आहारविधिविधान 

Ghee
Ghee

आहार सेवन करण्यामागे अनेक वेगवेगळे उद्देश असू शकतात. उदा. भूक भागविण्यासाठी आहार केला जातो, अन्नाचा आस्वाद घेण्यासाठी आहार केला जातो, आदरातिथ्यातही आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण असते. मात्र उद्देश काहीही असला तरी सरतेशेवटी आहारातून शरीराला शक्‍ती मिळणे, सर्व शरीरधातूंचे पोषण होणे हे सर्वांत महत्त्वाचे असते. यासाठी आहारविधी सांगितला जातो. या विधीतील पहिला मुद्दा आहे, 
उष्णमश्नीयात्‌ - अर्थात अन्न गरम व ताजे असावे. 

उष्णं हि भुज्यमानं स्वदते, भुक्‍तं चाग्निमौदर्यमुदीरयति, क्षिप्रं जरां गच्छति, वातमनुलोमयति, श्‍लेष्माणं च परिऱ्हासयति, तस्मात्‌ उष्णम्‌ अश्नीयात्‌ ।....चरकसंहिता विमानस्थान 

अन्न गरम असताना खाण्याने त्याची चव नीट समजते, गरम अन्नामुळे अग्नी संधुक्षित होतो, गरम अन्न लवकर पचते, वायूचे अनुलोमन होते, तसेच कफाचे शोषण होते. तेव्हा पोट साफ न होण्याची तक्रार असणाऱ्यांनी, घशात कफ तयार होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी गरम अन्न सेवन करणे श्रेयस्कर होय. 

स्निग्धमश्नीयात्‌ - म्हणजे अन्न स्निग्ध असावे. या ठिकाणी स्निग्ध म्हणजे तुपकट, तेलकट किंवा तळलेले पदार्थ असा अर्थ अपेक्षित नाही. तर योग्य प्रमाणात स्नेह म्हणजे तूप, लोणी, दही, तेल वगैरे शरीराला वंगण देणाऱ्या वस्तूंचा आहारात समावेश असणे म्हणजे स्निग्ध अन्न सेवन करणे. 
स्निग्धं हि भुज्यमानं स्वदते, भुक्‍तं चानुदीर्णमग्निमुदीरयति, क्षिप्रं जरां गच्छति, वातमनुलोमयति, शरीरमुपचिनोति, दृढीकरोतीन्द्रियाणि, बलाभिवृद्धिमुपजनयति, वर्णप्रसादं चाभिनिर्वतयति, तस्माद्‌ स्निग्धमश्नीयात्‌ ।।....चरकसंहिता विमानस्थान 

स्निग्ध अन्न अधिक रुचकर लागते, अग्नी प्रदीप्त होण्यास मदत करते, स्निग्ध अन्न सहजतेने पचते, वायूचे सुखपूर्वक अनुलोमन करते, शरीराचे योग्य प्रमाणात पोषण करते, इंद्रियांची शक्‍ती वाढवते, एकंदर शरीरशक्‍ती, रोगप्रतिकारशक्‍ती सुधारते तसेच प्रसन्न वर्ण सतेज कांतीचा लाभ होतो. 
म्हणूनच नुसत्या वरण-भातापेक्षा त्यावर तूप घेऊन खाण्याने तो अधिक रुचकर लागतो. अग्नीमध्ये तूप किंवा तेल टाकण्याने जसे अग्नी अजून पेटतो तसाच शरीरस्थ अग्नीसुद्धा अन्नातील स्निग्धतेमुळे प्रदीप्त होतो. योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात स्निग्ध पदार्थ सेवन करण्याने शरीर सुदृढ होण्यास, शरीरबांधा उत्तम राहण्यास मदत मिळते. त्यामुळे वजन वाढण्याच्या भीतीपायी कोरडे अन्न खाण्याची गरज नसते. 
मात्रावत्‌ अश्नीयात्‌ - म्हणजे अन्न योग्य प्रमाणात, मात्रापूर्वक खावे. 
त्रावद्धि भुक्‍तं वातपित्तकफानपीडयदायुरेव विवर्धयति केवलं, सुखं गुदमनुपर्येति, न चोष्माणमुपहन्ति, अव्यथं च परिपाकमेति, तस्मान्मात्रावदश्नीयात्‌ ।।....चरकसंहिता विमानस्थान 

योग्य प्रमाणात सेवन केलेले अन्न वात-पित्त-कफ या दोषांना प्रकुपित करत नाही, उलट दीर्घायुष्याचे कारण ठरते; पोटात गेल्यावर गुदापर्यंत सहजतेने आणि क्रमाक्रमाने व्यवस्थित पोचते. प्रमाणात खाल्लेले अन्न अग्नीला घातक ठरत नाही, तसेच कोणत्याही प्रकारचा उपद्रव न करता सहजतेने पचते. पोटाचे तीन भाग कल्पून त्यातील एक भाग घन पदार्थांनी भरणे, एक भाग पेय पदार्थांनी भरणे आणि उरलेला एक भाग वायूच्या हलनचलनासाठी मोकळा ठेवणे म्हणजे मात्रापूर्वक जेवणे होय. 

जीर्णेऽआग्नियात्‌ - म्हणजे अगोदर खाल्लेले अन्न पचल्यानंतर म्हणजे भूक लागल्यावरच खावे. 

अजीर्णे हि भुञ्जानस्याभ्यवहृतमाहारजातं पूर्वस्याहारस्य रसमपरिणतमुत्तरेणाहाररसेनोपसृजत्‌ सर्वान्‌ दोषान्‌ प्रकोपयत्याशु ।....चरकसंहिता विमानस्थान 

अगोदर खाल्लेले अन्न पचलेले नसतानाच केवळ वेळ झाली किंवा रुचीपोटी पुन्हा आहार केला, तर आधीच्या अन्नातून पूर्णपणे तयार न झालेला आहाररस व नंतरच्या अन्नातून तयार झालेला आहाररस परस्परांशी मिळून तिन्ही दोषांना तातडीने प्रकुपित करतात. या उलट अगोदरचे अन्न नीट पचल्यानंतर अन्न सेवन केल्यास दोष स्वतःच्या स्थानात स्वस्थतेने राहतात. 

अगोदर सेवन केलेले अन्न नीट पचले आहे की नाही हा पुढील लक्षणांवरून समजू शकते. 
- भूक लागते. 
- जेवण करण्याची इच्छा उत्पन्न होते. 
- स्रोतसांची मुखे शुद्ध होतात. 
- शुद्ध ढेकर येतात. 
- मल, मूत्र तसेच वायूचे सुखपूर्वक विसर्जन होते. 

ही लक्षणे उत्पन्न झाल्यावर जेवण करण्याने आयुष्य वाढते व शरीराचे व्यवस्थित पोषण होते. 

आहारविधिविधानाची उर्वरित माहिती आपण पुढच्या वेळी घेऊया. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com