#FamilyDoctor कोजागरीची ‘सोम’प्राप्ती

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Thursday, 1 November 2018

कोजागरीच्या दिवशी चंद्रप्रकाशात ध्यानाला बसून सोमाच्या माध्यमातून आत जाता येईल असे पाहावे. मनाच्या पलीकडे आतमध्ये असलेल्या जिवाला स्पर्श करून, व्यक्‍तिगत आत्म्याला स्पर्श करून त्यापलीकडे असलेल्या परमात्म्यापर्यंत पोचण्याची ही संधी आहे. या ठिकाणी आपल्याला आपण सर्व एक आहोत हा विश्वबंधुत्वभाव अनुभवता येतो. 

कोजागरीच्या दिवशी चंद्रप्रकाशात ध्यानाला बसून सोमाच्या माध्यमातून आत जाता येईल असे पाहावे. मनाच्या पलीकडे आतमध्ये असलेल्या जिवाला स्पर्श करून, व्यक्‍तिगत आत्म्याला स्पर्श करून त्यापलीकडे असलेल्या परमात्म्यापर्यंत पोचण्याची ही संधी आहे. या ठिकाणी आपल्याला आपण सर्व एक आहोत हा विश्वबंधुत्वभाव अनुभवता येतो. 

वेद हे सर्वव्यापी आहेत. संपूर्ण विश्वातील सूर्यमालिका, ग्रहमालिका, नक्षत्र, तारे या सगळ्यांचे एकत्रित ज्ञान, या सगळ्यांचा एकमेकांशी संबंध या संबंधीची अनुभवजन्य माहिती देणारे ते वेद. नुसती कल्पना करून दिलेली माहिती ही प्रत्यक्षात उपयोगी पडत नाही. मनुष्याचे जीवन हा एक अप्रतिम खेळ आहे किंवा असा एक उत्तम मार्ग आहे की ज्या मार्गाने जाताना आनंद अनुभवता येतो आणि मार्गक्रमण पूर्ण झाल्यावर आपण मूळ पदावर पोचतो, जे अक्षय आनंदाचे, परमानंदाचे स्थान आहे. साधारणतः प्रत्येक जण त्यामुळे स्वतःच्या मूळ पदाकडे किंवा घराकडे आकर्षित झालेला असतो. म्हणून वेदांचे आकर्षण आजपर्यंत टिकून आहे. 

वेदामध्ये काही गोष्टीरूपाने सांगितलेले आहे, काही रूपकात्मक रीत्या सांगितलेले आहे. त्यावेळची भाषा वेगळी असल्यामुळे त्यात वर्णन केलेली अस्तित्वे आपल्याला व्यक्‍ती वा देवता वाटतात, त्यासंबंधी काहीतरी गूढ कल्पना केली जाते. परंतु, वेदांच्या अंतरंगात शिरल्यानंतर मनुष्याच्या जीवनासाठी काय उपयोगी आहे हे समजू शकते ते प्रत्यक्ष अनुभव केलेले असल्यामुळे त्यानुसार आचरण केले तर माणसाला शंभर टक्के यश मिळेल, ही खात्री आहे. त्यामुळे कुठूनही गेले तरी वेदांशी संबंध येतोच. 

या वेदांपैकी काही भागाला आयुर्वेद म्हटले जाते. आयु म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे ज्ञान, अर्थात आयुर्वेद म्हणजे जीवनाचे ज्ञान. भारतीय जीवनशैलीतील सकाळी झोपेतून उठणे ही क्रिया पाहू. ‘आपण उठतो’ असे म्हणण्यापेक्षा ‘आपण उठले जातो’ असे म्हणणे अधिक सयुक्‍तिक ठरेल. फार क्वचित वेळी, क्वचित प्रसंगी, क्वचित ठिकाणी मनुष्य झोपेतून स्वतःहून उठतो, अन्यथा उठल्यावर तो म्हणतो ‘मी उठलो’. त्यामुळे या उठण्याच्या क्रियेपासून आयुर्वेद सुरू होतो. झोपेत असताना शरीराची हालचाल कशी होती, कुठल्या नाड्या प्रभावित होत्या, श्वास कसा चालत होता या सगळ्यांचा विचार करून अंथरुणातून बाहेर येताना प्रथम पंचमहाभूतांपैकी पृथ्वीतत्त्वाशी जेथे संबंध येणार असतो तेथे पूर्णांगाने (ज्या बाजूने श्वास चालू असेल, जी 

बाजू कार्यरत आहे तो पाय) जमिनीला स्पर्श करावा, असे सांगितलेले आहे. या प्रक्रियेमध्ये औषध किंवा वैद्य येत नसल्यामुळे ही क्रिया आयुर्वेदाला धरून आहे हे आपल्या लक्षात येत नाही. परंतु, जीवनक्रमात शरीरात बाधा उत्पन्न होऊ नये, मानसिक बाधा येऊ नये किंवा अध्यात्मिक बाधा उत्पन्न होऊ नये, यासाठी परंपरेत असलेल्या अशा गोष्टींचा लाभ होताना दिसतो. 

मनुष्याची वृत्ती बाहेर विश्वाकडे पाहण्याची अधिक असते. या विश्वाच्या पसाऱ्यात असलेले आकर्षण माणसाला मोहीत करत राहते. आनंद मिळवणे हे मनुष्याच्या जीवनाचे लक्ष्य असले तर मनुष्याला मनाच्या, आत्म्याच्या आत कुठेतरी पाहण्याची गरज असते. त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी कुठली शक्‍ती, देवता असेल तर तिचा उत्सव होणे साहजिक आहे. प्रत्येक उत्सवाला आरोग्याबद्दल मार्गदर्शन असते, जसे होलिकापूजनाच्या वेळी पुरणपोळी खाण्याने आरोग्याची काळजी घेतली जाते, तसे शरद पौर्णिमेला असलेल्या चंद्राच्या उत्सवासाठीही आयुर्वेदाने मार्गदर्शन केलेले आहे. म्हणून आयुर्वेद व कोजागरी असा लेखनाचा प्रपंच होतो. 

