त्यासाठी ताबडतोब उपलब्ध होईल अशी रक्‍त पुरविण्याची योजना इस्पितळात तयार ठेवावी लागते. मानवी रक्‍त देताना किंवा घेताना खूप बंधने सांभाळावी लागतात. परंतु आयुर्वेदात प्राण्याचे रक्‍त बस्तीमार्गाद्वारे देण्याविषयी उल्लेख सापडतो. त्यावर आधुनिक संशोधन झाल्यास रक्‍तपेढीला काम करणे सोपे होईल. रक्‍तक्षयाच्या व्यक्‍तीला जसा श्वास घेण्याचा त्रास होऊ शकतो, तसेच श्वासाचा वा दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्‍तीला पंडुरोगापासून सांभाळावे लागते. मूत्रपिंडाचादेखील रक्‍ताशी व रक्‍तशुद्धीशी फार जवळचा संबंध असतो. सर्व रक्‍तविकारात मूत्रापिंडाची व मूत्रपिंडविकारात रक्‍तशुद्धीची दक्षता घ्यावी लागते. अति धूम्रपान हेही या विकारात चांगले नाही. 

रक्‍त इतके महत्त्वाचे असल्यामुळेच योगशास्त्रातील प्राणायामाला खूप महत्त्व आले. कारण रक्‍त शुद्ध करण्याची क्रिया व ते रक्‍त सर्व शरीरभर खेळविण्याची क्रिया करणाऱ्या फुप्फुसांवर नियंत्रण करणे अत्यावश्‍यक ठरते व असे नियंत्रण प्राणायामाद्वारे करणे शक्‍य असते. म्हणून रक्‍तक्षयात किंवा रक्‍ताच्या कर्करोगात प्राणायामाला खूप महत्त्व आहे व त्याबरोबरच विश्रांतीही अत्यावश्‍यक असते. स्त्री-पुरुषसंबंधामध्ये वीर्य खर्च होते तेव्हा इतर कार्यांपेक्षा अधिक शक्‍ती खर्च पडते. म्हणजे स्त्री-पुरुषसंबंधापासून दूर राहणे किंवा कुठल्याही कामोत्तेजक गोष्टींचे आचरण न करण्याने विश्रांती मिळून रक्‍तधातू योग्य प्रमाणात तयार होऊ शकतो 

‘रक्त आटवू नका’
शरीरातील रक्‍त कमी झाल्यास मनुष्य पांढराफटक दिसू लागतो, उत्साह मावळतो, चालण्याची वा कुठलेही कार्य करण्याची शक्‍ती कमी होते. पंडुरोग हा एक महत्त्वाचा व अवघड रोग आयुर्वेदाने वर्णन केलेला आहे. पंडुराजाला पंडुरोग झालेला होता, त्यामुळे त्याला स्त्रीसंबंध वर्ज्य सांगितला होता व विश्रांतीसाठी कुटिप्रवेश व रसायन चिकित्साही दिलेली होती. पंडूने त्याला दिलेले पथ्य न पाळल्यामुळे विपरीत परिणाम त्याला भोगावे लागले. 
सप्तधातूंपैकी मज्जाधातूच्या ठिकाणी रक्‍त तयार होण्यासाठी लागणाऱ्या क्रिया घडतात, त्यामुळे बऱ्याच वेळी रक्‍तक्षयावर उपचार करताना मज्जेवरही उपचार करावा लागतो.  

‘माझे रक्‍त तू आटवू नको’ असे जे म्हटले जाते, त्यालाही व्यवहारात खूप मोठा अर्थ अभिप्रेत आहे. म्हणजे कुठल्याही चिंतेमुळे, कुठल्याही प्रकारच्या मानसिक ताणामुळे शरीर उष्ण होऊन रक्‍त अधिक प्रमाणात वापरले गेल्यामुळे रक्‍तक्षयाकडे वाटचाल होते. सतत शरीराची उष्णता प्रमाणापेक्षा जास्ती राहणेही रक्‍तासाठी चांगले नसते.    

रक्‍तक्षयावर उपचार करताना प्रत्यक्ष रक्‍त देणे, औषधोपचार करणे यांच्याबरोबर आयुर्वेदातील ग्रहचिकित्सा व ध्यान, संगीत यांचाही उपयोग करून घेता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com