esakal | रक्‍ताची कमतरता ॲनिमिया
sakal

बोलून बातमी शोधा

रक्‍ताची कमतरता ॲनिमिया

रक्‍ताची कमतरता ॲनिमिया

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com

शरीरातील रक्ताची कमतरता टाळली पाहिजे. रक्तामार्फतच ऑक्‍सिजन आणि ऊर्जा शरीरभर पोचवली जाते. रक्‍ताचे रक्षण करणे, रक्‍ताचे पोषण होईल अशा आहार-औषधांचे सेवन करणे, रक्‍त शुद्ध राहील याकडे लक्ष ठेवणे हे जमले तर रक्‍ताल्पता, ॲनिमियाशी सामना करावा लागणार नाहीच, पण सतेज कांती, उत्साह, स्फूर्ती आणि आरोग्याचा लाभ होईल. 

अलीकडच्या काळात केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत देशातील पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक स्त्रियांमध्ये रक्‍ताची कमतरता आढळून आलेली आहे. अर्थातच प्रजननक्षम वयोगटातील स्त्रियांमधील रक्‍ताल्पतेचा परिणाम जन्माला येणाऱ्या बाळावर, पर्यायाने पुढच्या संपूर्ण पिढीवर झाल्याशिवाय राहात नाही. यादृष्टीने रक्‍ताचे पोषण होण्याकडे, रक्‍तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य राहण्याकडे लक्ष देणे, त्यासाठी आहार, औषध, आचरण यामध्ये विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. 

आयुर्वेदात रक्‍त हा सप्तधातूंपैकी एक महत्त्वाचा धातू म्हणून सांगितला आहेच. पण दहा प्राणयतनांपैकी म्हणजे ‘प्राण’ ज्या दहा ठिकाणी विशेषत्वाने राहतात त्यातील एक सांगितला आहे. आयुर्वेदात रक्‍ताची कार्ये याप्रमाणे सांगितलेली आहे,

कर्म वर्णप्रसादो मांसपुष्टिर्जीवनं धातूनां पूरणं असंशयं स्पर्शज्ञानं च । ...सुश्रुत शारीरस्थान
तेजस्वी वर्ण, मांसादी उत्तरोत्तर धातूंचे पोषण, उत्तम जीवनशक्‍ती, स्पर्शज्ञान या सर्व गोष्टी रक्‍तामुळे मिळतात. म्हणूनच आयुर्वेदात रक्‍त हे शरीराचे मूळ असून रक्‍ताचे सर्वतोपरी रक्षण करावे असे सांगितलेले दिसते. रक्‍त कमी झाले तर त्याचा सर्वप्रथम त्वचेच्या तेजस्वितेवर, वर्णावर परिणाम झालेला दिसतो. म्हणून आयुर्वेदात रक्‍त कमी होण्याला ‘पांडुरोग’ नाव दिलेले आहे. पांडू म्हणजे फिकटता, म्लानता.

रक्ताल्पतेमुळे थकवा
खरोखरच ॲनिमियामध्ये रक्‍ताल्पतेमुळे प्राणशक्‍ती पुरेशा प्रमाणात शरीरात पोचत नसल्याने थकवा आलेला जाणवतो, 

शक्‍ती कमी वाटते, पटकन दम लागणे ही लक्षणेही जाणवतात. कधी कधी छातीत धडधड होणे, उत्साह कमी होणे, डोळे, चेहरा, त्वचा या ठिकाणी निस्तेजता दिसू लागते. आयुर्वेदातील ‘पांडू’ या रोगाशी ॲनिमियाचे साधर्म्य दिसून येते.

अत्याधिक प्रमाणात व्यायाम करण्याने; आंबट, खारट पदार्थांचे फार प्रमाणात सेवन करण्याने; विधिरहित अतिप्रमाणात मद्य पिण्याने; माती खाण्याने; दिवसा झोपण्याने; मोहरी, मिरी, लसूण वगैरे तीक्ष्ण पदार्थ अधिक प्रमाणात खाण्याने प्रकुपित झालेले दोष रक्‍तधातू व त्वचेला बिघडवून ‘पांडू’ उत्पन्न करतात.