कोजागरी पौर्णिमेला चंद्रप्रकाशात बसून चंद्राचे प्रतिबिंब ज्यात पडलेले आहे, पर्यायाने ज्यात चंद्राची शक्‍ती ज्यात उतरलेली आहे, असे दूध व खीर यांचे सेवन केली जात असे, चंद्राची पूजा केली जात असे. वेगवेगळ्या मार्गाने चंद्राची पूजा सांगितलेली आहे. सूर्य हा भौतिकाचा तर चंद्र हा मनाचा अधिपती आहे. परमपुरुष परमात्म्याला स्पर्श करून सूर्यालासुद्धा स्पर्श करणारा असा हा चंद्र. चाळणीतून चंद्राकडे पाहणे, चतुर्थीचा चंद्र उगवल्यावर उपवास सोडणे (कारण विशिष्ट वेळी मेंदूत विशिष्ट तरंग असतात) वगैरे व्रते सांगितलेली आहेत. असेच एक कोजागरीचे व्रत. शहरात गर्दी असल्यामुळे चंद्रप्रकाशात बसणे अवघड होत आहे. गच्ची सर्वांची झाली पाहिजे असा नारा पुलंनी दिला व त्या वेळी भाडेकऱ्यांना गच्ची मिळाली, पण प्रत्येकाच्या घरावर गच्ची असेलच असे नाही. तेव्हा कुठेतरी बाहेर बागेत जाऊन, डोंगरावर जाऊन सर्वांनी एकत्र बसून आनंद घ्यायचा व दूध प्यायचे इथपर्यंत ठीक होते. परंतु, नंतर या निमित्ताने धुडगूस घालणे, मोठमोठ्याने गाणी लागणे, बीभत्स नाचणे व बाटलीतील दूध पिणे याला कोजागरी उत्सव साजरा केला असे म्हणता येत नाही. 

भारतीय अध्यात्मशास्त्रात ‘सोम’ ही देवता व ‘सोम‘ हा रस सर्वांत महत्त्वाचा समजला आहे. सोमरस हे नाव मेंदूजलाला दिलेले आहे. मेंदू व आपला संपूर्ण मेरुदंड सोमरसात बुडालेले असतात. सोमरस हाच कर्ता-धर्ता व जीवन चालविणारा महत्त्वाचा घटक असतो. या सोमरसाला कोजागरीच्या दिवशी वृद्धी मिळते. जसे झाडात असलेल्या रसावर पौर्णिमेचा म्हणजेच चंद्राचा परिणाम होतो, तसे या दिवशी शरीरातील सोमरसाचीही वृद्धी होते. त्यामुळे या दिवशी खीर व दूध घेण्याने वर्षा ऋतूनंतर येणाऱ्या शरदात उत्पन्न झालेली शरीराची आग थंड व्हायला मदत होते. ही शारीरिक स्तरावरची उत्तम व्यवस्था सांगितलेली आहेत. मन आनंदित नसताना दूध घेतल्यास अशी शांती होऊ शकत नाही, कारण प्रत्येक अन्नावर व वस्तूवर मनाचा संस्कार होत असतो. या दिवशी सर्वांनी आनंदात एकत्र बसून दूध पिणे ही शारीरिक अवस्था झाली, पण आजच्या कोजागरीच्या दिवशी चंद्रप्रकाशात ध्यानाला बसून सोमाच्या माध्यमातून आत जाता येईल असे पाहावे. मनाच्या पलीकडे आतमध्ये असलेल्या जिवाला स्पर्श करून, व्यक्‍तिगत आत्म्याला स्पर्श करून त्यापलीकडे असलेल्या परमात्म्यापर्यंत पोचण्याची ही संधी आहे. या ठिकाणी आपल्याला आपण सर्व एक आहोत हा विश्वबंधुत्वभाव अनुभवता येतो. म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहे. 

या दिवशी सर्व मोठमोठे संत, अवतार, देवत्वाला पावलेले लोक विचाराने एकत्र येतात व सृष्टीवरील सर्वांना फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करतात. कारण त्या वेळी सोमरसातून निर्माण होणारे तरंग अधिक प्रभावशाली असतात. कोजागरीचा हाही भाव आपण लक्षात घेतला तर भगवंत चंद्राचे मानावेत तेवढे उपकार कमीच आहेत हे आपल्या लक्षात येईल.  

प्रत्येक वस्तू अशा प्रकारे आयुर्वेदाशी जोडलेली असते. आयुर्वेद ही केवळ शरीराच्या आरोग्यासाठी असलेली व्यवस्था नव्हे, तर त्यात संतुलित शरीराबरोबरच संतुलित मन, संतुलित व प्रसन्न आत्मा यांच्याबद्दलही सांगितलेले आहे. या दृष्टीने भारतीय संस्कार म्हणजे ऋषीमुनींनी केलेल्या संशोधनाचे फलित आहे, जे मनुष्यमात्राला अनंतकाळपर्यंत उपयोगी पडेल. अशा दृष्टीने आपण कोजागरीच्या चंद्रोत्सवाकडे पाहिले तर त्यातून पुरेपूर फायदा घेऊ शकू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family Doctor Dr. Balaji Tambe article on kojagiri purnima