थंडीची तयारी

थंडीची तयारी

ऊब ही शक्‍तिसापेक्ष असते. रक्‍ताभिसरण नीट होत असले, प्राणशक्‍ती पुरेशा प्रमाणात मिळत असली की शरीरावश्‍यक ऊब टिकून राहते. हिवाळ्यात पचनशक्‍ती सुधारत असल्याने शक्‍ती कमावण्याची मोठी संधी निसर्ग देत असतो. म्हणूनच आयुर्वेदाने हिवाळ्यात ‘रसायन सेवन’ सुचवले आहे. 

हिवाळा हा ऋतू सर्वच दृष्टिकोनातून सुखदायक व संपन्न ऋतू असतो. हिवाळ्यात उकाडयामुळे जिवाची घालमेल होत नाही. तसेच पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी छत्री-रेनकोटची तरतूद करावी लागत नाही.

निसर्गसौंदर्याचा लाभही या ऋतूत भरभरून मिळत असतो. ताज्या भाज्या, ताजी फळे ही सुद्धा हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनुष्याची अन्न पचविण्याची ताकद, निसर्गाचा आनंद घेण्याची ताकद ही सुद्धा उत्तम असते. हिवाळ्याचा हा काळ (म्हणजेच हेमंत, शिशिर हे दोन ऋतू) शरीरशक्‍ती साठवून ठेवण्यासाठी, रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी उत्तम समजला जातो. यासाठी आहाराचे योगदान महत्त्वाचे असते. 

हिवाळ्यामध्ये बाह्य वातावरण थंड होते, ज्याचा परिणाम म्हणून शरीरातील अग्नी प्रदीप्त होतो. म्हणूनच हिवाळ्यात पचन चांगले होते, भूक जास्ती लागते असा अनुभव येतो. प्रदीप्त झालेल्या अग्नीमुळे शरीर ऊबदार राहण्यास मदत मिळतेच, पण हिवाळ्यात उष्ण स्वभावाचे अन्न सेवन करणे अधिक फायदेशीर असते. उष्ण वीर्याचे अन्न सेवन करण्याचे आणखीही फायदे असतात. 

शरीरातील वात-कफ दोषांचे संतुलन होते. 
आहाराचे पचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते. 
  शरीर ऊबदार राहिल्याने हात-पाय आखडणे, गोळा येणे, दुखणे, मुंग्या येणे वगैरे त्रासांना प्रतिबंध होतो. 
  अग्नी प्रदीप्त झाल्याने आमद्रव्ये, विषद्रव्ये पचायला मदत मिळते. शरीरातील अभिसरण सुधारले की, ही द्रव्ये शरीराबाहेर निघून जाण्यासही मदत मिळते. 

ताजे खा, गरम खा!
ऊब देणाऱ्या, अग्नीला मदत करणाऱ्या आहारात उष्ण वीर्याच्या अन्नाचा समावेश होतो, तसेच अन्न गरम व ताजे असताना सेवन करणेही महत्त्वाचे असते. 
उष्णं हि भुक्‍तं स्वदते श्‍लेष्माणं च जयत्यपि ।
वातानुलोम्यं कुरुते क्षिप्रमेव च जीर्यते ।।
अन्नाभिलाषं लघुताम्‌ अग्निदीप्तिं च देहिनाम्‌ ।।
...काश्‍यप खिलस्थान

अन्न गरम असतानाच खाण्याने, 
  अधिक रुचकर लागते. 
  कफदोषाला जिंकते.
  वाताचे अनुलोमन करते.
  लवकर पचते. 
  शरीराला हलकेपणा देते.
  अग्नी प्रदीप्त करते. 
आणि  अर्थातच शरीराला ऊबदार ठेवण्यास मदत करते. 
वास्तविक सर्वच ऋतूत गरम अन्न खाणेच सयुक्‍तिक असते, पण हिवाळ्यात व पावसाळ्यात आवर्जून ताजे व गरम अन्न खाण्यावर भर द्यायला हवा. 
ऊब देणारी, उष्ण वीर्याची आहारद्रव्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. धान्यामध्ये बाजरी उष्ण वीर्याची असते, त्यामुळे आहारात बाजरीची भाकरी, बाजरीची खिचडी यांचा अंतर्भाव करता येतो. मात्र, बाजरीतील उष्णता बाधू नये म्हणून बरोबरीने तूप, लोणी घेणे आवश्‍यक असते. 

‘ऊब’दार आहार
नेहमीच्या धान्यांपैकी गहू, तांदूळ, ज्वारी यांचे सेवन करता येतेच. मात्र, हिवाळ्यात साध्या भाताऐवजी मसालेभात, फोडणीची खिचडी यांचे प्रमाण वाढवता येते. गव्हाच्या पिठात तिखट, मीठ, हळद वगैरे मसाल्याचे पदार्थ टाकून ठेपले बनवता येतात. ज्वारी-बाजरीची मिश्र भाकरी रुचकर लागते व अधिक चांगल्या प्रकारे पचते. 