पांडूरोगाच्या सुरवातीला त्वचा अतिशय कोरडी पडते, कैक वेळा त्वचेवर भेगाही पडतात, डोळ्यांभोवती सूज येते, पचन व्यवस्थित होत नाही. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ‘रक्‍तक्षय’ अर्थात ‘पांडूरोग’ होतो. 

याशिवाय रक्‍ताची कमतरता अनेक कारणांमुळे उद्भवू शकते.
स्त्रियांच्या बाबतीत पाळीमध्ये अतिप्रमाणात रक्‍तस्राव झाला किंवा पाळीखेरीज अधून मधून रक्‍तस्राव होत राहिल्यास रक्‍ताची कमतरता उद्भवू शकते. त्याचप्रमाणे शरीराच्या कुठल्याही भागातून रक्‍तस्राव होण्याचा विकार असल्यास, उदा. मूळव्याधीमुळे गुदमार्गाने थोडा थोडा रक्‍तस्राव होणे, अल्सरमुळे रक्‍तस्राव होणे वगैरेंमुळेही रक्‍ताल्पतेची लक्षणे दिसू शकतात. जंतांमुळेही रक्‍ताची कमतरता निर्माण होऊ शकते. 

पुरीषजाः क्रिमयः सूक्ष्माः पाण्डुतां जनयति ।
...माधवनिदान मधुकोष
विष्ठेत तयार होणाऱ्या सूक्ष्म जंतांनी शरीरातील रक्‍ताचे शोषण केल्यामुळे पांडुता निर्माण होतो. बऱ्याच लहान मुलांमध्ये रक्‍त कमी असण्यामागे हे एक कारण असते.

क्षयरोगामुळे क्षीण
राजयक्ष्मा अर्थात क्षयरोग हा धातूक्षयातून उत्पन्न होतो असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. यातील अनुलोम प्रकारच्या राजयक्ष्म्यात पाचक अग्नी मंद झाल्याने रस-रक्‍तादी धातू क्रमाक्रमाने अशक्‍त होत जातात व मनुष्य क्षीण होतो. या प्रकारात मूळ क्षयरोगावर उपचार करण्याबरोबरच पाचक अग्नीची कार्यक्षमता वाढवून रक्‍तादी धातूंना भरून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. वृक्क म्हणजे मूत्रपिंडांची कार्यक्षमता कमी झाल्यास रक्‍तात विषद्रव्य साठून रक्‍त कमी होताना दिसते. शरीरातील रोगप्रतिकार यंत्रणेत बिघाड झाल्यानेही रक्‍ताची कमतरता उद्भवू शकते. निःसत्त्व आहार घेण्याने, अपचनाकडे दुर्लक्ष केल्याने, फार मानसिक ताण, अति जागरण यामुळेही रक्‍ताची कमतरता निर्माण होऊ शकते.

रक्‍ताच्या कमतरतेवर उपचार करताना सर्वप्रथम त्याचे कारण बघावे लागते. रक्‍तवाढीसाठी उपचार करण्याबरोबरीने रक्‍त तयार होण्यातला किंवा ते शरीरात टिकण्यातला अडथळा शोधून तो दूर करण्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न करावे लागतात. उदा. स्त्रियांसाठी पाळीच्या वेळी अधिक रक्‍तस्राव होत असल्यास रक्‍तवाढीबरोबरच रक्‍तस्राव थांबवण्यासाठी उपाययोजना करावी लागते; जंत झाले असल्यास कृमीनाशक औषधे देऊन उपचार करावे लागतात. जनुकीय बिघाडामुळे होणाऱ्या थॅलिसिमियासारख्या दुष्कर विकारात रक्‍ताग्नी वाढवून रक्‍तधातूची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतात. तसेच पुढच्या बालकाला जन्मजात दोष येऊ नयेत म्हणून गर्भधारणेअगोदरपासून प्रयत्न करता येतात.

नैसर्गिक आहार घ्या
रक्‍तधातू सशक्‍त बनवण्यासाठी किंवा रक्‍तवाढीसाठी नैसर्गिक आहार व औषधांचा वापर करणे सर्वांत चांगले. काळ्या मनुका, खजूर, डाळिंब, सफरचंद, पालक, केशर, आवळा, गूळ वगैरे गोष्टींचा आहारात नियमित समावेश असण्याने रक्‍ताचे नीट पोषण होऊ शकते.