दूध, लोणी, ताक, तूप हे रोजच्या खाण्यात असावेत, असे पदार्थ हिवाळ्यातही खाण्यास उत्तम असतात. हिवाळ्यात ऊब मिळावी म्हणून दुधात सुंठ, केशर वगैरे घालता येते. लोण्यामध्ये काळी मिरी, आले, थोडासा लसूण, कोथिंबीर घातली तर ते अतिशय रुचकर लागते आणि शरीराला स्निग्धता व ऊब दोन्ही देऊ शकते. ताकातही आले-पुदिन्याचा रस टाकला, कधी तरी तूप-जिरे-हिंगाची फोडणी दिली तर हिवाळ्यात ऊब टिकण्यास मदत मिळते. 
कडधान्यांमध्ये मटकी, तूर, उडीद, कुळीथ, वाल हे इतर कडधान्यांच्या मानाने उष्ण असतात. प्रकृती आणि पचनशक्‍तीचा विचार करून यांचाही आहारात समावेश करता येतो. 

ऊब टिकवण्यासाठी, ऊब देण्यासाठी मसाल्याचे पदार्थ उत्तम असतात. हळद, आले, हिंग, लसूण, मोहरी, मिरची, कोथिंबीर, मेथ्या, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे मसाल्याचे पदार्थ हिवाळ्यात वापरणे उत्तम असते. भाज्या बनवताना या द्रव्यांची व्यवस्थित योजना केली तर त्या रुचकर होतात, सहज पचतात आणि ऊब देतात. 
भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगा, परवर, कर्टोली, गाजर, मुळा वगैरे भाज्या उष्ण गुणाच्या असतात, मात्र इतर पथ्याच्या भाज्याही मसाल्याचे पदार्थ टाकून रुचकर बनवल्या तर ऊब टिकविण्यास मदत करतात. बदाम, काजू, चारोळी, पिस्ता, अक्रोड हा सुका मेवाही ऊब देण्यास उत्तम असतो. हिवाळ्यामध्ये पचनशक्‍ती उत्तम असताना हे पदार्थ खाताही येतात. प्रकृतीचा विचार करून यांचे प्रमाण ठरवावे लागते. 

गरम पाणी प्या!
ज्वारी-बाजरीच्या भाकरीबरोबर गूळ-तूप खाणे, जेवणात तिळाची चटणी, लसणाची चटणी, ओली हळद-आंबेहळद यांच्यापासून बनविलेले लोणचे यांचा समावेश असणे, तिळाची चिक्की खाणे, सकाळी सुंठ-गूळ-तुपाची गोळी खाणे, रोज डिंकाचा लाडू, मेथीचा लाडू वा अहळिवाचा लाडू खाणे, जेवणानंतर ओवा-तीळ-बाळंतशोपा वगैरे द्रव्यांपासून बनवलेली सुपारी खाणे, भोजनानंतर त्रयोदशगुणी विडा खाणे वगैरे साध्या उपायांनीही हिवाळ्यात ऊब मिळण्यास खूप चांगली मदत मिळते. 

हिवाळ्यात प्यायचे पाणी गरम वा कोमट असणे उत्तम होय. जेवताना गरम पाणी पिण्याने अन्नपचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते. तसेच एरवी सुद्धा गरम पाणी पिण्याने ऊब मिळण्यास मदत मिळते. 

ऊब ही शक्‍तिसापेक्ष असते. रक्‍ताभिसरण नीट होत असले, प्राणशक्‍ती पुरेशा प्रमाणात मिळत असली की शरीरावश्‍यक ऊब टिकून राहते. हिवाळ्यात पचनशक्‍ती सुधारत असल्याने शक्‍ती कमावण्याची मोठी संधी निसर्ग देत असतो. म्हणूनच आयुर्वेदाने हिवाळ्यात ‘रसायन सेवन’ सुचवले आहे. च्यवनप्राश, धात्री रसायन, मॅरोसॅन, आत्मप्राश, ब्राह्मरसायन, अमृतप्राश वगैरे उत्तमोत्तम रसायने शास्त्रोक्‍त पद्धतीने व्यवस्थित बनवली असली, त्यात टाकायची केशर, वेलची, कस्तुरी, सोन्या-चांदीचा वर्ख वगैरे द्रव्ये खरी, शुद्ध, उत्तम प्रतीची असली तर त्यामुळे शक्‍ती वाढते, प्राणशक्‍ती व जीवनशक्‍तीची पूर्ती होते, अर्थातच शरीराला आतून ऊब मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com