स्वयंपाक करताना लोखंडाची कढई, तवा, पळी वगैरे वापरण्यानेही रक्‍तवाढीला मदत मिळते. पांडूरोगावर उपचार म्हणून लोखंडाच्या भांड्याचा उपयोग करायचा संदर्भ आयुर्वेदाच्या ग्रंथातही सापडतो.

लोहपात्रे श्रृतं क्षीरं सप्ताहं पथ्यभोजनः । 
पिबेत्पाण्डवामयी शोषी ग्रहणीदोषपीडितः ।।
...चक्रदत्त
लोखंडाच्या भांड्यात क्षीरपाक (म्हणजे पाण्यासह उकळलेले दूध) पिऊन पथ्याने राहिले असता पांडूरोग, शोष, ग्रहणी या विकारांसाठी उपयोगी पडते.
लोहभस्म, मंडूरभस्म, सुवर्णमाक्षिक भस्म, नवायास लोह वगैरे आयुर्वेदिक योगही रक्‍तवाढीसाठी उत्तम असतात. रक्‍तधातूच्या पोषणासाठी ‘सॅन रोझ’, ‘धात्री रसायन’ वगैरे रसायन कल्पांचाही चांगला उपयोग होतो, सशक्‍त रक्‍तधातूबरोबरच एकंदर आरोग्याचा, तेजस्वितेचाही लाभ होतो. याखेरीज द्राक्षासव, पुनर्नवामंडूर, धात्र्यारिष्ट वगैरे आयुर्वेदातील योगांचाही रक्‍ताची कमतरता भरून येण्यासाठी चांगला उपयोग होतो.

शिरेतून रक्त
रक्‍तक्षय मोठ्या प्रमाणावर झाला असल्यास आजकाल शिरेतून सरळ रक्‍त देता येते. तातडीचा इलाज म्हणून त्याचा उत्तम उपयोग होताना दिसतो. अपघात, शस्त्रकर्मानंतर उद्भवणाऱ्या समस्या किंवा काही प्रकारच्या आजारात शिरेवाटे रक्त देणे अत्यावश्‍यक असते, त्या दृष्टीने रक्तदान करण्याची पद्धत रूढ आहे. आयुर्वेदातही रक्‍ताने रक्‍तधातू वाढविण्याची संकल्पना आहे. फक्‍त हे रक्‍त सरळ शिरेतून दिले जात नाही; तर हरिण, बकरी, ससा वगैरे प्राण्यांचे रक्‍त बस्तीवाटे किंवा मध वगैरे द्रव्यांसह मिसळून सेवन करायला दिले जाते. 

रक्‍ताचे प्रमाण कमी झाले किंवा रक्‍तधातूची सारता, वीर्यता टिकवली नाही तर विविध रक्‍तविकार, उदा. त्वचारोग, विविध ॲलर्जी, अंगावर पित्ताच्या गांधी उठणे वगैरे त्रास होण्याची शक्‍यता वाढते. रक्‍ताल्पतेलाच चुकीच्या आहार-विहाराची विशेषतः पित्तदोष वाढवणाऱ्या कारणांची जोड मिळाली तर असे त्रास हमखास होऊ शकतात. सप्तधातूंपैकी एक असलेला रक्‍तधातू प्रमाणाने कमी झाला तर ‘धातुक्षयातून वातप्रकोप’ या तत्त्वानुसार वातदोषाचे असंतुलन होऊन त्वचा कोरडी पडणे, रंग काळवंडणे, एकंदर शरीररुक्षता वाढणे वगैरे त्रासही होऊ शकतात.

त्यामुळे रक्‍ताचे रक्षण करणे, रक्‍ताचे पोषण होईल अशा आहार-औषधांचे सेवन करणे, रक्‍त शुद्ध राहील याकडे लक्ष ठेवणे हे जमले तर रक्‍ताल्पता, ॲनिमियाशी सामना करावा लागणार नाहीच, पण सतेज कांती, उत्साह, स्फूर्ती आणि आरोग्याचा लाभ होईल.